भाजप महाराष्ट्रात दंगली भडकावण्याचं काम करत आहे- आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.
1. भाजप महाराष्ट्रात दंगली भडकावण्याचं काम करत आहे- आदित्य ठाकरे
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजप महाराष्ट्रात दंगली भडकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. तसंच आमची हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट असून भाजपच्या हिंदुत्वावर आमचा विश्वास नाही असंही ते म्हणालेत. एनडीटीव्ही ही बातमी दिली आहे.
“आमची हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट आहे. लोक काय खातात यावरून आम्ही त्यांना जाळत नाही. जर हे भाजपचं हिंदुत्व असेल तर हे आम्हाला म्हणजे मला, माझ्या वडिलांना आणि माझ्या आजोबांनाही ते मान्य नाही,” हैदराबादमध्ये ते बोलत होते.
राम मंदिर केंद्र सरकारमुळे बांधले जात नसून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बांधले जात आहे असंही ते यावेळी म्हणाले.
भाजपने 2014 मध्ये शिवसेनेचा विश्वासघात केला, असंही ते म्हणाले.
जर माझ्या आजोबांविषयी त्यांना इतका आदर असता तर त्यांनी उभा केलेला पक्ष संपवण्याचं काम त्यांनी केलं नसतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. हैदराबादमध्ये त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेटही घेतली.
2. आमच्या घरात तसुभरही अंतर नाही - धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Facebok
पंकजा मुंडे आणि माझ्यामध्ये विचाराचं वैर असलं तरी आम्ही आध्यात्मिक ठिकाणी राजकारण करत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलं. आमचे विचार वेगळे असले तरी घरामध्ये मात्र तसूभरही अंतर नसल्याचे मुंडे म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. संत भगवान बाबांच्या नारळी सप्ताहात भारजवाडी गावात मुंडे बहीण-भाऊ एकत्र आले होते. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
यावेळी 'मी भगवान गडाची पायरी' असल्याचं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. तर त्याला प्रतिउत्तर म्हणून धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा मुंडे जर या गडाची पायरी असतील तर त्या पायरीचा मी दगड आहे. गडासाठी कोणी काय केलं हे सर्वांना माहीत आहे.
पंकजामध्ये आणि माझ्यामध्ये एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही आमची राजकीय लढाई वेगळी असल्याचे मुंडे म्हणाले.
लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार नामदेवशास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना इगो दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्यावर बोलताना 'मला कुठलाही अहंकार नाही, मी फक्त गडाची पायरी आहे' असं त्या म्हणाल्या.
3.मला तुरुंगात पाठवा, मी घाबरणार नाही- राहुल गांधी
लोकसभेचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडला गेले. त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपवाले माझं खासदारपद काढून घेऊ शकतात, पण लोकांचं प्रतिनिधित्व करण्यापासून मला रोखू शकत नाहीl असं ते म्हणाले, लोकमतने ही बातमी दिली आहे.
“मी इतक्या वर्षांपासून भाजपच्या विरोधात आहे, पण आजपर्यंत हे लोक मला ओळखू शकले नाहीl. त्यांना वाटतं की माझ्या घरी पोलीस पाठवून ते मला घाबरवतील, पण मी घाबरणार नाही. त्यांनी माझं घर काढून घेतलं याचा मला आनंद आहे. भाजपने मला दिलेली सर्वांत मोठी भेट आहे. काहीही झालं तरी मी देशासाठी लढत राहीन,” असं ते म्हणाले.
4. सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

फोटो स्रोत, Savarkar.com
वि. दा. सावरकर यांचा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी म्हणजेच 28 मे रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.
सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी काढलेल्या उद्गाराच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
'महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील आदर्श महापुरूष म्हणून ते आजही आदरणीय आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे,' असं मंत्री उदय सामंत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
5. भारताचा विकासदर सहा टक्क्यांच्या खाली राहणार
2023-24 या चालू आर्थिक वर्षांसाठी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर 20 आधार बिंदूंनी कमी होऊन 5.9 टक्क्यांपर्यंत घसरेल, असा धोक्याचा इशारा देणारा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला.
याआधी आयएमएफने विकासदर 6.1 टक्के राहण्याचे भाकीत केलं होतं. तथापि, खालावलेल्या या सुधारित अंदाजानंतरही भारतच जगातील सर्वाधिक वेगाने आर्थिक विकास साधणारा देश असेल, असं आयएमएफने स्पष्ट केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन दर्शविणाऱ्या अहवालाने, जागतिक अर्थवृद्धीही 2023 सालात 2.9 टक्क्यांवरून, 2.8 टक्क्यांवर येण्याचं सुधारित अनुमान पुढे आणलं आहे, जे 2022 मधील 3.4 टक्क्यांच्या तुलनेत तब्बल अर्धा टक्क्यांची घसरण दर्शविणारं आहे.
भारताच्या दृष्टीने सरलेल्या आर्थिक वर्षांतील 6.8 टक्क्यांच्या तुलनेत विद्यमान आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था वाढीचा दर 5.9 टक्के असेल. 2024-25 या आगामी आर्थिक वर्षांसाठीचा अंदाजही जानेवारीत वर्तवलेल्या 6.8 टक्क्यांवरून 6.3 टक्क्यांपर्यंत कमी केला गेला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























