जर्मनीच्या या 'मेमसाब' बनल्या भारतीयांच्या 'आपा जान,' हे प्रसिद्ध विद्यापीठ उभारण्यात दिले योगदान

जेरडा फ्लिप्सबॉर्न

फोटो स्रोत, Family of Muhammad Mujeeb

फोटो कॅप्शन, जेरडा फ्लिप्सबॉर्न
    • Author, शेरलीन मोलन
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, मुंबई
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

दिल्लीतील एका मुस्लीम स्मशानभूमीत एक कबर आपलं लक्ष वेधून घेते. या कबरीवर उर्दू भाषेत मजकूर कोरला आहे. मात्र त्याखाली जर्मनीत जन्म झालेल्या जेरडा फ्लिप्सबॉर्न या ज्यू महिलेचं नाव आहे. त्यांच्या नावासमोर ‘आपा जान’ म्हणजे ताई असं संबोधण्यात आलं आहे.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठाचा पाया भारताच्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान घातला गेला होता. या विद्यापीठाच्या संस्थापकांच्या कबरींमध्ये फ्लिप्सबॉर्न यांची कबर उठून दिसते. या नावाजलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाची परंपरा कायम राखली आहे.

आपल्याला आठवत असेल की नरेंद्र मोदी सरकारने 2019 मध्ये वादग्रस्त सुधारित नागरिकत्व कायदा आणला तेव्हा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं होतं.

जेव्हाही या विद्यापीठांच्या संस्थापकांची चर्चा होती तेव्हा फ्लिप्सबॉर्न यांचा विषय हमखास निघतो.

मग प्रश्न असा पडतो की जर्मन ज्यू महिलेने तिच्या मातृभूमीपासून इतक्या दूर असलेल्या या जागी इतकी भावनिक गुंतवणूक कशी केली?

या प्रश्नाचं उत्तर 'मैत्री' आणि या महिलेने घेतलेला 'आयुष्याच्या अर्थाचा शोध' यात दडलेलं आहे, असं ‘जामियाज आपा जान- द मेनी लाइफ वर्ल्डस ऑफ जेरडा फ्लिप्सबॉर्न’ या पुस्तकाच्या लेखिका मार्गारिट परनौ म्हणतात.

परनौ यांनी जवळजवळ दहा वर्षं जामियावर संशोधन केलं. त्यांच्या मते या प्रवासात फ्लिप्सबॉर्न यांचं नाव अनेकदा आलं आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे असं त्या म्हणतात.

आजही अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठातील त्यांच्या योगदानाबद्दल माहिती नाही.

सईदा हमीद या आघाडीच्या कार्यकर्त्या आणि इतिहासकार आहेत. त्या म्हणतात की फ्लिप्सबॉर्न यांच्याविषयी जे लिहिलं गेलं आहे त्याचं भाषांतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि येणार्‍या पिढीचा फायदा होईल.

फ्लिप्सबॉर्न यांची जर्मन मेमसाब (ब्रिटिश काळात परदेशी महिलांविषयी आदराचं संबोधन) ते ‘आपा जान’ होण्यापर्यंतचा हा प्रवास 1933 मध्ये सुरू झाला. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये शिकायला गेलेल्या झाकिर हुसैन, मुहम्मद मुजीब आणि अबीद हुसैन या तीन भारतीय पुरुषांशी त्यांची ओळख झाली.

हे तिघेही जामियाचे मुख्य संस्थापक होते. भारतीय राजकारणाच्या इतिहासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. झाकिर हुसैन तर 1967 मध्ये भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
जेरडा फ्लिप्सबॉर्न

फोटो स्रोत, Margrit Pernau

फोटो कॅप्शन, जेरडा फ्लिप्सबॉर्न यांची कबर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1920 आणि 30 च्या दशकात दोन विभिन्न देशातील लोकांची मैत्री होणं अगदीच दुर्मिळ होतं. तीन पुरुष आणि एक महिला यांच्यातील निखळ, घट्ट मैत्री तर आणखी दूरची गोष्ट होती.

या तिघांचाही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान देईल अशी संस्था उभारण्याबाबत हे तिघेही फ्लिप्सबॉर्न यांच्याशी चर्चा करत असत.

त्या ब्रिटिशकालीन भारतात अगदीच निवडक विद्यापीठं होती. त्यात सरकारी अनुदान नसलेली विद्यापीठे आणखीच कमी होती.

जामियामध्ये मुस्लीम मुलामुलींनी शिकावं म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात ते सक्रिय सहभाग घेऊ शकतील अशी या तिघांची इच्छा होती. या संस्थेमुळे हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील एकता आणि मातृभूमीबद्दलचं प्रेम वाढावं अशीही त्यांची मनोकामना होती.

या समाजपोयोगी योजनेचा फ्लिप्सबॉर्न यांच्यावर खूप परिणाम झाला. त्यांचा जन्म एका सधन कुटुंबात 1895 साली झाला. त्यांचं आयुष्य, त्यांचं भवताल त्यांनी युद्धामुळे, औद्योगिकीकरणामुळे आणि ज्यूंना विरोध यामुळे बदलताना पाहिलं होतं.

शोषण काय असतं? याचा त्यांना अनुभव आला होता. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याची आस आणि परिवर्तनाचा वाहक होण्याच्या इच्छेने झपाटणं म्हणजे काय असतं हे त्यांना कळलं होतं असं परनौ लिहितात.

त्यामुळे जामियाची उभारणी करण्याठी त्यांच्या मित्रांनी बर्लिन सोडलं, फ्लिप्सबॉर्न सुद्धा त्यांच्या मागोमाग आल्या. मात्र आधुनिक बर्लिनमधून दारिद्र्य पसरलेल्या देशात येणं हा सोपा निर्णय नव्हता. झाकीर हुसैन यांनी त्यांना अनेकदा भारतात येण्यापासून थांबवलं होतं यावर परनौ प्रकाश टाकतात.

जामियातील विद्यार्थी तसेच शिक्षकांसमवेत जेरडा फ्लिप्सबॉर्न

फोटो स्रोत, Payam-e ta'lim

फोटो कॅप्शन, जामियातील विद्यार्थी तसेच शिक्षकांसमवेत जेरडा फ्लिप्सबॉर्न
लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

“फ्लिप्सबॉर्न यांनी अनेकदा झाकिर हुसैन यांच्यासमोर एकत्र काम करण्याचा प्रस्ताव दिला आणि झाकिर यांनीही अनेकदा त्यांना इशारा, सल्ला दिला आणि भारतात न येण्याबद्दल सूचना केली.

दरम्यान भारतात तेव्हा पडदा पद्धत अस्तित्वात होती. अशा परिस्थितीत फ्लिप्सबॉर्न यांच्यासारखी, तरुण, अविवाहित, कोणाचीही सोबत नसलेली ही मुलगी जामियात कशी रुळेल याची मुहम्मद मुजीब यांना काळजी वाटत होती, असंही त्या लिहितात.

मात्र इतक्या सूचना देऊन सुद्धा फ्लिप्सबॉर्न भारतात आल्या.

अगदी काही महिन्यातच त्यांनी जामियाच्या लोकांशी मैत्री केली तसंच जामिया विद्यापीठाच्या प्राथमिक शाळेत शिकवायलाही सुरुवात केली. इतर शिक्षकांप्रमाणेच त्याही अत्यल्प पगारावर काम करू लागल्या आणि संस्थेची सेवा करण्यासाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार केला.

त्यांना जर्मनीच्या बालवाडीत शिकवण्याचा अनुभव होता. शिक्षण कसं आनंददायी करता येईल याची त्यांना जाण होती. याच अनुभवाचा वापर त्यांनी जामियामध्ये केला. जेव्हा त्यांची हॉस्टेलच्या वॉर्डन म्हणून नेमणूक झाली तेव्हा त्या तिथल्या मुलांच्या आपा जान झाल्या. परनौ लिहितात.

त्या मुलांचं सगळं करायच्या. केस धुऊन देणं, केसांना तेल लावून देणं हे सगळं करायच्या. मनाने आणि शरीरानेही त्या मुलांच्या अगदी जवळ होत्या.

“जेव्हा लहान मुलं आजारी पडायची तेव्हा फ्लिप्सबॉर्न त्यांची इतकी काळजी घ्यायच्या की मुलांना आपल्या आईची आठवण यायची नाही” परनौ लिहितात.

जामिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जामिया विद्यापीठ प्रवेशद्वार (संग्रहित)

फ्लिप्सबॉर्न यांनी मुलींना आणि स्त्रियांना समाजात जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी पायम- ए- तालीम या लहान मुलांच्या मासिकाच्या संपादकीय टीम मध्ये सामील झाल्या तेव्हा त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यात स्त्रियांचे छंद, विविध गोष्टींची आवड याबद्दल लिहिलं आणि मुलींना या मासिकात जास्तीत जास्त लिहिण्यासाठी उद्युक्त केलं.

लहान मुलांबरोबरच विद्यापीठाच्या संस्थापकांना निधी उभारणीसाठीही त्यांनी मदत केली. त्यांच्यासाठी भाषणं लिहिली, अध्यापन आणि राजकारण या विषयाशी निगडित सर्व मुद्यांसाठी फ्लिप्सबॉर्न या संस्थापकांचा बुलंद आवाज झाल्या.

त्या भारतात आल्यानंतर सात वर्षांनी त्यांच्या कामात एक अडथळा आला.

जर्मनी आणि ब्रिटन यांच्यात युद्ध झाल्यानंतर ब्रिटिशकालीन भारतातील जर्मन नागरिकांना संशयास्पद नजरेनी पाहिलं जाऊ लागलं. त्यांना अटक होऊ लागली. त्यांना विविध छावण्यांमध्ये कैदेत ठेवण्यात आलं. तिथे परिस्थिती अतिशय बिकट होती. अपुरं पाणी, अन्न, ब्लँकेट, चादरी अशा अनेक गैरसोयींचा त्यांना सामना करावा लागला.

जामिया विद्यापीठ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जामिया विद्यापीठ (संग्रहित )

1940 साली फ्लिप्सबॉर्न यांना अशाच एका छावणीत नेण्यात आलं. त्यांना कैदेत ठेवण्यात आलं. त्यांना अधिकारी त्यांना जर्मनीला नेतील अशी भीती वाटायला लागली. कारण त्याच काळात हिटलर ज्यूंचे शिरकाण करत होता.

त्यामुळे या छावणीत आल्यापासून जीव जातो की काय अशीच भीती त्यांना वाटू लागली. पण त्याही परिस्थितीत तिथल्या कैद्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्या छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करू लागल्या. जे लोक आजारी पडले त्यांची सेवा करू लागल्या.

मात्र, या छावणीत आणल्यानंतर त्यांना काही महिन्यातच पोटात अल्सरचा त्रास सुरू झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा छावणीत आणण्यात आलं. तिथे त्या वर्षभर राहिल्या.

त्यांची सुटका झाल्यावर त्या जामियात परतल्या आणि आपलं काम सुरू ठेवलं. पण त्यांच्या अल्सरचं कॅन्सरमध्ये रूपांतर झाल्यामुळे आधीसारख्या तडफेने त्या काम करू शकत नव्हत्या. त्या अशक्त होऊ लागल्या. मात्र पायम-ए-तालीम या मासिकाच्या माध्यमातून मुलांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होत्या.

एप्रिल 1943 मध्ये फ्लिप्सबॉर्न यांचं निधन झालं. जामिया परिवारातील सदस्यांसाठी असलेल्या स्मशानभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला.

“त्यांच्या कुटुंबापासून हजारो मैल अंतरावर त्यांचा मृत्यू झाला. मात्र ज्या लोकांचं त्यांच्यावर निरतिशय प्रेम होतं ते लोक त्यांच्याबरोबर शेवटच्या क्षणी होते,” अशा शब्दात हमीद यांनी फ्लिप्सबॉर्न यांना श्रद्धांजली वाहिली.

त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा वारसा ‘आपा जान’ म्हणून अजूनही जामियाच्या कानाकोपऱ्यात आहे. तिथल्या हॉस्टेल आणि पाळणाघराला त्यांचं नाव दिलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)