एस. एच. रझा यांचं अडीच कोटी रुपयांचं पेंटिंग कोणी चोरलं?

एस. एच रझा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एस. एच रझा
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मुंबईच्या कलाविश्वाला मोठा धक्का बसला जेव्हा जागतिक दर्जाचे आधुनिक (मॉडर्निस्ट) भारतीय शैलीचे चित्रकार सय्यद हैदर रझा यांचं एक महत्वाचं चित्र गहाळ झाल्याचं मंगळवारी उघड झालं.

1992 साली रझा यांनी चितारलेल्या या पेंटिंगचं नावं आहे 'प्रकृती'. रझा यांचं चित्र असल्यामुळे या चित्राचं कलात्मक मूल्य मोठं आहेच, पण बाजारात या चित्राची किंमत अडीच कोटी रुपये इतकी आहे.

मुंबईतल्याच एका चित्राचा लिलाव करणाऱ्या खाजगी संस्थेच्या ताब्यात हे चित्र होतं. ते ज्या वेअरहाऊसमध्ये ठेवलं होतं, तिथं नाही असं समजलं तेव्हा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी आता अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

मूळचे मध्यप्रदेशचे असणारे पण 1940 च्या दशकात मुंबईत येऊन, इथल्या प्रसिद्ध जे जे कला महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या रझा यांना आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक असं म्हटलं जातं.

इथे मुंबईत भेटलेल्या मकबूल फिदा हुसेन, सुझा या समकालीन चित्रकारांच्या साथीने त्यांनी 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप' स्थापन केला होता, ज्यांचं काम आधुनिक भारतीय चित्रकलेत अत्यंत मोलाचं आणि क्रांतिकारी मानलं जातं.

2016 मध्ये रझा यांचं निधन झालं, पण आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी शेकडो महत्वाची चित्रं काढली.

युरोप-अमेरिकेसह जगभरच्या महत्वाचा कला प्रदर्शनांमध्ये आजही त्यांची पेंटिंग्स प्रदर्शित होत असतात आणि ती कोट्यावधी रुपयांना विकली जातात. त्यापैकीच एक हे चोरीला गेलेलं 'प्रकृती' नावाचं हे चित्र होतं, जे रझा यांनी 1992 मध्ये कॅनव्हासवर चितारलं होतं .

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

24 मार्च 2022 मध्ये हे पेंटिंग शेवटचं पाहिलं गेलं होतं.

रझा यांची विविध चित्रं वेगवेगळ्या लिलावांमध्ये विकली गेली आहेत आणि त्यांचे सध्याचे मालकही वेगवेगळे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 'प्रकृती' या चित्राची मालकी इंद्रा वीर यांच्याकडे होती.

त्यांनी हे चित्र फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबईच्याच 'ऍस्टागुरु ऑक्शन हाऊस' या एका लिलाव करणाऱ्या संस्थेला लिलाव करण्यासाठी दिलं होतं. तेव्हापासून या चित्राचा ताबा या संस्थेकडेच होता.

या 'ऍस्टागुरु ऑक्शन हाऊस'च्या फोर्ट भागातल्या बेलार्ड पीअर इथं असलेल्या एका गोडाऊनमध्ये हे चित्र तेव्हापासून होतं. त्यानंतर जवळपास 2 वर्षं ते कुठंही प्रदर्शित केलं गेलं नाही.

24 मार्च 2022 रोजी एका गिऱ्हाईकाला दाखवण्यासाठी हे चित्र शेवटचं बाहेर काढण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. त्याच वेळेस शेवटचं रझा यांच्या 'प्रकृती' या कलाकृतीला प्रत्यक्ष पाहिलं गेलं.

हे चित्र परत गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलं होतं. या वर्षी मार्च 2024 मध्ये इंद्रा वीर यांनी पुन्हा एकदा हे पेंटिंग 'ऍस्टागुरु ऑक्शन हाऊस'ला लिलावासाठी उपलब्ध करायला सांगितलं होतं. ते करण्यासाठी जेव्हा या आठवड्यात या संस्थेनं ठरवलं आणि गोडाऊनमध्ये पाहिलं, तेव्हा हे चित्र तिथून गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

'ऍस्टागुरु ऑक्शन हाऊस'च्या मुख्य प्रशासकीय अधिकारी सिद्धांत शेट्टी यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे.

एस. एच रझा

फोटो स्रोत, Getty Images

"आमचा तपास सुरु आहे. सध्या आम्ही इथल्या सगळ्या काम करणाऱ्या किंवा पूर्वी करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करतो आहे. गोडाऊन भवताली 15 सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. त्यातून काही हाती येतं आहे का ते पाहतो आहोत. पण जवळपास 2 वर्षांचा हा कालावधी आहे आणि सीसीटीव्ही फूटेज काही महिन्यांचंच असतं. त्यामुळे आव्हान आहे," असं या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक प्रदीप मोरे यांनी 'बीबीसी मराठी'शी बोलताना सांगितलं.

आम्ही या चित्राचा लिलाव करण्यासाठी अधिकृत असलेल्या 'ऍस्टागुरु ऑक्शन हाऊस'शी सुद्धा संपर्क करुन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कार्यालयातून कोणत्याही प्रतिक्रियेसाठी असमर्थता व्यक्त करण्यात आली.

त्यांच्या वेबसाईटनुसार या लिलाव संस्थेकडे रझा यांच्यासमवेत एफ. एन. सुझा, मकबूल फिदा हुसेन, तय्यब मेहता यांसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांची कोट्यवधी रुपयांची चित्र लिलावासाठी असल्याचं दिसतं.

सय्यद हैदर रझा

फोटो स्रोत, Getty Images

ज्येष्ठ कला समीक्षक सतीश नाईक कलाव्यवहार, चित्रांची चोरी आणि त्यांची किंमत याबद्दल म्हणतात, "रझा, हुसेन, सुझा या सगळ्यांनी मिळून ज्या काळात ही कामं सुरु केली तेव्हा या चित्रांना काही किंमत मिळत नसे. 50.60.100 रुपये अशा किंमतीला ती विकली जायची. त्यानंतर 1952 जहांगीर कलादालन सुरु झालं, तेव्हा लोकांना चित्रांची किंमत कळू लागली.

"पुढे 90 च्या दशकात जेव्हा जागतिकीकरण झालं, मग एक वेगळीच लाट आली आणि चित्रांच्या किंमती भराभरा वाढू लागल्या. श्रीमंत लोक त्यात गुंतवणूक करु लागले. सोन्यापेक्षाही या चित्रांची किंमत त्यांना जास्त वाटू लागली. मग लिलाव सुरु झाले. ते करणाऱ्या कंपन्या जेव्हा भारतात आल्या तेव्हा चित्रांच्या किंमती कोट्यावधीं गेल्या. हे कलाकार निर्विवादपणे मोठे आहेत आणि त्यांची चित्रंही, पण त्यातला व्यवहार हा वेगळा भाग आहे. त्यात एका प्रकारची स्पर्धाच सुरु झाली. त्या स्पर्धेतूनच मग वाईट गोष्टी येऊ लागल्या. खोटी पेंटिंग्स वगैरे. त्यातलाच हा चोरीचा भाग आहे. कला क्षेत्रात चोऱ्या पूर्वी झाल्या आहेतच. पिकासो, गॉग यांची चित्रंही चोरीला गेली आहेत. ते आपल्याकडेही आलं. आता हे रझाच्या चित्राचंही कोण्यातरी माहितगारानंच हे केलं असणार."

भारतीय आधुनिक चित्रकलेचे भीष्माचार्य : एस एच रझा

सय्यद हैदर रझा हे भारतीय आधुनिक चित्रशैलीत त्यांच्या अमूर्त चित्रकला (abstract works) या प्रकारातल्या त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. आपल्या चित्रांत त्यांनी वापरलेले भौमितिक आकार, त्यातली रंगसंगती आणि त्याला असलेली अध्यात्मिकतेची किनार, ही खास वैशिष्ट्यं. चित्रांमध्ये बिंदू, प्रकृती पुरुष, कुंडलिनी, पंचतत्व, त्रिभुज आदी संकल्पना त्यांनी आणल्या.

रझा यांचा जन्म 1922 साली सध्या मध्यप्रदेशात असणाऱ्या बाबरिया इथे झाला. त्यांचं सुरुवातीचं कलाप्रशिक्षण नागपूरच्या कला विद्यालयात झालं. त्यानंतर ते मुंबईच्या प्रसिद्ध जे. जे. कला महाविद्यालयात आले जिथे त्यांचं 1943 ते 1947 दरम्यान कलाशिक्षण झालं.

जे. जे. कला महाविद्यालयातच ते आधुनिक भारतीय शैलीचे जनक मानले गेलेल्या मकबूल फिदा हुसेन, सुझा, के. एच. आता अशा त्यांच्या समकालीन चित्रकार सहकाऱ्यांना भेटले आणि पुढे त्यांनी एकत्र 'प्रोग्रेसिव्ह आर्स्टिस्ट ग्रुप' स्थापन केला. या सगळ्याच चित्रकारांनी भारतीय चित्रकलेला नवं वळण दिलं.

"रझांची सुरुवातीची चित्रं ही लँडस्केप्स किंवा मूर्त प्रकारातली होती. त्यानंतर जी त्यांची बिंदू किंवा भौमितिक रचनांमधून जी चित्रं तयार झाली ती एका अध्यात्मिक धारणेतून तयार झालेली आहेत. मला स्वत:ला ती अमूर्त वाटत नाहीत. ते सांकेतिक काम आहे. पानं, फुलं आणि सृष्टी यातूनच त्यांना लागलेली ती संगती आहे जी पुढच्या चित्रांमध्ये येते. मला त्यांची चित्रं बघतांना 'कबीरा'ची आठवण येते. इथली माती, इथली संस्कृती आणि इथल्या सगळ्या अध्यात्मिक परंपरा त्यातून रझांनी त्यांची भाषा तयार केली आहे. ते त्यांचं संचित आहे. हा आपला कलाकार वाटतो. त्याच्याशी चटकन नाळ जोडता येते. म्हणून रझा मोठे आहेत," प्रसिद्ध चित्रकार संजीव खांडेकर रझांच्या चित्रांबद्दल बोलतांना म्हणतात.

रझा 1950 मध्ये एका शिष्यवृत्तीच्या निमित्तानं फ्रान्समध्ये गेले आणि तिथे त्यांच्या जगभरातल्या आघाडीच्या चित्रकारांशी संपर्क आला. त्यानंतरचा बहुतांश आयुष्याचा काळ त्यांनी फ्रान्समध्येच घालवला, पण भारताशी असलेले संबंध कधीही तोडले नाहीत. या दोनही देशांनी त्यांना आपला पुत्र म्हणून सतत सन्मान दिला.

त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. 1956 मध्ये 'Prix de la critique' हा सन्मान मिळणारे ते पहिले बिगर फ्रेंच नागरिक होते.

भारत सरकारनं त्यांना 1981 मध्ये पद्मश्री, 2007 मध्ये पद्मभूषण आणि 2013 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं. 2015 मध्ये फ्रेंच सरकारनं त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'लीजन ऑफ ऑनर'नं गौरवलं.

2016 मध्ये रजा यांचं निधन झालं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)