You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी नितीन देसाईंना म्हणाले होते, 'स्टुडिओसाठी दिडशे नाही तर पाचशे एकर जागा देतो, गुजरातमध्ये येऊन बनव'
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
प्रसिद्ध चित्रपट आणि कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या 57व्या वर्षी आयुष्य संपवलं.
कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली.
चित्रपट आणि मालिकांचे भव्यदिव्य आणि अगदी खरे वाटणारे सेट्स, अनेक चित्रपटांसाठी त्यांनी आर्ट डायरेक्टर म्हणून केलेलं काम, इव्हेंट्स आणि रॅलीजसाठी त्यांनी उभारलेले मंच यामुळे नितीन देसाईंचं नाव नेहमी कौतुकाने घेतलं जायचं.
हे सगळं करत असताना त्यांनी स्वत:चा जागतिक दर्जाचा स्टुडिओ उभारण्याचं स्वप्न पाहिलं आणि एनडी स्टुडिओच्या रुपाने ते पूर्णही केलं. नितीन देसाईंच्या याच एनडी स्टुडिओच्या निर्मितीमागची गोष्ट जाणून घेऊया.
रायगड जिल्ह्यातील एनडी स्टुडिओ
कर्जत शहराच्या जवळ साधारणपणे 52 एकर परिसरात एनडी स्टुडिओ आहे. 2005 साली या स्टुडिओचं उद्घाटन झालं.
तेव्हापासून इथे बऱ्याच चित्रपट, मालिका, रिएलिटी शोचं चित्रीकरण झालं. नितीन चंद्रकांत देसाई यांनी हा एनडी स्टुडिओ उभारला.
कालांतराने हा स्टुडिओ 2018 सालापासून सर्वसामान्यांसाठी बघण्यासाठीही सुरू करण्यात आला. तिकिट काढून सर्वसामान्य लोक या विस्तिर्ण पसरलेल्या आवारात फेरफटका मारू शकत होते.
महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर कर्जतमधली एक पर्यटकांचं एक आकर्षण म्हणून या स्टुडिओचं नाव नमूद केलेलं आहे.
या आवारात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स अशी व्यवस्था असल्याचंही त्यात म्हटलेलं आहे.
कला दिग्दर्शनानंतर स्वत:च्या स्टुडिओ निर्मितीचं स्वप्न
अनेक सुप्रसिद्ध आणि सुपरहिट चित्रपटांचं यशस्वी कला दिग्दर्शन केल्यावर नितीन चंद्रकांत देसाई यांना स्वत:चा स्टुडिओ असावा असं का वाटलं यामागेही काही किस्से आहेत.
आतापर्यंत त्यांनी दिलेल्या मुलाखतींमधून देसाईंनी त्याचा उलगडा केलेला आहे.
एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी एनडी स्टुडिओची आयडीया कशी आली याचे किस्से सांगितले.
“दिग्दर्शकाचं व्हिजन आणि निर्माते (बजेट) यांना एकत्र आणायचं तर स्टुडिओ असावा असं मला वाटलं. आँलिव्हर स्टोन नावाचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता भारतात आला होता. त्याला दोन आँस्कर मिळालेले आहेत. त्याला भारतात 650 कोटींचा अलेक्झांडर द ग्रेट हा चित्रपट करायचा होता.
अलेक्झांडर चित्रपटासाठी माझी निवड झाली. अलेक्झांडर आणि पोरसमधलं जे युद्ध आहे ते करायचं होतं. भारतात हत्ती असल्याने आपल्याकडे ते करता येण्यासारखं होतं. सगळं फायनल झालं. दुसऱ्या दिवशी ते जाणार होते. तर ते मला म्हणाले की जाण्याच्या आधी जिथे हे सेट बनणार ती फिल्मसिटी मला बघायची आहे.
आम्ही तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळाली किंवा ज्या पद्धतीने त्यांना ते पटलं नाही आणि अपुऱ्या सोयीसुविधांमुळे त्यांनी ते काम मोरोक्कोमध्ये केलं.
मोरोक्कोमध्ये मी गेलो. भारतात सर्वात जास्त चित्रपट बनतात तरिही हा माणूस मोरोक्को मध्ये का गेला असा प्रश्न पडला. त्यानंतर मला ध्यास लागला. मी मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, मुंबई-अहमदाबाद जो दाखवेल त्या पद्धतीने जागा बघायला सुरुवात केली.
त्यानंतर 60 जागा बघितल्यानंतर मला ही जागा मिळाली,” असं नितीन देसाईंनी सांगितलं.
जेव्हा मोदींनी देसाईंना गुजरातमध्ये स्टुडिओ काढण्याची ऑफर दिली होती
2003 साली नितीन देसाईंनी मोदींची एक रॅली मुंबईत डिजाईन केली. यामध्ये मोदी हे एका भव्य कमळामधून बाहेर पडतात अशी संकल्पना होती.
या यशस्वी प्रयोगानंतर नरेंद्र मोदी हे देसाईंच्या कामाने प्रभावित झाले.
"मोदींनी मला भेटायला बोलावलं. त्यावेळात त्यांनी विचारलं की तुला पुढे काय करायचं. माझ्याकडे स्टुडिओच्या संकल्पनेचं प्रेझेंटेशन होतं. ते त्यांना दाखवलं. ते पाहिल्यावर ते मला म्हणाले की, महाराष्ट्र जिथे संपतो आणि राजस्थान जिथे सुरु होतो तो सगळा गुजरात तुझा आहे. ते म्हणाले की मी तुला दिडशे नाही तर पाचशे एकर देतो. गुजरातमध्ये येऊन बनव. पण मी महाराष्ट्रातल्या जागेवर ठाम राहिलो,” असं नितीन देसाई माझा कट्टयावर सांगितलं.
एनडी स्टुडिओची सुरुवात आणि विस्तार
देसाईंच्याच सांगण्यानुसार त्यांचा स्टुडिओ उभारण्यामागचा उद्देश हा प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याला एक पुरक आणि योग्य जागा उपलब्ध व्हावी ही पण होती. चित्रपटाचा आशय छोटा असो की मोठा, सेट भव्य लागणार असो की लहान, बजेट जास्त असो की कमी, त्यांना एक सर्वसमावेशक जागा उपलब्ध करुन देता यावी अशीही त्यांची इच्छा होती असं देसाई सांगत.
एनडी स्टुडिओ बनवताना, त्यांनी परदेशातल्या मोठ मोठ्या नामांकित स्टुडिओ जसे की, वॉर्नर ब्रदर्स, डिस्ने स्टुडिओ, युनिव्हर्सल स्टुडिओ यांची उदाहरणं डोळ्यासमोर ठेवली होती.
2005 साली एनडी स्टुडिओची सुरुवात झाल्यानंतर तिथे परदेशी चित्रपटांचं चित्रीकरणाचे करार झाले असं जुन्या रिपोर्टवरुन समोर येतं. त्याचसोबत स्टुडिओचा विस्तारासाठी यासाठी रिलायंस कंपनीसोबत करार झाल्याचेही रिपोर्ट आहेत.
2008 सालच्या मिंट या वृत्तपत्राने दिलेल्या एका बातमीनुसार एनडी स्टुडिओ आणि 20th सेंच्यूरी फाँक्स यांमध्ये दहा वर्षांसाठी ४ जागा भाड्याने घेण्याबद्दल करार झाला. वाँल्ट डिज्ने कडून सुद्धा 10 आठवड्यांसाठी शुटींगसाठी करार करण्यात आला.
यानंतर एनडी स्टुडिओ हा सामान्य लोकांना बघण्यासाठी ओपन करण्यात आला. देसाईंच्या शब्दात सांगायचं तर तो पांढरा हत्ती होता. त्यांना तो ऍक्टिव्हेट करायचा होता.
“मला जाणवलं, जर दहा लोकांचं कुटूंब असेल तर त्यातल्या आठ लोकांना बाँलिवूड आवडतं. बऱ्याच लोकांना हौस असते. आताही अमिताभजींच्या घरासमोर किंव सलमानच्या घरासमोर लोकं जमतात. त्यांच्यासाठी स्टार म्हणजे देवच असतो. तर मला वाटलं की त्यांना ती संधी का उपलब्ध करुन देऊ नये. मग मी तो अभ्यास केला. शुटींगच्या लोकांना डिस्टर्ब व्हायला नको आणि लोकांनाही फिरता यायला पाहिजे. याला खूप छान प्रतिसाद मिळाला,” असं देसाईंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
या स्टुडिओच्या निर्मीतीसाठी मी स्वत:ला गहाण ठेवलं आहे असं देसाईंनी सांगितलं.
एनडी स्टुडिओमध्ये विद्यापीठ करण्याचं स्वप्न
देसाईंचं स्वप्न फक्त स्टुडिओ उभारुन संपलं नव्हतं. तर त्याच्या विस्तारामधला आणखी एक महत्त्वाचा टप्पा त्यांच्या डोक्यात होता. तो म्हणजे की, तिथे एक विद्यापीठ उभारणं.
जिथे नव्या पिढीला चित्रपटसृष्टीतल्या कला आणि क्राफ्टचं प्रशिक्षण मिळेल. त्यांनी सहा कोर्सेसची सुरुवात केली होती.
“माझा प्रयत्न राहिल की जीवात जीव असेपर्यंत वेगवेगळ्या संधी घ्यायच्या. मी असिस्टंट आर्ट डायरेक्टर होतो. मग आर्ट डायरेक्टर झालो. मग प्रोडक्शन डिझाईनर झालो. मग प्रोड्यूसर झालो. मग अॅक्टर झालो. त्यानंतर स्टुडिओ निर्मितीमध्ये आलो. पुढचा टप्पा काय असावा असं डोक्यात आहे. कलेच्या विश्वात एक कलेची युनिवर्सिटी व्हावी ही इच्छा आहे. विनोद तावडे, उदय सामंत, अमित देशमुख, सगळ्यांसमोर झोळी पसरून ऊभा आहे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये 28 क्राफ्ट आहेत. त्यांना एक करणारी एक विद्यापिठ नसावं हे वाईट वाटतं. त्यामधून तरुणांना शिक्षण आणि संधी मिळाव्यात. मी सध्या ध्यास घेतला आहे की, सध्या सहा कोर्सवरुन 28 कोर्सवर न्यावेत,” असं देसाईंनी या मुलाखतीत सांगतिलं.
एनडी स्टुडिओचं वैशिष्ट्य
ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर सांगतात की, एकाच ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध व्हाव्यात असा देसाईंचा प्रयत्न होता.
“एनडी स्टुडिओचा परिसर विस्तीर्ण आहे. तिथे डोंगर आहे. पाणी आहे. मागे रेल्वे ट्रॅक आहे. सपाट भूभाग आहे. यामुळे कुठलंही लोकेशन उभारता यावं यासाठी तिथे सोयी आहेत. नितीन हा प्रचंड मेहनती आणि अगदी तपशिलात जाऊन अभ्यास करणारा होता. त्याच्या सेटवरही तो तशीच मेहनत घ्यायचा. पण त्याचं अजून एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे, की आउटडोर लोकेशन शोधण्यासाठीही तो खूप फिरायचा. त्यासाठी तेवढीच मेहनत घ्यायचा,” असं दिलीप ठाकूर यांनी बीबीसी मराठी सोबत बोलतान सांगितलं.
लॉकडाऊन आणि एनडी स्टुडिओमध्ये लागलेली आग
कोरोना काळात लाँक़डाऊन असताना एनडी स्टुडिओतल्या जोधा अकबरच्या सेटला आग लागली होती. तसंच लॉकडाऊनमुळे स्टुडिओमधल्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या.
“मध्यंतरी जोधा अकबरच्या सेटवर आग लागली होती. लाँकडाऊन असल्यामुळे फक्त 20 सिक्युरिटी स्थाफ तिथं होता. रेल्वे ट्रॅक जवळचं गवत जाळायचं म्हणून त्या काँन्ट्रॅक्टरने ती आग लावली. ती फोफावत गेली. आमच्याकडे मनुष्यबळ नव्हतं.
मी तिथे पोहोचेपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या होत्या. त्या तीस फूट आगीच्या ज्वाळांमधून माझं तीस वर्षांच्या कामातला एक भाग भस्म झालं. मी त्यांना सांगितलं की, नुकसान भरपाई देऊन हे भरुन यण्यासारखं नाही. एनडी स्टुडीओ हा मी स्वत:ला गहाण टाकत, स्वत:चं आयुष्य समर्पित करत बनवलेला आहे. मी बाकी काही केलं नाही.
मी माझ्या बायको मुलांना माझ्या आई-वडिलांना एवढा वेळ दिला नाही जेवढा माझ्या करिअरला आणि माझ्या स्टुडिओला दिला. हे मी केलं ते कलेसाठी. तसा त्या कलेकडून मला काही सपोर्ट नाही.
सगळ्यांना वाटतं हा करतोय. पण कसा करतोय हे जाणवत नाही. मला माझ्यापेक्षा कलाकरांविषयी जास्त वाटतं,” असं नितिन देसाईंनी याविषयी बोलताना सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)