होमिओपॅथी विरुद्ध मॉडर्न मेडिसिन वाद का होतोय? होमिओपॅथीचा इतिहास आहे तरी काय?

    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, पुणे
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे होमिओपॅथी पुन्हा एकदा चर्चेत आली.

पण होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय?

याची सुरुवात खरंच कुठून झाली?

आणि होमिओपॅथी विरुद्ध मॉडर्न मेडिसिन हा वाद आहे तरी काय?

या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोतच. तत्पूर्वी, हा सगळा वाद जिथून सुरू झाला, तो सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी अर्थात CCMP चा वाद काय आहे, ते जाणून घेऊ.

CCMP कोर्सचा वाद

1973 मध्ये होमिओपॅथीला भारतात मान्यता देणारा एक केंद्रीय कायदा संमत झाला.

आज देशभरात होमिओपॅथीचे दवाखाने आहेत. वेगळी उपचार केंद्रही आहेत.

तुमच्याही अवतीभवती लोक अस्थमा, संसर्ग, ताप, तणाव आणि नैराश्यासारखे मानसिक आजार, अ‍ॅलर्जी, अ‍ॅसिडिटी आणि अगदी संधिवातावरही होमिओपॅथी उपचार घेत असतील.

महाराष्ट्र मेडिकल काउंसिल अ‍ॅक्टनुसार MBBS झालेल्या डॉक्टरांनाच मुळात मॉडर्न मेडिसीन देऊन उपचार करण्याची परवानगी आहे.

2016 मध्ये नाशिकस्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) महाराष्ट्रात MBBS न झालेल्या इतर डॉक्टरांसाठीही एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स सुरू केला. Certificate Course in Modern Pharmacology (CCMP) असं त्या कोर्सचं नाव. हा कोर्स पूर्ण केल्यावर हे डॉक्टर इतर औषधंही रुग्णांना प्रिस्क्राईब करू शकतात.

पण इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) या डॉक्टरांच्या संघटनेने या कोर्सला कायमच विरोध केलाय, तर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीसह इतर शाखांच्या डॉक्टरांनी या कोर्सद्वारे आपल्याला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर (RMP) म्हणून मान्यता मिळावी, यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली आहेत.

याच मागणीला नुकताच हिरवा कंदिल मिळाल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने (MMC) होमिओपॅथी डॉक्टरांचीसुद्धा RMP म्हणून नोंदणी सुरू केली. आणि यावरूनच आत्ता डॉक्टर पुन्हा संपावर गेले होते.

होमिओपॅथी विरुद्ध अ‍ॅलोपॅथी

होमिओपॅथी विरुद्ध मॉडर्न मेडिसिन हा वाद फक्त भारतातच नाहीये. युकेमध्येही नॅशनल हेल्थ सर्व्हिसचं म्हणणं आहे की, "होमिओपॅथी एखाद्या आजारावर उपचार करूच शकते, याचे ठोस आणि दर्जेदार पुरावे उपलब्ध नाहीत."

पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठात फार्मॅकोलॉजी (औषधी आणि त्यांचा उपचारात वापर) विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय दाभाडे सांगतात, "मॉडर्न मेडिसीनमध्ये आम्ही रुग्णाची लक्षणं पाहून ती औषधं आज देतो, ज्याने तो लवकर बरा होईल. ती औषधं संशोधन आणि पुराव्यांवर आधारित असतात. एका विशिष्ट क्लिनिकल ट्रायलनंतर, प्राण्यांवर आणि रुग्णांवरही चाचणी केल्यानंतर त्याच्या प्रभावीपण अभ्यासल्यानंतर FDIची मंजुरी मिळते, मग ही औषधं बाजारात विकली जातात. होमिओपॅथीच्या बाबतीत हे पुरावे आणि हा रिसर्च होताना दिसत नाही."

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "होमिओपॅथी आणि इतर शाखांच्या डॉक्टरांनी त्यांच्या शाखेची औषधच द्यावी, त्यांनी मॉडर्न मेडिसीन देऊ नये. हे चुकीचं आहे, आणि यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो."

पण होमिओपॅथीद्वारे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, दीर्घकालीन विकारांनी ग्रस्त अनेक रुग्ण होमिओपॅथी ओषधं खाऊन बरे होऊ शकतात.

"आत्ता डेंग्यूमुळे ताप आलेल्या रुग्णाला होमिओपॅथीचं औषध देऊन बरं केलं जात नाही, म्हणूनच त्याला मॉडर्न मेडिसीन देऊनच बरं केलं जाऊ शकतं. पण कोलेस्ट्रॉल कमी करणे किंवा संधिवातासारख्या दीर्घकालीन समस्यांपासून होमिओपॅथीने लोकांना आराम मिळतो," असं डॉ. योगेश भालेराव सांगतात.

डॉ. योगेश भालेराव हे इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन या डॉक्टरांच्या एका स्वतंत्र संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत.

डॉ. योगेश भालेराव सांगतात, "BHMS असो वा MBBS, दोन्ही शाखांमधल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायला सारखाच कालावधी लागतो. लोकांमध्ये या CCMP कोर्सबद्दल गैरसमज पसरवण्यात येत आहेत. पण प्रत्यक्षात या एका वर्षाच्या कोर्समध्ये डॉक्टरांना मॉडर्न मेडिसीनविषयी परिपूर्ण माहिती मिळते, ज्याच्या आधारे ते योग्य निदान करून रुग्णांना बरं करू शकतात."

डॉ. भालेराव यांच्या मते, सर्व शाखांमधील डॉक्टरांना RMPचा दर्जा मिळाला तर देशात, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये डॉक्टरांची कमतरता भरून निघेल.

"देशाची आरोग्य सेवा बळकट होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे," असं त्यांना वाटतं.

पण मग मुळात होमिओपॅथीचे डॉक्टर आणि औषधं सर्वत्र उपलब्ध नसल्यामुळे, तसंच तुलनेने कमी लोकांचा होमिओपॅथीवर विश्वास असल्यामुळे ही समस्या उभी राहतेय का, असं विचारल्यावर ते सांगतात, "हा विषय इगोचा आहे, अहंकाराचा आहे. MBBS डॉक्टरांना नकोय की BAMS (आयुर्वेद), BHMS (होमिओपॅथी) डॉक्टरांना त्यांच्याइतका दर्जा मिळावा."

डॉ. संजय दाभाडे यांच्या मते, हा विरोध पुरावे आणि पुरेसा अभ्यास न झाल्यामुळे आहे.

"होमिओपॅथीमुळे लोकांना आराम मिळत असेल, पण तो किती लोकांपैकी किती लोकांना, याचा पुरेसा अभ्यास होताना दिसत नाही. कुठल्याही वैद्यकीय तपासणीत रँडमाईज्ड कंट्रोल ट्रायल केली जाते, जेणेकरून एका मोठ्या सँपल साईझमध्ये पुरेशी चाचणी करून निष्पक्षपणे निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. याच्या अभावामुळे हा विरोध केला जातो," असं त्यांना वाटतं.

एकूणच या विषयी सरकारने योग्य आणि ठाम भूमिका घेण्याची गरज आहे, असं मत दोन्हीकडच्या तज्ज्ञांचं आहे.

दरम्यान, मुंबई हायकोर्टाने संपावर गेलेल्या MARD डॉक्टरांना सरकारशी चर्चा करून योग्य समाधान शोधण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या MARD संघटनेने त्यांचा संप मागे घेतला आहे.

होमिओपॅथीचा उगम

होमिओपॅथी हा शब्द दोन ग्रीक शब्दांमधून आलाय. Homois म्हणजे समान किंवा Similar आणि Pathos म्हणजे दुःख, पीडा.

होमिओपॅथी या उपचार पद्धतीला विकसित करण्याचं श्रेय डॉ. सॅम्युएल हानिमन यांना दिलं जातं. ते स्वतः 1779 मध्ये पारंपरिक वैद्यकीय शिक्षणातून डॉक्टर बनले, पण पारंपरिक औषधोपचारांमधून त्यांना फारसं यश किंवा समृद्धी मिळत नव्हती.

मग पर्यायी प्रयोग करत असताना ते क्विनाईन झाडाचं सालापासून बनलेलं सिंकोना हे मलेरियावरचं औषध दररोज थोड्या प्रमाणात खाऊ लागले. यातून डॉ. हानीमन यांना मलेरियासारखीच, पण जरा कमी तीव्रतेची लक्षणं दिसू लागली. या प्रयोगाच्या आधारे त्यांनी एक सिद्धांत मांडला, जर एखाद्या आजारी व्यक्तीला तेच औषध दिलं, ज्याद्वारे एखाद्या तंदुरुस्त व्यक्तीला तोच रोग होईल पण कमी तीव्रतेचा, तर त्या औषधीमुळे ती आजारी व्यक्तीही बरी होऊ शकते.

यातून "Like Cures Like" आणि "Principle of Similars"चा उदय झाला, जो होमिओपॅथीचा आधार मानला जातो.

मग हानीमन आणि त्यांचे सहकारी असे अनेक पदार्थ टेस्ट करून पाहू लागले, ज्यातून लोकांना कुठल्या ना कुठल्या रोगाची लक्षणं दिसू लागली. याच्या आधारे मग ते त्या-त्या रोगांची औषधं बनवू लागले.

त्या काळी पारंपरिक औषधोपचार पद्धती एकाच तत्त्वावर आधारित होती – आजारी व्यक्तीची लक्षणं पाहून, रोगाचं निदान करून, मग योग्य ती औषधं द्यावी.

पण हानीमन याच्या उपचार पद्धतीत रुग्णाची पूर्ण माहिती, वैद्यकीय इतिहास, त्याचा राहणीमान आणि इतर गोष्टींची विचारपूस करून एक संभाव्य उपचार सुचवले जात होते. त्यामुळे ही उपचार पद्धती वेळखाऊ होती, आणि प्रत्येकाला पटणारी नव्हती.

म्हणजे मॉडर्न मेडिसिन विरुद्ध होमिओपॅथी हा वाद काही नवीन नाही.

(हानीमन यांनीच होमिओपॅथी हून 'वेगळ्या उपचार'पद्धतीसाठी 'अ‍ॅलोपॅथी' हा शब्द वापरला होता. पण सध्या आधुनिक वैद्यकशास्त्र प्रॅक्टिस करणारे व्यावसायिक स्वतःसाठी हा शब्द वापरत नाहीत तर ते मॉडर्न मेडिसिनच वापरतात.)

19व्या शतकात युरोप आणि अमेरिकेत होमिओपॅथीचा प्रचार-प्रसार वेगाने झाला. 1830च्या दशकात युरोपात कोलेराची साथ आली असताना, सामान्य डॉक्टरांच्या औषधीपेक्षा होमिओपॅथीची औषधं घेणारे रुग्ण जास्त चांगल्याने बरे होत होते, असा दावा करण्यात आला.

भारतात होमिओपॅथी 1839च्या सुमारास आली, जेव्हा महाराजा रणजीत सिंह यांच्य़ा अर्धांगवायूच्या उपचारांसाठी डॉ. जॉन होनिगबर्गर यांना बोलावण्यात आलं, असं दिल्लीतील BR सुर होमिओपॅथी कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वेबसाईटवरील माहिती सांगते.

नंतर डॉ. जॉन होनिगबर्गर यांनी कोलकात्यात स्वतःचा दवाखाना थाटला, आणि होमिओपॅथी देशभरात ठिकठिकाणी लोकप्रिय होऊ लागली.

पण होमिओपॅथीची वाढती लोकप्रियता पाहून पारंपरिक औषधोपचार करणारे डॉक्टर अस्वस्थ झाले. त्यांनी याला 'भोंदूगिरी' आणि 'अशास्त्रीय' म्हणत विरोध करायला सुरुवात केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)