You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आमचं सरकार नसतं तर दहिहंडी, गणपती हे सण साजरेच झाले नसते – एकनाथ शिंदे : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. आमचं सरकार नसतं तर दहिहंडी, गणपती हे सण साजरेच झाले नसते – एकनाथ शिंदे
आमचं सरकार आलं नसत तर सगळं बंद असतं कारण चीनमध्ये कोरोना आला आहे. गोविंदा, गणपती पण झाले नसते. पण, आमचं सरकार आलं म्हणून असे कार्यक्रम होतं आहेत, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकावर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. लोकमतनं ही बातमी दिलीय.
कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “राजस्थानमध्ये मला भरभरून प्रेम मिळालं पण ठाण्यातला कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. पुढच्या काही काळात बदलेलं ठाणे दिसेल. टप्याटप्याने सर्व काम पूर्ण होतील. भारतातून लोकं ठाणे बघायला येतील.”
ते पुढे म्हणाले, “तुमचे आमदार निधी आणायला खूप हुशार आहेत. जेवढी कामे गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहेत, मला वाटतं इतर कुठल्याच मतदारसंघात तेवढी कामं झालेली नाहीत. गुवाहाटीला असताना सगळ्या कागदपत्रांवर सह्या करत होतो. सर्वात जास्त निधी प्रताप सरनाईक यांनाच मिळाला आहे.”
2. बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आज संपावर
नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज एक दिवसीय संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या आजच्या संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण 700 शाखा असून कर्मचाऱ्यांची संख्या 13 हजार इतकी आहे. दरम्यान 30 आणि 31 जानेवारी रोजी देशातील सर्व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
सध्याची असलेली कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतोय, मात्र बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्याचा आरोप बॅंक संघटनेकडून करण्यात येतोय.
बॅंकेचा कारभार 250 पटीनं वाढला आहे, सोबतच अनेक शाखा देखील वाढल्या आहेत, तरीही कर्मचारी संख्या मात्र वाढवली जात नाही असा आरोप कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी करत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे.
3. नागपूर: विद्यार्थिनीवर कारमध्ये कोंबून सामूहिक बलात्कार
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून जंगलात कारमध्ये कोंबून दोघांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना सावनेरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
अखिल महाविर भोंगे आणि पवन विठ्ठलराव बासकवरे अशी आरोपींची नावे आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 16 वर्षीय मुलगी ही सावनेरमधील एका विद्यालयात दहावीत शिकते. तिच्या वर्गमैत्रिणीचा आरोपी अखिल भोंगे हा प्रियकर होता. पवन बासकवरे त्याचा मित्र होता.
23 जानेवारीला सायंकाळी पवन आणि अखिल हे दोघेही मुलीला शाळेत भेटायला आले. तिला कारमध्ये बसवून पवन आणि अखिलेशने कार नागपूर महामार्गाने घेतली. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
4. मुंबई लुटून खाण्यासाठी अधीर झाले; त्यांना सत्ता, मालमत्तेशिवाय काही दिसत नाही’
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
शिंदे गटातील आणि भाजपमधील नेते गेली अनेक दिवस बाळासाहेब ठाकरे ही कुणाची खासगी मालमत्ता नाही ते महाराष्ट्राची मालमत्ता आहे असे म्हणत होते, यावरून सुषमा अंधारेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदी अन् देवेंद्र फडणवीस यांना सत्ता, मालमत्ता या शिवाय काहीच दिसत नाही.
“केंद्रात नरेंद्रजी आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी ही नावे अशी आहेत की यांना पैसा, सत्ता, खुर्ची मालमत्ता, अधिकार, याच्याशिवाय आयुष्यात दुसरे काही दिसू शकत नाहीत. मुंबई लुटून खाण्यासाठी अधीर झालेल्यांना आता चक्क वंदनीय बाळासाहेब यांना मालमत्ता म्हणताना सुद्धा जेव्हा अजिबात थरथरत नाहीत,” असा घणाघात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.
5. महाराष्ट्रात थंडीची लाट 29 जानेवारीनंतर
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून येत्या काही दिवसांत गारवा अधिक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर ही थंडीची लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहिल, अशीही शक्यता आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. जम्मू-काश्मीर बर्फाने आच्छादले आहे. त्यातच पुणे, मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. 30 जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट होईल, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात येतंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)