मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागानं सांगितलं कुठे किती पाऊस पडणार

फोटो स्रोत, Getty Images
राज्यात अखेर पावसाची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सून अखेर 6 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनने दक्षिण कोकणाचा काही भाग, तसेच गोव्यात सक्रीयपणे प्रवेश केला आहे.
पावसाच्या आगमनाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आज (7 जून) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून राज्याच्या अंतर्गत भागात सरकण्यास अनुकूल परिस्थिती असल्याने 7 जूनला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे करताना हवामानाचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, नैर्ऋत्य मान्सूनने वेगाने आगेकूच करत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच ईशान्य भारतातील मोठा भाग व्यापला आहे.
आयएमडीने पुढील 7 दिवसांत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच पुढील 2 ते 5 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि ईशान्य भारतातील आणखी काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, 8 ते 12 जूनदरम्यान राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश आणि ओडिशातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
यंदा मोसमी पाऊस सरासरी वेळेच्या 3 दिवस उशिरा म्हणजेच 4 जूनरोजी केरळ येथे दाखल झाला. त्यानंतर मोसमी पावसाची वाटचाल वेगाने सुरू असून गोव्यातील काही भागांत शुक्रवारी (5 जून) पाऊस दाखल झाला.
राज्यातील हवामानाची स्थिती
राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण प्रदेशातील काही भाग आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे.
तसेच, पुढील 3 ते 4 दिवसांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
तर, उर्वरित राज्यातील बहुतांश भागांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे असून काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
'एल निनो'चं सावट
दरम्यान, यंदाच्या पावसावर एल निनोचं सावट असणार आहे. भयंकर दुष्काळ पडेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक हवामान संघटनेनं (WMO) 'एल निनो'च्या प्रारंभाला दुजोरा दिलाय आणि जगभरातील तापमान वाढू शकतं, असा इशाराही दिलाय.
यामुळे, भारतातील नैऋत्य मोसमी पावसाळी हंगामातही मोठे बदल घडणार असून शेती, पाणीपुरवठ्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























