सैफ अली खानची 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त होणार का? पाकिस्तानात गेलेल्या आजीबाबत का होतेय चर्चा?

फोटो स्रोत, Getty Images
सैफ अली खान सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर झालेला चाकूहल्ल्यातून बचावल्यानंतर आता तो पुन्हा एकदा एका नव्या कारणास्तव चर्चेत आला आहे.
सैफ अली खानची 15 हजार कोटींची मालमत्ता सरकार जप्त करणार आहे का? असा प्रश्न तो चाकू हल्ल्यानंतर सुखरूप घरी परतल्यानंतर सतत विचारला जात आहे.
सैफ अली खानची ही 15 हजार कोटींची मालमत्ता नक्की काय आहे? ती शत्रू संपत्ती का ठरवली गेली आहे? या प्रश्नांबाबत सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
काय आहे हा वाद?
भोपाळमधल्या ज्या मालमत्तेबद्दलचा हा वाद आहे ती पतौडी घराण्याची वंशपरंपरागत मालमत्ता आहे.
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भोपाळ हे एक संस्थान होतं. इथल्या एके काळच्या राज्यकर्त्या आणि भोपाळच्या तत्कालीन नवाबांच्या सर्वांत मोठ्या कन्या आबिदा सुलताना 1948 साली पाकिस्तानला निघून गेल्या होत्या.
2015 साली भारत सरकारच्या 'Custodian of Enemy Property for India'ने ही मालमत्ता शत्रू संपत्ती म्हणून घोषित केली आहे. त्यानंतर तिथूनच हा सगळा वाद सुरू झाला आहे.


काय आहे शत्रू संपत्ती कायदा?
'शत्रू संपत्ती कायदा' हा भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या 1965 च्या युद्धानंतर संसदेने पारित केला होता. या कायद्यानुसार भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्यांच्या मागे राहिलेल्या संपत्तीचं काय करायचं, याबाबतचा निर्णय केला जात होता.

फोटो स्रोत, www.bharatrakshak.com
2017 साली या कायद्यामध्ये काही बदल करण्यात आले होते. याबद्दलची सोपी गोष्ट तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही ती इथे पाहू शकता.
आता परत येऊया सैफ अली खानच्या संपत्तीच्या वादाकडे...
पाकिस्तानला निघून गेलेली सैफ अली खानची आजी कोण?
भोपाळचे नवाब हमिदुल्लाह खान यांची मोठी मुलगी म्हणजे आबिदा सुलताना होय. त्यांचं लग्न कोरवाईचे नवाब सरवर अली खान यांच्याबरोबर झालं होतं.
तेव्हा आबिदा केवळ 17 वर्षांच्या होत्या. पण त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडथळे होते. आबिदा यांचा मुलगा शहरयार खान हे पुढे जाऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षदेखील झाले.
नवाब हमिदुल्लाह खान आपल्या मुलीलाच आपला उत्तराधिकारी करण्याच्या तयारीत होते. पण या बाप-लेकीच्या नात्यात कटुता निर्माण झाली. कारण 1945 साली हमीदुल्लाह यांनी दुसरं लग्न केलं आणि आबिदांच्या आईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.

फोटो स्रोत, Facebook/PakistanRoyalFamilies
भारत स्वतंत्र होताना आबिदा लंडनमध्ये होत्या. त्या तेव्हा मोहम्मद अली जिन्नांच्या संपर्कात आल्या आणि त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला.
1948 साली त्यांनी जिन्नांना तसं फोन करून सांगितलं. आपल्या मुलीचा निर्णय समजल्यानंतर नवाब हमिदुल्लाह लंडनला तिला समजवण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी तिला असा प्रस्ताव दिला की, 'मी पाकिस्तानात जातो आणि तू भोपाळचं हे संस्थान सांभाळ.'

फोटो स्रोत, Getty Images
पण भारतात संस्थानांचं विलीनीकरण झालं आणि नवाबपद नावापुरतं राहिलं. मधल्या काळात जिन्नांचंही निधन झालं.
पण तोपर्यंत आबिदा सुलताना पाकिस्तानात पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्या पाकिस्तानच्या राजकारणातही सक्रीय झाल्या.
आबिदा यांचा सैफ अली खानच्या संपत्तीशी काय संबंध?
4 फेब्रुवारी 1960 रोजी नवाब हमीदुल्लाह अली खान यांचं निधन झालं, तेव्हा आबिदा भोपाळमध्येच होत्या. त्यांना प्रस्ताव दिला गेला की, त्यांनी पाकिस्तानचं नागरिकत्व सोडून भारतात परत यावं.
त्यांना भोपाळचं नवाब घोषित केलं जाईल. अर्थातच तेव्हा संस्थानं खालसा झाली होती.
पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनीही याला संमती दर्शवली होती, पण आबिदा सुल्ताना यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि लहान बहीण साजिदा सुल्ताना हिच्यासाठी हे सगळं सोडलं.

फोटो स्रोत, Hulton Archieve
साजिदा यांचं लग्न नवाब इफ्तिखार अली खान ऑफ पतौडी यांच्यासोबत झालं होतं. इफ्तिकार अली खान पतौडी यांचे चिरंजीव म्हणजे लोकप्रिय क्रिकेटर आणि भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांचे वडील आणि सैफ अली खान यांचे आजोबा होय.
भोपाळच्या संपत्तीवर सैफ अली खानचा हक्क कसा?
साजिदा यांचे पती आणि सैफ अली खानचे आजोबा यांच्याशी संबंधित या सगळ्या मालमत्ता आहेत. फेब्रुवारी 2015 मध्ये भारत सरकारच्या Custodian of Enemy Property यंत्रणेने या मालमत्ता शत्रू संपत्ती म्हणून घोषित केल्या.
शर्मिला टागोर आणि सैफ अली खान म्हणजे मन्सूर अली खान पतौडी यांची पत्नी आणि मुलगा यांनी याविरोधात कोर्टात धाव घेतली.
मध्य प्रदेश हाय कोर्टाने डिसेंबर 2024 मध्ये आदेश दिले की, शत्रू संपत्ती कायद्याअंतर्गत अपील करण्यासाठी यंत्रणा आहे त्यांच्याकडे अर्ज दाखल केला जावा.

फोटो स्रोत, Getty Images
आबिदा सुलतान भारत सोडून पाकिस्तानात गेल्या असल्याने भोपाळच्या नवाबांची ही संपत्ती शत्रू संपत्ती घोषित करावी असा आदेश या यंत्रणेने काढला होता.
पण सैफ यांच्या वकिलांचा असा युक्तिवाद आहे की, या संपत्ती साजिदा सुलतान यांच्या होत्या आणि त्यांचे वारस आधी मन्सूर अली खान पतौडी आणि त्यांच्यानंतर सैफ अली खान आहेत.
साजिदा भारतातच असल्याने या संपत्तीला शत्रू संपत्ती घोषित करता येणार नाही.
(ऐतिहासिक संदर्भ - अकील अब्बास जाफरी आणि हसन बिलाल झैदी)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























