जगातला  सर्वांत मोठा बेडूक सापडला, वजन आहे पावणेतीन किलो  

Published

ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागात सर्वात मोठा बेडूक सापडला आहे. इतकं जास्त वजन आणि आकारांचा बेडूक असेल, असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांनाही नव्हता.

सर्वसामान्य बेडकापेक्षा आकाराने सहापट अधिक मोठा हा बेडूक आहे. या बेडकाचं वजन 2.7 किलो आहे.

वन्यजीव अभ्यासकांनी या बेडकाला ‘टॉडझिला’ असं नाव ठेवलं आहे.

खरंतर सर्वसामान्य बेडकांसारखाही हा जीव नाहीय. टॉड्स नामक प्रकारात मोडणारा हा जीव आहे.

ऑस्ट्रेलियात 1935 मध्ये पहिल्यांदा टॉड्स सापडला होता. ऑस्ट्रेलियातील सर्वांत घातक किटकांपैकी एक टॉड्स आहेत आणि त्यांची सध्याची अंदाजे संख्या 2 अब्जांपेक्षा जास्त असेल.

जेव्हा पार्क रेंजर काइली ग्रे हिने क्वीन्सलँडमध्ये गस्तीवर असताना पहिल्यांदा या भल्यामोठ्या उभयचर प्राण्याला पाहिलं, तेव्हा तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनशी बोलताना तिने म्हटलं की, मी एवढं मोठं बेडूक कधीच पाहिलं नव्हतं. हे जवळपास फुटबॉलसारखं दिसत होतं. आम्ही त्याचं नामकरण ‘टॉडझिला’ असं केलंय.

ग्रे यांच्या टीमने तातडीनं टॉडझिलाला पकडलं.

टॉडझिला मादी असल्याचं कळतंय. तिचं वजन करण्यासाठी ते तळ्यावर पोहोचले. ती वजनदार होतीच, पण विश्वविक्रमी वजन असेल असं त्यांना वाटलं नव्हतं.

आता गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डनुसार, 2.65 किलोचं टॉड्स स्वीडनमध्ये 1991 साली सापडलं होतं. प्रिन्सेन असं त्या टॉड्सचं नाव ठेवण्यात आलं होतं.

टॉडझिला पोटात मावेल असं काहीही खाऊ शकतं, असं त्या सांगतात.

ऑस्ट्रेलियामध्ये टॉड्सचे कोणतेही नैसर्गिक शिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची वाढ लक्षणीय आहे.

टॉडझिला जवळपास 15 वर्षं जगू शकतात.