'सैयारा'मध्ये असं काय आहे, ज्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ?

फोटो स्रोत, YRF/INSTAGRAM
- Author, रवी जैन
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या 'सैयारा' या सिनेमानं केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर लोकांच्या मनामध्येही आपली खास जागा बनवली आहे.
नव्या चेहऱ्यांची ही प्रेमकथा, दमदार संगीत आणि जिवंत अभिनयामुळे सर्वत्र चर्चेत आहे. हा रोमँटिक सिनेमा प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो.
'सैयारा' सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 22 कोटींची कमाई केली आहे, ज्यामुळे प्रेक्षक आणि सिनेसृष्टीतले जाणकारही आश्चर्यचकित झाले आहेत.
यशराज फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार, 'सैयारा'नं दुसऱ्या दिवशी 26.25 कोटी रुपयांची कमाई केली, तर रविवारी तिसऱ्या दिवशी हा आकडा वाढून 35.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
एकंदर 'सैयारा'नं आपल्या पहिल्या विकेंडमध्ये एकूण 84 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सोमवारीदेखील (चौथ्या दिवशी) 'सैयारा'नं 20 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि केवळ चार दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
मोहित सुरीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
गेल्या जवळपास दोन दशकांपासून सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या मोहित सुरीने 13 चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. परंतु, इतकं यश यापूर्वी त्याला कधीच मिळालं नव्हतं.
'सैयारा'बद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत?
'सैयारा' सिनेमाला प्रेक्षकांकडून, विशेषतः तरुणांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि तो सध्या चर्चेचाही विषय ठरत आहे.
मुंबईच्या 20 वर्षांच्या माही विठ्ठलानी हिने चित्रपट पाहिल्यानंतर म्हटलं की, "सैयारा ही एक प्रामाणिक, भावनिक आणि हृदयाला भिडणारी प्रेमकथा आहे, जी अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली.
हा चित्रपट जणू ताज्या हवेसारखा वाटतो. यात स्टार व्हॅल्यू नसतानाही दोन्ही नवोदित कलाकारांनी खूपच छान अभिनय केला आहे. अहान पांडे आणि अनित पड्डा यांची केमिस्ट्री अगदी नैसर्गिक वाटली. 'सैयारा' हा असा चित्रपट आहे जो सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात थांबून प्रेमाबद्दल विचार करायला भाग पाडतो."

फोटो स्रोत, Getty Images
28 वर्षीय विनय विधानी यालाही हा सिनेमा खूप आवडला.
तो म्हणाला, "हा एक टिपिकल मोहित सुरी स्टाइलचा सिनेमा आहे, ज्यात मधुर संगीताच्या माध्यमातून प्रेमाची वेदना खूप सुंदर आणि सहजपणे दाखवली आहे. हाच त्या चित्रपटाचा खास भाग आहे, जो तरुणांना भावतोय आणि त्यांना थिएटरपर्यंत खेचून आणतोय."
भोपाळच्या 29 वर्षीय प्राध्यापिका ईशा पबिआ म्हणाल्या, "या चित्रपटातील प्रेमकहाणी खूपच खरी वाटते. एकमेकांसाठी दोघांचा समर्पणभाव कोणत्याही परिस्थितीत टिकून राहतो, आणि तेच मनाला भिडतं. म्हणूनच मला 'सैयारा'ची कथाही खूप आवडली."
दरम्यान, काही प्रेक्षकांनी सिनेमाच्या कथेवर टीकाही केली आहे.
दिल्लीच्या 24 वर्षांच्या नीतू अरोरा यांचं मत आहे, "कथेत फारसं नाविन्य नाही, ती नेहमीसारख्या टिपिकल बॉलिवूड प्रेमकथेसारखीच आहे. नव्या कलाकारांना अजून मेहनत करून आपली जागा पक्की करावी लागेल. तरीही, या चित्रपटाला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय."
'सैयारा'चा वेगळा आणि लक्ष वेधणारी प्रमोशन स्ट्रॅटेजी
'सैयारा'च्या यशामागे चित्रपट क्षेत्रातील जाणकार आणि समीक्षकांनी अनेक कारणं सांगितली आहेत.
जाणकारांच्या मते, एक साधी प्रेमकथा, उत्तम संगीत, आणि अहान पांडे-अनित पड्डा या नव्या चेहऱ्यांना मर्यादित प्रमोशनसह लाँच करण्याची यशराजची रणनीती, या सगळ्यांमुळे 'सैयारा'ला मोठं यश मिळालं.
सुमारे चार दशकांपासून सिने पत्रकारितेत कार्यरत असलेल्या ज्येष्ठ पत्रकार मीना अय्यर यांनी 'सैयारा'चं यश आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी खास करून सिनेमाच्या प्रमोशनच्या पद्धतीकडे लक्ष वेधलं.

फोटो स्रोत, YRF/INSTAGRAM
त्या म्हणतात, "'सैयारा'च्या प्रमोशनमध्ये यशराज फिल्म्सने सर्वात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे अहान आणि अनितला रिलीजपूर्वी फारसं समोर आणलं नाही. ना त्यांना मीडियामध्ये सतत मुलाखती द्यायला लावल्या, ना शहराशहरांत फिरवलं. यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या विषयी एक उत्सुकता टिकून राहिली, जी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी फायदेशीर ठरली."
दिग्दर्शक मोहित सुरीने यापूर्वी 'जहर', 'कलियुग', 'आवारापन', 'मर्डर 2', 'आशिकी 2' आणि 'एक व्हिलन' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.
तो रोमँटिक थ्रिलर चित्रपटांचा तज्ज्ञ मानला जातो. त्याच्या चित्रपटांची एक मोठी खासियत म्हणजे संगीत, जे प्रेक्षकांच्या मनात बराच काळ रेंगाळत राहतं.
'सैयारा'चा सुपरहिट टायटल ट्रॅक आणि इतर गाणीही चित्रपटातील प्रेमकथेच्या भावनिक बाजूला छानपणे अधोरेखित करतात. या सिनेमाचं गीत-संगीत लोकांच्या ओठांवर रेंगाळतंय, असं म्हटलं जातं आहे.
समीक्षकांचंही मत आहे की, या संगीतानेच चित्रपटाच्या यशात मोठा वाटा उचलला आहे.
मनाला भिडणारी प्रेमकथा
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक मयंक शेखर यांचंही मत आहे की 'सैयारा'च्या यशामध्ये संगीताचा मोठा वाटा आहे.
ते म्हणतात, "फक्त सिनेमाचं संगीतच उत्कृष्ट नाही, तर सगळ्या गाण्यांचं चित्रिकरणही खूप छान झालं आहे. यामुळेच प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये येत आहेत."
मयंक शेखर यांच्या मते, अहान पांडे आणि अनित पड्डासारख्या नव्या चेहऱ्यांची निवड, त्यांचा आश्वासक अभिनय, आणि मोहित सुरीचं दिग्दर्शन या सगळ्यांमुळेच 'सैयारा' यशस्वी ठरतो.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "गेल्या काही वर्षांत बॉक्स ऑफिसवर भावनिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या प्रेमकथा जवळजवळ दिसेनाशा झाल्या होत्या.
त्यामुळेच 'लैला मजनू', 'ये जवानी है दीवानी', 'सनम तेरी कसम' यांसारख्या जुन्या प्रेमकथा पुन्हा थिएटरमध्ये दाखवल्या जात होत्या आणि आजची तरुण पिढी त्या मोठ्या प्रमाणावर पाहायला जात होती."
शेखर पुढे म्हणतात, "अशा काळात, जेव्हा एक ताजी आणि भावूक प्रेमकथा 'सैयारा' नव्या कलाकारांसोबत समोर आली, तेव्हा प्रेक्षकांनी ती लगेच स्वीकारली. तरुण प्रेक्षकांच्या मनात प्रेमकथांची जी भूक अनेक दिवसांपासून होती, ती 'सैयारा'नं अगदी योग्य वेळी पूर्ण केली."
सिंगल स्क्रीन थिएटरमधल्या प्रेक्षकांनाही 'सैयारा' सुखावतोय
हे लक्षात घेण्यासारखं आहे की 'सैयारा' हा फक्त मॉलमधल्या मल्टिप्लेक्समध्येच नाही, तर देशभरातल्या छोट्या शहरांतील 'बी' आणि 'सी' दर्जाच्या सेंटर्समध्येही चांगली कमाई करत आहे.
गावोगावी असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
बिहारमध्ये 'सैयारा'ला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रेमाबाबत मधुबनी जिल्ह्यातल्या 'रूपबाणी' या थिएटरचे मालक विषेक चौहान यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांनी सांगितलं की, बिहारमधल्या छोट्या छोट्या थिएटरमध्येही 'सैयारा' पाहायला प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी सांगितलं, "या वर्षी बिहारमध्ये सर्वात यशस्वी ठरलेल्या 'छावा'लाही 'सैयारा' मागे टाकू शकतो. 'छावा'ला इथं चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण बिहारमधल्या सिनेमागृहांमध्ये 'छावा'पेक्षा जास्त वेड 'सैयारा'साठी दिसून येत आहे."
विषेक चौहान यांचंही चित्रपट समीक्षक मयंक शेखर यांच्या मताशी एकमत आहे की, तरुण प्रेक्षकांना गेल्या काही काळापासून एका भावनिक प्रेमकथेची गरज होती, आणि 'सैयारा'ने ही उणीव भरून काढली आहे.
जयपूरमधील एंटरटेनमेंट पॅराडाइज मल्टिप्लेक्सचे मालक राज बन्सल सांगतात की, 'सैयारा'ला फक्त जयपूरसारख्या मोठ्या शहरातच नव्हे, तर भरतपूर, सीकरसारख्या लहान शहरांमध्येही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज बन्सल म्हणतात, "एक चांगला दिग्दर्शक, चांगली कथा आणि सुरेल संगीत असेल, तर कोणताही सिनेमा यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. 'सैयारा'बाबत हाच अनुभव आला आहे, ज्याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे."
'छावा'च्या कमाईला टक्कर देईल का 'सैयारा'?
बॉक्स ऑफिसवर सुमारे 600 कोटींची ऐतिहासिक कमाई करणाऱ्या 'छावा'नंतर 'सैयारा' हा या वर्षीचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज झालेल्या विकी कौशलच्या 'छावा'ने पहिल्याच दिवशी 33 कोटींहून अधिकची कमाई केली होती. त्याचवेळी नवीन कलाकार असलेल्या 'सैयारा'ने पहिल्या दिवशीच 22 कोटींचा गल्ला जमवून वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ओपनिंग मिळवली.

फोटो स्रोत, INSTAGRAM/VICKYKAUSHAL
रिलीजच्या चौथ्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या 'सैयारा'च्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीला प्रसिद्ध ट्रेड विश्लेषक कोमल नाहटांनीही उल्लेखनीय मानलं आहे.
कोमल नाहटा म्हणतात, "'सैयारा'नं चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर जे यश मिळवलं, ते खूपच उल्लेखनीय आहे. मी याची तुलना 'छावा'सोबत करू इच्छित नाही, कारण त्या चित्रपटात विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांसारखे प्रसिद्ध कलाकार होते आणि तो एक मोठ्या बजेटचा ऐतिहासिक सिनेमा होता."
ते पुढे म्हणतात, "सध्या तरी 'सैयारा'चं अंतिम कलेक्शन किती असेल मी नक्की सांगू शकणार नाही. परंतु, जगभरातून मिळणाऱ्या प्रतिसादावरून एवढं नक्की सांगू शकतो की, हा सिनेमा सहजपणे 400 कोटींचा टप्पा पार करू शकतो.
मात्र प्रेक्षकांचा जो उत्साह आहे, तो पाहता हे सांगणं कठीण आहे की कमाईच्या बाबतीत हा सिनेमा कुठे जाऊन थांबेल. परदेशातसुद्धा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्याचा एकूण कलेक्शनवर परिणाम होईल."
अहान पांडे आणि अनित पड्डा कोण आहेत?
अभिनय क्षेत्रात 'सैयारा'मधून पदार्पण करणाऱ्या अहान पांडेची तुलना 25 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या सुपरहिट 'कहो ना... प्यार है'मधून डेब्यू करणाऱ्या हृतिक रोशनशी केली जात आहे.
त्याचप्रमाणे अनित पड्डा आणि अहान यांची जोडीही बॉक्स ऑफिसवर हृतिक-अमिषाच्या जोडीसारखी धुमाकूळ घालणारी ठरते आहे, असं मानलं जात आहे.
अहान पांडे हा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि फिटनेस कोच डिआन पांडे यांचा मुलगा आहे. 27 वर्षीय अहानने अभिनयात येण्यापूर्वी काही चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पडद्यामागे काम केलं आहे.

फोटो स्रोत, INSTAGRAM/YRF
हे उल्लेखनीय आहे की, 'सैयारा' या चित्रपटासाठी अभिनेता अहान पांडे यांना कास्ट करण्याचा सल्ला निर्माता आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शक मोहित सुरीला दिला होता.
सुरुवातीला मोहितला अहान मुख्य भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हता, परंतु काही वेळ एकत्र घालवल्यानंतर त्यांना जाणवलं की, हाच चेहरा या प्रेमकथेसाठी अगदी योग्य आहे.
अहान पांडे समोर प्रमुख भूमिकेत झळकलेली अनित पड्डाबाबत बोलायचं झालं, तर तिने दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' या वेब सीरिजमध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिच्या कामाचं तेव्हा विशेष कौतुक झालं होतं.
अनित पड्डाने यापूर्वी रेवती दिग्दर्शित आणि काजोल अभिनीत 'सलाम वेंकी' या चित्रपटातही एका छोट्या भूमिकेत दिसली होती. मात्र प्रमुख अभिनेत्री म्हणून 'सैयारा' हा तिचा पहिलाच चित्रपट आहे.
मुळची अमृतसरची असलेली अनित पड्डा अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती आणि ती अनेक जाहिरातींमध्येही झळकली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























