अमरावतीत खेळाडूंच्या बसला भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू, 10 जण गंभीर जखमी

अमरावती अपघात

फोटो स्रोत, Nitesh Raut/BBC

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, अमरावती
  • Published

अमरावती जिल्ह्यात मिनी बस आणि काँक्रिट मिक्सरचा भीषण अपघात झाला आहे. नांदगाव खंडेश्वरच्या शिंगणापूर फाट्याजवळ झालेल्या या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, 10 जण गंभीररित्या जखमी झाले आहे.

जखमींना तातडीने नांदगाव खंडेश्वर आरोग्य केंद्रात, तर गंभीर जखमींना अमरावतीच्या रिम्स आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमरावती अपघात

फोटो स्रोत, Nitesh Raut/BBC

विविध मैदानी स्पर्धेसाठी 23 खेळाडू यवमाळकडे मिनी बसमधून निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला.

अमरावती-यवतमाळ रस्ता आणि नागपूर-औरंगाबाद इंटरचेंजजवळ काँक्रिट मिक्सरने मिनी बसला बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे मिनी बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली.

हा अपघात झाला, त्या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याची माहिती मिळते आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये श्रीहरी राऊत, आयुष बहाले, सुयश अंबरले आणि संदेश पाडर या चौघांचा समावे आहे. हे सगळे अमरावती शहरातील रवी नगर आणि रुखमिणी नगरतील रहिवाशी होते.

अमरावती अपघात

फोटो स्रोत, Nitesh Raut/BBC

काँक्रिट मिक्सर ही गाडी गुजरातमधील नोंदणीकृत आहे.

अमरावती जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी माहिती दिली की, "आम्ही तातडीने घटनास्थळ गाठून अपघातग्रस्ताना रुग्णालयात उपचारासाठी हलवले. त्यांच्यावर उपचार सुरू असून 10 जण किरकोळ जखमी, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती गंभीर असून, डॉक्टर सध्या उपचार देत आहेत."

तसंच, या अपघाताला कारणीभूत असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात येईल, असंही विशाल आनंद यांनी सांगितलं.