15 लाख वर्षं जुना बर्फ का वितळवत आहेत? त्यातून कोणतं रहस्य उलगडणार आहे?

फोटो स्रोत, PNRA/IPEV
- Author, जॉर्जिना रेनार्ड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
15 लाख वर्षांपेक्षा जास्त जुना असलेला बर्फाचा तुकडा युकेमध्ये आणण्यात आला आहे.
पृथ्वीच्या हवामानाबद्दलची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ हा तुकडा वितळवणार आहेत.
दंडगोल आकाराचा हा काचेसारखा पारदर्शक तुकडा, या ग्रहावरचा सर्वात जुना बर्फ असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंटार्क्टिकाच्या बर्फाच्छादित भागातून तो उकरुन काढण्यात आलाय.
त्यात लपलेली हजारो वर्षांची माहिती शास्त्रज्ञांना कळाली तर त्याने हवामान बदलाबद्दलच्या आपल्या समजुतीत क्रांतिकारक बदल होतील, असं शास्त्रज्ञ सांगत आहेत.
हा तुकडा नेमका कसा दिसतो, हे पाहण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी केंब्रिजमधल्या 'ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हे' या संस्थेतल्या फ्रिजमधे जाऊन आले.
यासाठी वापरला जातोय खास फ्रिज
या फ्रिजमधे - 23 C एवढं कमी तापमान होतं.
"आपल्या पृथ्वीच्या इतिहासातील या काळाविषयी आपल्याला काहीच माहिती नाही," डॉ. लिझ थॉमस सांगत होत्या.
त्या ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हे या संस्थेत 'बर्फाच्या तुकड्याचं संशोधन' विभागाच्या प्रमुख आहेत.
आतमध्ये असताना काही गडबड झालीच तर फ्रिजच्या दारावर धोक्याची सूचना देणारे लाल रंगाचे दिवे लावण्यात आलेत.

फोटो स्रोत, PNRA/IPEV
शिवाय, आतमध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापरता येईल, असा एक बोगद्याकडे जाणारा बचावमार्ग आहे.
नियमांप्रमाणे जाडसर स्वेटर, थंडीचे बूट, टोपी आणि हातमोजे असा सगळा पोषाख करून फक्त 15 मिनिटं आत जाण्याची परवानगी आम्हाला होती.
आतमध्ये जाताच आमच्या कॅमेऱ्याचा इलेक्ट्रॉनिक शटर गोठून बंद झाला आणि आमचे केस बर्फात गोठून तडतड आवाज करू लागले.
आतमध्ये एकीकडे बर्फाचे खोके एकावर एक रचून साठवून ठेवलेले दिसले.
15 लाख वर्षांपेक्षाही जास्त जुने असलेले बर्फाचे तुकडे
तिथेच शेजारी एका टेबलावर ठेवलेल्या सर्वात जुन्या म्हणजे सुमारे 15 लाख वर्षांपेक्षाही जास्त वय असणाऱ्या बर्फाच्या दंडगोल तुकड्यांकडे डॉ. थॉमस यांनी आमचं लक्ष वेधलं.
ते इतके चमकत होते आणि इतके पारदर्शक होते की त्यातून आम्हाला आमचा हात स्पष्टपणे दिसत होता.
हा बर्फ वितळवण्याचं काम सात आठवडे चालेल.

फोटो स्रोत, PNRA/IPEV
त्यातून अनेक वर्षांपूर्वीची धूळ, ज्वालामुखीतून निघालेली राख आणि पाण्याचं बर्फात रुपांतर होताना त्यात अडकलेलं डायटोम्स नावाचं समुद्री शेवाळ अशा अनेक गोष्टी बाहेर पडतील.
या घटकांमुळे लाखो वर्षांपूर्वीचे वारा वाहण्याचे प्रकार, तापमान आणि समुद्राची पातळी याबद्दलची माहिती शास्त्रज्ञांना मिळेल.
नळीद्वारे हे घटक शेजारच्या प्रयोगशाळेत असलेल्या यंत्रांमध्ये पाठवले जातील.
ही प्रयोगशाळा जगातल्या मोजक्याच ठिकाणांपैकी एक आहे जिथे असं संशोधन करता येतं.
बर्फाचा तुकडा खणून काढण्यामागे अनेक देशांची मेहनत
अंटार्क्टिकामधून हा बर्फाचा तुकडा खणून काढण्यासाठी अनेक देशांनी मेहनत घेतली आहे.
त्यासाठी लाखोंचा खर्च आला. त्यानंतर बर्फाचे एक मीटर लांबीचे तुकडे करुन ते बोटीने आणि नंतर थंड ठेवलेल्या व्हॅनमधून केंब्रिजला नेण्यात आले.
जेम्स व्हील या अभियंत्याने पूर्व अंटार्क्टिकातल्या कोन्कोर्डिया या भागाच्या जवळून हा बर्फ खणून काढायला मदत केली.
"माझ्या हातमोजे घातलेल्या हातात काळजीपूर्वक बर्फ धरणं आणि खाली सांडू नये यासाठी प्रयत्न करणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता," ते सांगतात.
जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधल्या दोन संस्थांनाही 2.8 किमी लांबीचे दोन दंडगोलाकार तुकडे पाठवण्यात आलेत.

डॉ. थॉमस यांच्या मते, यातून संशोधन करणाऱ्यांना सुमारे 8 लाख वर्षांपूर्वीच्या काळाबद्दलची माहिती सापडू शकते.
या काळात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण नैसर्गिकरित्या आजच्या पातळीइतकं किंवा कदाचित त्याहूनही जास्त होतं.
त्यामुळे आपल्या वातावरणात तापमान वाढवणारे गॅस अडकून पडल्यानं भविष्यात आपला ग्रह काय प्रतिक्रिया देईल हे समजायला यातून मदत होणार आहे.
"आपली हवामान प्रणाली अनेक बदलांना सामोरी गेली आहे. त्यामुळे पुन्हा भूतकाळात जाऊन या वेगवेगळ्या प्रक्रिया कशा झाल्या आणि त्याचे निर्णायक क्षण कोणते होते हे समजून घ्यायला हवं," डॉ. थॉमस सांगतात.
8 ते 12 लाख वर्षांपूर्वीच्या रहस्यमय बदलाची उकल होईल
आजच्या आणि जुन्या काळातील हरितगृह वायूंच्या वाढीत एक महत्त्वाचा फरक आहे.
आजच्या काळात माणसाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे गेल्या 150 वर्षांत या उष्णता वाढवणाऱ्या वायूंच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे.
यामुळे एका अज्ञात दिशेने आपल्या प्रवास सुरू झाला आहे.
पण या बर्फात बंद झालेल्या आपल्या ग्रहाच्या पर्यावरणीय इतिहासानं आपल्याला या प्रवासासाठी मार्गदर्शन मिळेल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटते.

फोटो स्रोत, PNRA/IPEV
संशोधनकर्ते यातले रासायनिक समस्थानिक (Chemical Isotopes) कोणते ते शोधून काढतील.
त्यातून सुमारे 8 ते 15 लाख वर्षांपूर्वीच्या किंवा अगदी त्यापूर्वीच्याही काळातल्या वाऱ्याचे नमुने, तापमान आणि पर्जन्यमान यांची माहिती मिळू शकेल.
त्यासाठी संशोधक इंडक्टिव्हली कपल्ड प्लाझ्मा मास स्पेक्ट्रोमीटर (आयसीपीएमएस) नावाच्या एका उपकरणाचा वापर करणार आहेत. त्यातून जवळपास 20 घटक आणि धातू मोजता येतील.
त्यात पृथ्वीवरील दुर्मिळ घटक, समुद्री क्षार, सागरी घटक आणि पूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकांतून निघालेली राख याचा समावेश आहे.
समुद्राच्या पातळीसंदर्भात मिळेल माहिती
हे संशोधन शास्त्रज्ञांना सुमारे 8 लाख ते 12 लाख वर्षांपूर्वी झालेल्या एका रहस्यमय बदलाची उकल करायला मदत करेल.
या बदलाला मिड-प्लायस्टोसीन ट्रान्झिशन असं नाव आहे. त्यावेळी पृथ्वीवरील हिमयुगांचं चक्र अचानक बदललं होतं.
पृथ्वीचा गरम हवामानाच्या काळानंतर थंड हिमयुगांकडे बदल होत असतो. या काळात बर्फाने पृथ्वीचा मोठा भाग झाकला जातो.
आधी हा बदल दर 41,000 वर्षांनी व्हायचा. पण अचानक त्यात परिवर्तन होऊन तो बदल 1, 00, 000 वर्षांनी होऊ लागला.

डॉ. थॉमस यांच्या मते, या बदलामागचं कारण हा हवामान शास्त्रातील एक 'अतिशय रहस्यमय आणि अजूनही न सुटलेला प्रश्न' आहे.
समुद्राची पातळी आत्ता होती त्यापेक्षा फार जास्त असेल अशा काळातील संदर्भ या बर्फात सापडू शकतात. तेव्हा आंटार्क्टिका मधला बर्फाच्छादित प्रदेशही फार कमी होता.
बर्फात आढळणाऱ्या धुळीतून संशोधकांना हे समजून घेता येईल की बर्फाचे थर लहान कसे होत गेले आणि त्यातून समुद्राची पातळी वाढण्यास कशी मदत झाली.
खरंतर तीच आजच्या शतकातली सर्वात गंभीर समस्या आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























