भारताचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न सेमीफायनलमध्ये भंगलं; हरमनप्रीत-जेमिमाची झुंज ठरली व्यर्थ

ऑस्ट्रेलियन संघ

फोटो स्रोत, Getty Images

Published

भारतीय महिला संघाचं वर्ल्डकपविजयाचं स्वप्न सेमी फायनलमध्येच भंगलं. ऑस्ट्रेलियाने केप टाऊन इथे झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत भारतावर 5 धावांनी विजय मिळवत सातव्यांदा वर्ल्डकपची फायनल गाठली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी अफलातून खेळी करत भारताचा विजय दृष्टिक्षेपात आणला होता. मात्र मोक्याच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीत धावचीत होणं भारतीय संघासाठी दुस्वप्न ठरलं.

सेमी फायनलच्या दडपणाच्या लढतीत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. मेगन शूटने धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्माला पायचीत केलं.

तिने तातडीने रिव्ह्यू घेतला पण पंचांनी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने कौल दिला. तिने 9 धावा केल्या.

शैलीदार फलंदाज स्मृती मानधनाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. तिने 2 धावा केल्या. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू असताना धाव घेण्याचा यात्सिका भाटियाचा प्रयत्न फसला. तिने चार धावा केल्या.

33/3 अशा स्थितीतून जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी संघाला तारलं. या दोघींनी 41चेंडूत 69 धावांची भागादारी रचली.

दोघींनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दहाव्या षटकात भारताने 93 धावांची मजल मारली.

हरमनप्रीत कौर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हरमनप्रीत कौर

उत्तम सूर गवसलेल्या जेमिमाने उसळत्या चेंडूला बॅट लावण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावला.

जेमिमाने 24 चेंडूत 6 चौकारांसह 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

जेमिमा बाद झाल्यानंतर काही षटकं खेळ मंदावला पण हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांनी 26 चेंडूत 35 धावांची भागीदारी केली.

हरमनप्रीतने 34 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

जेमिमा रॉड्रिगेज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेमिमा रॉड्रिगेज

हरमनप्रीत बाद झाली तेव्हा भारताला जिंकायला 40 धावांची आवश्यकता होती. डार्सी ब्राऊनने ऋचा घोषला बाद करत भारताला अडचणीत टाकलं. पण यानंतर स्नेह राणा आणि दिप्ती शर्माने भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. पण ऑस्ट्रेलियाने सातत्याने विकेट्स मिळवत बाजी मारली. डार्सी ब्राऊन आणि अॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

जेमिमा रॉड्रिगेज आणि हरमनप्रीत कौर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेमिमा रॉड्रिगेज आणि हरमनप्रीत कौर

ऑस्ट्रेलियाने बेथ मूनी, कर्णधार मॅग लॅनिंग आणि अष्टपैलू अॅशले गार्डनरच्या दमदार खेळींच्या बळावर 172 धावांची मजल मारली. अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी 52 धावांची खणखणीत सलामी दिली. हिली 25 धावा करुन तंबूत परतली.

बेथ मूनीने 37 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 54 धावांची आक्रमक खेळी केली. लॅनिंग-गार्डनर जोडीने चौकार आणि एकेरी-दुहेरी धावांची सांगड घातली. लॅनिंगने 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 49 धावांची खेळी केली. गार्डनरने 18 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा कुटल्या.

बेथ मूनीला 32 वर जीवदान मिळालं तर लॅनिंग एकवर खेळत असताना तिचा झेल सुटला. या दोघांनी जीवदानाचा फायदा उठवत मोठी खेळी केली.

भारतीय संघाकडून अनुभवी शिखा पांडेने 2 तर दिप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सलामीवीर बेथ मुनी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सलामीवीर बेथ मुनी

बेथ मुनीचं वेगवान अर्धशतक

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर बेथ मुनीने वेगवान अर्धशतकी खेळी केली. तिने सुरुवातीपासून संयमी खेळी करून एक बाजू सांभाळून धरली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मुनीने धावांचा वेग वाढवला.

मुनीने 37 चेंडूंमध्ये 54 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकार तर एका षटकाराचा समावेश आहे.

सलामीवीर बेथ मुनीला ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगची चांगली साथ मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या लॅनिंगने 34 चेंडूंमध्ये नाबाद 49 धावा केल्या. तिने 4 चौकार तर 2 षटकार खेचले

सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेग कमी होता. त्यांचा संघ दीडशेच्या आतच रोखला जाईल, असं वाटत असताना अॅशले गार्डनर फलंदाजीला आली.

गार्डनरने शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. तिने 5 चौकारांच्या मदतीने 18 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

अखेर, निर्धारित 20 षटकांत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 172 धावांचा डोंगर उभारला.

गोलंदाज शिखा पांडे विकेट मिळवल्यानंतर जल्लोष करताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गोलंदाज शिखा पांडे विकेट मिळवल्यानंतर जल्लोष करताना

भारताकडून गोलंदाज शिखा पांडेने 2 विकेट घेतले. तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन तिला साथ दिली.

पूजा वस्राकर दुखापतग्रस्त; स्नेह राणाचा समावेश

दुखापतीमुळे पूजा वस्राकर खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. आयसीसी तांत्रिक समितीने वस्राकरऐवजी स्नेह राणाच्या समावेशाला मंजुरी दिली.

सामन्यापूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरला ताप आला होता. ती या महत्त्वपूर्ण लढतीत खेळू शकणार का याविषयी साशंकता होती. मात्र तापातून सावरत हरमनप्रीत खेळायला उतरली.

.....................

याआधीच्या वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला नमवलं होतं. कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाने शेवटच्या 21 ट्वेन्टी20 लढतीपैंकी 20 मध्ये विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाने डिसेंबरमध्ये मुंबईत झालेल्या मालिकेत 4-1 अशी बाजी मारली होती.

ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरुद्धच्या पाचही लढती जिंकल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने 2010, 2012, 2014, 2018, 2020 अशा पाचवेळा ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला आहे.

सलग तिसऱ्यांदा गाठली होती सेमीफायनल

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आयर्लंडविरुद्ध 5 धावांनी विजय मिळवत भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती.

भारतीय महिला संघाने सलग तिसऱ्यांदा (2018, 2020 आणि आता 2023) वर्ल्डकप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये आगेकूच केली.

घुबेरहा इथे झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 155 धावांची मजल मारली. स्मृती मन्धानाने 56 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 87 धावांची वादळी खेळी साकारली.

आयर्लंडतर्फे लौरा डिनलीने 3 विकेट्स घेतल्या. सेमी फायनल प्रवेशादृष्टीने भारताला या लढतीत विजय आवश्यक होता.

आयर्लंडने 8.2 षटकात 54/2 अशी मजल मारली पण त्यानंतर पावसाचं आगमन झालं. पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लुईस पद्धतीने भारतीय संघ विजयी असल्याचं घोषित करण्यात आलं.

भारतीय संघाने प्राथमिक फेरीत 4 सामन्यांपैकी 3 मध्ये विजय मिळवला. भारताने वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यावर विजय मिळवला तर इंग्लंडविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)