दूरदर्शनचा लोगो भगवा का झाला? प्रसार भारतीचे माजी प्रमुख म्हणतात, ही तर 'प्रचार भारती'

फोटो स्रोत, DD NEWS
दूरदर्शन ही सरकारी वाहिनी आहे. प्रसार भारतीअंतर्गत या वाहिनीचं नियमन होतं. जरी सरकारी असली तरी या वाहिनीनं तटस्थ राहणं अपेक्षित आहे. त्यामुळेच दूरदर्शनचा लोगो भगव्या रंगाचा झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
सरकारच्या अधिपत्याखालील प्रसार भारतीनं डीडी न्यूज या वृत्तवाहिनीच्या लोगोचा रंग बदलून 'भगवा' केला आहे. आधी तो 'लाल' रंगाचा होता.
लोकसभा निवडणुकींच्या काळातच दूरदर्शनच्या लोगोचा रंग बदलल्यामुळं विरोधी पक्षांनी यावर सडकून टीका केली आहे.
जवाहर सरकार या राज्यसभेतील खासदार आणि प्रसार भारतीच्या माजी प्रमुखांनी या निर्णयाबद्दल म्हटलं आहे की ''ही प्रसार भारती नाही, ही प्रचार भारती आहे.''
मात्र प्रसार भारतीचे विद्यमान सीईओ गौरव द्विवेदी यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ''लोगोमध्ये भडक रंगाचा वापर फक्त व्यावसायिक धोरणाचा भाग म्हणून करण्यात आला आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.''
मागील वर्षी जानेवारीत 'दूरदर्शन पोथिगई' या दूरचित्रवाणी वाहिनीचं नाव बदलून 'डीडी तमिळ' करण्यात आलं होतं.
नाव बदलल्याच्या वृत्तामुळं त्यावेळेस खूप वाद निर्माण झाला होता. शिवाय 'डीडी तमिळ'च्या लोगोचा रंगदेखील बदलून 'भगवा' करण्यात आला होता.
याच महिन्याच्या सुरूवातीला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दूरदर्शनवर 'द केरल स्टोरी' नावाच्या चित्रपटाच्या प्रसारणाला तीव्र विरोध केला होता.
विजयन यांचं म्हणणं होतं की, 'द केरल स्टोरी' हा चित्रपट प्रसारित करण्याचा निर्णय दूरदर्शनने तात्काळ बदलला पाहिजे. कारण या चित्रपटाचा हेतू द्वेष पसरवणं आहे. दूरदर्शनने संघ परिवाराचा अजेंडा चालवू नये.''
मात्र असं असूनदेखील 5 एप्रिलला रात्री 8 वाजता दूरदर्शनवर या चित्रपटाचं प्रसारण करण्यात आलं होतं. हे प्रकरण शांत होण्याआधीच डीडी न्यूच्या लोगोचा रंग बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळं प्रसार भारती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.
दूरदर्शनचा निर्णय
दूरदर्शन ही भारत सरकारची अधिकृत दूरचित्रवाणी वाहिनी आहे. या वाहिनीच्या लोगोचा रंग बदलण्याचा निर्णय दूरदर्शनच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर एका पोस्टच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला.
या पोस्टमध्ये दूरदर्शननं म्हटलं आहे, ''आता आम्ही एका नव्या रुपात येत आहोत, मात्र आमच्या मूल्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आधी अनुभव घेतला नसेल अशा बातम्यांचं जग अनुभवण्यासाठी तयार रहा आणि नवीन डीडी न्यूज पाहा.''
दूरदर्शननं त्याचबरोबर असंही म्हटलं आहे की ''दूरदर्शनच्या बातम्या नेहमीच वेगवान बातम्यांऐवजी अचूक बातम्या, नाटकी बातम्यांऐवजी वास्तव, तसेच सत्याची खात्री देतात.''
प्रसार भारतीच्या निर्णयावर टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील आपल्या सोशल मीडिया पेजवरून या निर्णयावर टीका केली आहे.
त्यांनी लिहिलं आहे, ''देशभरात लोकसभेची निवडणूक होत असताना दूरदर्शनच्या लोगोचा रंग अचानक भगवा झाला आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटतं आहे. ही गोष्ट पूर्णपणे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे.''
त्यांनी याचा भाजपाशी संबंध असल्याचा म्हणत टीका केली आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला.
ममता बॅनर्जी यांनी लिहिलं आहे की ''या निर्णयातून दूरदर्शन भाजपाला अनुकूल असण्यासंदर्भात बरंच काही दिसून येतं. ऐन निवडणुकीच्या काळात या प्रकारच्या भगवा समर्थक प्रचाराला निवडणूक आयोगानं परवानगी कशी दिली? निवडणूक आयोगाला या निर्णयावर तात्काळ अडकाव केला पाहिजे आणि दूरदर्शनचा लोगो पुन्हा एकदा जुन्या रंगाचा केला पाहिजे.''

फोटो स्रोत, DD
तर प्रसार भारतीचे माजी प्रमुख जवाहर सरकार यांचं म्हणणं आहे की असं वाटतं की एका विशिष्ट पक्षाचा प्रचार केला जातो आहे.
जवाहर सरकार 2012 पासून 2014 पर्यत प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सध्या ते तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत.
डीडी न्यूजने लोगोचा रंग बदलून भगवा करण्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''भारताची सरकारी दूरचित्रवाणी वाहिनी असलेल्या दूरदर्शनच्या ऐतिहासिक लोगोला भगवा रंग देण्यात आला आहे. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मला दूरदर्शनच्या भगवीकरणाबद्दल चिंता वाटते आहे. आता हे प्रसार भारती राहिलेलं नाही, तर एका विशिष्ट पक्षाची प्रचार भारती झाली आहे.''

जवाहर सरकार यांनी या आशयाचा संदेश एका व्हीडिओद्वारे सोशल मीडियावरदेखील पोस्ट केला आहे.
या व्हिडिओत त्यांनी म्हटलं आहे की ही फार दु:खाची गोष्ट आहे की सरकारी वृत्तवाहिनीने आपल्या ब्रॅंडिंगसाठी हा रंग निवडला. तुम्ही याला नारिंगी किंवा इतर दुसरा रंग म्हणू शकता. मात्र सर्वसाधारणपणं याला भगवा रंग म्हटलं जातं आणि याला एका विशिष्ट धर्माशी जोडून पाहिलं जातं.
जवाहर सरकारनं म्हटलं की ''या निर्णयानंतर देश, सरकार, पक्ष, संघटना आणि धर्म यांना वेगळं करणाऱ्या रेषा जणूकाही संपल्या आहेत.''
ते म्हणाले, ''लाखो लोक ही वाहिनी पाहतात. या व्यासपीठाचा वापर एका विशिष्ट धर्माच्या रंगाचा प्रसार करण्यासाठी करणं योग्य नाही. तुम्ही म्हणू शकता की राष्ट्रध्वजादेखील हा रंग आहे. मात्र तिथं हा रंग इतर रंगांसोबत आहे.''
दूरदर्शनचं भगवीकरण होतं आहे का?
दूरदर्शनमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीशी या वादाबद्दल संवाद साधला.
त्यांनी सांगितलं, 90 च्या दशकात जेव्हा दूरदर्शन सुरू झालं होतं, तेव्हा त्याला एका सत्ताधारी पक्षाच्या बॅनरखाली लॉंच करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळेस इथं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचं आकलन नव्हतं की या वाहिनीचं उद्दिष्ट काय आहे आणि याच्या वाटचालीचे पुढील टप्पे काय असणार आहेत.
त्या अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं, ''दूरदर्शन लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं. याचं एक कारण हेदेखील होतं की त्यावेळेस दुसरी कोणतीही वाहिनी तितकी मोठी नव्हती. 2000 च्या दशकात खासगी वाहिन्यांची सुरूवात झाली आणि त्या लोकप्रियदेखील होऊ लागल्या. मात्र तरीदेखील कोणीही दूरदर्शनला बदलण्याचा प्रयत्न केला नव्हता. एकापाठोपाठ येणाऱ्या सरकारांनादेखील याचं आकलन झालं नाही.''
ते अधिकारी म्हणाले, ''ज्याप्रकारे बीएसएनएलसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला संपवण्यात आलं, तीच गोष्ट दूरदर्शनच्या बाबतीतदेखील होते आहे. दूरदर्शनमध्ये काय होतं आहे, हे पाहणारा कोणीही नाही. त्यामुळंच संपूर्ण नियंत्रण काही लोकांच्या हाती जातं.''
एका उदाहरणाद्वारे ही गोष्ट समजवताना ते सांगतात, ''दूरदर्शन जर निवडणूक प्रचाराचा एखादा व्हीडिओ आला तर त्यात सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. मात्र एका राज्यात व्हीडिओमध्ये त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सातव्या क्रमांकावर ठेवलं जातं. कारण ते विरोधी पक्षातील असतात. मात्र एक भाजपा नेता जो कोणत्याही पदावर नाही त्याला तिसऱ्या स्थानावर ठेवलं जातं आणि अधिक वेळ दिला जातो. यात कोणती समानता आहे?''
अधिकाऱ्यानं सांगितलं, ''दूरदर्शनमध्ये सर्व नोकऱ्या त्यांनाच मिळतात जे एका विशिष्ट पक्षाचे असतात. तामिळ दूरदर्शनमध्येदेखील हेच होतं आहे. अलीकडेच एका सेलिब्रिटीबरोबर मोठी सीरिअल करण्याची ऑफर देण्यात आली. आता ते भाजपामध्ये दाखल झाले आहेत.''
ते म्हणाले, ''काही कर्मचारीदेखील एकाच पक्षाला झुकंत माप देण्याचा विरोध करत आहेत, मात्र त्यांचं कोणीही ऐकत नाही. दूरदर्शन अधिक उत्तम बनवण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत. या प्रकारे भगवेकरण करून काही उपयोग होणार नाही.''
भगवीकरण रुजवण्याचा प्रयत्न
तामिळनाडू प्रोगेसिव्ह रायटर्स आर्टिस्ट असोसिएशनचे महासचिव अधावन दीत्सन्या सांगतात, ''भारतीय मीडियामध्ये मागील काही वर्षांपासून स्थित्यंतर होतं आहे. तुम्ही जर दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहात असाल तर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे कुठेतरी याचं भगवाकरण झालं आहे.''
''आयआरसीटीसीचं मोबाईल अॅप, वंदे भारत ट्रेन, ही फक्त काही उदाहरणं आहेत. प्रत्येक ठिकाणी भगवा रंग आणून, सर्वसामान्यांमध्ये ते रुजवण्याचा प्रयत्न होतो आहे.''
''हे त्या लोकांबद्दल बोलण्यासारखं आहे की सरकार लोक जेव्हा बोलतात तेव्हा जय श्रीराम म्हणतात. फक्त दूरदर्शनच नाही, तर आपल्या चारी बाजूंना पाहिल्यास दिसतं की कसं या दहा वर्षात एक महाकाव्यच तयार झालं आहे.''

फोटो स्रोत, AADHAVANDHEETCHANYA
ते पुढं म्हणाले, ''निवडणूक प्रचारासाठी जाणारे पंतप्रधान, पदाचं महत्त्व राखण्याऐवजी सांगतात की विरोधी पक्षांनी मांसाहार केला आणि मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आले नाहीत. अशा परिस्थितीत दूरदर्शनच्या लोगोचा रंग भगवा करण्यात आला आहे, यात आश्चर्य नाही.''
सरकारी वाहिनीवर 'द केरल स्टोरी' चं प्रसारण
ज्येष्ठ पत्रकार प्रियन म्हणतात, ''द केरला स्टोरी' या चित्रपटाचा खटला आधीच न्यायालयात सुरू असताना सरकारी वाहिनी असणाऱ्या दूरदर्शननं निवडणुकीच्या काळात हा चित्रपट दाखवला. निवडणूक आयोगालादेखील यामुळं आश्चर्य वाटलं. दूरदर्शनचा हा नवा अवतार नक्कीच एक भगवा अवतार आहे.''
याबाबतीत प्रश्न विचारताना ते म्हणतात, ''हा चित्रपट एका विशिष्ट वर्गाविरोधात आणि समाजाविरोधात आहे हे माहित असूनसुद्धा याला सरकारी वृत्तवाहिनीवर का दाखवण्यात आलं? निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी हे केलं जात असताना दूरदर्शनला हे ठाऊक नव्हतं का की ते एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने उभे आहेत.''

फोटो स्रोत, Sunshine Pictures
ते म्हणाले, जिथं संसदेचंच भगवीकरण करण्यात आलं आहे, तिथं डीडीच्या लोगोचा रंग भगवा होणं अत्यंत साधारण गोष्ट आहे.
ते पुढं म्हणाले, ''निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. अजून सहा टप्प्यांचं मतदान व्हायचं बाकी आहे. लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी ते आता अशा डावपेचांचा वापर करतील आणि म्हणतील की आम्ही बहुसंख्यांक समाजाचे समर्थक आहोत आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात आहोत. त्यांना एव्हढंच येतं.''
दूरदर्शनचं संचालक मंडळ काय म्हणतं?
प्रसार भारतीचं सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी दूरदर्शनच्या लोगोचा रंग बदलण्यासंदर्भात होत असलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे.
ते म्हणाले की लोगोचा नवा रंग नारिंगी आहे आणि या बदलाचा संबंध कोणत्याही पक्षाशी किंवा एका विशिष्ट रंगाशी नाही.
त्यांनी पत्रकारांना सांगितलं की ''हा नारिंगी रंग आहे. सहा-सात महिन्याआधी, जी20 परिषदेच्या आयोजनाआधी, आम्ही डीडी इंडिया (इंग्रजी वृत्तवाहिनी) च्या लोगोचा रंग याच रंगात अपडेट केला होता. यानंतर आम्ही नव्या ग्राफिक्ससंदर्भात निर्णय घेतला.''
''आम्ही व्हिज्युअल्स आणि तांत्रिक पातळीवर डीडी न्यूजच्या एका नव्या अवताराची सुरूवात केली आहे. फक्त वाहिनीचा लोगोच नाही तर नवीन ठिकाणं, आधुनिक उपकरणं, सादरीकरणाची नवी शैली, असे अनेक नवे बदल करण्यात आले आहेत.''
ते म्हणाले, ''या आधी आम्ही दूरदर्शनच्या लोगोमध्ये निळ्या आणि पिवळ्या रंगांचादेखील वापर केला आहे. लोगोमध्ये भडक रंगाचा वापर हा मार्केटिंग धोरणाचा भाग आहे. त्यामुळंच हा बदल वाहिनीसाठी करण्यात आला आहे. याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही.''



























