टी-20 वर्ल्ड कप : 'बुमरा', 'बापू' आणि सॅमसनने भारताला सलग दुसऱ्या फायनलमध्ये पोहोचवलं

भारतीय संघ
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

संजू सॅमसनची झंझावाती फलंदाजी, बुमरा आणि हार्दिकचा अचूक मारा आणि अक्षर पटेलचं अप्रतिम क्षेत्ररक्षण यांच्या जोरावर भारतानं इंग्लंडला हरवलं आणि पुरुषाच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अटीतटीच्या लढतीत भारताने शेवटच्या क्षणी 7 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर 254 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. जेकब बेथलने शतक ठोकून इंग्लंडच्या आशा शेवटपर्यंत जिवंत ठेवल्या होत्या.

पण इंग्लंडला 20 षटकांत 7 बाद 246 धावाच करता आल्या आणि भारतानं विजय साजरा केला.

टीम इंडियाला आता 8 मार्चला अहमदाबादमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा मुकाबला करायचा आहे.

अखेरच्या षटकात भारतानं असा मिळवला विजय

वानखेडेवर इंग्लंडच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत लढा दिला. विशेषतः जेकब बेथलची खेळी लक्षवेधक ठरली. त्यानं 48 बॉलमध्ये 8 चौकार आणि 7 षटकार खेचून 105 धावा केल्या.

शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये इंग्लंडला 69 धावांची गरज होती, तेव्हा कर्णधार सूर्यकुमारने भारतीय संघाचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराच्या हातात बॉल दिला.

बुमराने 4 षटकांत फक्त 33 धावा देऊन 1 विकेट काढी. त्याने टाकलेलं 16 वं आणि 18 वं षटक निर्णायक ठरलं.

मग 19 व्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर सॅम करन बाद झाला तेव्हा भारताची सामन्यांवरील पकड वाढली.

शेवटच्या 6 बॉलमध्ये 30 धावांशी आवश्यकता असताना सूर्युकमारनं चेंडू मुंबईकर शिवम दुबेकडे सोपवला. शिवमनं टाकलेल्या त्या षटकात इंग्लंडचे फलंदाज 22 धावाच करू शकले आणि भारताचा विजय निश्चित झाला.

अक्षर पटेलचे अफलातून झेल

वानखेडेवरच्या उपांत्य सामन्यात तीन कॅचेस लक्षवेधक ठरले.

आधी भारताच्या डावात हॅरी ब्रूकनं संजू सॅमसनला जीवदान दिलं, जे इंग्लंडला चांगलंच महागात पडलं. अगदी सरळ हातात आलेला सॅमसनचा झेल ब्रूकनं सोडला. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी मात्र अशी चूक होऊ दिली नाही.

विशेषतः अक्षर पटेल, म्हणजे चाहत्यांच्या लाडक्या 'बापू'नं टिपलेले दोन झेल कायम लक्षात राहतील असेच होते.

अक्षर पटेल
फोटो कॅप्शन, पाचव्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक बाद झाला. अक्षर पटेलने मागे धावत जाऊन ब्रुकचा अप्रतिम झेल घेतला.

जसप्रीत बुमराच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलनं मागे जात ब्रूकचा झेल टिपला, तो केवळ अप्रतिमच ठरला. 24 मीटर मागे जात अक्षरनं हा झेल टिपला, तेव्हा काहींना अक्षर पटेलची आठवण आली.

त्या कॅचनं इंग्लंडला काहीसं बॅकफूटवर ढकललं, तेव्हा जेकब बेथेलनं त्यांचा डाव सावरला. बेथेल विल जॅक्ससह आणखी एक मोठी भागीदारी रचण्याची चिन्हं दिसू लागली.

तेव्हा अक्षरच्या मदतीनं शिवम दुबेनं त्याचा अप्रतिम रिले कॅच पकडला.

अक्षर पटेल आणि शिवम दुबे

विल जॅक्सचा डीप कव्हरवरून मारलेला चेंडू सीमारेषेजवळ अक्षरनं टिपला, पण आपण बाऊंडरी ओलांडणार हे लक्षात येताच त्यानं चेंडू शिवम दुबेकडे भिरकावला.

शिवमनं झेल टिपण्यात कसर केली नाही. आणि कॅचेस विन मॅचेस असं का म्हणतात, ते पुन्हा एकदा सिद्ध झालं.

अशा पडल्या इंग्लंडच्या विकेट्स

खरंतर इंग्लंडच्या डावातल्या पहिल्या षटकात जॉस बटलरनं अर्शदीप सिंगला तीन चौकार खेचून आक्रमक सुरुवात केली होती.

पण भारतीय गोलंदाजांनी लगेच त्यांच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडलं. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर फिल सॉल्ट अक्षर पटेलकडे झेल देऊन बाद झाला.

त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमरा गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर त्यानं भारताला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. अक्षर पटेलने मागे धावत जाऊन ग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकचा अप्रतिम झेल घेतला.

जेकब बेथेलने वरुण चक्रवर्तीला सलग तीन षटकार खेचले. पण त्यानंतर लगेच जॉस बटलर चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.

मग अक्षर पटेलनं आठव्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर टॉम बँटमची विकेट काढली आणि इंग्लंडला चौथा धक्का दिला.

14 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने विल जॅक्सची विकेट घेतली. विल जॅक्सने 20 बॉलवर 35 रन्स काढले होते.

भारतीय संघ

जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्तीनं सुरुवातीला या विकेट्स काढल्या, तेव्हा सामना एकतर्फी होईल की काय असं वाटलं.

पण जेकब बेथेल पाय रोवून उभा राहिला. त्यानं शतक ठोकत भारतीय गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. पण जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीनं हा दबाव काहीसा कमी केला.

मग 19 व्या षटकात हार्दिक पटेलच्या गोलंदाजीवर तिलक वर्मानं सॅम करनचा झेल टिपला. त्यानंतर अखेरच्या षटकात बेथेल धावचीत झाला, आणि तिथेच भारताचा विजय निश्चित झाला.

संजू सॅमसनचा झंझावात

या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. त्याचा पुरेपूर फायदा भारतीय फलंदाजांनी उचलला.

संजूनं 42 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 7 षटकारांची बरसात करत 89 धावा केल्या. तसंच ईशान किशनसह 97 आणि शिवम दुबेसह 43 धावांची भागीदारी रचली.

खरं तर या सामन्यात संजू सॅमसन आणि इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यातली चुरस आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

तिसऱ्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चर आणि संजू सॅमसन यांच्यात नाट्य रंगलं. आधी पहिल्याच चेंडूवर सॅमसननं चौकार लगावला. मग दुसऱ्या चेंडूवर सॅमसनला जीवदान मिळालं.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला सॅमसनचा सरळ हातात आलेला झेल टिपता आला नाही. हे जीवदान किती महागात पडू शकतं, याची प्रचिती लगेचच आली.

त्या षटकातला चौथा चेंडू सॅमसननं सहज स्टँड्समध्ये भिरकावत षटकार साजरा केला. ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवरही त्यानं एक चौकार लगावला.

संजू सॅमसन

तिसऱ्या ओव्हरमध्ये संजू सॅमसनला जीवदान मिळालं. जोफ्राच्या ओव्हरमध्ये कर्णधार ब्रूक्सने संजूचा झेल सोडला.

आठव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत सँजू सॅमसननं अर्धशतकाची वेस ओलांडली. 26 चेंडूंमध्येच त्यानं 50 धावांचा टप्पा ओलांडला.

Samson

संजूची फलंदाजी पाहून कुणालाही वाटावं की जणू ईडनवरची इनिंगच तो पुढे खेळतो आहे, एवढा सेट होऊन संजू खेळत करत होता.

वानखेडे स्टेडियमवरचे फॅन्सही त्याच्या 'संजू... सॅमसन, संजू... सॅमसन' म्हणून त्याच्या नावाचा घोष करत राहिले.

सलग दुसऱ्या सामन्यात शतकाच्या जवळ येऊनही संजूला शतक पूर्ण करता आलं नाही. पण भारताच्या डावाला त्यानं आकार मात्र दिला.

अगदी दहा-बारा दिवसांपूर्वी फलंदाजीत टॉप ऑर्डरचं अपयश हे भारतासाठी डोकेदुखी ठरलं होतं.

पण सुपर एटच्या अखेरच्या लढतीत वेस्ट इंडीजविरुद्ध संजू सॅमसनला अभिषेक शर्मासोबत सलामीला पाठवायचा आणि तिलक वर्माला पाचव्या क्रमांकवर मधल्या फळीत खेळवण्याचा निर्णय भारतासाठी गेमचेंजर ठरला होता. मग वानखेडेवरच्या सामन्यातही संजूनं त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.

भारतीय फलंदाजांची कामगिरी

दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अभिषेक शर्माची विकेट पडली. विल जॅक्सनच्या गोलंदाजीवर फिलिप सॉल्टनं त्याचा झेल टिपला. अभिषेक 9 धावा करून माघारी परतला.

पण संजू सॅमसननं इशान किशनसह भारताचा डाव सावरला

संजू सॅमसन
फोटो कॅप्शन, संजू सॅमसन

दहाव्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर आदील रशीदनं अखेर ईशान किशनला बाद केलं आणि इंग्लंडला ब्रेकथ्रू मिळवून दिला. ईशाननं 18 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या.

धावांचा ओघ सुरू राहावा म्हणून भारतानं बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केले आणि शिवम दुबेला बढती दिली. 12.4 षटकांत भारतानं 150 धावांचा टप्पा गाठला.

अखेर चौदाव्या षटकात 42 बॉल्समध्ये 89 धावांची खेळी करून संजू बाद झाला. विल जॅक्सच्या गोलंदाजीवर फिल सॉल्टनं संजूचा झेल टिपला, तेव्हा वानखेडे स्टेडियमवर शांतता पसरली.

सूर्यकुमार यादव 11 धावांवर माघारी परतला, आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बटलरनं त्याला यष्टीचीत केलं. पाठोपाठ धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवम दुबेला ब्रूकनं धावचीत केलं. शिवमनं 43 धावांची खेळी केली.

इंग्लंडचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

टॉस जिंकल्यानंतर ब्रुक म्हणाला, "आमच्याकडे गोलंदाजी करणार आहोत. चांगली खेळपट्टी दिसतेय, आशा आहे की आम्ही गोलंदाजीमध्ये चांगली सुरुवात करू शकू. या मैदानावर त्यांना आमच्यापेक्षा खूप जास्त अनुभव आहे. टी-20 क्रिकेट हा इतका अनिश्चित खेळ आहे की काय होईल हे तुम्हाला कधीच कळत नाही. आशा आहे की आम्ही त्यांना रोखू शकू. रेहानऐवजी ओव्हरटन संघात आला आहे."

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, "आम्हाला आधी फलंदाजीच करायची होती. उपांत्य फेरी हा मोठा सामना आहे. जास्त दव पडेल असे वाटत नाही. खेळपट्टी चांगली दिसतेय. सर्व क्युरेटर आणि ग्राउंड्समनना याचं श्रेय जातं. आम्ही संघात कुठलाही बदल केलेला नाही."

हॅरी ब्रूक आणि सूर्यकुमार यादव
फोटो कॅप्शन, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडचा संघ : फिलिप साल्ट, जॉस बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

भारतीय संघ : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

सेमीफायनलच्या तिकीटाची किंमत 20,000पर्यंत

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमलगत मरीन ड्राईव्हवर जमलेले चाहत.

अनेक जण मैदानात प्रवेश मिळणार नाही म्हणून ते निराशही आहेत
फोटो कॅप्शन, अनेक जण मैदानात प्रवेश मिळणार नाही म्हणून ते निराशही आहेत

अनेक जण आत प्रवेश मिळणार नाही म्हणून ते निराशही आहेत - काळ्या बाजारात तिकिटाची किंमत तब्बल 20,000 रुपयांपर्यंत गेल्याची माहिती मिळते आहे.

स्टेडियममध्ये अजून सगळे स्टँड्स पूर्ण भरलेले नाहीत आणि लोक अजूनही आत येत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)