मुंबईच्या सफाई कामगाराने मिळवली परदेशी विद्यापीठात Ph.D साठी स्कॉलरशिप

मयूर हेलिया
Published

मुंबई महानरपालिकेत गेली 12 वर्षे सफाई कामगार म्हणून काम करत असलेल्या मयूर हेलिया या तरुणाने स्वप्ववत अशी भरारी घेतली आहे.

मयूरने ब्रिटनच्या लँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये PhD करण्यासाठी स्कॉलरशिप मिळवली आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलंय. या यशामुळे मयूरचं आयुष्य पुरतं बदलून जाणार आहे.

मयूरच्या या यशाचं मुंबई महापालिकेसह सर्वच स्तरातून मोठं कौतुक होत असल्याचं दिसून येतं.

18 व्या वर्षी वडिलांचं निधन

मयूरचे वडील मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करायचे. मयूर अठरा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं.

वडिलांच्या पश्चात त्याच्या कुटुंबात आई, मयूर आणि दोन लहान भावंडं इतके सदस्य होते.कुटुंबात सर्वात मोठा भाऊ म्हणून मयूरला निर्णय घ्यायचा होता.

कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याला शिक्षण सोडून नोकरी करणं भाग होतं.

त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनही मयूरला वडिलांच्या ठिकाणी रिक्त झालेल्या जागेवर नोकरी स्वीकारावी लागली.

मयूर हेलिया

पहिल्याच दिवशी ठरवलं, 'पुढे शिकायचं'

याबाबत बोलताना मयूर सांगतो, “माझ्याकडे कोणताही पर्याय उरलेला नव्हता. पण ठीक आहे, असं म्हणत, मी नोकरी करायचं ठरवलं.”

“मात्र, पहिलाच दिवस माझ्यासाठी अतिभयानक ठरला. त्याच दिवशी मला हे काम तर करायचं नाही. त्या दिवसापासूनच मी निदान पदवी तरी पूर्ण करायचं ठरवलं. त्यानंतर क्लर्क म्हणून किंवा प्रमोशन घेऊन या कामातून बाहेर पडण्याचा मी विचार करत होतो,” असं तो सांगतो.

मयूर रात्री दहा ते पहाटेपर्यंत सफाई कामगार म्हणून काम करायचा आणि दिवसा कॉलेज आणि अभ्यास असा त्याचा दिनक्रम असायचा.

या काळात इतर सफाई कर्मचाऱ्यांनी मयूरला शिकता यावं, यासाठी मदत केली.

मयूर सांगतो, “माझ्या सहकारी सफाई कामगारांनी मला नेहमी मदत केली. मी प्रत्येकवेळी त्यांना म्हणत असतो की, तुम्ही जर मला मदत केली नसती तर आज मी याठिकाणी पोहोचू शकलो नसतो.”

कित्येक कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या काळात माझ्या वाट्याचं काम स्वतः केलं. परीक्षा असल्यास अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर, म्हणत माझं काम करून त्यांनी मला मदत केली.”

मयूर हेलिया

'मुलाला विनाचप्पल कधी ठेवलं नव्हतं'

ब्रिटनच्या लँचेस्टर विद्यापीठात मयूर हेलियाच्या PhDचा विषय असणार आहे स्वच्छता आणि तंत्रज्ञान.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून मास्टर करताना परदेशी विद्यापीठात पुढे शिकायचं हे त्याचं स्वप्न होतं.

ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आईचा खूप मोठा वाटा आहे असं मयूर म्हणतो.

आईनेच तिन्ही मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला, म्हणूनच हे सगळं शक्य झालं, असं तो म्हणतो.

मयूरच्या आई शांता हेलिया सांगतात, “ज्या मुलाला मी कधी अस्वच्छतेत जाऊ दिलं नाही, चप्पल घातल्याशिवाय चालायला दिलं नाही, तोच जेव्हा कचरा उचलतो, कचऱ्यात हात घालतो, ते पाहून माझ्या मनाला खूप वेदना व्हायच्या.”

“तो दिवसरात्र मेहनत करायचा, ते बघून मला वाटायचं की, माझ्याकडे पैसे असते तर त्याच्यावर ही वेळ आली नसती."

मयूर हेलिया

बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामुळे प्रेरणा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जाती व्यवस्थेचे चटके तर ते लहानपणापासूनच सोसत आले होते. सामाजिक विज्ञान शिकत असताना त्यांची सामाजिक विचारांशी ओळख झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांसारख्या समाजसुधारकांमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली.

बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलताना मयूर सांगतो, "मी मास्टर्सचं शिक्षण घेत असताना बाबासाहेबांविषयी वाचायला सुरुवात केली. मास्टर्सला असताना माझा मुख्य विषय दलित अँड ट्रायेबल स्टडीज असा विषय होता. बाबासाहेबांसोबतच इतर समाजसुधारक, जसं की, सावित्रीबाई फुले, जोतीराव फुले, रमाई, वीर मेघमाया यांच्यापासून मला नेहमीच प्रेरणा मिळाली. मी पहिल्यांदा जेव्हा बाबासाहेबांचं पुस्तक Annihilation of Caste वाचलं, तोच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. यातून मला जातीव्यवस्था समजली.

तो पुढे म्हणतो, “बाबासाहेबांना वाचल्यानंतर लक्षात येतं की कशा प्रकारे जात व्यवस्था काम करते.

शहरांमध्ये कदाचित अॅट्रॉसिटी कमी असू शकेल, पण जातीय भेदभाव कमी नाही. आम्ही मुंबईत ज्या भागात राहतो तिथून मुंबईतील उच्चभ्रू वसाहतींना मोठ्या संख्येने कामगार पुरवले जातात. पण यामध्ये शोषण होत असल्याचं, मला बाबासाहेबांना वाचल्यावर समजलं."

भारतात सफाई कामगार म्हणून प्रामुख्याने वंचित आणि दलित जातींमधील लोक काम करतात.

एखाद्या ठिकाणी एखाद्या सफाई कामगारांचा मृत्यू झाल्यास रिक्त झालेल्या जागेवर त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच नोकरी दिली जाते.

मयूरने जातीतलं हे अलिखीत आरक्षण नाकारलं आणि शोषणाविरुद्ध शिक्षणाचा मार्ग निवडला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)