You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणात मोठी घडामोड; राजीनामे, FIR आणि ट्रस्टची भूमिका
- Author, अर्शद अफजल खान
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, अयोध्या
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
राम मंदिरातील दानपेट्यांमधून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अयोध्येचे एसएसपी गौरव ग्रोव्हर यांनी बीबीसी न्यूज हिंदीला दिली.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र (न्यास)द्वारे 27 जून रोजी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय, त्यात दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. न्यासाचे महामंत्री चंपत राय आणि न्यासी अनिल मिश्रा यांच्याकडून राजीनामे प्राप्त झाले असून यावर न्यासाच्या आगामी बैठकीत चर्चा केली जाईल, असं निवेदनात म्हटलं आहे.
सर्व 8 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. या सर्वांना पुढील 1-2 दिवसांत मॅजिस्ट्रेट न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
एफआयआरमध्ये नाव असलेले सर्व संशयित आरोपी हे त्या टीमचे सदस्य होते, जी 40 दानपेट्यांतील अर्पण किंवा देणगी तीर्थयात्री सुविधा केंद्रात आणल्यानंतर त्याची मोजणी करण्याचं काम करत होती.
तपास यंत्रणा मंदिर निधीतील कथित गैरव्यवहारामध्ये त्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत.
हा एफआयआर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) अशा कलमांखाली नोंदवण्यात आला आहे, जी कर्मचाऱ्याची चोरी, फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हेगारी कटाशी संबंधित आहेत.
टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, सुभाष श्रीवास्तव, करुणेश पांडे आणि रामशंकर मिश्रा अशी एफआयआरमधील नावं आहेत.
टिन्नू यादव देखरेखीची जबाबदारी सांभाळत होता, तर इतर सर्वजण रोख रक्कम मोजण्याच्या कामात होते.
तक्रारीनुसार, आरोपींनी परस्पर संगनमत करून भाविकांनी दिलेल्या देणगीची रकमेचा अपहार केला आणि ट्रस्टच्या निधीचा गैरवापर केला. हा प्रकार मंदिर परिसरातील दानपेट्यांतून जमा झालेल्या रकमेतील कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे.
13 जून रोजी आर्थिक अनियमिततेचे आरोप समोर आल्यानंतर ट्रस्टच्या मागणीवरून एका विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती.
या समितीचे अध्यक्ष विजय विश्वास पंत आहेत. या समितीत किरण एस आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नीलरत्न कुमार यांचाही समावेश आहे.
या समितीला कार्यपद्धतीतील त्रुटी शोधण्याचे आणि यामागे काही मोठा कट आहे का हे तपासण्याचे काम सोपवण्यात आले होते.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र (न्यास)द्वारे प्रसिद्ध झालेलं पत्रक
या प्रकरणाची न्यायपूर्ण चौकशी करून रामभक्तांचा विश्वास जपण्यास आम्ही बांधील असल्याचं न्यासाने स्पष्ट केलं आहे.
न्यासाच्या महामंत्री चंपत राय आणि न्यासी अनिल मिश्रा यांच्याकडून राजीनामे प्राप्त झाले असून यावर न्यासाच्या आगामी बैठकीत चर्चा केली जाईल, असं श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र (न्यास)द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
चांदीच्या विटा, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू ज्या भक्तांनी न्यासाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या आहेत, त्या सर्व वस्तू सुरक्षित असून त्यांचा संपूर्ण हिशोब उपलब्ध आहे, असं ट्रस्टद्वारे सांगण्यात आलं आहे.
मंदिरातील दानपेट्यांमधून मिळालेल्या रकमेच्या संदर्भात घडलेल्या प्रकारावर उत्तर प्रदेश प्रशासनाच्या विशेष तपास पथकाने (SIT) सादर केलेल्या अंतरिम अहवालाच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू असल्याचंही न्यासाने नमूद केलं आहे.
पुढील काळात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील आणि दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळेल, असा विश्वास ट्रस्टने व्यक्त केला आहे.
तसेच, समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या भ्रामक व निराधार अफवांपासून दूर राहण्याचं आवाहनही ट्रस्टने केलं आहे.
ताब्यात घेतलेले आरोपी कोण आहेत?
1. रामाशंकर यादव (टिन्नू)
जबाबदारी: दानपेट्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांना तळघरात नेणे.
आरोप: दानपेट्यांमधील कोट्यवधी रुपये हडप करणे, अपहार करणे आणि अयोध्या परिसरात मालमत्तांची खरेदी करणे.
2. लवकुश मिश्रा
जबाबदारी: देणगी आणि रोख रकमेची मोजणी करणे.
आरोप: देणगी देण्यात आलेल्या पैशांची चोरी करून कोट्यवधींची संपत्ती जमवणे. घरातून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले.
3. अनुकल्प मिश्रा
जबाबदारी: काउंटिंग रूममध्ये (मोजणी कक्ष) रोख रक्कम मोजणे.
आरोप: काउंटिंग रूममधून पैसे चोरून बाथरूममध्ये लपवणे आणि लाखो रुपयांची मालमत्ता जमवणे.
4. सुभाषचंद्र श्रीवास्तव
जबाबदारी: कॅश काऊंटिग कर्मचाऱ्यांचे प्रभारी.
आरोप: देखरेखीतील निष्काळजीपणा आणि चोरीमध्ये सहभाग.
5. करुणेश पांडे
जबाबदारीः दान करण्यात आलेली रक्कम काऊंटिग रूमपर्यंत आणणे आणि त्याची मोजणी करणे.
आरोपः अर्पण केलेल्या रकमेची चोरी करून अयोध्या परिसरात मालमत्ता खरेदी करणे.
6. मनीष यादव
जबाबदारीः देणगी पेटीतून मिळालेल्या रोख रकमेची मोजणी करणे.
आरोप: धार्मिक अर्पणांची चोरी; घरातून 36 लाख रुपये जप्त.
7. अविनाश शुक्ला
जबाबदारीः देणगी पेटीतून मिळालेली रक्कम काऊंटिंग रूमपर्यंत आणणे आणि त्याची मोजणी करणे.
आरोपः अर्पण करण्यात आलेल्या रकमेतून मालमत्तांची खरेदी.
8. रामाशंकर मिश्रा
जबाबदारीः देणगी पेटीतून मिळालेली रक्कम काऊंटिंग रूमपर्यंत आणणे आणि त्याची देखरेख करणे.
आरोप: इतर आरोपींसोबत मिळून संगनमताने देणगीच्या निधीचा गैरव्यवहार करणे
देणग्यांच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री संतापले
राम मंदिराच्या उभारणीसाठी जमा झालेल्या देणग्यांबाबत प्रश्न विचारल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक संतप्त झाले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "मी विचारतो, बाबरी मशिदीसाठी देणग्या गोळा केल्या होत्या का? केल्या होत्या ना? त्याबद्दल प्रश्न विचारा, कोणी विचारत आहे का?"
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस 'तुष्टीकरणाचे राजकारण' करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजप सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध 'शून्य सहिष्णुतेच्या धोरणावर' (झिरो टॉलरन्स) ठाम आहे, असंही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)