अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षांनी मावळमध्ये बांधली होती 100 घरं, तर पत्नी झाडायच्या लाभार्थीचं घर

जिमी कार्टर

फोटो स्रोत, Ajij Shaikh

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी स्वतः बांधकामात मदत केली होती.
    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अमेरिकेचे 39 वे अध्यक्ष जिमी कार्टर यांचं 29 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं.

जिमी कार्टर यांच्या निधनाची बातमी कळताच पुण्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावातल्या नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कारण अमेरिकेच्या या माजी राष्ट्राध्यक्षानं या गावातील 100 कुटुंबासांठी घरं बांधून दिली होती.

2006 मध्ये या नागरिकांना त्यांचा हक्काचा निवारा देणारे जिमी कार्टर या घरांचं बांधकाम चालू असताना स्वतः उपस्थित होते.

सुतारकामात निपुण असलेल्या जिमी कार्टर यांनी त्यावेळी स्वतः घरांच्या बांधकामात मदत केली होती, तर त्यांच्या पत्नी रोझलीन यांनी देखील जिमी कार्टर यांच्यासोबत श्रमदान केलं होतं.

काय आहे ही शंभर घरांची गोष्ट आणि मावळमध्ये जिमी कार्टर पोहोचले कसे, हे आपण जाणून घेऊया.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

1977 ते 1981 या दरम्यान अमेरिकेचं अध्यक्षपद भूषवलेल्या आणि शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या जिमी कार्टर यांनी लोणावळ्याजवळील पाटण गावात येऊन तेथील नागरिकांसोबत काम केलं होतं.

जिमी कार्टर यांनी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी आणि संपर्क या दोन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं 2006 साली लोणावळ्याजवळील पाटण गावातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या 100 कुटुंबांना हक्काचा निवारा दिला होता. अवघ्या पाच ते सहा दिवसांत या घरांचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं होतं.

या प्रकल्पात जिमी कार्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत हॉलिवूड कलाकार ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली, भारतीय अभिनेता जॉन अब्राहम आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी देखील यावेळी मदत करून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.

जवळपास हजारहून जास्त स्वयंसेवकांनी या प्रकल्पामध्ये श्रमदान केलं होतं.

'जिमी कार्टर यांनी स्वतःच्या हातानं बनवली माझ्या घराची भिंत'

ज्यांच्या घराची एक अख्खी भिंत जिमी कार्टर यांनी स्वतःच्या हातानं बनवली होती, त्या अजीज रफीक शेख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना जिमी कार्टर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

त्यांनी सांगितलं की, "जिमी कार्टर यांनी माझ्या घराची एक संपूर्ण भिंत स्वत:च्या हातानं बनवली होती. दोन दिवस ते आणि त्यांच्या पत्नी रोझलीन कार्टर आमच्यासोबत आमच्या घराचं काम करत होते. त्यांनी खुप मनापासून काम केलं होतं."

"जिमी कार्टर यांच्या पत्नी रोझलीन कार्टर तर माझ्या घरात काम झालं की संध्याकाळी झाडू मारायच्या. मला आणि माझ्या पत्नीला त्यांना तसं करताना पाहून फार अवघडल्यासारखं वाटायचं.

जिमी कार्टर

फोटो स्रोत, Getty Images

"आम्ही त्यांना म्हणायचो की, नका करू तुम्ही हे काम. परंतु त्या ऐकायच्या नाहीत. उलट त्या 'नो नो, दिस इज माय हाऊस' असं म्हणून संपूर्ण घर झाडून घ्यायच्या," असंही पुढं ते म्हणाले.

जिमी कार्टर आणि त्यांच्या पत्नी रोझलीन यांनी माझ्या घरासाठी काम करणं ही माझ्या आयुष्यातली खुप मोठी घटना आहे असं अजीज शेख सांगतात.

कामाच्या शेवटच्या दिवशी जिमी कार्टर यांनी अजीज शेख यांना 20 डॉलरची नोट भेट म्हणून दिली होती. ती नोट आठवण म्हणून आजही अजीज यांनी जपून ठेवल्याचं ते सांगतात.

ब्रॅड पीटदेखील करत होता बांधकामात मदत

या प्रकल्पादरम्यान अजीज शेख यांची ब्रॅड पीट या हॉलिवूड अभिनेत्यासोबत देखील भेट झाली होती. त्याबद्दल बोलताना अजीज शेख यांनी म्हटलंय, "ब्रॅड पीट हा हॉलिवूड अभिनेता आमच्या शेजारच्या खोलीत काम करत होता. कामाच्या पहिल्या दिवशी असंच मधेच तो माझ्याकडे आला आणि मला त्याचं नाव सांगितलं, मग मी ही त्याला माझं नाव सांगितलं. मला तेव्हा त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं."

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कर्णधार स्टीव्ह वॉ

फोटो स्रोत, Ajij Shaikh

फोटो कॅप्शन, हॉलिवूड कलाकार ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली, भारतीय अभिनेता जॉन अब्राहम आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी देखील हा प्रकल्प बांधण्यात मदत केली होती.

"तेव्हा माझ्यासोबत काम करणारे जीमी कार्टर यांचे फॅमिली डॉक्टर शरद पटेल हे आमचं संभाषण ऐकत होते. यांनी मला विचारलं की अजीज तुला माहिती आहे का तो कोण आहे?

"मी नाही असं म्हटल्यावर त्यांनी मला सांगितलं की अमिताभ बच्चन यांच्यासारखा तो (ब्रॅड पिट) तिकडचा खुप मोठा अभिनेता आहे." त्यावेळी त्यांना फार काही वाटलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

"परंतु त्यानंतर पुन्हा 3 ते 4 दिवसांनी ब्रॅड पीट पुन्हा आला आणि आल्या आल्या त्यानं मला 'कसा आहेस अजीज' असं इंग्रजीमधे विचारलं. माझं नाव इतक्या मोठ्या कलाकारानं लक्षात ठेवलं हे पाहून त्यावेळी मला खुप छान वाटलं होतं. त्या मौल्यवान आठवणी मी कधी विसरूच शकत नाही," असं पुढं त्यांनी सांगितलं.

या प्रकल्पासाठी पाटणची निवड कशी झाली?

या प्रकल्पासाठी पाटणची निवड कशी झाली, याबाबत बीबीसी मराठीनं 'संपर्क' या स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख अमित कुमार बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिमी कार्टर ग्रुपला ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या आणि स्वतःचं हक्काचं घर नसलेल्या कुटुंबासाठी एक गृह निर्माण प्रकल्प करायची इच्छा होती.

त्यादृष्टीनं 2005 मध्ये या प्रकल्पाची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यांच्याकडून या प्रकल्पाची जबाबदारी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी या आंतरराष्ट्रीय तर लोणावळ्यातील संपर्क या स्थानिक स्वयंसेवी संस्थांना देण्यात आली होती.

जिमी कार्टर

फोटो स्रोत, Ajij Shaikh

फोटो कॅप्शन, जिमी कार्टर ग्रुपला ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या आणि स्वतःचं हक्काचं घर नसलेल्या कुटुंबासाठी एक गृह निर्माण प्रकल्प करायची इच्छा होती.

बॅनर्जी यांच्या संपर्क या स्थानिक स्वयंसेवी संस्थांनं सुचवल्याप्रमाणं, मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्थानकापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटण गावातील पाच एकर जमीनीची खरेदी या प्रकल्पासाठी करण्यात आली.

महिला बचत गटाच्या सदस्यांच्या मदतीनं 'संपर्क अभिनव गृहनिर्माण सोसायटी' असं नाव ठेवलेला हा प्रकल्प पुर्ण करण्यात आला.

28 फेब्रुवारी 2007 ला सांडपाणीच्या व्यवस्था तसेच इतर अत्यावश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेली ही घरं 100 कुटुंबांच्या ताब्यात देण्यात आली. या घरांची मालकी ही कुटुंबातील महिलांना देण्यात आलेली.

त्याच वर्षी संपर्क या स्वयंसेवी संस्थेनं या प्रकल्पाच्या आवारात अंगणवाडी ते इयत्ता 12 वी पर्यंतचं शिक्षण देणारी 'संपर्क अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल' या शाळेची स्थापना केली.

अजीज यांची व्हीआयपी लाभार्थ्यांमध्ये कशी झाली निवड?

दरम्यान, या प्रकल्पाचं बांधकाम सुरू होण्याच्या एक वर्ष आधी 'हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी' या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं 5 जणांची एक टीम इथे पाहणी करण्यासाठी आली होती.

त्यावेळी त्यांना हव्या त्या ठिकाणी गाडीमध्ये घेऊन जाण्याचं काम एक ड्रायव्हर म्हणून अजीज शेख करत होते. इंग्रजी बोलता येत असल्यामुळे या प्रकल्पाच्या अगदी सुरुवातीपासूनच ते या मंडळींसोबत होते.

त्यांनी सांगितलं की, "मी या गावात राहत नव्हतो. त्यामुळे संपर्क संस्थेनं तयार केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत माझं नाव नव्हतं. तरी मला घर दिलं गेलं. कारण सुरूवातीला हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी आणि संपर्कमध्ये फक्त 91 घरांबाबत करार झाला होता."

श्रद्धांजलीचा फोटो

फोटो स्रोत, Ajij Shaikh

फोटो कॅप्शन, जिमी कार्टर यांच्या मृत्यूनंतर मावळच्या या छोट्याशा गावात राहणाऱ्या गावकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.

उरलेली 9 घरं हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी यांच्यातर्फे ते त्या लोकांना देणार होते जी लोकं त्यांना या प्रकल्पाचं काम करताना योग्य वाटणार होती.

परंतु, नंतर त्यांनी 98 घरं गावातील लोकांना दिली आणि उरलेल्या 2 व्हीआयपी लाभार्थ्यांमध्ये त्यांनी माझी आणि साठे कुटुंबाची निवड केली."

या घरासाठी निवड करताना त्यांनी विविध प्रकारे आपली योग्यता तपासून पाहिली असे देखील ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, वयाच्या 100 व्या वर्षी दीर्घ आजारानं जिमी कार्टर यांचं निधन झाल्याची बातमी कळताच या प्रकल्पातील लाभार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)