प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फोटो स्रोत, Getty Images
प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. मुंबईच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
14 डिसेंबर रोजी बेनेगल यांचा 90 वा वाढदिवस होता. श्याम बेनेगल यांच्या कन्या पिया बेनेगल यांनी बीबीसीशी बोलताना श्याम बेनेगल यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
त्या म्हणाल्या की, "श्याम बेनेगल यांचं आज (23 डिसेंबर 2024) संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी निधन झालं आहे. ते मागच्या 2 वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते."
अंकुर (1973), निशांत (1975), मंथन (1976), भूमिका (1977), मम्मो (1994), सरदारी बेगम (1996) आणि झुबेदा (2001) यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांसाठी बेनेगल यांना ओळखलं जात होतं. श्याम बेनेगल यांनी व्यावसायिक आणि समांतर अशा दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांचा ठसा उमटवला होता.
70-80 च्या दशकातील समांतर सिनेमाच्या चळवळीतील दिग्गज म्हणून श्याम बेनेगल यांना ओळखलं जातं.
त्यांच्या चित्रपटांत लैंगिक समानता, सामाजिक न्याय आणि राजकीय संघर्ष अशा विषयांचं अत्यंत मार्मिक चित्रण केलेलं असायचं.
श्याम बेनेगल यांना टीव्हीवर प्रचंड गाजलेल्या 'भारत एक खोज' आणि 'संविधान'च्या निर्मितीसाठीही ओळखलं जाईल.
त्यांना 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषणनं गौरवण्यात आलं होतं.
श्याम बेनेगल यांच्या 'अंकुर' चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांच्या वाढदिवसाला एक फोटो एक्सवर पोस्ट केला होता.

फोटो स्रोत, x.com/azmishabana


प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत श्याम बेनेगल यांना आदरांजली अर्पण केली.
"त्यांनी सिनेमात एक नवी लाट निर्माण केली होती. भारतीय चित्रपटसृष्टीची दिशा बदलणारे दिग्दर्शक म्हणून त्यांना कायम ओळखलं जाईल, " असं शेखर कपूर यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, X
अंकुर, मंथन आणि अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी हा बदल घडवला. त्यांनी शबाना आझमी, आणि स्मिता पाटील सारखे अनेक स्टार घडवले, अशी प्रतिक्रिया शेखर कपूर यांनी दिली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























