You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस उशिरा, 'या' आहे नव्या तारखा
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टी भागात मोठं नुकसान झालंय. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे सौराष्ट्रसह इतर किनारपट्टी भागाला फटका बसलाय.
हे बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे जरी वळलं नसलं, तरी महाराष्ट्रात येऊ घातलेल्या मान्सूनवर त्याचा किती परिणाम होईल, असा प्रश्न अनेकांना पडलाय.
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन वेळेपेक्षा पुढे गेलंय. त्यात अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचा मान्सून आणखी लांबणीवर पडला आहे का?
वादळामुळे राज्यातल्या मान्सूनवर काय परिणाम होणार आहे? हे प्रश्न आम्ही मुंबई हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांना विचारले.
सुनील कांबळे यांच्याशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी सविस्तर संवाद साधला. या संवादाचा संपादित अंश :
प्रश्न – बिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर काही परिणाम होईल का?
सुनील कांबळे - बिपरजॉयचा परिणाम फक्त गुजरातमधील सौराष्ट्रासह किनारपट्टीच्या भागावर होईल.
महाराष्ट्रासाठी याबाबतचा कुठलाही इशारा नाहीय. दोन-तीन दिवसांपूर्वी अरबी समुद्रातून चक्रीवादळ उत्तर दिशेला जात असताना महाराष्ट्राच्या सीमेपासून जवळ होतं. ताशी 40-50 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वारं आपल्या किनाऱ्यानं अनुभवले.
पण आता आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा कुठलाही धोका नाहीय.
प्रश्न – बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर काही परिणाम झालाय का?
सुनील कांबळे – आपल्याला माहिती आहे की, 4 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. केरळात दाखल झाल्यानंतर मान्सून उत्तरेच्या दिशेला सरकत, दोनच दिवसापूर्वी (13-14 जून) रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे.
चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आवश्यक आर्द्रता निर्माण झाली नाही. परिणामी महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवेश लांबला होता. थोडक्यात, मान्सून अंदाजाप्रमाणे येणार होता, त्यात बिपरजॉय चक्रीवादळामुळे काहीसा विलंब झालाय.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 18 ते 21 जूनच्या दरम्यान मान्सूसन महाराष्ट्र आणि मुंबईत सक्रीय होईल.
एकूणच, जरी मान्सून उशिरा आला, तरी महाराष्ट्रात जितका पाऊस पडणं अपेक्षित आहे, तितका पडण्याचा अंदाज असल्याचंही सुनील कांबळे यांनी सांगितलं.
मान्सूनच्या आगमनाविषयी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मान्सूनच्या प्रगतीविषयी बोलताना हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितलं की, “ज्याप्रमाणे मान्सूनची प्रगती व्हायला पाहिजे होती, तशी ती झालेली नाहीये. त्यामुळे पावसात मोठा खंड चालू आहे, असं म्हणायला हरकत नाही.
"ज्यावेळी पावसात असे मोठे खंड पडतात, तेव्हा अवर्षणाची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसात खंड असल्यावर पेरणी करू नये.”