You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लिंकन ते केनडी : अमेरिकेत आतापर्यंत किती राष्ट्राध्यक्षांच्या हत्या झाल्या, त्या कोणी आणि का केल्या?
- Author, सेलिन गिरिट, ॲलेक्झांड्रा फौचे
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे राजकीय सहकारी चार्ली कर्क यांच्या मारेकऱ्याचा अमेरिकेत कसून शोध घेतला जात आहे.
चार्ली कर्क हे एक उच्चपदस्थ काँझर्वेटिव्ह कार्यकर्ते होते. बुधवारी (10 सप्टेंबर) युटाहमधील एका विद्यापीठात बोलत असताना त्यांच्या मानेला एक गोळी लागली. त्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला.
कर्क यांच्या मारेकऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तसंच ही हत्या करण्यामागचा हेतूदेखील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि युटाह राज्याचे गव्हर्नर या दोघांनी या हत्येचा संबंध राजकीय हिंसाचाराशी जोडला आहे.
कर्क यांची हत्या ही अमेरिकेतील गोळीबाराच्या धक्कादायक हिंसाचारातील आणखी एक घटना आहे.
अमेरिकेत राजकीय हेतूनं प्रेरित होऊन केलेल्या हत्यांच्या दीर्घ मालिकेतील हा आणखी एक प्रकार असू शकतो.
अमेरिकेच्या इतिहासातील अशाच काही अत्यंत उच्च पदस्थ व्यक्तींच्या राजकीय हत्यांवर आपण नजर टाकूया.
राष्ट्राध्यक्षांच्या हत्या
अब्राहम लिंकन, अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष
अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे हत्या करण्यात आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष होते. 14 एप्रिल 1865 ला जॉन विल्क्स बूथ यानं लिंकन यांची हत्या केली होती.
लिंकन आणि त्यांची पत्नी वॉशिंग्टन डीसीमधील एका थिएटरमध्ये नाटक पाहायला गेलेले असताना बूथनं लिंकन यांच्यावर गोळी झाडली होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 एप्रिलच्या सकाळी लिंकन यांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांना लिंकन पाठिंबा देत होते. हे त्यांच्या हत्येमागचं कारण असल्याचं सांगितलं जातं.
नंतर काही दिवसांनी व्हर्जिनियामध्ये बूथला गोळी झाडून मारण्यात आलं.
जेम्स गारफिल्ड, अमेरिकेचे 20 वे राष्ट्राध्यक्ष
गारफिल्ड हे हत्या झालेले अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते. 2 जुलै 1881 ला गारफिल्ड वॉशिंग्टन डीसीमध्ये एका रेल्वे स्थानकावर पायी चालत असताना चार्ल्स गिटो यानं त्यांच्या गोळी झाडली होती.
त्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गारफिल्ड यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांना त्यांच्या शरीरात गोळी शोधण्यात अपयश आलं होतं. गारफिल्ड राष्ट्राध्यक्षपदावर येऊन फक्त काही महिनेच झाले होते.
चार्ल्स गिटो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं सांगण्यात आलं. त्याला गारफिल्ड यांच्या हत्येचा दोषी ठरवण्यात आलं आणि जून 1882 मध्ये त्याला मृत्यूदंड देण्यात आला.
विल्यम मॅककिन्ले, अमेरिकेचे 25 वे राष्ट्राध्यक्ष
6 सप्टेंबर 1901 ला न्यूयॉर्कमधील बफेलो इथं एका भाषणाच्या वेळी मॅककिन्ले यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती.
गोळी लागल्यामुळं झालेल्या जखमांमुळं काही दिवसांनी मॅककिन्ले यांचा मृत्यू झाला होता. लिऑन झोलगोझ या अराजकतावाद्यानं त्यांच्यावर गोळी झाली होती.
झालगोझला या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि ऑक्टोबर 1901 मध्ये फाशी देण्यात आली.
जॉन एफ केनेडी, अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष
22 नोव्हेंबर 1963 ला केनेडी डल्लासला भेट देत असताना मारेकऱ्यानं एका शक्तीशाली रायफलमधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. राष्ट्राध्यक्षांचा वाहनांचा ताफा मध्य डल्लासमधून जात असताना हा गोळीबार झाला.
गोळीबार झाल्यानंतर केनेडी यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.
केनेडींच्या हत्येच्या काही तासांनंतर, पोलिसांनी ली हार्वे ओसवाल्ड याला अटक केली. तो माजी मरीन सैनिक होता.
दोन दिवसांनी ओसवाल्डला पोलीस मुख्यालयातून काउंटी तुरुंगात नेलं जात असताना डल्लास नाईटक्लबचा मालक जॅक रुबी यानं त्याची गोळ्या झाडून हत्या केली.
राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार
रॉबर्ट एफ केनेडी, डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर
रॉबर्ट एफ केनेडी न्यूयॉर्कमधील सिनेटर होते. पाच वर्षांपूर्वी हत्या झालेल्या जॉन एफ केनेडी यांचे ते भाऊ होते.
1968 च्या कॅलिफोर्निया प्रायमरीमध्ये विजयी भाषण दिल्यानंतर लॉस एंजेलिसमधील एका हॉटेलमध्ये रॉबर्ट एफ केनेडी यांची हत्या झाली होती. त्यावेळेस ते डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते.
रॉबर्ट एफ केनेडी यांची हत्या सिरहान सिरहान यानं केली. त्याला हत्येचा दोषी ठरवण्यात आलं आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
मात्र सिरहाननं त्याविरोधात याचिका केली होती. 2023 मध्ये सिरहानची सुटकेसाठीची शेवटची याचिका फेटाळण्यात येऊन फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं.
नागरी हक्कांसाठी लढणारे नेते
मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर
कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्कांसाठी लढणारे नेते डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांची 1968 साली टेनेस्सीमधील मेम्फिसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
ते तिथे, कमी वेतन आणि कामाच्या ठिकाणच्या वाईट परिस्थितीविरोधात निदर्शनं करणाऱ्या सफाई कामगारांच्या मोर्चाचं नेतृत्व करणार होते.
डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांची हत्या जेम्स अर्ल रे यानं केली होती. तो श्वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादी मानसिकतेचा होता.
एका हॉटेलच्या बाल्कनीत किंग उभे असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा लगेचच मृत्यू झाला होता. त्यावेळेस ते 39 वर्षांचे होते.
डॉ. किंग यांच्यावर त्याआधीदेखील जीवघेणे हल्ले झाले होते. मात्र त्यातून ते बचावले होते. यात 1956 मध्ये त्यांच्या घरावर झालेल्या बॉम्बहल्ल्याचा देखील समावेश होता.
माल्कम एक्स
माल्कम एक्स हे कृष्णवर्णायांच्या सबलीकरणाला पाठिंबा देणारे करिष्माई नेते होते. 1965 मध्ये न्यूयॉर्कमधील एका बॉलरुममध्ये त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांचं वय 39 वर्षे होतं.
ते अनेक वर्षे नेशन ऑफ इस्लाममध्ये प्रमुख प्रवक्ते होते. यात अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या फुटीरतावादाचं समर्थन करण्यात आलं होतं. मात्र नंतरच्या काळात त्यांचे विचार अधिक संयमी झाले होते.
मुहम्मद अझीझ, खलील इस्लाम आणि थॉमस हेगन यांना त्यांच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2021 मध्ये अझीझ आणि इस्लाम यांची शिक्षा रद्द करण्यात आली.
अलीकडच्या काळातील हत्या आणि हत्येचे प्रयत्न
अगदी अलीकडेच म्हणजे 14 जून 2025 ला मिनेसोटामधील दोन डेमोक्रॅटिक लोकप्रतिनिधींची त्यांच्या घरात गोळ्या घालण्यात आल्या. ही 'हत्या राजकीयदृष्ट्या प्रेरित' असल्याचं म्हटलं गेलं.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधी मेलिसा हॉर्टमन आणि त्यांचे पती मार्क यांची त्यांच्या घरातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
स्टेट सिनेटर जॉन हॉफमन आणि त्यांची पत्नी यवेट यांच्यावर देखील अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या घरी त्यांच्यावर अनेक वेळा गोळीबार करण्यात आला, ज्यातून ते बचावले होते.
गेल्या वर्षी दोनवेळा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न झाले होते
जुलै 2024 मध्ये पेनसिल्व्हेनियामधील बटलरमध्ये उघड्यावर घेतलेल्या सभेत ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
युटाहमध्ये बुधवारी (10 सप्टेंबर) झालेल्या हल्ल्याशी त्याचं लक्षणीय साम्य दिसतं - दोघेही बाहेर गर्दीसमोर कार्यक्रम करत होते, असं बीबीसीचे उत्तर अमेरिकेचे प्रतिनिधी अँथनी झर्कर म्हणतात.
त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात ट्रम्प यांच्यावर त्यांच्या फ्लोरिडातील गोल्फ कोर्सवर हल्ला करण्याचा आणखी एक प्रयत्न झाला होता, मात्र सिक्रेट सर्व्हिसकडून तो उधळून लावण्यात आला होता
त्याच्या दोन वर्षे आधी, तत्कालीन सभापती आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख नेत्या नॅन्सी पेलोसी यांच्या घरात एक हातोडाधारी हल्लेखोर शिरला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.