मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई, माजी महापौर किशोरी पेडणेकर, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, KISHORI PEDNEKAR/TWITTER

फोटो कॅप्शन, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर
Published

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर 'एसआरए'प्रकरणी मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात वांद्रे येथील निर्मल नगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. पेडणेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. 'सकाळ'ने ही बातमी केली आहे.

काही दिवसांपूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेकडून कारवाईही झाली होती.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किशोरी पेडणेकर यांचे वरळीमधील गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आलं होतं. मुंबई महानगरपालिकेने किशोरी पेडणेकर यांचे एसआरए कायद्यानुसार घर आणि कार्यालय सील केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए योजनेवरुन गंभीर आरोप केले होते.

2. 'बदनामीची पर्वा करत नाही, धडाडीने काम करतो, चूक झाली तर माफी मागतो'

अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विरोधी पक्षनेते अजित पवार

“मी कधी बदनामीची पर्वा केली नाही, धडाडीने काम करणे हा माझा स्वभाव आहे. माझ्या मताशी ठाम राहतो, चूक झाली तर माफीही मागतो”, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.

“जलसंपदा विभागातील माझ्या कामातील चांगल्या कामाची चर्चा कमी झाली, तर काही कामांबाबत उगाचच आरोप करून बदनामी करण्यात आली. माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाला नाही. तत्कालीन जलसंपदा सचिव सुरेश सोडळ यांचे ऐकले असते तर आरोप झालेच नसते”, असं अजित पवार म्हणाले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

राजहंस प्रकाशनतर्फे जलसंपदा विभागातील माजी निवृत्त सचिव सुरेश सोडळ यांच्या ‘माझी जीवनधारा’ पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, “जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून काम करताना राज्य पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी असावे यासाठी प्रयत्न केले. राज्य आणि राज्यातला शेतकरी महत्त्वाचा असतो. काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यातून बदनामीही झाली. सोडळ सोलापूरच्या दुष्काळी भागातून आलेले असल्याने जलसंपदा विभागात तळमळीने काम केले. माझ्या राजकीय कारकिर्दीत वित्त विभाग, जल संपदा, ऊर्जा विभाग अशा विविध जबाबदाऱ्या निभावल्या. वडनेरे, सोडळ हे माझ्या जलसंपदा विभागातील कामाचे साक्षीदार आहेत”

3.राज ठाकरेंना अयोध्याबंदी करणारे बृजभूषण सिंहांचे पुण्यात स्वागत

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे पुण्यात आले होते. महाराष्ट्रात येताच बृजभूषण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे मंचावर भेट घेण्यासाठी आले तर नक्कीच भेटू असं ते म्हणाले. माझं आणि त्यांचं वैयक्तिक वैर नाही असंही त्यांनी सांगितलं.

मनसेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदवरच्या भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर त्यांनी आयोध्येत राम मंदिराला जाण्याचं ठरवलं होतं. याकरिता कार्यकर्ते मोठे उत्साहीत झाले होते. मात्र त्यांच्या या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्याच वेळेस राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. यामुळे राज ठाकरे यांना आयोध्या दौरा स्थगित करावा लागला होता. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

बृजभूषण सिंह यांनी केलेला विरोध विसरून राज ठाकरे यांनी त्यांना महराष्ट्रात येण्यासाठी कोणताही विरोध किंवा भूमिका दर्शवली नाही.

"कधीकाळी महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील नागरिकांना त्रास झाला होता. यावर राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. मी म्हणालो होतो राज ठाकरे यांना देखील माहित नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या नागरिकांना त्रास झाला असेल. पण आता ती गोष्ट संपली, ते दिवस गेले", असं बृजभूषण सिंह म्हणले.

4.द्वेष पसरवणाऱ्या अँकर्सना दूर करा- सर्वोच्च न्यायालयाने वृत्तवाहिन्यांना फटकारलं

सर्वोच्च न्यायालय, हेट स्पीच

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर्वोच्च न्यायालय

वृत्तवाहिन्यांवर प्रत्येक गोष्ट टीआरपीसाठी सुरु असून, यासाठी वाहिन्यांमध्ये स्पर्धा आहे. संवेदनशील मुद्यांचा अजेंडा ठरवला जातो. मात्र आपल्या कार्यक्रमांमधून समाजात द्वेष पसरवला जात असेल अशा वृत्तनिवेदकांना पडद्यावरून दूर केलं पाहिजे अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने वृत्तवाहिन्यांना फटकारलं आहे. 'सामना'ने ही बातमी दिली आहे.

युपीएससी जिहाद, कोरोना जिहाद, तबलगी जमात, धर्म संसद आदी द्वेषपूर्ण भाषणांचे संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. द्वेष पसरवणारी भाषणं आणि त्यावर कार्यक्रम घेण्यास, प्रसारण करण्यास वृत्तवाहिन्यांनी रोख लावावी अशी मागणी करण्यात आली. न्यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

5. युवा विश्वचषकात भारतीय मुलींची दमदार सलामी

शफाली वर्मा, श्वेता सेहरावत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शफाली वर्मा

दक्षिण आफ्रिकेत सुरु झालेल्या पहिल्या मुलींच्या U19 स्पर्धेत भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. बेनोई इथे झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 166 धावांची मजल मारली. सिमोन लोरेन्सने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. मॅडिसन लँड्समनने 32 धावा करत तिला चांगली साथ दिली. भारताकडून शफाली वर्माने 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना सलामीवीर श्वेता सेहरावतने 57 चेंडूत 20 चौकारांसह 92 धावांची वादळी खेळी केली. कर्णधार शफाली वर्माने 16 चेंडूत 45 धावांच्या खेळीदरम्यान एका ओव्हरमध्ये 4,4,4,4,4,6 अशा 26 धावा चोपून काढल्या.

या दोघींच्या तडाखेबंद खेळाच्या बळावर भारतीय संघाने हा सामना 4 षटकं आणि 7 विकेट्स राखून जिंकला. श्वेताला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)