अर्जुन तेंडुलकर मुंबईचा नवा हिरो; हैदराबादवर 14 धावांनी विजय

फोटो स्रोत, Getty Images
अर्जुन सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा नवा नायक असल्याचं मंगळवारी सिद्ध झालं. 193 धावांचा पाठलाग करताना हैदराबादने 19व्या षटकात रडतखडत 173 धावांची मजल मारली. शेवटच्या षटकात हैदराबादला 20 धावांची आवश्यकता होती. प्रमुख आणि अनुभवी गोलंदाजांची षटकं झाली होती. कर्णधार रोहित शर्माने चेंडू अर्जुन तेंडुलकरने सोपवला. अर्जुनने हे शिवधनुष्य पेललं आणि मुंबईला दिमाखदार विजय मिळवून दिला.
शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर अर्जुनने स्फोटक खेळींसाठी प्रसिद्ध अब्दुल समदपासून चेंडू दूर ठेवला. समदला मोठा फटका लगावता आला नाही. विकेटकीपर इशान किशनने डाईव्ह लगावत चेंडू थांबवला. दुसऱ्या चेंडूवर अर्जुनने समदला मोठा फटका मारण्यासाठी जागा दिली नाही. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात समद धावचीत झाला.
तिसरा चेंडू वाईड पडला. पण त्याने खचून न जाता अर्जुनने पुढच्या चेंडूवर मयांक मार्कंडेयला दोनच धावा करु दिल्या. चौथ्या चेंडूवर लेगबाय मिळाली. पाचव्या चेंडूवर अनुभवी भुवनेश्वर कुमारला बाद करत अर्जुनने आयपीएल कारकीर्दीतील पहिली विकेट पटकावली. या विकेटसह हैदराबादचा डाव 178 धावात आटोपला. हाणामारीच्या षटकांमध्ये चौकार-षटकारांची लयलूट होते पण अर्जुनने शेवटच्या षटकात एकही चौकार किंवा षटकार जाऊ दिला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
“ऑफस्टंपपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता जेणेकरून मैदानाच्या मोठ्या आकाराच्या बाऊंड्रीच्या दिशेने फलंदाजांना मारावं लागेल. मला गोलंदाजी करायला आवडते. कर्णधाराने कुठलंही षटक टाकायला सांगितलं असतं तरी आनंदच झाला असता. आम्ही घरीही क्रिकेटबद्दल बोलतो. बाबांकडून मार्गदर्शन मिळतं. डावपेच आणि योजनांबद्दल चर्चा होते. गोलंदाजी करताना रिलीज पॉइंट आणि लेंथवर लक्ष केंद्रित केलं”, असं अर्जुनने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.
अर्जुनचा आतापर्यंतचा प्रवास
मुंबईतल्या वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धेत तो खेळला आहे. भारतीय संघाच्या सरावादरम्यान नेट्समध्ये दिसला आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या U19 संघातही त्याने स्थान पटकावलं होतं.
अर्जुन डावखुरा फास्ट बॉलर आहे. उंचपुरा अर्जुन स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. अर्जुन उपयुक्त बॅटिंगही करतो. अर्जुनने पुणेस्थित कोच आणि बायोमेकॅनिक्स तज्ज्ञ अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. दोन स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे अर्जुनला अॅक्शनमध्ये काही बदल करावे लागले. अतुल नॅशनल क्रिकेट अकादमीबरोबरही काम करतात.
भारताचे माजी फास्ट बॉलर आणि कोच सुब्रतो बॅनर्जी यांचं मार्गदर्शनही अर्जुनला लाभलं आहे. देशातल्या अव्वल प्रशिक्षकांमध्ये सुब्रतो यांचं नाव घेतलं जातं. रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाचं प्रशिक्षकपद त्यांनी सांभाळलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अर्जुनने भारतीय U19 आणि मुंबई U19 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत मुंबईच्या वरिष्ठ संघात अर्जुनचं पदार्पण झालं.
हरयाणाविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुनने एक विकेट मिळवली. त्याच्या तीन ओव्हर्समध्ये 34 रन्स कुटण्यात आल्या.
पुद्दुचेरीविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुनने 33 रन्सच्या मोबदल्यात एक विकेट पटकावली.
अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्करने जेव्हा इंग्लंडच्या बॅट्समनमनला जेरीस आणलं होतं...
मुंबई U19 संघातर्फे खेळताना 2017-18 हंगामात कूचबिहार करंडक स्पर्धेत 19 विकेट्स पटकावल्या होत्या.
2017 मध्ये बडोदा इथे झालेल्या जयंत लेले निमंत्रितांच्या स्पर्धेत अर्जुनने चांगली कामगिरी केली होती.
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या इनडोअर अकादमीत सरावाची संधी अर्जुनला मिळाली आहे. इंग्लंड संघ सराव करत असताना अर्जुनने बॉलिंग केली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचे बॅट्समन सराव करत होते. अर्जुनच्या बुंध्यात पडलेल्या यॉर्करवर इंग्लंडचा बॅट्समन आणि विकेटकीपर जॉनी बेअरस्टो दुखापतग्रस्त होता होता वाचला.
अर्जुनच्या वेगाने आणि अचूकतेने बेअरस्टोसह इंग्लंड संघातील खेळाडू प्रभावित झाले होते.
गेल्या वर्षी लॉर्ड्स इथे भारतीय महिला क्रिकेट संघ सराव करत असताना अर्जुनने बॉलिंग केली होती.
भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यानिमित्ताने मुंबईत असतो तेव्हा अर्जुन नेट बॉलर म्हणून सरावादरम्यान दिसतो.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. मयांक अगरवालने एक बाजूने किल्ला लढवत 48 धावांची खेळी केली. हेनरिच लासेनने 16 चेंडूत 36 धावा करत विजयाच्या आशा जागृत केल्या. पण या दोघांचा अपवाद वगळता हैदराबादच्या बाकी फलंदाजांनी निराशा केली.
मुंबईतर्फे जेसन बेहनड्रॉफ, राईली मेरडिथ आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान ज्या खेळाडूंसाठी मुंबईने पैशांची रास ओतली, त्या सगळ्या खेळाडूंनीच मुंबईला हैदराबादविरुद्ध विजय मिळवून दिला.
लिलावावेळी मुंबई इंडियन्स संघाने इशान किशन, कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्हिड यांच्यासाठी तिजोरी रिती केली. ग्रीनसाठी 17.5 कोटी, टीम डेव्हिडसाठी 8.25 कोटी तर इशानसाठी 15.25 कोटी रुपये खर्च केले होते. युवा फलंदाज तिलक वर्मासाठी मुंबई इंडियन्सने 1.7 कोटी रुपये दिले होते. एकाच खेळाडूवर मुंबई इंडियन्स इतके पैसे खर्च करत नाही. पण या चौघांसाठी मुंबई इंडियन्स संघाने पाऊण टक्के रक्कम खर्चली.
रोहित शर्मा आणि इशान किशन जोडीने 41 धावांची सलामी दिली. यानंतर किशन-ग्रीन जोडीने चांगली भागीदारी केली. ग्रीन आणि तिलक वर्मा जोडीने 28 चेंडूत 56 धावांची वेगवान भागीदारी केली. टीम डेव्हिड आणि ग्रीनने 21 चेंडूत 41 धावा करत मुंबईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. किशनने 31 चेंडूत 38 धावांची खेळी केली. तिलक वर्माने 17 चेंडूत 37 धावा केल्या. डेव्हिडने 11 चेंडूत 16 धावा करत धावगती वाढवली. ग्रीनने 40 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी करताना 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. 60 धावा आणि एक विकेट पटकावणाऱ्या ग्रीनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























