स्मृतिभ्रंश : लेकॉनेमॅब औषधाच्या संशोधनात मोठं यश

मेंदू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स गॅलॅघर
    • Role, आरोग्य व विज्ञान प्रतिनिधी
  • Published

अल्झायमर्स असलेल्या रुग्णाच्या मेंदूच्या क्षमतेचा ऱ्हास कमी करणारं पहिलं औषध म्हणून लेकॉनेमॅब औषधाला महत्त्व आहे.

 

गेली अनेक दशके अल्झायमर्सवरील औषधाच्या संशोधनाला अपयश येत होतं. आता मात्र स्मृतिभ्रंशाच्या या सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या आजारावरील उपचारांचं नवं युग सुरू झालं आहे.

 

पण लेकॉनेमॅब या औषधाचा परिणाम तसा नगण्यच आहे आणि लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर याचा होणारा परिणाम काहीसा वादाचा मुद्दा आहे.

 

आणि हे औषध या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे, म्हणून या औषधामुळे झालेली क्रांती अनेकांना अनुभवताच येणार नाही.

 

अल्झायमर असलेल्या रुग्णांच्या मेंदूत तयार होणाऱ्या बिटा ॲमिलॉइड या चिकट पदार्थावर लेकॉनेमॅब हल्ला करतं.

 

या संदर्भात वैद्यकीय क्षेत्राच्या पदरी आतापर्यंत निराशाच आली आहे. त्यामुळे हा नवा शोध म्हणजे एक नवी उभारी समजली जात आहे.

 

अल्झायमर रिसर्च यूके या संस्थेच्या मते याचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत.

 

30 वर्षांपूर्वी, ॲमिलॉइडना लक्ष्य करण्याच्या संपूर्ण संकल्पनेचे उद्गाते जगातील आघाडीचे संशोधक प्रा. जॉन हार्डी म्हणाले,

"हा शोध ऐतिहासिक आहे आणि अल्झायमर थेरपीची ही पहाट आहे."

एडिनबर्ग विद्यापीठातील प्रा. तारा स्पायर्स-जोन्स म्हणतात की, याचे परिणाम अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण आतापर्यंत आम्हाला 100% अपयशच आलं होतं.

 

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सध्या अल्झायमर असलेल्या रुग्णांना त्यांच्या लक्षणांचं व्यवस्थापन करण्यासाठी इतर औषधं देण्यात येतात. पण प्रत्यक्ष आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी मात्र औषधं नाहीत.

 

लेकॉनेमॅब ही अँटिबॉडी आहे. शरीर जीवाणू किंवा विषाणूंवर हल्ला करण्यासाठी तयार करत असलेल्या घटकांप्रमाणे ही अँटिबॉडी आहे. मेंदूतून ॲमिलॉइड काढून टाकण्याचा आदेश प्रतिकारक यंत्रणेला देण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. 

ॲमिलॉइड हे एक प्रोटिन (प्रथिन) आहे. ते मेंदूतील न्यूरॉनमधील जागेत साचतं आणि प्लाक तयार करतं. हे अल्झायमरचं व्यवच्छेदक लक्षण आहे. 

  

मोठ्या प्रमाणावरील या चाचणी सर्वेक्षणात अल्झायमरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील 1 हजार 795 रुग्ण सहभागी झाले होते.  दर पंधरा दिवसांनी लेकॉनेमॅबचा डोस देण्यात आला.

 

सानफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या अल्झायमर आजार परिषदेतील क्लिनिकल ट्रायल्समध्ये परिणाम सादर करण्यात आले आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित केलेले परिणाम सांगतात की हे चमत्कार करणारे उपचार नाहीत.

या आजार अजूनही रुग्णांच्या मेंदूच्या शक्तीचा ऱ्हास करतच आहे, पण सुमारे 18 महिन्यांच्या उपचारांनंतर या ऱ्हासाचा वेग सुमारे एक चतुर्थांश कमी करण्या आला. अमेरिकेतील नियंत्रकांतर्फे या आकडेवारीचं मूल्यमापन करण्यात येत आहे. लेकॅनेमॅबचा वापर व्यापक पातळीवर करता येईल का, याविषयी ते लवकरच निर्णय घेणार आहेत.

 

ईसाइ आणि बायोजेन या औषधनिर्मिती कंपन्यांची पुढील वर्षी इतर देशांमध्ये मंजुरी प्रक्रिया सुरू करण्याची योजना आहे.

अल्झायमर्स

डेव्हिड इसॅम यांचं वय 78 आहेत, ते यूकेमधील केंटचे रहिवासी आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय चाचणीमध्ये सहभाग घेतला होता.

 

त्यांच्या अल्झायमरमुळे त्यांना जॉइनर म्हणून आपलं काम सोडावं लागलं. कपाट कसे तयार करायचे आणि अवजारं कशी वापरायची हे त्यांना आठवू शकत नाही. आता ते काट्यांचे घड्याळ पाहून वेळ सांगू शकत नाहीत. त्यांना डिजिटल घड्याळ वापरावं लागतं.

 

“आत ते पूर्वीचे राहिले नाहीत. त्यांना बहुतेक कामांमध्ये मदत लागते, त्यांची स्मृती तर नसल्यातच जमा आहे”, असं त्यांची पत्नी शेरिल सांगते. पण या चाचणीमुळे त्यांना कुटुंबाला आशेचा किरण दिसला, असं त्या म्हणाल्या. 

 

डेव्हिड म्हणाले : “कुणी अल्झायमरमुळे होणाऱ्या ऱ्हासाचा वेग कमी करू शकले आणि कालांतराने तो पूर्णपणे थांबवू शकले तर हे खूपच चांगलं असेल, कारण हा आजार अत्यंत भयंकर आहे.”

 

डेव्हिडसारखे जगभरात 5.5 कोटी लोक आहेत आणि 2050 पर्यंत अल्झायमरच्या रुग्णांची संख्या 13.9 कोटी असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 

शेरिल आणि डेव्हिड इसॅम
फोटो कॅप्शन, डेव्हिड इसॅम, त्याची पत्नी शेरिल या चाचण्यांमध्ये सहभागी झाले आहेत

त्याने खरच फरक पडेल का?

लेकॉनेमॅबने प्रत्यक्ष रुग्णांवर खरच फरक पडेल का याबाबत अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांमध्ये वाद सुरू आहे. 

 

व्यक्तीच्या लक्षणांच्या मानांकनांचा उपयोग करून या औषधामुळे ऱ्हासा कमी होणारा वेग दिसून आला आहे. ही 18 पॉइंट्सची फुटपट्टी आहे. यात सामान्य स्थितीपासून ते गंभीर स्वरुपाच्या स्मृतिभ्रंशाचा समावेश आहे. ज्यांनी औषध घेतले त्यांच्यात 0.45 गुणांची सुधारणा दिसून आली. 

 

प्रा. स्पायर्स-जोन्स म्हणाल्या की, आजारावर हा खूपच नगण्य प्रमाणातील परिणाम आहे, तो खूप नाट्यमय नसला तरी तो झाला आहे, हेही काही कमी नाही 

 

अल्झायमर रिसर्च यूकेच्या डॉ. सुझन कोल्हास  “हा सौम्य परिणाम होता. पण यामुळे आपल्याला थोडाफार तरी आधार लाभला आहे आणि या औषधांची पुढची आवृत्ती सुधारित असेल.”

 

यात जोखीमही आहे. मेंदू स्कॅन केल्यावर मेंदूतील रक्तस्त्राव (सर्वेक्षणातील व्यक्तींपैकी 17%),  मेंदूला सूज येणे (13%) अशी जोखीमही दिसून आली. हे औषध देण्यात येत असलेल्या एकूण 7% रुग्णांचं औषध थांबवावं लागलं. कारण त्यांच्यावर साइड इफेक्ट्स होत होते.

 

या चाचण्यांच्या 18 महिन्यांनतर काय होतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तराबद्दल अजूनही साशंकता आहे. 

 

नॉर्थ ब्रिस्टॉल एनएचएस ट्रस्टमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. एलिझाबेथ कोल्थार्ड म्हणतात की, सौम्य स्वरुपाची आकलनाची समस्या निर्माण झाल्यानंतर सरासरी सहा वर्षे ती व्यक्ती स्वतंत्रपणे कामे करू शकते. 

 

अल्झायमरचा परिणाम 25% कमी केला तर रुग्णाला अजून 19 महिन्यांचं स्वतंत्र आयुष्य मिळतं. “पण याबाबत आपल्याला निश्चित खात्री नाही,” असं त्या म्हणतात. 

 

अधिक दीर्घकालीन चाचण्यांमध्ये परिणाम अधिक दिसू शकतो, हेही शास्त्रीय दृष्ट्या शक्य आहे. “हे इथवरच थांबणार आहे, असे आपण गृहित धरू शकतो, असं मला वाटत नाही.”, असं डॉल कोल्हास म्हणतात.

 

या आजाराचा परिणाम कमी करणारं औषध नव्यानं आलं असलं तरी वैद्यकीय सेवा या औषधाचा वापर करण्यास तयार आहेत का, हा मोठा प्रश्न आहे.

 

मेंदूचं फार नुकसान होण्याआधी सुरुवातीच्या टप्प्यात हे औषध दिलं जाणं अपेक्षित आहे. कारण स्मृतिभ्रंशासाठी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींचा आजार हा बहुधा पुढील टप्प्यावर पोहोचलेला असतो. 

यासाठी स्मृतिभ्रंशाची लक्षणं लवकर समजून लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. तरच डॉक्टरांना ॲमिलॉइड चाचणीसाठी त्यांना पाठवता येईल. मेंदू स्कॅन करणे किंवा स्पायनल फ्लुइड ॲनालिसिसचच्या या चाचण्या असतील. त्यांना अल्झायमर आहे की, स्मृतिभ्रंशाचा दुसरा प्रकार आहे, हे यातून समजून येऊ शकतं. सध्याच्या घडीला स्मृतिभ्रंश झालेल्या केवळ 1-2% लोकांच्या या चाचण्या करण्यात येतात. 

 

अल्झायमर सोसायटीच्या म्हणण्यानुसार  यूकेमधील 8 लाख 50 हजारांहून अधिक लोकांना कोणत्यातरी प्रकारचा स्मृतिभ्रंशाचा आजार आहे. त्यांच्यापैकी निम्म्या रुग्णांना अल्झायमर आहे, पण प्रत्येकाची चाचणी करणे गरजेचं आहे.

 

“सध्याची सेवा उपलब्धता आणि आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला जे करण्याची आवश्यकता आहे, त्यात मोठी तफावत आहे.”, असे डॉ. कोल्थार्ड म्हणतात.

 

त्या म्हणाल्या की, मोठ्या वैद्यकीय केंद्राजवळ राहणाऱ्या किंवा खासगी वैद्यकीय सेवांचा खर्च करू शकणाऱ्यांनाच याचा लाभ होऊ शकतो.

 

अल्झायमरच्या आजाराच्या गुंतागुंतीच्या स्वरुपाचा ॲमिलॉइड हा केवळ एक भाग होता आणि उपचारांचं सगळं लक्ष फक्त त्यावरच केंद्रीत होऊ नये, असंही शास्त्रज्ञांना वाटतं.

 

प्रतिकारक यंत्रणा आणि दाह या आजाराचा एक मोठा हिस्सा आहेत आणि मेंदूच्या पेशी जिथे प्रत्यक्ष मृत होत आहेत तिथे ताऊ नावाचं एक विषारी प्रथिन आढळत आहे. 

 

“माझं लक्ष त्यावरच आहे,” असं प्रा. स्पायर्स जोन्स म्हणाल्या. 

 

त्या पुढे म्हणाल्या, “आपण या समस्येची उकल करण्याच्या सीमेवर आहोत, याबद्दल मी रोमांचित आहे आणि दशकभरात मोठा परिणाम करणारं काहीतरी आपल्याला सापडेल, असं मला वाटतं.”

 

अल्झायमर सोसायटी चॅरिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी केट ली यांनी ‘यूकेला सामना करावा लागत असलेल्या स्मृतिभ्रंश या सर्वांत मोठ्या आरोग्यसमस्येवर दशवार्षिक सरकारी योजना आखली गेली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

 

रेडियो-4 च्या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, ज्यांना आधीपासून स्मृतिभ्रंश आहे त्यांच्यावर लेकॅनेमॅबचा फार परिणाम होणार नाही.

 

पण पुढील पिढ्यांवर याचा मोठा प्रभाव पडेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. 

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)