जो बायडन - कमला हॅरिस पुन्हा लढवणार अमेरिकेची निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस पुन्हा एकदा निवडणुकीच्या शर्यतीत उतरणार आहेत. 2024 साली होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष-उपराष्ट्राध्यक्ष निवडणूक आपण लढणार आहोत, अशी घोषणा जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी केलीय. दोघांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
जो बायडन यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "गर्भपाताचा अधिकार, लोकशाहीचं रक्षण, मतदानाचा अधिकार आणि सामाजिक सुरक्षा हे मुद्दे 2024 सालच्या निवडणुकीत महत्त्वाचे असतील."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तर कमला हॅरिस यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "अमेरिकन नागरिक म्हणून स्वातंत्र्य आणि हक्क अधिक महत्त्वाचे वाटतात. आपली लोकशाही अधिक मजबूत होईल, असा विश्वास वाटतो. त्यासाठी आम्हाला लढण्याची इच्छा आहे. त्यामुळेच बायडन आणि मी पुन्हा निवडणूक लढत आहोत."
2020 मध्ये कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षा बनल्या होत्या.
जो बायडन यांचा परिचय
जो बायडन यांचा 47 वर्षांपूर्वी त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1973 साली ते सिनेट सदस्य म्हणून निवडून गेले होते, तर 1987 साली म्हणजे तब्बल 33 वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले होते.
त्यामुळे बायडन यांच्याकडे मतदारांना आकर्षित करण्याची कला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, त्यांची अडचण अशी आहे की, बोलण्याच्या ओघात ते अनेक गंभीर चुका करतात.
लोकांसमोर बोलताना बरेचदा ते भावनेच्या भरात वाहून जातात. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या त्यांच्या प्रयत्नात ते याच कारणामुळे लगेच बाहेर फेकले गेले होते. मात्र, 2020 साली ते राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले.
1987 साली बायडन यांनी पहिल्यांदा अध्यक्षपदाचा उमेदवार होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी आपल्या प्रचार सभांमध्ये ते सांगायचे, "माझे पूर्वज वायव्य पेन्सिल्वेनियामधल्या कोळशाच्या खाणीत काम करायचे." ते असंही सांगायचे की माझ्या पूर्वजांना ते करण्याची संधी कधीच मिळाली नाही ज्याच्यावर त्यांचा हक्क होता आणि याचं शल्य त्यांच्या मनात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, प्रत्यक्षात बायडन यांच्या पूर्वजांनी कधीच कोळसा खाणीत काम केलेलं नाही. नील किनॉक नावाच्या एका ब्रिटीश नेत्याची नक्कल करत त्यांनी ही खोटी कथा रचली होती. (अशाच प्रकारे त्यांनी इतरही अनेक नेत्यांची वक्तव्यं आपल्या नावावर खपवल्याचे आरोप आहेत.)
त्यांची अशी खोटी वक्तव्यं अमेरिकेच्या राजकारणात 'जो बॉम्ब' या नावाने (कु) प्रसिद्ध आहेत.
2012 साली आपल्या राजकीय कारकिर्दीविषयी बढाया मारताना एका प्रचारसभेत ते बोलून गेले, "मित्रांनो, मी आठ राष्ट्राध्यक्षांसोबत काम केलं आहे आणि त्यापैकी तिघांशी माझे जवळचे संबंध (intimate) होते." मात्र, बोलण्याच्या ओघात intimately शब्द वापरल्याने तीन राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांचे शारीरिक संबंध होते असा अर्थ ध्वनित झाला.
बराक ओबामा यांच्या कार्यकाळात ते उपाध्यक्ष होते. त्यावेळी 'आम्ही अर्थव्यवस्थेबाबत चुका करण्याची शक्यता तीस टक्के असल्याचं' म्हणत त्यांनी लोकांना धडकी भरवली होती.
बायडन ओबामांविषयी बोलताना म्हणाले होते, "ओबामा मुख्य प्रवाहातील पहिले असे आफ्रिकन-अमेरिकी नागरिक आहेत जे उत्तम वक्ते आहेत, चमकदार आणि स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि दिसायलाही देखणे आहेत." यावरून बराच वाद झाला होता. मात्र, तरीही ओबामा यांनी त्यांना उपाध्यक्ष केलं.
बायडन यांच्यावर अनेक कौटुंबिक संकटं कोसळली आहेत.
बायडन पहिल्यांदा सिनेटची निवडणूक जिंकून शपथग्रहणाची तयारी करत होते त्यावेळी त्यांच्या पत्नी नीलिया आणि मुलगी नाओमी यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांची दोन्ही मुलं बो आणि हंटर गंभीर जखमी झाली होती.
त्यानंतर 2015 साली बो यांचं वयाच्या 45 व्या ब्रेन ट्युमरने निधन झालं.
इतक्या कमी वयात जवळची माणसं गमावल्यामुळे अनेकांना त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. लोकांना वाटतं की, एवढे मोठे राजकारणी असूनही आणि सत्तेच्या इतक्या जवळ असूनही बायडन यांना वैयक्तिक आयुष्यात ती दुःख भोगावी लागली जी सामान्य माणसंही भोगत असतात.
मात्र, बायडन यांच्या कुटुंबाची दुसरी कहाणी याहून पूर्णपणे वेगळी आहे. विशेषतः त्यांचा मुलगा हंटर यांची.
कमला हॅरिस यांचा परिचय
कमला हॅरिस अमेरिकेच्या 46 व्या उप-राष्ट्राध्यक्षा आहेत.
कमलांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ओकलंडचा. त्यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित. आईचा जन्म भारतातला आणि वडिलांचा जमैकातला.
कमला लहान असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांची आई श्यामला गोपालन हॅरिस यांनी कमला आणि माया या लेकींना वाढवलं. श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत.
आपल्या दोन्ही मुलींना त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची जाणीव असेल याची काळजी श्यामला यांनी त्यांना वाढवताना घेतली.
कमला हॅरिस त्यांच्या 2018मध्ये प्रसिद्ध झालेल्या द ट्रुथ्स वी होल्ड (The Thruths We Hold) या आत्मचरित्रात लिहीतात, "आपण दोन कृष्णवर्णीय मुलींना वाढवतो आहोत याची माझ्या आईला पूर्ण जाणीव होती. तिने घर म्हणून स्वीकारलेल्या देशामध्ये माया आणि माझ्याकडे कृष्णवर्णीय म्हणून पाहिलं जाईल, हे तिला माहीत होतं. आणि आम्हा दोघींनाही कॉन्फिडंट कृष्णवर्णीय महिला म्हणून मोठं करण्याचा तिचा निर्धार होता."

फोटो स्रोत, Getty Images
मोठं होताना कमला यांचा कायमच त्यांच्या भारतीय मुळाशी संपर्क आला. आईसोबत त्या भारतातही येत. पण यासोबतच आईने आपल्याला आणि बहिणीला ओकलंडच्या कृष्णवर्णीय इतिहासाशीही जोडल्याचं कमला सांगतात.
आईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या सांगतात. त्यांच्या आत्मकथेत त्यांनी घरी भारतीय बिर्याणी बनवण्याबद्दलही लिहिलेलं आहे.
2014मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी भारतीय परंपरेनुसार कमलांनी नवऱ्याच्या गळ्यात फुलांची वरमाला घातली तर डग्लस यांनी त्यांच्या ज्यू परंपरेनुसार काचेचा ग्लास पायाखाली फोडला.
सिनेटर हॅरिस यांनी काही काळ कॅनडातही घालवलाय. श्यामला गोपालन हॅरिस यांनी कॅनडातल्या मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारल्यानंतर माया आणि कमला या दोन्ही बहिणी पाच वर्षं माँट्रियालच्या शाळेत शिकत होत्या.
अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कमला यांनी 4 वर्षं शिक्षण घेतलं. आपल्या आयुष्यातली ही जडणघडणीची सर्वांत महत्त्वाची वर्षं असल्याचं त्या सांगतात.
हार्वडमधल्या शिक्षणानंतर कमला हॅरिस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून कायद्याची पदवी घेतली आणि अल्मेडा काऊंटीच्या डिस्ट्रीक्ट अॅटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली.
2003साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी झाल्याय. कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या.
2017 साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांनी महत्त्वाच्या चर्चांदरम्यान त्यांच्या संभाषण कौशल्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























