बंगाली अभिनेत्रीचं 24 व्या वर्षी कार्डिअक अरेस्टने निधन, कार्डिअॅक अरेस्ट नेमका काय असतो?

अँड्रिला

फोटो स्रोत, ANI

Published

बंगाली टीव्ही शोमधील आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री अँड्रिला शर्माचं रविवारी (20 नोव्हेंबर) निधन झालं.

24 वर्षांच्या अँड्रिलाला शनिवारी (19 नोव्हेंबर) कार्डिअक अरेस्ट आला. त्यानंतर तिला सीपीआर दिला गेला.

तिला हावडा इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

त्यानंतर तिची प्रकृती काही प्रमाणात सुधारली. मात्र 12 वाजून 59 मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला.

अँड्रिला कॅन्सर सर्व्हायर होती. तिने टीव्ही शो ‘झुमुर’नंतर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. तिने भागर नावाच्या वेब सीरीजमध्येही काम केलं होतं.

हृदय

फोटो स्रोत, iStock

Heart.org या संस्थेनुसार 'कार्डिअॅक अरेस्ट' होतं तेव्हा शरीराकडून त्याविषयी कुठलाही संकेत मिळत नाही. याचं मुख्य कारण हृदयात होणारी इलेक्ट्रिकल गडबड आहे, जी हृद्याच्या ठोक्यांचं ताळमेळ बिघडवते. यामुळे हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मेंदू किंवा इतर अवयवांपर्यंत रक्त पोहोचवण्यात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी काही क्षणांतच व्यक्ती बेशुद्ध पडते आणि हृदयाचे ठोकेही मंदावत जातात. जर योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत, तर काही सेकंदांत किंवा मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

'कार्डिअॅक अरेस्ट'मध्ये मृत्यू नक्की?

अमेरिकेत प्रॅक्टिस करत असलेले डॉक्टर सौरभ बंसल यांनी बीबीसीला सांगितलं, "खरं तर कार्डिअक अरेस्ट हा प्रत्येक मृत्यूचा अंतिम क्षण म्हटला जाऊ शकतो. याचा अर्थ आहे हृदयाचे ठोके बंद पडणे आणि मृत्यूचं कारणही हेच असते." पण याचं कारण काय असावं? डॉक्टर बंसल म्हणतात, "याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सामान्यपणे याचं एक प्रमुख कारण हे मोठा हार्टअटॅक असू शकतं"

ईसीजी

फोटो स्रोत, iStock

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनुसार, हृदयातील इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये अडचणी उद्भवल्यानंतर शरीराच्या इतर भागांत रक्तपुरवठा होऊ शकत नाही आणि हीच प्रक्रिया कार्डिअॅक अरेस्टचं स्वरूप घेते. जेव्हा हृदय रक्ताचं पंपिंग बंद करतं, तेव्हा मेंदूतील ऑक्सिजनचं प्रणाणही घटतं. अशावेळी व्यक्ती बेशुद्ध पडते आणि श्वास घेता येत नाही.

याची काही लक्षणं असतात का?

सगळ्यांत मोठी अडचण हीच आहे की, कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी त्याची काहीच लक्षणं दिसत नाही. हेच कारण आहे की, कार्डिअॅक अरेस्टमध्ये मृत्यू येण्याचा धोका कैक पटींनी वाढतो. यात सर्वसाधारण कारण हे असामान्य हार्ट ऱ्हिदम असल्याचं म्हटलं जातं. ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'वँट्रिकुलर फिब्रिलेशन' म्हटलं जातं. कार्डिअॅक अरेस्टची अनेक कारणं असू शकतात. पण हृदयविकाराशी निगडीत आरोग्य समस्या याविषयीची शक्यता वाढवतात : - कोरोनरी हार्टचा आजार - हार्ट अटॅक - कार्डियोमायोपॅथी - काँजेनिटल हार्टचा अजार - हार्ट वॉल्वमधील अडथळे - हार्ट मसल्समधील इन्फ्लेमेशन - लाँग क्युटी सिंड्रोमसारखे डिसऑर्डर याशिवाय इतरही काही कारणं आहेत, जे कार्डिअॅक अरेस्टला निमंत्रण देऊ शकतात : - विजेचा झटका बसणं - प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्ज घेणं - हॅमरेज, ज्यात रक्तस्राव होतो - पाण्यात बुडणं

यातून वाचणं शक्य आहे का?

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

पण कार्डिअॅक अरेस्ट झाल्यानंतर माणूस बरा होऊ शकतो का? होयं, अनेकवेळा छातीवर इलेक्ट्रिक शॉक देऊन बंद पडलेलं हृदय सुरू करता येऊ शकतं. यासाठी डिफिब्रिलेटर नावाचं टूल वापरलं जातं. मोठ्या रुग्णालयांमध्ये ते उपलब्ध असतं. यात मुख्य मशीन आणि शॉक देण्यासाठीचे बेस असतात, ज्यांना छातीवर दाबून अरेस्टपासून वाचवण्याचे प्रयत्न केले जातात. याचं उत्तर आहे - CPR. याचा अर्थ आहे, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. यात दोन्ही हात सरळ ठेऊन रुग्णाच्या छातीवर जोराने दबाव टाकला जातो आणि तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न केला जातो.

हार्टअटॅकपेक्षा वेगळं कसं?

बहुतांश लोक कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्टअटॅक हे एकच असल्याचं समजतात. पण हे खरं नाही. दोन्ही गोष्टींमध्ये फार फरक आहे. हार्टअटॅक तेव्हा येतो जेव्हा कोरोनरी आर्टरीमध्ये गुठळ्या तयार झाल्यानं हृदयापर्यंत रक्तपुरवठा होण्यात अडथळे येतात. तर दुसरीकडे कार्डिअॅक अरेस्टमध्ये हृदय रक्तपुरवठा करणं तत्काळ थांबवतं. म्हणूनच अरेस्ट झाल्यावर व्यक्ती अचानक बेशूद्ध पडते आणि श्वासोश्वासही बंद पडतो. याच कारण काय असू शकतं?

स्टेथो

फोटो स्रोत, Getty Images

डॉक्टर बंसल सांगतात, "कार्डिअॅक अरेस्टचा अर्थ आहे हृदयाचे ठोके बंद पडणे आणि हार्टअटॅकचा अर्थ आहे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न होऊ शकणे." पुढे ते म्हणतात, "हो, हेही आहेच की रक्तपुरवठा न झाल्यानंही पुढे कार्डिअॅक अरेस्टच होईल. रक्ताची एक गुठळी कार्डिअॅक अॅरेस्टसाठीचं कारण ठरू शकते." "हृदयाच्या आजूबाजूला असलेल्या द्रव्यांमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळेही कार्डिअॅक अरेस्ट होऊ शकतं."

हार्टअटॅकमध्ये वाचणं सोपं?

हार्टअटॅकमध्ये आर्टरीचा रस्ता रोखला गेल्यानं ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही. जर रस्त्यातील अडथळा तत्काळ बाजूला केला गेला नाही, तर हृदयाचं नुकसान व्हायला सुरुवात होते.

हार्टअटॅकमध्ये उपचार मिळण्यात जेवढा उशीर होईल, तेवढं हृदय आणि शरीराचं नुकसान ठरलेलं असतं. हार्ट अटॅक आल्यानंतर हळूहळू जाणवू लागतात. कार्डिअॅक अरेस्टप्रमाणे हार्टअटॅकमध्ये हृदयाचे ठोके बंद पडत नाहीत. त्यामुळेच कार्डिअॅक अॅरेस्टच्या तुलनेत हार्टअटॅकमध्ये रुग्णांना वाचवलं जाण्याची शक्यता जास्त असते.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

मृत्यूचं मोठं कारण

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) या संस्थेनुसार दरवर्षी हृदयाशी संबंधित आजारांमुळे जगातील सुमारे 1.7 कोटी लोकांचा मृत्यू होतो.

हे एकूण मृत्यूंच्या 30 टक्के इतकं प्रमाण आहे. विकसनशील देशांमध्ये HIV, मलेरिया, TB यांसारख्या आजारांमुळे होणाऱ्या एकत्रित मृत्यूंच्या दुप्पट मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमध्ये होतात.

एका अंदाजानुसार, हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये अचानक आलेल्या कार्डिअॅक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे 40 ते 50 टक्के आहे.

जगभरात कार्डिअॅक अरेस्टमधून वाचण्याचं प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा कमी आहे आणि अमेरिकेत हे प्रमाण 5 टक्के इतकं आहे.

यावर पर्यायी उपाययोजना शोधण्यावरही जगभरात भर दिला जात आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये परिस्थिती तर आणखीनच गंभीर आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)