सामूहिक झोपण्याची पद्धत जी हळूहळू अस्ताला गेली

    • Author, झारीया गॉर्वेट
    • Role, बीबीसी फ्युचर
  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

1187 मध्ये मध्ययुगातील एक राजकुमार त्यांच्या भव्य लाकडी पलंगावर एका नव्या साथीदाराबरोबर झोपले होते. दाट सोनेरी केस असलेले रिचर्ड द लायनहार्ट हे एक महान योद्धे होते.

ते युद्धाच्या मैदानावर अजेय नेतृत्व आणि शौर्याबरोबरच त्यांच्या वर्तनासाठीही प्रसिद्ध होते.

पण त्यांनी त्यांचे पूर्वीचे शत्रू असलेले फिलिप द्वितीय यांच्याबरोबर अनपेक्षितपणे मैत्री केली होती. फिलीप यांनी 1180 ते 1223 दरम्यान फ्रान्सवर राज्य केलं होतं.

सुरुवातीला या दोन राजकीय व्यक्तींनी व्यवहारिक कारणांनी मैत्री केली होती. पण नंतर एकमेकांबरोबर अधिक काळ घालवल्यानंतर एकाच टेबलावर बसून आणि अगदी एकाच ताटात जेवण्याइतपत त्यांची मैत्री घट्ट झाली.

दोघांमधली आणि देशांमध्ये असलेली मैत्री आणखी घट्ट व्हावी यासाठी त्यांनी एक शांतता करारही केला आणि एकमेकांबरोबर एकाच पलंगावर ते झोपले देखील.

दोन पुरुषांनी एकाच पलंगावर झोपण्याच्या आधुनिक अर्थांच्या शिवाय त्या काळाच्या दृष्टीनं ते प्रचंड उल्लेखनीयही होतं.

इंग्लंडच्या इतिहासाच्या समकालीन इतिहासात याकडं एक आश्चर्यकारक घटना म्हणून पाहिलं गेलं.

रात्रीच्या वेळी एकांत मिळावा या अपेक्षेच्याही खूप आधी किंवा पौरुषत्वाच्या अलिकडच्या काही कल्पनांच्या खूप आधी हे घडलं.

अनेक इतिहासकार दोन राजघराण्यांच्या या रात्रीच्या मैत्रीकडं विश्वास आणि बंधुत्वाचे संकेत असल्याच्या दृष्टीनंच पाहतात.

हा प्रकार म्हणजे काळानुरुप मागं पडलेला सामूहिक झोपेची (एकत्र झोपणे) प्राचीन प्रथा आहे.

हजारो वर्षांपर्यंत रात्रीच्या वेळी मित्र, सहकारी, नातेवाईक किंवा कुटुंबातील लोक किंवा अगदी फिरणाऱ्या पर्यटकांबरोबरही एकाच अंथरुणावर लोटणं किंवा झोपणं ही अगदी सामान्य बाब होती.

लोक रस्त्यावर असले की, अगदी सहजपणे अनोळखी लोकांबरोबर लोटायचे. त्यात जर ते दुर्दैवीच असतील तर शेजारी असलेल्या अनोळखी व्यक्तीच्या शरिरातून दुर्गंध येत असे किंवा ती घोरत असायची. त्याहूनही वाईट म्हणायचं तर व्यक्ती विवस्त्र असेल.

काही वेळा सामुहिक झोपेचा हा प्रकार म्हणजे अंथरुणांच्या कमतरतेवरील एक व्यवहार्य पर्याय होता. कारण बेड म्हणजे मौल्यवान फर्निचर असायचे.

पण अगदी खानदानी किंवा चांगल्या कुटुंबातील लोकही रात्रीच्या वेळच्या गप्पांमध्ये एक खास जवळीकता, सुरक्षिततेची भावना आणि प्रेमाची ऊब मिळवण्यासाठी साथीदाराच्या शोधात असायचे.

मग, सामूहिक झोपण्याच्या या पद्धतीत रात्री कशा असायच्या? आणि ही प्राचीन परंपरा बंद का झाली?

एक प्राचीन परंपरा

2011 मध्ये पुरातत्व अभ्यासकांच्या एका पथकानं दक्षिण आफ्रिकेच्या सिबुडू गुहांमधून इतिहासपूर्व काळातील अत्यंत असामान्य आणि सुस्थितीतील काही गोष्टी शोधून काढल्या.

त्यात जंगलातील क्रिप्टोकार्या वुडी या झाडाच्या पानांचे काही जीवाश्म आढळले होते. त्यापासून अंदाजे 77,000 वर्षांपूर्वी म्हणजे पाषाण युगात एक गादी तयार करण्यात आलेली होती.

या पथकाचे प्रमुख लिन वाडली यांच्या अंदाजानुसार कदाचित ही गादी संपूर्ण कुटुंबाला झोपता येईल एवढी मोठी असावी.

सामूहिक झोपेचे पुरावे मिळणं कठिण आहे. पण तरीही ही प्राचीन परंपरा असल्याचं मानलं जातं.

खरंतर ऐतिहासिक दृष्टीनं विचार केल्यास एकट्यानं किंवा खासगीत झोपण्याची आधुनिक पद्धत अत्यंत विचित्र आहे.

प्राचीन काळात एका ठरावीक अंतरानंतर काही उच्च वर्गातील विवाहित सदस्यही वेगळे किंवा स्वतंत्र झोपत होते. पण तरी मध्ययुगापर्यंत ही परंपरा जवळपास कायम होती.

पण याबाबतच्या नोंदी या प्रामुख्यानं प्रारंभिक आधुनिक काळात सर्वांत जास्त प्रमाणात आहेत. जवळपास 1500 ते 1800 पर्यंत त्या नोंदी आढळतात. या काळात अंथरून किंवा बेड शेअर करणं ही अगदी सामान्य बाब होती.

व्हर्जिनियाच्या टेक व्हर्जिनियातील इतिहासाचे प्राध्यापक आणि अॅट डेज क्लोज: अ हिस्ट्री ऑफ नाइटटाइमचे लेखक रोजर एकिर्च यांच्या मते, "अभिजात वर्गातील लोक, काही धनाढ्य व्यापारी आणि काही सावकार वगळता त्या काळातील बहुतांश लोकांसाठी अंथरुणावर झोपताना सोबत कोणी नसणं ही असामान्य बाब होती."

मँचेस्टर विद्यापीठात प्रारंभिक आधुनिक इतिहासाच्या प्राध्यापक आणि स्लीप इन अर्ली मॉडर्न इंग्लंडच्या लेखिका साशा हँडले यांच्या मते, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्या काळात बहुतांश घरांमध्ये वैयक्तिक झोपण्यासाठी पुरेशे बेड किंवा तशी व्यवस्था नव्हती.

"अगदी मध्यम किंवा उच्च वर्गातील लोकांनाही, ते बाहेर प्रवासात असतील तेव्हा ज्याठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल त्याठिकाणी एकाच अंथरुणाचा वापर करावा लागत होता. प्रवासाचा हा काळही मोठा असायचा," असंही हँडले सांगतात.

1590 च्या आसपास हर्टफोर्डशायर हे लहानसं शहर ग्रेट बेड ऑफ वेयरसाठी प्रसिद्ध झालं होतं.

हा बेड व्हाइट हार्ट इन (इन-लॉज किंवा त्या काळातील हॉटेल)साठी आणला होता.

ओकच्या लाकडापासून तयार केलेला हा खास बेड 2.7 मीटर ऊंच (9 फूट), 3.3 मीटर रुंड, (11 फूट) आणि 3.4 मीटर (11 फूट) लांब गडद रंग असलेला आणि लाल तसंच पिवळे पडदे, सिंहांचं कोरीवकाम आणि नक्षीकाम असलेला होता.

प्रवाशांना एकत्रितपणे त्याचा वापर करता येत होता. एका अख्यायिकेनुसार 1689 मध्ये 26 कसाई आणि त्यांच्या पत्नी असे 52 लोक एक पैज पूर्ण करण्यासाठी त्यावर एकत्र झोपले होते.

बेड किंवा अंथरुण शेअर करण्याचा अर्थ त्यावेळी आजच्या काळासारखा लैंगिक संबंध जोडून लावला जात नव्हता.

मध्ययुगीन काळात ख्रिश्चन बायबलमध्ये तीन सभ्य पुरुष अनेकदा एकत्र झोपलेले दाखवले आहेत.

अनेकदा ते नग्न आणि स्पूनिंग पोझिशनमध्येही झोपलेले दिसतात. ते काहीतरी कामुक कृत्य करत असतील असं म्हणणं निरर्थक ठरेल असं तज्ज्ञांचं मत आहे.

सामूहिक झोपेची ही पद्धत एवढी उपयुक्त होती की, तिनं सामाजिक अडथळेही सहज पार केले.

अशा अनेक ऐतिहासिक कथा आहेत ज्यात लोक रोज रात्री त्यांच्या वरिष्ठ किंवा कनिष्ठांबरोबर वेळ घालवायचे.

त्यात त्यांचे मार्गदर्शक, शिष्य, घरातील कामगार, कर्मचारी किंवा शाही कुटुंबातील लोक आणि प्रजा यांचा समावेश असायचा.

1784 मध्ये एका पादरींनी त्यांच्या डायरीत लिहिलं होतं की, एका प्रवाशानं त्यांच्या नोकराबरोबर झोपण्याचा आग्रह केला होता. त्यावेळी चादर ओढण्यासाठीचा प्रयत्न आणि रात्री अनेक तास येणारे शारीरिक आवाज यात एकप्रकारची अशी समानता होती जी त्या खोलीच्या बाहेर दिसत नव्हती.

रात्रीची चांगली झोप

झोपण्याच्या सामूहिक पद्धतीच्या सर्वांत सविस्तर नोंदी सॅम्युअल पेपीज यांच्या डायरींमध्ये आढळतात. त्यातून 17 व्या शतकातील जीवनाचा अंदाज येतो.

भावी पिढीला कामी यावे म्हणून त्यांनी जतन केलेले हे दस्तऐवज आजही युकेतील त्यांच्या लायब्ररीच्या कपाटात आढळतात. त्यांनी 1660 मध्ये सुरुवात करून नऊ वर्षं रोज त्यात लिखाण केलं होतं.

दैनिंदिन जीवनातील वर्णनं आणि महिलांबरोबरच्या काही आठवणींशिवाय या डायरीमध्ये त्यांनी अनेक मित्र, सहकारी आणि अनेकदा पूर्णपणे अनोळखी लोकांबरोबर एकाच अंथरुणात झोपल्याचं लिहिलं आहे.

त्यात त्यांनी बेड शेअरिंगच्या यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्नाबाबत बारकाईनं उल्लेख केला आहे.

पोर्ट्समाऊथमध्ये एकदा पेपीज लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये त्यांच्याबरोबर काम केलेल्या एका डॉक्टरबरोबर एकत्र झोपले होते.

आनंदानं आणि चांगल्याप्रकारे एकमेकांबरोबर लोटून रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्यानंतर डॉक्टरला किड्यांनी, पिस्सूंनी खूप त्रास दिला. पेपीज यांना त्यामुळं एकटं राहावं लागलं. (पेपीज यांचं रक्त किड्यांना आवडलं नाही असं म्हटलं गेलं,कदाचित त्यामुळंच ते प्लेगपासून वाचू शकले.)

अनेक चादरी अंगावर घेतलेले आणि नाईटकॅप परिधान करणारे एकिर्च म्हणाले की, चांगला बेडफेलो सकाळी चांगल्या गप्पा मारतो. त्याला पडलेल्या स्वप्नांचा अंदाज लावण्यासाठी तो दोन झोपांमध्ये काही वेळ जागतही असतो.

रात्रीच्या अंधारात गप्पा मारत घालवलेल्या या अनेक तासांमुळे सामाजिक विण घट्ट होण्यात आणि एकमेकांची सहस्य जाणून घेण्यासाठी एक चांगलं स्थानही उपलब्ध झालं.

हँडले या सारा हेयरस्ट यांचा उदाहरण देत म्हणाल्या की, त्यांचे अनेक आवडते बेड फेलो होते आणि त्यांच्याशी त्यांचं चांगलं नातंही होतं. त्यांच्याबरोबर नेहमी बेड शेअर करणाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी दुःख व्यक्त करत एक कविताही लिहिली होती.

असं म्हटलं जातं की राणी एलिझाबेझ प्रथम यांच्याकडं अनेक बेड होते तरीही त्या 44 वर्षांच्या शासनकाळात कधीही एकट्या झोपल्या नाहीत. रोज रात्री त्यांच्या विश्वासू दासींपैकी एक त्यांच्या शयनकक्षात जायच्या आणि त्यांना दिवसभरात न्यायालयात काय घडलं याची माहिती द्यायच्या. त्यांच्यामुळं राणीचा तणाव कमी व्हायचा. तसंच या महिला राणीची सुरक्षाही करायच्या.

इतिहासकार अॅना व्हाइटलॉक यांनी द क्वीन्स बेड: अॅन इंटिमेट हिस्ट्री ऑफ एलिजाबेथस् कोर्ट नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे की, तिथं पुरुषांनी प्रवेश केल्याचंही ऐकिवात आलं आहे.

जसं की राणी लहान असताना त्यांच्या सावत्र आईशी विवाह केलेला व्यक्ती अचानक शिरायचा आणि त्यांना नितंबांवर मारायचा. अशा प्रकारच्या घटना नुकसानीच्या ठरू शकल्या असत्या. कारण त्यांना कौमार्याचंही रक्षण करायचं होतं.

शिष्टाचारां प्रकरण

अशा काळात जेव्हा एकच अंथरूण वापरणं अटळ किंवा गरजेचं होतं त्यावेळी प्रत्येकाला रात्री चांगली झोप मिळावी आणि रात्रीची भांडणं टाळता यावी यासाठी, लोकांनी योग्य शिष्टाचाराचं पालन करणं फायद्याचं होतं.

त्यामुळं बेडफेलो (अंथरुण शेअर करणारे) यांनी कमी बोलावं, एकमेकांच्या वैयक्तिक जागेची काळजी घ्यावी आणि हलगर्जीपणा टाळावा अशी अपेक्षा केली जात होती.

पण नेहमीच सर्वकाही पाहिजे तसंच घडत नसायचं.

9 सप्टेंबर 1776 ला रात्री उशिरा अमेरिकेचे दोन संस्थापक बेंजामिन फ्रैंकलिन आणि जॉन अॅडम्स न्यू ब्रुन्सविकमधील एका लॉज किंवा तत्कालीन हॉटेलमध्ये बेड शेअर करताना प्रचंड चर्चा करताना आढळले होते. हा विषय अॅडम्स खिडकी बंद करायला गेले तेव्हा सुरू झाला होता.

"फ्रँकलिन म्हणाले, 'खिडकी बंद नका करू, माझा श्वास कोंडेल.' मी उत्तर दिलं, की मला संध्याकाळच्या हवेची भीती वाटत होती," अॅडम्स यांनी नंतर डायरीत त्याचा उल्लेख केला होता.

त्यातून फ्रँकलिन यांनी थंडीबाबतच्या त्यांच्या नव्या सिद्धांताबाबत बोलायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं होतं की, तसं थंड हवेनं नाही तर, कोंडलेल्या खोलीतील हवेच्या चक्रामुळं होतं. अॅडम्स या अनपेक्षित व्याख्यानानं एवढे आनंदी झाले की, त्यांना लगेचच झोप आली.

अंथरुणातील उपद्रवी सहकाऱ्यांची समस्या एवढी मोठी होती की, सुरुवातीच्या आधुनिक युगातील फ्रान्सच्या एका पुस्तकात सोबत झोपणाऱ्याला रागवण्यासाठी काही शब्दही उपलब्ध करून दिले होते. एकिर्च यांना त्यांच्या पुस्तकासाठी संशोधन करताना एक खंड सापडला होता.

त्यात काही अनुवाद देण्यात आले होते, त्यात "तुम्ही लाथ मारण्याशिवाय काही करत नाही", "तुम्ही अंथरुणावरील सर्व चादरी ओढता", आणि "तुम्ही आजारी बेडफेलो आहात" अशी काही वाक्ये होती.

हँडले यांच्या मते, "त्यांच्याकडं असे अनेक मजेदार किस्से आहेत ज्यात लोकांनी त्यांच्या बेडफेलोला चांगल्या गोष्टी सांगण्यावरून किंवा न घोरण्याच्या गुणामुळं चागलं वाईट ठरवलं आहे."

त्या एका असमाधानी शिक्षकाचं उदाहरण देतात. त्यांचा सहकारी मद्यधुंद अवस्थेत बेडवर गेला आणि खूप गोंधळ केला तेव्हा त्यांनी त्याची तुलना डुकराशी केली होती.

पण काही असेही कार्यक्रम होते ज्यांचा उद्देश गंभीर परिणामांपासून वाचण्याचा होता. बहुतांश परिस्थितीमध्ये अविवाहित पुरुष आणि महिलांना त्यांच्या कुटुंबाशिवाय इतरांबरोबर बेड शेअर करणं ही सामान्य बाब नव्हती. जेव्हा असं घडलं तेव्हा जोखीम कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

एकिर्च यांना 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील एका आयरिश घरातील झोपण्याच्या पद्धतीबाबतच्या कठोर नियमांची माहिती मिळाली होती. सर्वांत मोठी मुलगी दारापासून सर्वात लांब भिंतीजवळ झोपत होती.

त्यानंतर तिच्या बहिणी कमी वयानुसार क्रमाने झोपत होत्या. त्यानंतर आई, वडील आणि नंतर मुलंही वयाच्या क्रमानं झोपायचे. सगळ्यांत शेवटी अनोळखी किंवा इतर लोक झोपायचे. म्हणजे ते कुटुंबातील महिलांपासून सर्वात लांब असायचे या पद्धतीला "टू पिग" नावानं ओळखलं जात होतं.

अंथरुणांची कमतरचा असल्यानं पुरुष आणि घरातील मोलकरणींना एकत्र झोपावं लागायंच, अशीही काही प्रकरणं होती. एकिर्च यांच्या मते, "ही सामान्य आणि गमतीची बाब होती. किमान ज्यांचे नोकर नाहीत त्यांच्यासाठी तरी, अनेकदा याचे परिणाम म्हणजे त्या गर्भवती होत होत्या."

अनोळखी लोकांबरोबर झोपताना लैंगिक अत्याचार किंवा हत्येचा धोका कायम असायचा.

1851 मधील कादंबरी मोबी डिकच्या सुरुवातीच्या प्रकरणात, मुख्य पात्राला हे समजतं की, हॉटेलमध्ये एकच बेड उपलब्ध आहे. त्यातही त्यांना धोकादायक व्हेल हार्पूनर (व्हेलची शिकार करणारा) बरोबर बेड शेअर करावा लागेल. हा हार्पूनर शहरात व्हेलची शीरं विकण्यासाठी आलेला असतो.

अशा सामूहिक झोपेबाबत इतर कमी आकर्षक बाबीही होत्या. अंधारात एकमेकांबरोबर केलेल्या गप्पा आणि रोमान्स यामुळं निर्माण झालेल्या प्रेमाबरोबरच ही अंथरुणं कीडे आणि आजारांचे माध्यमही बनले होते. एकाच गादीवर एवढे लोक झोपल्यामुळं ते उवा, ढेकूण आणि पिस्सूंनी भरुन जायचे.

कधी कधी झोपणाऱ्यांना न धुतलेले कपडे, वापरलेल्या भांड्यांचा दुर्गंध आणि इतर वासांनी त्रास व्हायचा.

एकिर्च यांनी वर्णन केलेल्या एका घटनेत, दोन महिलांनी एकमेकींवर दुर्गंध पसरवल्याचा आरोप केला होता. पण प्रत्यक्षात त्यांच्या अंथरुणाच्या वरच्या भागात एक शौचालय होतं, तिथून दुर्गंधी पसरत होती.

हळूहळू प्रमाण घटलं

19व्या शतकाच्या मध्यापर्यंत बेड शेअरिंगची फॅशन कमी होऊ लागली. अगदी विवाहित जोडप्यांमध्येही प्रमाण घटलं.

अमेरिकेतील एका प्रभावी डॉक्टरमुळं याची सुरुवात झाली. अनेक विषयांबाबत परखड मत असणारे विल्यम व्हिट्टी हॉल यांनी सामूहिक झोपेचा प्रकार मूर्खपणाचा आणि अनैसर्गिक असल्याचं ठाम मत मांडलं.

त्यांच्या 1861 मध्ये प्रकाशित स्लीप या पुस्तकात हॉल यांनी बेंजामिन फ्रँकलिनसारखाच हॉटेलमधील खिडकीवरून झालेल्या वादाचा उल्लेख केला.

एकापेक्षा जास्त जण झोपणाऱ्या खोलीत हवा लवकर प्रदूषित होऊ शकते. त्याशिवाय सामाजिक जीवनात आवश्यक असलेला परस्पराबद्दलचा विचार आणि आदर यामुळं कमी होतो.

तसंच एकाच अंथरुणात झोपणं हे स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनंही योग्य नसल्याचंही ते म्हणाले.

प्राण्यांच्या या जगातील सर्वांत घाणेरड्या प्राण्यांना यामुळं एकत्र आणल्याचंही ते म्हणाले.

अनेक शतकांच्या वैवाहिक जीवनात बेड शेअर करुनही धोक्यातून बचावलेले वृद्ध जोडपे नशीबवान होते, असंही ते म्हणाले.

अ कल्चरल हिस्ट्री ऑफ ट्विन बेड्स नावाच्या पुस्तकात इतिहासकार हिलरी हिंड्स यांनी सांगितलं आहे की,

"यामुळं वैयक्तिक झोपेच्या सुरुवातीच्या काळाला चिन्हांकित केलं. कुटुंबांनीही सामूहिक झोपेची पद्धत बंद करणं सुरू केलं आणि जवळपास एका शतकापर्यंत अनेक विवाहित जोडपी ट्विन बेडवर (दोन सारखे शेजारी असलेले पलंग) वेगवेगळे झोपत होते."

पण फक्त 1950 च्या दशकात त्यात बदल झाला. विवाह तुटण्यामागं हे एक मोठं कारण असल्याचं लोकांनी म्हटलं. पण सामूहिक झोपेची कल्पना आधीच्या काळात होती तेवढी पुन्हा लोकप्रिय होऊ शकली नाही.

मग आपण नेमकी काय चूक करत आहोत? आधुनिक राजकीय नेत्यांनीही रिचर्ड द लायनहार्ट आणि फिलिप द्वितीय यांच्याप्रमाणं हात मिळवताना फोटो काढण्याबरोबरच एक रात्र प्रतिकात्मकपणे सोबत झोपावं का? किंवा ऐतिहासिक प्रवाशांप्रमाणे पूर्णपणे अनोळखींबरोबर बेड शेअर केल्यानं पर्यटकांना फायदा होईल का?

"मला वाटतं की, लोक जेव्हा विविध कारणांमुळं एकटे झोपतात तेव्हा त्यांना चांगली झोप येते. बेड शेअर केल्यामुळं मिळणाऱ्या मानसिक समाधानाची पातळी तुम्हाला गाठता यायला हवी. बहुतांश लोकांना त्यांच्या गरजेनुसार झोपेसाठी आवश्यक असलेल्या वातावरणाचा फायदा त्यासाठी होतो," असं हँडले म्हणाले.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.