You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हजारो कोटींची संपत्ती अन् 'लोढा' नाव वापरण्याचा वाद, मंगलप्रभात यांच्या मुलांमधील तिढा असा सुटला
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, मुंबई
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक आणि अभिनंदन यांच्यात 'लोढा' ट्रेडमार्क वापरावरून असलेला वाद अखेर मिटला आहे.
वाद सोडविण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायामूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांची 'मध्यस्थ' म्हणून नियुक्ती केली होती.
पाच आठवड्यांत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र दोन महिन्यातच हा वाद नि. न्यायामूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांनी मिटविला आहे.
21 जानेवारी 2025 रोजी अभिषेक लोढा यांनी मुंबई उच्च न्यायालयात लोढा व्यापारचिन्हाचे नोंदणीकृत मालकीहक्क माझ्याकडे आहेत म्हणत, अभिनंदन लोढा यांच्या कंपनी विरोधात याचिका केली होती आणि पाच हजार कोटींचा नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता.
याप्रकरणी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी दोन्ही भावांना सामंजस्याने हे प्रकरण सोडवण्यास सांगितले होते आणि त्यासाठी न्यायमूर्ती रविंद्रन यांचे मध्यस्थी मार्गदर्शन घेण्यासाठी सांगितले होते.
वाद मिटवण्यासाठी माजी न्यायमूर्ती रवींद्रन यांची मध्यस्थी फार महत्वाची ठरली आहे. या वादावर तोडगा काढण्यात आल्याचे लोढा बंधुंनी सोमवारी एका अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले. लोढा हे नाव वापरण्याबाबत दोन्ही बंधुंमध्ये सहमती झाल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनामध्ये काय म्हटले आहे ?
दोन्ही भावांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार, थोरले बंधू अभिषेक लोढा यांची 'मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड' (एमडीएल) ही कंपनी 'लोढा अँड लोढा ग्रुप' या व्यापारचिन्हाचे मालक असतील आणि त्यांना हे नाव वापरण्याचा विशेषाधिकार असेल.
तर धाकटे बंधू अभिनंदन लोढा 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' (एचओएबीएल) या व्यापारचिन्हाचे मालक असतील आणि त्यांना हे नाव वापरण्याचा विशेषाधिकार असेल.
याशिवाय, लोढा ग्रुप आणि हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या दोन्ही कंपन्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध असणार नाही आणि दोन्ही कंपन्यांमध्ये त्याबाबत विस्तृत समन्वय साधला जाईल.
अभिनंदन लोढा यांना लोढा ग्रुप किंवा एमडीएल किंवा अभिषेक तोढा यांच्या इतर व्यवसायांमध्ये कोणताही अधिकार असणार नाही किंवा ते त्यावर दावाही सांगणार नाहीत.
हीच बाब अभिषेक यांना अभिनंदन यांच्या मालकीच्या कंपन्या आणि इतर व्यवसायांबाबत लागू होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती रविंद्रन आणि आरिफ डॉक्टर यांचे लोढा बंधूंनी मानले आभार
अभिषेक आणि अभिनंदन या दोघांनीही निवृत्त न्यायमूर्ती आर.व्ही. रवींद्रन यांचे मनापासून आभार मानत, मध्यस्थी प्रक्रियेत मार्गदर्शन अमूल्य होते असे म्हटले.
मध्यस्थीची प्रक्रिया करण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल लोढा कुटुंब न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांचे ही आभारी आहे," असे सोमवारी निवेदनात म्हटले आहे.
पाच हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकीचे 'लोढा' हे नाव वापरण्यावरून अभिषेक आणि अभिनंदन या लोढा बंधुंमध्ये माजी न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांनी यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. हा वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याचा सल्ला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने लोढा बंधुंना दिला होता. तो दोन्ही भावांनी मान्य केला.
या भावांमध्ये 'लोढा' हे नाव वापरण्यावरून सुरु असलेल्या वादावर बीबीसी मराठीने काही महिन्यांपूर्वीच बातमी केली होती.
'गावानं लोढा आला...' हे आगरी-कोळी भाषिक गाणं आपण ऐकलंच असेल. यातील 'लोढा' हे भारतातील बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या कंपनीचं नाव आहे. हे नाव महाराष्ट्रात गावागावापासून शहराशहरापर्यंत पोहोचलं आहे.
बांधकाम क्षेत्रातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळातील श्रीमंत आमदारांच्या यादीत असणारे एक नाव म्हणजे मंगल प्रभात लोढा. हजारो कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या लोढा कुटुंबीयांमध्ये आता व्यावसायिक कारणास्तव वाद निर्माण झाला आहे.
मंगल प्रभात लोढा यांच्या प्रतिथयश कुटुंबाला तडा गेला असून त्यांचे दोन्ही सुपुत्र अभिषेक लोढा आणि अभिनंदन लोढा या बंधूंमध्ये 'लोढा' हे नाव वापरण्यावरून सुरू झाला आहे. किंबहुना, या वादानं कोर्टाची पायरी चढलीय.
धाकट्या भावाला (अभिनंदन) 'लोढा' हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी अभिषेक लोढांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिषेक लोढा यांच्या कंपनीने अभिनंदन लोढा यांच्या कंपनीविरोधात याचिका दाखल केलीय.
नक्की वाद कशावरून आहे?
सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंबईतील आमदार मंगल प्रभात लोढा यांना दोन सुपुत्र आहेत. थोरल्या मुलाचं नाव अभिषेक, तर धाकट्या मुलाचं नाव अभिनंदन आहे.
मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय आहेत. कॅबिनेट मंत्रिपदही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे व्यवसायाची संपूर्ण धुरा लोढांचे हे दोन्ही मुलं सांभाळतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून लोढांच्या दोन्ही मुलांमध्ये व्यावसायिक कारणावरून वाद आहे.
त्यातच अभिषेक लोढा यांच्या 'मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड'ने गेल्या आठवड्यांत अभिनंदन यांच्या 'हाऊस ऑफ अभिनंदन' लोढा या कंपनी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे.
या याचिकेत अभिषेक लोढांनी दावा केलाय की, 'लोढा' या व्यापारचिन्हाचे स्वामित्वहक्क आपल्याकडे असून इतर कोणीही ते वापरू शकत नाही. त्यामुळे लोढा हे व्यापारचिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करावी.
अभिषेक लोढा यांनी याचिकेत काय म्हटलं ?
अभिषेक लोढा यांनी केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, आपल्या कंपनीकडे लोढा व्यापारचिन्हाचे नोंदणीकृत मालकीहक्क आहेत. तसेच, याआधी किंवा आजपर्यंत अभिनंदन यांच्या कंपनीला हाऊस ऑफ अभिनंदन लोढा हे नाव वापरण्यास आपण ना हरकत दिली नाही. लोढा हे नाव सर्वदूर करण्यासाठी गेल्या चार दशकांपासून आमच्या कंपनीने प्रयत्न केले आहेत. तसेच, त्यासाठी कंपनीने एकाच दशकात 1700 कोटी रुपये खर्च केले आहेत.
'लोढा समूहाचे नाव प्रतिष्ठित मानले जाते आणि कंपनीने गेल्या दशकात देशांतर्गत मालमत्ता विक्रीतून 91 हजार कोटी रुपये कमावले आहेत. लोढा समूहाने जाहिरातीवर कोट्यवधी खर्च केले आहे,' असा दावाही अभिषेक यांनी केला आहे. त्यामुळे अभिनंदन लोढा यांनी हे नाव वापरू नये, अशी मागणी करत, 'वापरल्यास पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई'च्या दाव्याची मागणी त्यांनी केलीय.
तसेच, याचिकेत अभिषेक लोढा यांनी म्हटले आहे की, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लोढा समूहाची प्रमुख कंपनी आहे. लोढा समूहातील कंपन्या व्यापारचिन्हाचा वापर करू शकतील, असा करार 2015 पर्यंत होता. 2015 मध्ये अभिनंदन लोढा हे लोढा समूहापासून वेगळे होतील आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करतील, असा निर्णय घेण्यात आला होता.
मार्च 2017 मध्ये आणि नंतर 2023 मध्ये वेगळे होण्याच्या अटी निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार, अभिनंदन यांची कंपनी 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' नावाने काम करेल, असा निर्णय घेण्यात आला.
2023 मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो. त्यामुळे, त्यातील अटींना बांधील नसल्याचा दावाही अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हेलपर्सने केला आहे.
झी बिझनेसला दिलेल्या मुलाखतीत अभिनंदन लोढा यांनी सांगितलं की, "मला माझ्या वाट्याला लोढा फिनसर्व आणि लोढा वेंचर्स आल्या होत्या, त्यानुसार मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय. गेल्या पाच वर्षापासून हाऊस ऑफ अभिनंदन लोढा हा आमचा रजिस्टर ब्रँड देशभर काम करतोय. त्यावेळेला त्यांना आक्षेप नव्हता, मग आता का आहे? तर मला वाटतं लोकांना आमचं यश पटत नसावं."
याबाबत कोर्टात काय घडलं?
न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर मंगळवारी (21 जानेवारी) सकाळच्या सत्रात अभिषेक यांची याचिका सर्वप्रथम सुनावणीसाठी आली.
अभिषेक लोढा यांनी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याची मागणी केली असल्याने त्यांच्या याचिकेवर आपण सुनावणी घेऊ शकत नाही, असे न्या. पितळे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेणाऱ्या न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठापुढे दुपारच्या सत्रात अभिषेक यांची याचिका सादर करण्यात आली.
पुढील सुनावणी 27 जानेवारीला
सुनावणीच्या वेळी एकलपीठाने हा वाद दोन भावांमधील भांडणाशी संबंधित आहे का? अशी विचारणा अभिषेक यांच्या वकिलांकडे केली.
त्याला सकारात्मक उत्तर देऊन अभिषेक आणि अभिनंदन यांच्या लोढा या व्यापारचिन्हावरून वाद सुरू असल्याचे अभिषेक यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
त्यानंतर, एकलपीठाने प्रकरणाची सुनावणी 27 जानेवारी रोजी ठेवताना त्यावेळी अंतरिम दिलासा देण्याच्या मागणीवर युक्तिवाद ऐकण्याचे स्पष्ट केले.
अभिनंदन लोढा यांची प्रतिक्रिया
बीबीसी मराठीने लोढा नावावरून सुरू असलेल्या वादावर अभिनंदन लोढा यांच्या प्रवक्त्यांना ईमेलवर काही प्रश्न विचारले. यावर त्यांनी त्यांची सविस्तर बाजू मांडली.
1. मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे हाऊस ऑफ अभिनंदन लोढावर कोणते आक्षेप?
मॅक्रोटेक डेव्हलपर्स यांनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढावर कोणते आक्षेप घेतलेत? या प्रश्नावर हाऊस ऑफ अभिनंदन लोढा'चे व्यावसायिक प्रवक्ते महेश शाह म्हणाले, "त्यांच्या याचितेतील मुख्य मुद्दा हा लोढा नाव वापरण्याबद्दल होता. लोढा वेंचर्स आणि लोढा फिनसर्व्ह अभिनंदन यांना देण्याचा करार झाला तेव्हा बांधकाम क्षेत्रात लोढा हे नाव स्वतंत्रपणे वापरायचं नाही असा निर्णय झाला होता."
"2017 ते 2020 या काळात मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने 'लोढा फिनसर्व'कडून अनेकदा उसनवारी केली आहे. त्यांनी घेतलेल्या एकूण कर्जाची रक्कम 900 कोटी रुपयांपर्यंत जाते. त्यातील 175 कोटी रुपये अजूनही परत आलेले नाहीत," 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा'चे व्यावसायिक प्रवक्ते महेश शाह यांनी बीबीसीने ईमेलवर विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात लिहिले आहे.
"2019 साली गुंतवणुकदारांनी जास्त परतावे मागितल्यामुळे मॅक्रोटेक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली होती. थोरले भाऊ आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने अभिनंदनकडे धाव घेतली. तेव्हा अभिनंदन यांनी फिनसर्व आणि लोढा वेंचर्स या दोन्ही कंपन्यांमधून कर्ज मॅक्रोटेकला कर्ज दिली होतं," असंही महेश शाह यांनी पुढे लिहिलं.
अभिनंदन यांच्या गॅरंटीशिवाय बँकांनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सला कर्ज द्यायला नकार दिला. तेव्हाही अभिनंदनने मॅक्रोटेक डेव्हलपर्सची मदत केली होती. जवळपास २५० कोटी रुपयांची व्यावसायिक तर 2000 कोटी रूपयांची खासगी गॅरंटी अभिनंदन यांनी मॅक्रोटेक डेव्हलपर्ससाठी दिली.
मॅक्रोटेक डेव्हलपर्सला निधी उपलब्ध करून देण्यासाठी अभिनंदन यांनी स्वतःचा एक फ्लॅटही गहाण ठेवला. या सगळ्याची नोंद आहे. हे सगळं कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याने केलं, असं महेश शाह यांनी म्हटलंय.
900 कोटी रुपयांचं कर्ज, कोट्यावधी रुपयांसाठी गॅरंटी आणि घर गहाण ठेवायला सांगूनही त्याच कंपनीवर मॅक्रोटेक डेव्हलपर्सने नाव चोरल्याचा आरोप करणं हे फार विचित्र आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
2. अभिनंदन लोढा या प्रकरणात पुढे काय करणार?
"अभिनंदन यांचा रिअल इस्टेट ब्रँड मायक्रोटेक डेव्हलपर्सपेक्षा वेगळं काम करतो. त्याच्या काम करण्याचा जागाही वेगळ्या आहेत. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा एका निर्धारित जमिनीवर काम करते. मायक्रोटेक डेव्हलपर्सचे प्रकल्प चालतात तिथे आम्ही जात नाही."
"अभिनंदन यांनी 2021 मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा प्रवास सुरू केला. 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा ही कंपनी शुन्यातून उभी केली. या नव्या व्यवसायाच्या यशाबद्दल आम्हाला आनंद आहे. तेच यश मायक्रोटेक डेव्हलपर्सना पचवता येत नाही."
"2021 पासून नोंदणीकृत ब्रँड आहे. गेल्या चार वर्षांत त्यांना 16 जागांवर प्रकल्प उभे केलेत. 12 मिलियन स्केअर फिटची विक्री केली आहे. 38 मिलियन स्केअर फिट अजूनही बांधकाम होतंय. आत्तापर्यंत आम्ही एकूण 6500 कोटी रुपयांची विक्री केली आहे. 700 ग्राहक, 25 देश, 23 राज्ये, 107 शहरे असा आमचा प्रवास आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, व्यावसायिक आमचे ग्राहक आहेत. काम वाढवण्याचे आमचे प्रयत्न आहेत."
"अशा पद्धतीने रहेजा किंवा हिरानंदानी कुटुंबातली भावंडही एकच नाव वापरून मुंबईतच बांधकाम क्षेत्रात काम करतात."
3. या प्रकरणाने लोढा कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल का?
"या सगळ्यासाठी अभिनंदन त्यांच्या पालकांना दोष देत नाहीत. संस्थापक म्हणून त्यांच्या वडिलांचे नाव मायक्रोटेक डेव्हलपर्सशी जोडले गेले आहे याची त्यांना जाण आहे. त्यामुळेच अजूनही ते वडिलांच्या आणि भावाच्या शब्दावर विश्वास ठेऊन आहेत."
"कौटुंबिक व्यवसायातील त्यांचे शेअर्स परत करणे, कंपनीला गरज पडेल तेव्हा मदत करणे या माध्यमातून त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली आहे. पालकांच्या आदरापोटी आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेपोटी ते गप्प राहिले. घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर नकोत म्हणून त्याने 10 वर्ष मौन पाळले. त्याची आईही या सगळ्या दुर्दैवी घटनांची साक्षीदार आहे."
लोढा ते मॅक्रोटेक डेव्हलपर्स
पूर्वीचं नाव 'लोढा डेव्हलपर्स' ही एक भारतीय बांधकाम व्यावसायिक कंपनी आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. या कंपनीची स्थापना 1980 मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी केली होती.
मुंबई, ठाणे, हैदराबाद, पुणे आणि लंडन येथे त्यांनी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्या आहेत. लोढा अल्टामाउंट, द वर्ल्ड टॉवर्स, लोढा बेलिसिमो, ट्रम्प टॉवर मुंबई आणि लोढा पार्क हे त्यांचे काही उल्लेखनीय प्रकल्प आहेत.
मुंबईजवळील पलावा ही स्मार्ट सिटी विकसित करण्याचे श्रेयही कंपनीला जाते.
19 एप्रिल 2021 रोजी कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर म्हणून नव्या नावाने बनवण्यात आली. या कंपनीचे आता सीईओ हे अभिषेक लोढा आहेत.
तर 2015 साली मंगल प्रभात लोढा यांच्याकडून मुलांना व्यवसाय आणि कंपन्यांचे वाटप करण्यात आले.
त्यात बांधकाम व्यावसायिक क्षेत्र अभिषेक लोढा यांना देण्यात आले, तर अभिनंदन लोढा यांना वडिलांकडून लोढा फिनसर्व आणि लोढा वेंचर्स या कंपन्या देण्यात आल्या होत्या. मात्र, पाच वर्षांपूर्वी अभिनंदन लोढा यांनी 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' हा एक ब्रँड बनवून बांधकाम व्यवसायात भरारी घेतली.
मंगल प्रभात लोढा- वकील ते व्यावसायिक आणि आता मंत्री
स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायाधीश गुमानमल लोढा यांचे मंगलप्रभा लोढा हे सुपुत्र आहेत. मंगलप्रभात लोढा यांचा जन्म जोधपूरमध्ये 18 डिसेंबर 1955 रोजी झाला.
त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम करायला सुरुवात केली.
लोढा यांनी राजस्थानात येथे त्यांचे एलएलबी पूर्ण केले. वकिली करण्यासाठी त्यांनी सनद घेतली. मात्र, त्यांचे वडील हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्याने त्यांनी त्या ठिकाणी वकिली करणे योग्य समजले नाही.
वकिलीला राम राम करत थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर त्यांनी वकिली न करता एका रिअल इस्टेट काम करण्यास सुरुवात केली. चार वर्ष काम केल्यावर त्यांनी इमारती बांधण्यासाठी लागणारे समान पुरवण्यास सुरुवात केली.
त्यानंतर 1982 मध्ये एका मित्राच्या साह्याने नालासोपारा येथे जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. यात त्यांनी चांगले यश मिळवले.
बघता बघता महाराष्ट्रातील उभरत्या शहरांमध्ये त्यांनी आपले प्रकल्प सुरू केले आणि यशस्वी राबवले. त्यातूनच लोढा ही बांधकाम क्षेत्रातील एक अग्रेसर कंपनी निर्माण झाली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)