हेमलता लवनम: दरोडेखोरांच्या तावडीतून एका संपूर्ण गावाला मुक्त करणारी महिला #सावित्रीच्यासोबतिणी – 2

व्हीडिओ कॅप्शन, हेमलता लवनम: दरोडेखोरांच्या तावडीतून एका संपूर्ण गावाला मुक्त करणारी महिला
Published

हे गाव तुम्हाला दिसायला सामान्य दिसेल पण स्टुअर्टपुरम गाव एक आदर्श गाव ठरलंय. आदर्श कारण इथे आता कोणी दरोडेखोर नाही.

या आधी चोर आणि दरोडेखोरांचं गाव अशी आंध्रप्रदेशमधल्या स्टुअर्टपुरम गावाची ओळख होती.

Presentational grey line

बीबीसी पुन्हा घेऊन आलंय इतिहासातल्या काही शूरवीर, धैर्यवान महिलांच्या कथा. सावित्रीच्या सोबतिणी ही खास सीरिज त्या दलित आणि मुस्लीम महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकते ज्यांना उपेक्षितांचं जीणं मंजूर नव्हतं.

Presentational grey line

या गावातले ग्रामस्थ म्हणतात की एकेकाळी चोर-दरोडेखोरांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टुअर्टपुरममध्ये आता कोणी चोर नाहीत.

या भागातले पोलीस अधिकारी ए. श्रीनिवास याबद्द्ल अधिक माहिती देताना म्हणतात, "सध्या इथे कोणी दरोडेखोर नाहीये. हां, काही लहान-सहान चोर असतील पण 80 च्या दशकाची तुलना केली तर हे काहीच नाहीये. इथे आता दरोडेखोर नाहीत असं म्हटलं तरी ही अतिशयोक्ती ठरणार नाही."

पण दरोडे आणि दरोडेखोरांच्या तावडीतून हे गाव कसं सुटलं? हेमलता लवनम यांच्या प्रयत्नांनी. सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका असणाऱ्या हेमलता एका ख्रिश्चन कुटुंबातल्या होत्या. त्यांचे पती लवनम सामाजिक कार्यकर्ते होते.

लग्नानंतर पती पत्नी दोघांना विनोबा भावेंनी मध्यप्रदेशातल्या चंबळच्या खोऱ्यात बोलावलं. चंबळ खोऱ्यातल्या दरोडेखोरांच्या आत्मसमर्पणाचे ते साक्षीदार बनले.

विनोबा भावे तेव्हा चंबळ खोऱ्यात शांतता मोहीम चालवत होते आणि या मोहिमेअंतर्गतच अनेक दरोडेखोरांनी आत्मसमर्पण केलं होतं.

लेखक के. सुंदर त्या घटनेबद्दल अधिक माहिती देतात.

"1960 साली विनोबा भावेंनी चंबळच्या खोऱ्यात एका पदयात्रेचं आयोजन केलं होतं. तिथे त्यांनी लवनम दांपत्यालाही बोलवलं होतं. हेमलता यांनी म्हटलं होतं की चंबळच्या खोऱ्यात समाजसुधारणा करणं हा त्यांचा मधुचंद्र होता. त्यांनी आपल्या पतीसह खोऱ्यातल्या मुरैना आणि भिंड या दोन्ही जिल्ह्यांचे दौरे केले."

हेमलता लवनम

फोटो स्रोत, SAMSKAR NASTIK KENDRA

तिथे हेमलता यांनी डाकू मानसिंह यांना राखी बांधली. यानंतर दरोडेखोरांबद्दल असणारा त्यांचा दृष्टीकोन बदलला.

"दरोडेखोरही माणसंच असतात, त्यांना परिस्थितीमुळे दरोडेखोर बनावं लागतं ही जाणीव त्यांना झाली. या घटनेने त्यांना आंध्रप्रदेशमधल्या स्टुअर्टपुरममध्येही सामजिक सुधारणा आणण्यासाठी प्रेरित केलं," के. सुंदर म्हणतात.

चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोरांनी केलेलं आत्मसमर्पण पाहून हेमलता खूप भारावून गेल्या. या घटनेने त्यांच्या मनाचा ठाव घेतला आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्ती बनण्याचं ठरवलं. त्यांनी गुन्हेगारांचं पुर्नवसन करण्याच्या दिशेने काम करायला सुरूवात केली. त्यांच्या कामाची सुरूवात त्यांनी स्टुअर्टपुरममधून केली.

आधी गुन्हेगार असलेल्या अनेकांचं पुनर्वसन हेमलता यांनी केलं.

"माझे वडील गुन्हेगार होते आणि मीही गुन्हेगार होतो. अम्माजी आमच्या गावात आल्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे करताय ते योग्य नाही. त्यांना भेटल्यानंतर आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू. त्या मला जेलमध्ये भेटायला यायच्या," या गावचे ग्रामस्थ असणारे प्रभाकर सांगतात.

सामाजिदृष्ट्या मागास महिलांना मुख्यधारेत आणण्यासाठी त्या सतत प्रयत्न करत राहिल्या. महिलांना जोगीण प्रथेतून मुक्त करण्यासाठीही त्यांनी लढा दिला. जोगीण प्रथेत महिलांना देवाच्या नावाने सोडलं जायचं.

हेमलता लवनम

फोटो स्रोत, SAMSKAR NASTIK KENDRA

के. सुंदर म्हणतात, "लग्नाच्या नावाखाली बहुतांश दलित महिलांना मंदिरांमध्ये विकलं जायचं. महिलांना जोगतिणी बनवून त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली केली जाते, त्यांना सक्षम बनू दिलं जात नाही, त्यांच्या स्वतःच्या शरीरावरचा त्यांचा हक्क हिरावून घेतला जातो आणि त्यांचा आई बनण्याचाही अधिकार हिरावून घेतला जाते असं लवनम म्हणायच्या."

हेमलता लवनम

फोटो स्रोत, SAMSKAR NASTIK KENDRA

हेमलता यांना लोक प्रेमाने अम्मा म्हणायचे. त्यांनी जवळपास 30 हून जास्त जोगतिणींची सुटका केली. त्यांनी दरोडेखोर, गुन्हेगारांना आत्मसमर्पण करण्यासाठी समजावलं आणि त्यांचं पुनर्वसन करून त्यांना मुख्यधारेत आणलं.

हेमलतांचा देवावर विश्वास नव्हता पण त्या म्हणायच्या की समाजात बदल घडवायचे असतील तर पिढी दर पिढी हे काम करत राहिलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे.

लेखन - पद्मा मीनाक्षी, सुशीला सिंह

निर्माती - सुशीला सिंह

शूट - रवी पेडापोलू

एडिट - संगीतम प्रभाकर, दिपक जसरोटिया

हे पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)