महाराष्ट्र लॉकडाऊन: 'पास सक्तीमुळं गावी जाता येत नाही, अन् शहरात पोट भरत नाही ' - पाहा व्हीडिओ

Published

लॉकडाऊन 3 नंतर वाहनाने प्रवास करताना ई-पास सक्तीचा केला आहे. त्यानंतर जिल्ह्यांच्या सीमेवर आणि पोलीस चेक पोस्टवर सध्या ई-पासची तपासणी होत आहे. पण स्वत:च्या घरी जायला लोकांना ई-पास काढायला अडचणी येत आहेत.

एकतर मजूर आणि घरकाम करणाऱ्या महिलांना याची कल्पना नाही. त्यांच्या स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा नाहीय. हजारो लोकांनी ई-पास मिळवायचा प्रयत्न केल्याने ती वेबासाईट क्रॅश होतेय, असं चेकपोस्टवर खोळंबलेल्या प्रवाशांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ई-पासची गरज असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

"नागरीक जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. तेव्हा त्याची स्थानिक प्रशासनाला माहिती असावी. जेणेकरून त्याचं विलगीकरण ठेवता येईल. त्याची वैद्यकीय तपासणी झाली की नाही हे कळल्याशिवाय त्यावर लक्ष ठेवता येणार नाही. पण पासची व्यवस्था ठेवली नसती तर रेड झोन मधून कुणी ग्रीन झोनमध्ये गेलंय का याची माहिती मिळाली नसती. म्हणून पासची व्यवस्था केलेली आहे," पुणे-सोलापूर पोलीस चेकपोस्टवर तैनात असलेले पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

लॉकडाऊन वाढत चाललंय. त्यामुळे शहरांत मजुरांच्या रोजीरोटीचे प्रश्न उद्भवू लागलेत. तसंच मुंबई-पुण्यात रुग्ण वाढल्याने हे लोक भीतीने तिथून गावी निघालेत.

वाहनाने प्रवास करून गावी जायचं असेल तर https://covid19.mhpolice.in/registration या वेबसाईटवरून पास घेणं आवश्यक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)