You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या UNमधील भाषणांनंतर काश्मीरमध्ये लोक काय म्हणाले?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या दोघांनीही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 74व्या अधिवेशनात जोरदार भाषणं केली. हे दोघे काय बोलणार याकडे जगभरातले नेते, आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकारांचं लक्ष लागलं होतं.
पण त्याबरोबरच काश्मीरमध्येही उत्सुकता होती, की मोदी आणि खान काय बोलतात, काश्मीरवर जगापुढे काय भूमिका मांडतात.
प्रथम पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानचं नाव न घेता जागतिक शांतता आणि कट्टरतावादावर बोलले. भारताने विकासाच्या वाटेवर कसा अग्रेसर आहे, हे त्यांनी जगासमोर मांडलं. त्यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीरच्या मुद्द्यावर काहीही बोलणं टाळलं, पण इम्रान खान यांचं संपूर्ण भाषण कश्मीरभोवती केंद्रित होतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झालं तर दोन्ही देशांचंच नव्हे तर जगाचंही किती नुकसान होईल, हेही त्यांनी सांगितलं.
एकप्रकारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न इम्रान यांनी केला.
या दोघांच्याही भाषणांवर तणावग्रस्त काश्मीर खोऱ्यातही प्रतिक्रिया उमटल्या. बीबीसी प्रतिनिधी रियाझ मसरूर यांनी सांगितलं की भारत प्रशासित काश्मीरमध्ये अनेक लोकांनी आंदोलन आणि घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान यांच्या भाषणाच्या समर्थनार्थ लोकांनी काश्मीरमध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी तणाव वाढला, मात्र सुरक्षा रक्षकांनी कुठलीही टोकाची प्रतिक्रिया देणं टाळलं, ज्यामुळे कुठलीही हानी झाली नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये कट्टरतावादी आणि सैन्यात संघर्षाच्या बातम्याही आल्या. या संघर्षात मुजाहिद्दीनशी संबंधित चार स्थानिक कट्टरतावादी ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
रियाझ मसरूर यांचा वृत्तांत तुम्ही याठिकाणी ऐकू शकता.
हेही नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)