अप्सरा रेड्डी- काँग्रेस पक्षातली पहिली ट्रान्सजेंडर सेक्रेटरी

Published

अप्सरा रेड्डी या महिला काँग्रेसच्या महासचिव होणाऱ्या तसंच कुठल्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या महत्त्वाच्या पदी बसणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत.

"मी ट्रान्सजेंडर जरी असले तरी मी देशाची नागरिकही आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था, मुलभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणाविषयी माझा पुरोगामी विचार आहे. फक्त एकाच समुदयासाठी झगडणं हे चुकीचं ठरेल." असं अप्सरा यांना वाटतं.

पाहा बीबीसी प्रतिनिधी मीना कोटवाल यांनी घेतलेली अप्सरा यांची मुलाखत.

प्रश्न - आतापर्यंतचं आयुष्य कसं राहिलं?

लोक अनेक गोष्टी बोलत होते. तू कधीही जिंकणार नाही. तुझ्यासाठी तिथं जागा नसेल. तू भारत सोडून जा. पण मी आज इथं आहे. देवानं माझ्यासाठी मोठा प्लॅन केला आहे.

मी एका साउथ इंडियन कुटुंबात जन्माला आले. माझं बालपण चागलं गेलं. मम्मी खूप समजूतदार होती. शाळेत शिकताना मला मुलगी व्हावसं वाटलं. माझ्या मनात अनेक संघर्ष चालू होते.

बाबा दारू प्यायचे. आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मी माझ्या करिअरवर जास्त लक्ष केंद्रित केलं. मला स्वाभिमानानं आयुष्य जगायचं होतं.

मी खूप चांगला अभ्यास केला. शाळेत पहिला क्रमांक काढला. स्कॉलरशिप मिळाल्यावर ऑस्ट्रेलियात आणि लंडनमध्ये शिकायची संधी मिळाली.

पुढं जॉब मिळाला. त्यामध्ये रिपोर्टर, फिचर एडिटर, नंतर अँकरिंग केलं. त्यानंतर जयललिता यांनी राजकारणात बोलावलं.

मी जयललिता मॅडमकडून खूप काही शिकले. धैर्य आणि स्वाभिमानानं कसं सामोरं जायला हवं हे मी त्यांच्याकडून शिकले.

तीच गोष्ट मी सोनियाजी यांच्याकडेही पाहिली. पुरुष नेत्यांवर मुद्द्यांवरून हल्ले केले जातात. पण महिलांवर वैयक्तिक टीका केली जाते.

प्रश्न - तुम्ही भाजपमध्ये असताना तुमच्याकडे काही पद होतं का?

नाही. मला महिला दिनादिवशी एक पुरस्कार मिळाला होता. अमित शहा यांनाही भेटले होते. पण मला तिथं राहावसं वाटलं नाही. त्यामुळं मी बाहेर पडले आणि जयललिता यांच्यासोबत काम केलं.

प्रश्न - राजकारणातच का यायचं ठरवलं? तुम्ही तर मीडियामध्ये काम करत होता?

मीडियात राहून काही प्रमाणातच आपण काम करू शकतो. पण मोठं लक्ष्य साधण्यासाठी एक पॉलिटिकल प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे.

राहुलजी यांना भेटले तेव्हा त्यांनी जेंडर हे महत्त्वाचं नाहीए असं सांगितलं. तुमच्याकडं टॅलेंट, स्कील आहे. आम्ही त्याला जास्त महत्त्व देतो. मला त्यांचा हा स्वभाव खूप आवडला.

प्रश्न - काँग्रेसला ट्रान्सजेंडर व्यक्तीला पक्षात आणण्यासाठी इतका वेळ का लागला?

ग्रहतारे जुळून यायला वेळ लागला. राहुलजी एक वर्षापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि एका वर्षातच घवघवीत यश मिळवलं. काँग्रेसनं मोक्याच्या ठिकाणी बहुमत मिळवलं. राहुल गांधीनी चांगली पक्षबांधणी केली.

प्रश्न - तुमच्याकडे ट्रान्सजेंडर समुदायासाठी काय प्लॅन आहे? तुम्ही ते राहुल गांधी यांच्या गळी उतरवू शकाल का?

मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून तुम्ही हा प्रश्न मला विचारत आहात. पण मी या देशाची नागरिकही आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था, मुलभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणाविषयी माझा पुरोगामी विचार आहे. फक्त एकाच समुदायासाठी झगडणं हे चुकीचं ठरेल. स्त्री-पुरुष समानता सगळीकडं महत्त्वाची आहे. पण होय, ट्रान्सजेंडर या नात्यानं मी माझ्या समुदायाला प्राधान्य देईन.

प्रश्न - पण राजकीय पक्षानं पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला महत्त्वाचं पद दिलं आहे. मग तुमच्या मनात नक्कीच काहीतरी असणार की?

मी भाजपनं आणलेल्या ट्रान्सजेंडर विधेयकाच्या विरोधात आहे. त्यात समतोल नाहीए. ट्रान्सजेंडर समुदायाला मुख्य प्रवाहात आणायचं असेल त्यांना कामाच्या ठिकाणी समान संधी द्यायला पाहिजे. विधेयकात त्यांच्या शिक्षण, आरोग्य, कायदेशीर मदत याविषयी चर्चा व्हायला पाहिजे. या गोष्टी आताच्या विधेयकात नाहीत. या व्यतिरिक्त जेंडरची व्याख्या स्पष्ट केलेली नाही.

प्रश्न - IPCच्या 377 सेक्शनबद्दल तुमच काय मत आहे?

PM जगभर फिरून 64 बिलियन रुपये खर्च करतात. प्रियंका चोप्राच्या लग्नाच्या रिसेप्शनला जातात, तेच PM माणसांच्या आत्मसन्मासाठी कायदा करू शकत नाहीत. हे लज्जास्पद आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)