You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्लाझ्मा थेरपी कोव्हिड-19 वरील खात्रीशीर उपचार नाही- ICMR
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
कोरोनाचे दिवसभरातले अपडेट्स
आजच्या या लाइव्ह पेजमध्ये आपण थांबत आहोत. आज दिवसभरात काय काय घडलं हे थोडक्यात पाहूया-
- जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तीस लाखांहून अधिक झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय.
- भारतामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,396 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 27 हजारांहून अधिक झालीये.
- कोरोनावर उपचारांसाठी सध्या प्लाझ्मा थेरपीची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मात्र कोव्हिड-19 वर प्लाझ्मा थेरपी ही अजूनही प्रायोगिक पातळीवर असून कोरोनावरील उपचारांसाठी ज्या वेगवेगळ्या उपचारपद्धतींवर काम सुरू आहे त्यापैकी एक आहे, असं ICMR नं स्पष्ट केलं आहे.
- भारतानं चीनला दिलेली पाच लाख रॅपिड टेस्टिंग किटची ऑर्डर रद्द केली आहे. हे टेस्टिंग किट फारसे उपयुक्त ठरत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
- देशातील 80 जिल्ह्यांमध्ये मागच्या 7 दिवसांपासून कोरोना व्हायरसशी संबंधित एकही रुग्ण आढळून आला नाही, तर 47 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही रुग्ण सापडला नाही.
कोरोनाचे जगातील आणि देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी 29 एप्रिलच्या लाइव्ह पेजला भेट द्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरून राजभवनात रस्सीखेच
आजचा #CoronaPodcast
CBSE ची दहावी-बारावीची परीक्षा घेणं आता कठीण- मनीष सिसोदिया
CBSE ची दहावी आणि बारावीची परीक्षा घेणं आता शक्य नाही, त्यामुळे ज्याप्रमाणे 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना जसं अंतर्गत मार्कांच्या आधारे उत्तीर्ण केलं गेलं, त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण करण्यात यावं, असं दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.
प्लाझ्मा थेरपी कोव्हिड-19 वरील खात्रीशीर उपचार नाही- ICMR
कोरोनावर उपचारांसाठी सध्या प्लाझ्मा थेरपीची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मात्र कोव्हिड-19 वर प्लाझ्मा थेरपी ही अजूनही प्रायोगिक पातळीवर असून कोरोनावरील उपचारांसाठी ज्या वेगवेगळ्या उपचारपद्धतींवर काम सुरू आहे त्यापैकी एक आहे, असं ICMR नं स्पष्ट केलं आहे.
प्लाझ्मा थेरपी किती यशस्वी ठरू शकते, याबद्दल अजून ठोस पुरावे मिळाले नसल्याचंही ICMR नं म्हटलं आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानंही प्लाझ्मा थेरपीकडे एक प्रायोगिक उपचारपद्धती म्हणूनच पाहिल्याचं ICMR कडून सांगण्यात आलंय.
दरम्यान, प्लाझ्मा थेरपी नेमकी काय आहे आणि कोरोनाबाधितांवर उपचारासाठी या थेरपीचा का विचार होत आहे, हे सविस्तर वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरी का गाठतोय?
रशियात एका दिवसात कोरोनाचे 6411 नवीन रुग्ण
रशियात एका दिवसात कोरोनाचे 6411 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता रशियामधील कोरोनाबाधितांची संख्या ही चीन आणि इराणपेक्षाही अधिक झाली आहे.
रशियामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 93, 558 आहे, तर मृतांची संख्या 867 झाली आहे.
रशियातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा मॉस्कोमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे.
देशातले 16 जिल्हे कोरोनामुक्त
लाखीसराई (बिहार), बिलासपूर (छत्तीसगढ), दुर्ग (छत्तीसगढ), राजनांदगाव (छत्तीसगढ), दक्षिण गोवा (गोवा), कोडागू (कर्नाटक), चित्रदुर्ग (कर्नाटक), दावणगेरे (कर्नाटक), इंफाळ पश्चिम (मणिपूर), ऐझॉल (मिझोरम), गोंदिया (महाराष्ट्र), माहे (पुदुच्चेरी), प्रतापगढ (राजस्थान), भद्राद्री कोथागुदेम (तेलंगणा), पौरी गढवाल (उत्तराखंड) आणि शिवपुरी (मध्य प्रदेश) या जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही.
महाराष्ट्रातल्या गोंदियाचा यात समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली.
भारताकडून चीनला दिलेली रॅपिड टेस्टिंग किटची ऑर्डर रद्द
भारतानं चीनला दिलेली पाच लाख रॅपिड टेस्टिंग किटची ऑर्डर रद्द केली आहे. हे टेस्टिंग किट फारसे उपयुक्त ठरत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं राज्यांकडे पाठवलेले टेस्टिंग किट पण परत मागवले आहेत. या किट्सचा वापर करून रॅपिड अँडीबॉडीज टेस्ट केल्या जात होत्या.
या चाचण्यांचे अहवाल मिळण्यासाठी साधारण अर्ध्या तासाचा वेळ जात होता. त्यामुळे एखाद्या भागात किती वेगानं संक्रमण होत आहे, याचा अंदाज तपासणी अधिकाऱ्यांना यायचा.
अर्थात, या रॅपिड टेस्टिंग किटमुळे कोरोना व्हायरसची चाचणी होत नाही. याच्या वापरावर अनेक संशोधकांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे.
दुसरीकडे चीननं मात्र भारताचे दावे फेटाळून लावले आहेत. चिनी दूतावासाचे प्रवक्ते जे राँग यांनी म्हटलं, की चीनकडून निर्यात करण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य दिलं जातं. काही लोकांकडून चिनी उत्पादनांकडे पूर्वग्रहदूषित नजरेनं पाहिलं जातं. हे चुकीचं आहे.
भारतातील काही राज्यांनी रॅपिड टेस्टिंग किटच्या वापरानंतर तक्रारी केल्या होत्या. या किटच्या निष्कर्षांची अचूकता ही केवळ पाच टक्के असल्याचं राज्यांनी म्हटलं होतं.
या तक्रारीनंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) केलेल्या गुणवत्ता चाचणीमध्ये हे किट्स पास झाले नाहीत. सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयानं या सर्व प्रकरणावर भाष्य करताना म्हटलं, की भारत टेस्टिंग किट्ससाठी अवाजवी पैसे मोजत आहे.
कोरोनाची लस शोधण्याचं काम पुण्यात कसं होत आहे? - सोपी गोष्ट
मजुरांना अडवण्यासाठी तामिळनाडू-आंध्राच्या सीमेवर उभारली भिंत
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तामिळनाडूनं आंध्र प्रदेशला लागून असलेल्या सीमेवरच भिंत उभारली आहे.
तामिळनाडूमधील वेल्लोर आणि आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यादरम्यान ही पाच फूट लांबीची भिंत उभारण्यात आली आहे. गाड्यांची वाहतूक थांबविण्याच्या उद्देशानं ही भिंत बांधण्यात आली आहे.
वेल्लोर जिल्ह्यातील अधिकाऱ्यानं सांगितलं, की यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करून येत असलेल्या मजुरांना थांबविता येईल.
या अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, की मुख्य सीमा असलेल्या रस्त्यावर या लोकांना अडवणं शक्य आहे, पण दुर्गम भागातून ये-जा करणाऱ्या लोकांना अडवताना अडचण येत आहे. अर्थात, लोकांची ये-जा थांबविण्यासाठीचा हा तात्पुरता उपाय आहे.
गुजरातमधील हिरे मजूरांची गावी सोडण्याची मागणी
गुजरातच्या सुरतमध्ये हिरे कारखान्यात काम करणाऱ्या मजूरांनी घरी सोडण्याची मागणी करत गोंधळ घातला. लॉकडाऊनमध्ये सुद्धा काम करायला लावल्याचा मजूरांचा आरोप आहे.
राष्ट्रीय हरित लवाद कार्यालयातील कामकाज 4 मेपासून पूर्ण क्षमतेने होणार
महिनाभराचं लॉकडाऊन पाळल्यानंतर 4 मेपासून राष्ट्रीय हरित लवाद कार्यालयातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
लवादाचे प्रमुख, सदस्य आणि अधिकारी कार्यालयात 100 टक्के उपस्थित असतील. तर कर्मचारी वर्गापैकी 33 टक्के लोक कार्यालयात येतील, असं राष्ट्रीय हरित लवाद कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
दिल्लीत इलेक्ट्रॉनिक दुकाने उघण्यास परवानगी
राजधानी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक उत्पादनं विकणारी दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या सुधारित नियमांनुसार ही दुकानं उघडी राहू शकतात, असं प्रशासनानं म्हटलं आहे, अस वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठा भाऊ म्हणून पाहतोय – सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील सगळे मंत्री उत्तम काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहत आहे,” असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
कोरोना व्हायरसच्या महाराष्ट्रातील प्रसाराबाबत अनेक समज गैरसमज आहेत. त्यामुळे आपण गाफील न राहता अधिक खबरदारी बाळगली पाहिजे.
सध्याच्या स्थितीत उद्धव ठाकरेंकडे राज्यातील नागरिक मोठा भाऊ म्हणून पाहत आहेत, याचा आनंद वाटत असल्याचं सुळे म्हणाल्या. तसंच त्यांनी सरकारने वरळी, सांगली आणि बारामतीमध्ये केलेल्या कामाचीही प्रशंसा केली.
देशातील कोरोनाग्रस्तांच्या डबलिंग रेटमध्ये घट – डॉ. हर्षवर्धन
देशातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेटमध्ये घट झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
गेल्या 14 दिवसांत डबलिंग रेट 8.7 आहे. तर गेल्या 7 दिवसांचा विचार केल्यास हे प्रमाण 10.2 आहे.
देशातील 80 जिल्ह्यांमध्ये मागच्या 7 दिवसांपासून कोरोना व्हायरसशी संबंधित एकही रुग्ण आढळून आला नाही. तर 47 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही रुग्ण सापडला नाही.
तसंच 21 दिवसांचा विचार केल्यास 39 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसात कोरोनाग्रस्त आढळून आला नाही. त्याचप्रमाणे 17 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत एकही रुग्ण सापडला नाही, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 हजारांच्या पार
दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 3108 वर पोहोचली आहे. काल एका दिवसात 190 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.
आतापर्यंत दिल्लीतील 877 रुग्ण बरे झाले आहेत तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.
ब्रिक्स देशांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंग बैठक
ब्रिक्स देशांची बैठक आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या बैठकीत सहभागी होतील.
नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या पाच व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण
नांदेडमधील हजूर साहेब इथून पंजाबमध्ये गेलेल्या पाच व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे इथून पुढे नांदेडमधून पंजाबमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोव्हिड-19 बाबत तपासणी करण्यात येईल, असं पंजाब आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.