गाझाच्या जमिनीवरील सर्व सीमा इस्रायलच्या नियंत्रणात
आज 30 मे आहे. देशविदेशातील बातम्या तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.
थोडक्यात
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे.
सलमान खानवर आणखी एका हल्ल्याच्या कट उघड, चौघांना अटक केल्याचा पोलिसांचा दावा
फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी चीनला दक्षिण चीन सागरात आपली सीमा ओलांडू नये असं सांगितलं आहे.
बायडेन यांनी जाहीर केला गाझातील युद्ध थांबवण्यासाठीचा इस्रायलचा प्रस्ताव
हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनोतनं हिमाचल प्रदेशात मोदींची लाट असल्याचं म्हटलं आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे.
देशीतील 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात यावेळी इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.
सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाची मुदत वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांना 2 जूनला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे.
लाईव्ह कव्हरेज
नितीन आणि तुषार
गाझाच्या जमिनीवरील सर्व सीमा इस्रायलच्या नियंत्रणात
फिलाडेल्फी कॉरिडॉरवर इस्रायली सैन्यानं ताबा मिळवल्यामुळे आता गाझाच्या जमिनीवरील सर्व सीमा आता इस्रायलच्या नियंत्रणात गेल्या आहेत.
गाझा पट्टीच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे तर या क्षेत्राच्या उत्तर आणि पूर्वेकडील सीमा आधीपासूनच इस्रायललगत होत्या. तर गाझापट्टीची साधारण दक्षिणेकडची सीमा इजिप्तलगत आहे. साधारण तेरा किलोमीटरची ही सीमा असून, फिलाडेल्फी कॉरिडॉर हा या सीमेलगतच आहे.
फोटो स्रोत, REUTERS/AMIR COHEN
फिलाडेल्फी कॉरिडॉर हा एक बफर झोन किंवा म्हणजे दोन देशांमधल्या 'नो मॅन्स लँड' सारखी मोकळी जागा आहे. हा कॉरिडॉर फक्त शंभर मीटर रुंद आहे आणि धोरणात्मकदृष्ट्या हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं आहे.
इजिप्त पॅलेस्टिनींचं समर्थन करत आला आहे, पण त्यांनी हमासवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घातली आहे. त्यामुळे 2006 मध्ये गाझात हमासची सत्ता आल्यापासून इजिप्तनं या सीमेची नाकेबंदी केली आहे. रफा क्रॉसिंग हा तिथून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे.
मात्र या क्रॉसिंगची गाझामधली बाजू आणि लगतचा फिलाडेल्फी कॉरिडॉर इस्रायलनं ताब्यात घेतल्यामुळे इजिप्त आणि इस्रायलमधल्या तणावात भर पडली आहे.
विराट कोहलीवर टीका केल्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा गौप्यस्फोट न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल याने केला आहे.
क्रिकेट मीडिया प्लॅटफॉर्म ‘क्रिकबझ’वर आयपीएलवर चर्चा सुरू होती. यावेळी डूलने दिनेश कार्तिकसोबत बोलताना ही माहिती दिली.
"कमेंटेटर असताना अनेकदा विराटची स्तुती केली. पण गरज असेल तेव्हा टीकाही केली," असं डूल म्हणाला.
आयपीएल 2024 ला सुरुवात झाली तेव्हा स्ट्राईक रेटवरून डूलने कोहलीवर टीका केली होती. त्यानंतर या धमक्या आल्याचं डूलनं सांगितलं.
दिनेश कार्तिकसोबत बोलताना तो म्हणाला, "विराट कोहली एक चांगला खेळाडू आहे. त्याने मैदानात आक्रमकपणे खेळायला पाहिजे."
डूल म्हणाला, "मी स्ट्राईक रेटवरून टीका केली तेव्हा मला हेच बोलायचं होतं. त्याने आऊट होण्याची चिंता करू नये. तो अतिशय चांगला खेळाडू आहे. मी विराटबद्दल नेहमीच चांगलं बोलत आलो. पण मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या ही गोष्ट जरा नकारात्मक वाटली."
यानंतर दिनेश कार्तिकनं भारतीय क्रिकेक चाहत्यांना समज दिली.
कार्तिक म्हणाला, "हे खरंच क्लेशदायक आहे. खेळातील तांत्रिक बाबींवरील टीका आणि वैयक्तिक टीका यात फरक असतो, हे भारतीय क्रिकेट चाहत्यांनी समजून घ्यायला हवं."
मुंबईत मध्ये रेल्वेवर 63 तासांचा जम्बो ब्लॉक, कुठले मार्ग बंद असतील?
मध्य रेल्वेवर 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जूनपर्यंतच्या दुपारपर्यंत तब्बल 63 तासांचा जम्बो ब्लॉक असणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं 36 तासांचा ब्लॉक असेल.
ठाण्यात प्लॅटफॉर्म रुंदीकरण, तर सीएसएमटी इथं नॉन इटरलॉकींगच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
फोटो स्रोत, Getty Images
कोणत्या ठिकाणी किती काळ मेगा ब्लॉक?
ठाण्यातल्या प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामामुळे 30 मेच्या मध्यरात्री साडेबारा वाजपासून 2 जून रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे कळवा (सीएसएमटी आणि क्रॉसओव्हर्ससह) ते ठाण्यादरम्यानच्या स्लो लाईनवरील सेवा खंडीत होईल. तसेच ठाणे ते कळवा ही डाऊन जलद मार्गिका आणि कळवा ते ठाणे अप जलद मार्गिका या पूर्णपणे बंद असतील.
फोटो स्रोत, Getty Images
सीएसएमटीवर कोणत्या मार्गिका बंद असतील?
शुक्रवारी (31 मे) मध्यरात्री साडेबारा वाजतापासून तर रविवारी (2 जून) दुपारी साडेबारा वाजेपर्यंत तब्बल 36 तास सीएसएमटी इथं मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी आणि वडाळा दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल.
सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल.
मेगा ब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवेवर परिणाम झाला असून 930 उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये, गरज असेल तरच प्रवास करण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
मान्सूनविषयी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाले आहेत. 30 मे रोजी मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांत दाखल झाला असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
मान्सूननं केरळचा जवळपास संपूर्ण भाग आणि ईशान्येकडील सर्व राज्यांत म्हणजे मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, ही राज्ये व्यापली आहेत. तसंच मेघालय, आसाम लक्षद्वीपमध्येही मान्सूननं पदार्पण केलं आहे.
फोटो स्रोत, IMD
फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं, तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.
केरळमध्ये गेल्या चोवीस तासात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.
पुढच्या 2-3 दिवसांत मान्सून दक्षिण तामिळनाडू, मन्नारच्या आखाताचा काही भाग, बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाखल होईल आणि आसाम तसंच अरुणाचलचा उर्वरीत भागही व्यापेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
केरळमध्ये एरवी साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल झाला आहे. साधारणपणे 5 जूनच्या आसपास गोव्यात, 10 जूनच्या आसपास मुंबईत आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अवतरतो. त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे.
फोटो स्रोत, IMD
सध्या केरळ आणि माहे मध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिक्कीम, अरुणाचलमध्येही ऑरेंज अलर्ट, तर आसाम मेघालयमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे देशात उष्णतेची लाटही कायम आहे, बिहारमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट तर वायव्येकडील राज्ये, मध्य भारत आणि पूर्व भारतातील ओडिसामध्येही उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पण 31 मे आणि 1 जूनपासून पुढच्या काही दिवसांत या उष्णतेपासून उत्तर भारताला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
फोटो स्रोत, IMD
महाराष्ट्रात उत्तर कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
तर दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भाजपनं सैनिकांना मजूर बनवलंय, राहुल गांधींची टीका
फोटो स्रोत, Getty Images
भाजपने सैनिकांना मजूर बनवून ठेवलं आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलीय.
राहुल गांधी म्हणाले की, जर इंडिया आघाडीचं सरकार आलं तर ते अग्निवीर योजना बंद करतील. ओडिशाच्या बालासोरमध्ये राहुल गांधी पत्रकारांशी बोलत होते.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, "आम्ही सत्तेत आलो तर अग्निवीर योजना बंद करू. भाजप सरकारने देशातल्या सैनिकांना मजूर बनवलं आहे. आम्ही तरुणांना पुन्हा एकदा लष्करात भरती होण्याची संधी देऊ."
लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्याचं मतदान एक जूनला होणार आहे. काँग्रेसने त्यांच्या प्रचारात अनेकवेळा अग्निवीर योजना आम्ही बंद करण्याचं आश्वासन दिलंय.
2022 मध्ये आणलेल्या या योजनेमुळे सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हटले जातंय. एकदा भरती झाल्यावर ते अग्निवीर म्हणून ओळखले जातील आणि त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल, असं या योजनेचं स्वरूप आहे.
टीम इंडियाच्या कोचच्या निवडीबाबत सौरव गांगुली काय म्हणाला?
फोटो स्रोत, GETTY IMAGES
भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या कोचसाठीचा शोध सुरू झाला आहे. बीसीसीआयनं या पदासाठी अर्ज करण्यासाठी 27 मे ही अंतिम तारीख ठरवली होती.
या पदासाठी कुणी अर्ज केले आहेत, याबाबत अद्याप बीसीसीआयनं काहीही माहिती दिलेली नाही. पण अनेक माध्यमांनी या पदासाठी गौतम गंभीर प्रबळ दावेदार असल्याचा दावा केला आहे.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनं नुकतंच याबाबत मत व्यक्त केलं. कोच मैदानात आणि मैदानाबाहेरही संघातील सदस्यांना सावरत असतो. त्यामुळं कोचची निवड विचारपूर्वक करायला हवी.
“एखाद्याच्या जीवनात कोचचं महत्त्वं त्याचं मार्गदर्शन आणि सातत्यानं प्रशिक्षणाबरोबरच भवितव्याला आकार देणारं असतं. मग ते मैदानावर असो की मैदानाबाहेर. त्यामुळं कोचची निवड बीसीसीआयनं विचारपूर्वक करावी..” असं त्यानं एक्सवर लिहिलं.
ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदनं नंबर वन मॅग्नस कार्लसनला केलं पराभूत
फोटो स्रोत, GETTY IMAGES
भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं जगातील नंबर वन बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला पराभूत करत कसिकल गेममध्ये विजय मिळवला. या विजयाद्वारे त्यांनं नॉर्वे चेस टुर्नामेंटमध्ये आघाडी घेतली आहे.
या स्पर्धेत तीन राऊंडनंतर 5.5 गुणांसह प्रज्ञानंद अव्वल स्थानी आहे.
प्रज्ञानंद पांढळ्या सोंगट्यांसह खेळत होता. या सामन्यातील पराभवामुळं कार्लसन तालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
18 वर्षांच्या भारतीय खेळाडून रॅपिड/अॅक्सिशन गेम्समध्ये कार्लसनला अनेकदा पराभूत केलं आहे. पण प्रथमच त्यानं कार्लसनला क्लासिक गेममध्ये पराभूत केलं आहे.
अशा प्रकारच्या गेममध्ये प्लेयर जास्त वेळ घेऊन चाली खेळू शकतात. साधारणपणे खेळाडू एक तासापर्यंतचा वेळ घेतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत यापूर्वीची सरकारं गांधींना जगभरात पोहोचवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.
रिचर्ड एटनबरो यांनी 'गांधी' चित्रपट तयार केल्यानंतर जगभरातील लोकांना त्यांच्याबद्दल माहिती झाली किंवा उत्सुकता निर्माण झाली, असा दावा मोदींनी केला होता.
"महात्मा गांधी हे जगातील एक महान व्यक्ती होते. पण या 75 वर्षांमध्ये महात्मा गांधींची जगाला ओळख व्हावी, ही आपली जबाबदारी न्वहती का?" असं मोदी म्हणाले.
"मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांना जग ओळखतं. पण गांधीही कमी नव्हते. गांधींना आणि गांधींमुळं भारताला महत्त्वं मिळायला हवं होतं,"असंही मोदी म्हणाले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
"फक्त 'एंटायर पॉलिटिकल सायन्संस' च्या विद्यार्थ्यालाच महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागला असेल," असं राहुल गांधींनी लिहिलं.
हाँक काँगच्या कोर्टानं गुरुवारी 14 लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांना दोषी ठरवलं आहे. हा निर्णय चीनच्या एका नव्या निर्णयानं घेण्यात आला आहे. त्यामुळं जवळपास विरोधाचा आवाज संपूर्णपणे दाबला आहे.
दोषी ठरवण्यात आलेल्यांमध्ये माजी खासदार लेऊंग क्वोक-हंग,लॅम चेऊक-टिंग,हेलेना वोंग आणि रेमंड चॅन यांचा समावेश आहे. या खटल्याची सुनावणी तीन न्यायाधीशांच्या पीठाकडून केली जात आहे. न्यायाधीशांच्या पॅनलनं या खटल्यात माजी जिल्हा काऊंसिलर ली यू-शून आणि लॉरेन्स लाऊ यांना मुक्कोत केलं आहे.
या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या 14 जणांना जन्मठेप होण्याची शक्यता आहे.
दोषी ठरवण्यात आलेल्या 14 जणांमध्ये - गॉर्डन एनजी,टाट चेंग,क्लेरिस येउंग,मायकल पँग,काल्विन हो, हेलेना वोंग, सेझ टॅक-लॉय, ग्वेनेथ हो, रेमंड चॅन,ओवेन चाऊ, लॅम चेउक-टिंग, लेउंग क्वोक-हंग, रिकी ऑर आणि विनी यू.
2021 मध्ये एका निवडणुकीत सहभागी होण्यास 47 जणांनी नकार दिला होता. त्यातील हे 14 जण आहेत. या सर्वांनी हाँग काँगचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
2019 मध्ये सरकारविरोधी आंदोलनांनंतर राजकीय विरोधकांना दाबण्यासाठी कायद्याचा वापर केला जात असल्याचं यावर लक्ष ठेवून असलेल्यांचं म्हणणं आहे.
तर चीन आणि हाँग काँगच्या सरकारनं या कायद्याच्या मदतीनं सरकारमध्ये स्थैर्य आणलं असून न्यायालयीन स्वातंत्र्याचं संरक्षणही केलं असल्याचं म्हटलं आहे.
नमस्कार
बीबीसी मराठीच्या पेजवर आपले स्वागत आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. शेवटच्या टप्प्याचा प्रचार देखील आता संपण्यासाठी काही तासांचा कालावधी बाकी आहे.
तेव्हा प्रचाराची रणधुमाळी आणि त्याचसोबत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातम्या तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.