You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बस्तर: चकमकीत 12 माओवादी मारल्याचा संरक्षण दलांचा दावा
खटल्यामध्ये आरोप निश्चिती हा सुनावणीचा पहिला टप्पा असतो. आता पुढच्या टप्प्यात दोन्ही बाजूकडून युक्तिवाद केला जाईल.
थोडक्यात
- परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, शेजारी देश असल्यामुळे मालदीव आणि भारताचा विकास परस्परांच्या हितसंबंधांवर आधारलेला आहे.
- इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलं की, आवश्यकता पडल्यास इस्रायल एकटाही संघर्ष करेल.
- आयपीएल 17 च्या 58 व्या सामन्यात आरसीबीनं पंजाब किंग्जला 60 धावांनी हरवलं.
लाईव्ह कव्हरेज
नितीन सुलताने
बस्तर: चकमकीत 12 माओवादी मारल्याचा संरक्षण दलांचा दावा
छत्तीसगडमधील माओवाद्यांच्या प्रभावाखालील बस्तर मध्ये झालेल्या एका चकमकीमध्ये 12 संशयित माओवादी मारले गेल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे.
मृत पावलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की गंगालूरमधील जंगलात माओवादी असल्याची बातमी शुक्रवारी मिळाल्यानंतर जवानांची एक तुकडी कारवाई करण्यासाठी गेली होती.
संशयित माओवाद्यांशी सकाळच्या सुमारास जेव्हा चकमक सुरू झाली तेव्हा बीजापूरव्यतिरिक्त दंतेवाडा आणि सुकम जिल्ह्यातूनदेखील डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि कोबरा बटालियनच्या जवानांना मोठ्या संख्येनं पाठवण्यात आलं.
संध्याकाळी उशीरा चकमकीच्या ठिकाणाहून बारा माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. घटनास्थळाहून मोठ्या संख्येने हत्यारंदेखील मिळाली आहेत.
पोलिसांचं म्हणणं आहे की अजूनही शोध मोहिम सुरू आहे. यावर्षी जानेवारीपासून सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने माओवादी मारले गेले आहेत.
मागील महिन्याच्या 16 तारखेला सुरक्षा दलांनी एका चकमकीत 29 माओवादी मारले गेल्याचा दावा केला होता. माओवाद्यांच्या इतिहासात याआधी चकमकीत एवढ्या मोठ्या संख्येने कधीही माओवादी मारले गेले नव्हते.
याआधी 2 एप्रिलला बस्तरमध्येच पोलिसांनी 13 संशयित माओवाद्यांना मारल्याचा दावा केला होता. 30 एप्रिललादेखील पोलिसांनी एका चकमकीमध्ये 10 संशयित माओवादी मारले गेल्याचं सांगितलं होतं.
एप्रिल महिन्यात पोलिसांनी बस्तरमध्ये 59 माओवादी मारले गेल्याचा दावा केला होता. राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा सातत्याने आवाहन करत आहेत की माओवाद्यांनी शांततेची बोलणी करण्यासाठी पुढं आलं पाहिजे. मात्र माओवादी त्यासाठी तयार नाहीत.
शांततेची बोलणी करण्याआधी वातावरण निर्मिती व्हावी अशी मागणी माओवाद्यांनी केली आहे. त्याबरोबरच बस्तर मधून सुरक्षा दलं मागे घ्यावीत आणि माओवाद्यांच्या विरोधात सुरू असलेली सर्व कारवाई बंद करण्याची मागणीदेखील केली आहे.
महिला कुस्तीपटुंच्या लैंगिक शोषणप्रकरणी बृजभूषण शरण सिंहांवर आरोप निश्चित
भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सहा महिला कुस्तीपटुंनी नी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू कोर्टानं आरोप निश्चिती केली आहे.
अतिरिक्त चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (एसीएमम) प्रियांका राजपूत यांनी भाजप खासदारांच्या विरोधात आदेश दिले आहेत.
बृजभूषण शरण सिंह उत्तर प्रदेशच्या कैसरगंजमधून भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आहेत.
न्यायालयानं बृजभूषण शरण सिंह यांच्याशिवाय जागतिक कुस्ती महासंघाचे माजी सहायक सचिव विनोद तोमर यांच्यावरही आरोप केले आहेत.
बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम 354 (महिलांबरोबर गैरवर्तन) आणि 354ए (लैंगिक शोषण) आणि कलम 506 (धमकी) बाबतचे पुरेसे पुरावे मिळाले असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
तोमर यांच्या विरोधात आयपीसीच्या 506 अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
खटल्यामध्ये आरोप निश्चिती हा सुनावणीचा पहिला टप्पा असतो. आता पुढच्या टप्प्यात दोन्ही बाजूकडून युक्तिवाद केला जाईल.
बृजभूषण शरण सिंह उत्तर प्रदेशच्या कैसरमधून खासदार आहेत. पण यावेळी त्यांच्याऐवजी निवडणुकीत त्यांचा मुलगा करण भूषण सिंहला उमेदवारी देण्यात आली आहे.
भारताच्या अनेक पदक विजेत्या महिला कुस्तीपटुंनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर बृजभूषण यांच्या विरोधात अनेक दिवस आंदोलन केलं होतं.
हरियाणामध्ये राजकीय संकट
प्रकाश आंबेडकर : सत्तेपेक्षा आजोबांच्या नावाचे वलय अधिक महत्त्वाचे मानणारे नेते
पुण्यात मुसळधार पावसाने प्रचारावर फेरले पाणी, अनेक ठिकाणी झाडे कोसळली
पुण्यात शनिवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. शहरातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळं अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
ढगांच्या गडगडाटासह झालेल्या वादळी पावसामुळं जवळपास 15 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. तर हडपसरमधील शंकर महाराज मठाजवळ वीज पडून झाड पेटल्याची घटना समोर आली आहे.
सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळं शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचंही पाहायला मिळालं.
13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळं राजकीय पक्षांच्या अनेक कार्यक्रमांवर या पावसामुळं अक्षरशः पाणी फेरलं गेलं.
राज ठाकरे यांच्या सभेचंही आज पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. जोरदार पावसामुळं अद्याप या सभेवरही अनिश्चिततेचं सावट पसरलं होतं. मात्र ही सभा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्याने नवा वाद, काँग्रेसने झटकले हात
मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षानं त्या विधानापासून अंतर राखलं आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याशी पूर्णपणे असहमत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. तसंच पक्षाशी संबंधित विधानं करणं मणिशंकर अय्यर अधिकार क्षेत्रात नसल्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
मणिशंकर अय्यर यांनी गेल्या महिन्यात एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यात पाकिस्तानशी चर्चा करण्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी, पाकिस्तान हा एक सार्वभौम देश आहे आणि भारताने त्याबद्दल आदर बाळगला पाहिजे, असं म्हटलं होतं.
मणिशंकर अय्यर यांच्या मुलाखतीचा एक भाग आज व्हायरल झाला. त्यानंतर भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"कॉंग्रेसचे नेते राहतात भारतात, मात्र पाकिस्तानची तळी उचलतात," असं ठाकूर म्हणाले.
कॉंग्रेस नेते पवन खेडा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मणिशंकर अय्यर यांनी महिनाभरापूर्वी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याशी कॉंग्रेस पक्ष पूर्णपणे असहमत आहे. या विधानावर वाद निर्माण करून भाजप लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करत आहे," असंही ते म्हणाले.
"जुन्या व्हिडिओंबद्दलच बोलायचं असेल तर एस जयशंकर यांचाही एक व्हिडिओ फार जुना नाही. त्यात ते भारताने चीनला घाबरून राहावं असा सल्ला देत आहेत," असंही खेडा म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन, 1 जूनपर्यंतचा जामीन मंजूर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानं केजरीनालांना 1 जूनपर्यंत हा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठानं शुक्रवारी हा जामीन मंजूर केला. त्यांनी 2 जूनला पुन्हा स्वतः न्यायालयासमोर हजर व्हावं असं कोर्टानं म्हटलं आहे.
केजरीवाल यांना निवडणुकीत प्रचार करता यावा म्हणून कोर्टानं हा निर्णय दिला आहे. 21 मार्चपासून केजरीवनाल ईडीच्या कोठडीत आहेत.
“ही अटक आधी किंवा नंतर व्हायला हवी होती. आता आम्ही 21 दिवस देत आहोत, ”असं जस्टीस संजीव खन्ना म्हणाले.
केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका केली आहे. त्यासह या प्रकरणावरची सुनावणीही लवकरच पूर्ण करणार असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.
अद्याप निकालाची कॉपी मिळालेली नसल्यानं या जामीनाच्या आणखी काय अटी असतील हे समोर आलेलं नाही.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत केजरीवालांच्या जामीन आर्जाला ईडीने केला विरोध केला होता. निवडणुकीचा प्रचार करणं हा मूलभूत अधिकार नाही किंवा घटनात्मक अधिकारही नाही, असं ईडीनं गुरुवारी म्हटलं होतं.
जस्टिस संजीव खन्ना यांच्या पीठानं केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी निर्णय देणार असं स्पष्ट केलं होतं.
अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला दिल्लीच्या मद्यधोरण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता केजरीवालांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अंबानी आणि अदानी यांच्याबाबत मोदींनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे - चिदंबरम
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी अदानी-अंबानींचं नाव घेऊन राहुल गांधींवर हल्लाबोल करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
चिदंबरम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलंय की, "पीएम मोदींच्या आरोपांनुसार राहुल गांधींच्या चौकशीची मागणी अगदी योग्य आहे.
"दोन मोठ्या उद्योगपतींनी टेम्पोमध्ये पैसे भरून काँग्रेस पक्षाला दिल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे."
चिदंबरम पुढे म्हणाले, "हे आरोप स्वत: पंतप्रधान मोदींनी केले असल्याने त्यांच्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. राहुल गांधी यांनी या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली असून ही मागणी पूर्णपणे न्याय्य आहे. गेल्या 24 तासांपासून पंतप्रधान मोदी गप्प का? चौकशीच्या मागणीच्या प्रश्नावर अर्थमंत्री उत्तर का देत नाहीत?”
पंतप्रधान मोदींनी काय आरोप केले?
मोदी दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते, "निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी आणि अदानींना शिव्या देणे बंद केले आहे. आज मला तेलंगणाच्या भूमीतून त्यांना विचारायचे आहे की, राजकुमारांनी निवडणुकीत अंबानी आणि अदानी यांच्याकडून किती संपत्ती गोळा केली हे जाहीर करावे. आज टेम्पो भरून पैसे काँग्रेसपर्यंत पोहोचले आहेत का?"
राहुल गांधींचं प्रत्युत्तर
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया साइट X वर लिहिलं आहे की, “एक काम करा. त्यांच्याकडे (अबानी-अंदानी) सीबीआय आणि ईडी पाठवा. संपूर्ण माहिती द्या. चौकशी करा. ते लवकरात लवकर पूर्ण करा. मोदीजी घाबरू नका. मी पुन्हा देशाला सांगतोय की, नरेंद्र मोदींनी जेवढा पैसा यांना (अदानी-अंबानी) दिलाय, तितकाच पैसा आम्ही भारतातील गरिबांना देणार आहोत. त्यांनी 22 अब्जाधीश निर्माण केले आहेत. आम्ही कोट्यवधी लखपती निर्माण करू.”
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळस्कर दोषी; तीन आरोपींची निर्दोष सुटका
सनातन संस्था: कोण आहे संस्थापक, संस्थेत काय काम केलं जातं आणि संस्थेवर कोणते आरोप झाले ?
इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरून पाच भारतीय नागरिकांची सुटका
इराणने ताब्यात घेतलेल्या एमएससी एरीज जहाजावरून पाच भारतीय नागरिकांना सोडण्यात आलं आहे.
या पाच भारतीय नागरिकांना आज संध्याकाळी भारतात पाठविण्यात येणार आहे.
इराणमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधीची माहिती दिली.
इराणच्या नौदलाने 13 एप्रिलला भारतात येत असलेलं एसएससी एरीज हे जहाज ताब्यात घेतलं होतं.
जहाजात 25 कर्मचारी होते. यामध्ये 17 भारतीय नागरिक होते.
इस्रायलसोबत असलेल्या तणावादरम्यान इराणने ही कारवाई केली होती. या जहाजाचा मालक एक इस्रायली व्यावसायिक आहे.
जहाजाच्या चालक दलामध्ये एकमेव महिला कॅडेट एन टेसा जोसेफ याही सहभागी आहेत. त्यांना जहाज ताब्यात घेतल्यानंतर तातडीने सोडण्यात आलं.
अमेरिकेच्या इशाऱ्यावर इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू काय म्हणाले?
इस्रायल एकटा उभा राहू शकतो, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.
इस्त्रायलनं रफामध्ये कोणतीही मोठी कारवाई सुरू केल्यास देशाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जाणार नाही, असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांचं हे वक्तव्य आलं आहे.
"आवश्यक वाटल्यास आम्ही एकटे उभे राहू. गरज पडली तर शेवटच्या श्वासापर्यंत लढू, असं मी यापूर्वीही सांगितलं आहे,” असंही नेतन्याहू म्हणालेत.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गैलांट म्हणाले की, "शत्रूंसोबत मित्रांनीही समजून घेतले पाहिजे, आमचा मागे राहू शकत नाही. आम्ही मजबूत आहोत आणि आमचे ध्येय साध्य करू."
लोकांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन अमेरिकेने रफामध्ये बॉम्ब पुरवठा करण्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे.
सोमवारी (6 मे) इस्रायलनं जवळपास 1 लाख लोकांना रफा सोडण्यास सांगितलं होतं. हमासवर विजय मिळवण्यासाठी इस्रायल रफावरील हल्ल्याची पुनरावृत्ती करत आहे.
इस्रायलनं रफामध्ये मोठी कारवाई केली तर हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं अमेरिका आणि इतर संघटनांचं मत आहे.
मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर एस. जयशंकर यांनी काय म्हटलं?
“मालदीवच्या विकासात भारताची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली होती. आमच्या अनेक प्रकल्पांमुळे या देशाच्या लोकांना फायदा झाला आहे.”
जयशंकर यांनी पुढे म्हटलं की, जगात अनेक उलथापालथी घडत आहेत. कोरोना, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटांदरम्यान शेजारी राष्ट्रांच्या भूमिका किती महत्त्वाच्या ठरू शकतात हे आपण पाहिलं आहे.”
मोहम्मद मुइज्जू हे राष्ट्रपती बनल्यानंतर मालदीव आणि भारतादरम्यान तणाव निर्माण झाला होता. यापूर्वी मालदीवचे राष्ट्रपती आपला पहिला दौरा हा भारताचा करायचे. मात्र मुइज्जू हे चीनला गेले होते.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, शेजारी देश असल्यामुळे भारत आणि मालदीवच्या संबंधांचा विकास हा परस्परांच्या हितसंबंधांवर आधारलेला आहे
जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांची भेट घेतली. या दोघांच्या बैठकीनंतर जयशंकर यांनी हे विधान केलं.
मालदीवमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
जयशंकर यांनी म्हटलं,“भारत आपल्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आणि SAGAR पॉलिसीसाठी कटीबद्ध आहे. या बैठकीनंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील दोन्ही देशांच्या दृष्टिकोन आणि संबंधांना मजबूती मिळेल असा विश्वास मला आहे.”
गुड मॉर्निंग.
बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर तुमचं स्वागत आहे. इथे तुम्हाला दिवसभरातील सर्व अपडेट एकाच ठिकाणी वाचायला मिळतील.
9 मे रोजी घडलेल्या महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.