You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

प्रज्वल रेवण्णानं परदेशातून जारी केला व्हीडिओ, SIT समोर कधी येणार तेही सांगितलं

दिवसभरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

थोडक्यात

  • पुणे पोर्शे अपघात : ब्लड रिपोर्टशी छेडछाड केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक
  • रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले
  • IPL -17 चे विजेते कोलकाता नाईट रायडर्स ठरले आहेत. त्यांनी अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला हरवले.

लाईव्ह कव्हरेज

तुषार आणि नितीन

  1. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचे आदेश, जाणून घ्या आत्तापर्यंत काय काय घडलं?

  2. प्रज्वल रेवण्णानं परदेशातून जारी केला व्हीडिओ, SIT समोर कधी येणार तेही सांगितलं

    कर्नाटकमधील हासनचा जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णाने आज (27 मे) व्हीडिओ जारी करत माहिती दिली की, "31 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहीन."

    प्रज्वल रेवण्णावर अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. कथित लैंगिक शोषणाच्या शेकडो व्हीडिओ क्लिप समोर आल्याचाही आरोप आहे.

    रेवण्णानं जारी केलेल्या व्हीडिओमध्ये म्हटलंय की, "या प्रकरणावर मी उत्तर दिलं नव्हतं, कारण मी 'डिप्रेस' होतो. सर्वांपासून मी स्वत:ला वेगळं केलं होतं. माझ्यावरील महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप राजकीय कटातून लावण्यात आलेत."

    रेवण्णा पुढे म्हणाला की, "26 एप्रिलला मतदान झालं, तोपर्यंत माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. माझा परदेश दौरा आधीच ठरलेला होता. तीन-चार दिवसांनी मी यूट्यूब चॅनेल पाहत होतो आणि मला या आरोपांची माहिती मिळाली. एसआयटीने पाठवलेल्या नोटिशीला मी उत्तर दिलंय. मी माझ्या वकिलामार्फत हजर होण्यापूर्वी सात दिवसांचा अवधी मागितला.

    “दुसऱ्याच दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी हा राजकीय मुद्दा बनवून माझ्याविरुद्ध राजकीय कट रचण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पाहून मी डिप्रेशनमध्ये गेलो. हासनमधील काही राजकीय शक्ती मला रोखू इच्छित आहेत. त्यामुळे माझ्याविरुद्ध कट रचला जात आहे.

    “हे सर्व पाहिल्यानंतर मी स्वतःला सर्वांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. मी शुक्रवार, 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होत असून तपासात पूर्ण सहकार्य करेन. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला या प्रकरणातून बाहेर पडण्याची पूर्ण आशा आहे.”

    लैंगिक शोषणाच्या व्हीडिओंचं हे संपूर्ण प्रकरण वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

  3. राजकोट गेम झोन आग : सीसीटीव्ही फुटेज आले समोर, कशी लागली आग

    राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये आग लागून झालेल्या अपघाताचे चार सीसीटीव्ही फुटेज बीबीसीनं पाहिले आहेत. त्यातून आग नेमकी कशी लागली? ते स्पष्ट होतं.

    शनिवारी झालेल्या या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात लहान मुलांची संख्या जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.

    पहिले फुटेज सायंकाळी 5:33:30 वाजताचे आहे. त्यात गेम झोनच्या आत वेल्डिंगचं काम सुरू असल्याचं काम सुरू होतं हे पाहायला मिळालं. ज्याठिकाणी वेल्डिंग सुरू होतं त्याच्याच खाली फोम शीटचा मोठा पॅड ठेवलेला होता. वेल्डिंगमधून उडालेल्या ठिणग्यांमुळं सर्वात आधी या फोमशीटला आग लागली.

    5:34:06 वाजता या फोममधून थोडा धूर निघू लागला. त्यानंतर लगेचच चार ते पांच लोक पळत असल्याचं दिसून आलं. ते लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पाहायला मिळालं.

    5:34:55 पर्यंत तिथं ठेवलेले फोमशीट जळायला लागले. काही लोक तिथं जमा झाले. काही लोक आगीपासून बचावलेले फोम शीट तिथून हटवण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांना ते शक्य झालं नाही. पाहता-पाहता आग वेगानं पसरू लागली.

    दुसऱ्या एका फुटेजमध्ये एक व्यक्ती फायर एक्सटिंग्विशरनं आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसला. पण त्याचाही काही फायदा झाला नाही.

    काही मिनिटांमध्येच लोक इकडून तिकडे पळताना दिसले. पुन्हा एकदा फायर एक्सटिंग्विशर आणलं पण तरीही आग विझवण्यात यश आलं नाही. मिनिटभरातच वेगानं आग पसरू लागली.

    पोलिसांनी या प्रकरणी गेम झोनच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. गुजरात हायकोर्टानं स्वतः या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल मागवला आहे.

    या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं एका एसआयटीची स्थापनाही केली आहे.

  4. वैद्यकीय तपासण्यांसाठी जामिनाची मुदत वाढवून द्यावी, अरविंद केजरीवालांची विनंती

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामिनाचा कालावधी 7 दिवस वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आप नेत्या आतिशी यांनी दुजोरा दिला आहे.

    या पोस्टमध्ये आतिशी म्हणाल्या की, "ते (अरविंद केजरीवाल) ईडीच्या ताब्यात होते त्यावेळी त्यांचं सात किलो वजन कमी झालं होतं. अचानक वजन कमी होणं, डॉक्टरांच्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे. जामीन मिळाल्यानंतर आणि डॉक्टरांच्या निगराणीत राहूनही त्यांना वजन वाढवण्यात यश मिळत नाही. प्राथमिक तपासणीत त्यांच्या कीटोनची पातळी वाढल्याचे संकेत मिळाले आहेत.

    आतिशी म्हणाल्या की, किटोन पातळीसह अचानक वजन कमी झाल्यानं कॅन्सर आणि किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

    त्यामुळंच डॉक्टरांनी अरविंद केजरीवाल यांना संपूर्ण शरिराचं पीईटी स्कॅनसह इतर चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे.

    दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. त्यांना सप्रीम कोर्टानं निवडणूक प्रचारासाठी 2 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला होता.

  5. दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी, 'इथे' पाहा निकाल

  6. केकेआरच्या तिसऱ्या विजेतेपदानंतर मेंटॉर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया

    आयपीएल 2024 मध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत गंभीरनं लिहिलं की, “जिसकी मति और गति सत्य की हो, उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं.”

    रविवारी आयपीएल फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सनं सनरायझर्जस हैदराबादला आठ विकेटनं पराभूत करत विजेतेपद मिळवलं. यापूर्वी 2012 आणि 2014 मध्ये कोलकातानं ही स्पर्धा जिंकली होती.

    केकेआरच्या या विजयात मेंटॉर गौतम गंभीरची भूमिका मोलाची असल्याचं मानलं जात आहे. गंभीर आल्यानंतर संघाच्या रणनितीमध्येही अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

    गंभीरनं बॅटिंग लाइनअपबरोबरच गोलंदाजीमध्येही अनेक महत्त्वाचे बदल केले होते. त्याचा फायदा संघाला झाला.

  7. पुणे पोर्शे अपघात : ब्लड रिपोर्टशी छेडछाड केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक

    पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टशी छेडछाड केल्याचा आरोप पोलिसांनी या दोन डॉक्टरांवर नोंदवत ही कारवाई केली आहे.

    ससून रुग्णालयातील डॉ.अजय तावडे आणि डॉ. हरी हरनोर या दोन डॉक्टरांना या घटनेचा तपास करणाऱ्या पुणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

    अपघात झाला त्या रात्री कार चावलत असलेला अल्पवयीन मुलगा दारू प्यायलेला होता.

    डॉक्टरांचे फोन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासावरून डॉ. तावडे आणि अल्पवयीन आरोपीचे वडील यांच्यात फोनवरून बोलणं झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

    अपघात झाला तेव्हा कार अल्पवयीन आरोपी चालवत होता. पण त्याच्या रक्ताच्या चाचण्यांचे रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यात त्यानं दारू प्यायली नव्हती असा उल्लेख होता. पण प्रत्यक्षात तो मुलगा एका पबमध्ये दारू घेत असल्याचं सीसीटिव्ही फुटेजवरून स्पष्ट झालं होतं.

  8. रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालला धडकले, मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा

    रेमल चक्रिवादळ रविवार रात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या सागरी किनारपट्टीला धडकलं.

    रेमलच्या प्रभावामुळं बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या सागरी किनारपट्टीच्या भागात वेगवान वाऱ्यांसह पाऊस होत आहे.

    बांगलादेशच्या हवामान विभागानुसार चक्रिवादळाच्या मुख्य भागानं स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे 11 वाजता किनारपट्टी ओलांडली.

    हे चक्रिवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधून पुढं गेलं. त्यामुळंच पश्चिम बंगालच्या विमानतळावर रविवारी दुपारी 21 तासांसाठी उड्डाणं रद्द केलं.

    रेमलचा परिणाम बिहारमध्येही पाहायला मिळू शकतो. तसंच उत्तर बिहारच्या बहुतांश शहरांमध्ये लोकांना काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो.

    हवामान विभागानं पश्चिम बंगाल, ओडिशासह ईशान्येच्या सर्व राज्यांमध्ये जोरदार जोरदार पावसाचा इशाराही दिला आहे. या राज्यांमध्ये आणखी दोन दिवस रेमलचा परिणाम पाहायला मिळू शकतो.

    रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेमलचा सामना करण्यासाठी आढावा बैठक घेतली होती.

  9. नमस्कार

    आज 27 मे आहे. बीबीसी मराठीत आपले स्वागत आहे. देशविदेशात अनेक घडामोडी सुरू आहेत. देशातील सहा टप्प्यांचे मतदान संपले आहे.

    आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन-रशिया आणि इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष सुरू आहे. या सर्व घडामोडी तुम्हाला बीबीसीच्या या पेजवर वाचायला मिळतील.

    26 मेच्या बातम्या वाचण्यासाठी या पेजला भेट द्यावी.