You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार

3 जूनच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजला भेट द्या.

थोडक्यात

  • नैऋत्य मोसमी वारे येत्या चार पाच दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 3
  • 3 जूनपासून अमूलचे दूध महागले; नव्या किमतींनुसार प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ
  • हमासने शस्त्रसंधी स्वीकारली तर इस्रायलदेखील शस्त्रसंधी स्वीकारेल अशी अपेक्षा अमेरिकेनी व्यक्त केली आहे.
  • मेक्सिकोतील निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत क्लॉडिया शिनबॉम पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.
  • सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत.
  • CSDS नुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांचा वाटा 40 टक्के असू शकतो. या सर्वेक्षणात काँग्रेसची मते 23 टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार आणि आशय

  1. तिहार तुरुंगात केजरीवालांचा छळ होतोय, कोठडीत साधा कूलरही नाही' - आतिशी मार्लेना

    तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांना जी कोठडी देण्यात आली आहे त्यात साधा कूलरही नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

    दिल्ली सरकारच्या मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी केंद्रातील भाजप सरकार अरविंद केजरीवाल यांचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

    सोमवारी(3 जून) पत्रकार परिषदेत आतिशी म्हणाल्या की, “अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केलं, ते तिहार तुरुंगात गेले.

    दिल्लीतील तापमान 48-50 अंशांवर पोहोचत असताना त्यांना अशा एका कोठडीत ठेवण्यात आलं आहे, जिथे कूलरचीही सुविधा उपलब्ध नाही."

    मार्लेना म्हणाल्या की, “तिहारमध्ये कुख्यात गुन्हेगारांनाही कूलर दिले जातात. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असूनही त्यांना कूलर देण्यात आलेला नाही.

    रविवारी 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण केलं.

    दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 10 मे रोजी जामीन मंजूर केला होता.

    अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, "निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांना काही दिवस जामिनावर सोडण्यात येत आहे. मतदान संपल्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करावे लागेल."

  2. कोल्हापूरात भरधाव चारचाकी गाडीने 3 दुचाकींना उडवले, अपघातात 3 जण ठार, 6 जखमी

    कोल्हापूर शहरातल्या सायबर चौक या ठिकाणी भरधाव चारचाकी वाहनाने तीन ते चार दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना घडली आहे, ज्यामध्ये चार चालकासह दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू तर 6 जण जखमी झाले आहेत.

    कारचालक हे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू असल्याचे समोर आले आहे. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

    या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हीडिओही समोर आला आहे.

    कोल्हापुरातील सायबर चौकात कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

    एका चार चाकी गाडीने भरधाव वेगात येत 3 दुचाकी वरील 7 जणांना उडवले असून यामध्ये 3 जण ठार झाले आहेत तर अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

    या अपघातात कार चालवणारे आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. वसंत चव्हाण (वय 74 रा. वैभव हाउसिंग सोसायटी उजळाईवाडी) यांचा उपचार सुरू असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला, तर हर्षल सचिन पाटील वय 16 आणि प्रदीप पाटील वय 24 रा. दोघेही दौलतनगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    या अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

  3. देशाच्या भवितव्याला कलाटणी देणारा निकाल कोणाच्या बाजूने?

  4. काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार

    भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले आहेत.

    भारतीय लष्कराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, "गुप्तचर विभागाकडून दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री संयुक्त कारवाई सुरू केली."

    जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, “पुलवामाच्या निहामा भागात दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

    मारले गेलेल्या दहशतवाद्यांची आणि त्यांच्या गटाची माहिती गोळा केली जात आहे." लष्कराने सांगितले की, परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू आहे.

  5. मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

    दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी(४ जून) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

    सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या यादीनुसार, सिसोदिया यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

    दिल्ली उच्च न्यायालयाने 21 मे रोजी सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात सहभागी असल्याबद्दल सीबीआयने गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला सिसोदिया यांना अटक केली होती.

    सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे, नंतर ईडीने 9 मार्च रोजी त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली.

    या दोन्ही प्रकरणात सिसोदिया सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ३० एप्रिल रोजी सिसोदिया यांचा जामीन अर्ज ट्रायल कोर्टाने फेटाळला होता.

    मात्र, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते.

    सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला विचारले होते की, 'सरकारी साक्षीदार झालेल्या सहआरोपींच्या वक्तव्याव्यतिरिक्त सिसोदिया यांच्या विरोधात अन्य काही पुरावे आहेत का?'

    प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) आरोप दाखल करण्यासाठी अनेक अटी पूर्ण कराव्या लागतील, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

  6. आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी इंजिनिअर निशांत अग्रवालला जन्मठेप

    पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ब्राह्मोस एरोस्पेसचा इंजिनिअर निशांत अग्रवाल याला नागपूरच्या जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

    निशांत अग्रवालला 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही देण्यात आली आहे. यासोबतच न्यायालयाने त्याला तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

    पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीश एमव्ही देशपांडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, "अग्रवाल आयडी कायद्याच्या कलम 66 (एफ), सीपीसीच्या कलम 235 आणि अधिकृत गुप्तता कायद्याच्या (ओएसए) विविध कलमांतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी दोषी आढळला आहे."

    विशेष सरकारी वकील ज्योती वजानी म्हणाल्या, "न्यायालयाने निशांत अग्रवालला जन्मठेपेसह 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे."

    निशांत अग्रवाल हा नागपूरमधील ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संशोधन शाखेत कार्यरत होता. 2018 मध्ये त्याला मिलिटरी इंटेलिजन्स आणि उत्तर प्रदेश एटीएस (दहशतवादविरोधी पथक) यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती.

  7. न्यूज क्लिक प्रकरण: अमेरिकेकडून दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्याची मागणी

    न्यूज क्लिक प्रकरणात, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (आरएसएफ) आणि '‘गुएर्निका 37 चेंबर्स’(Guernica 37 Chambers) या संस्थांनी, सुमारे 40 पत्रकारांच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चार उच्च अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.

    भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाच्या एक दिवस आधी, आरएसएफ आणि 'गुएर्निका 37 चेंबर्स' या मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कायद्यातील तज्ज्ञ संघटनांनी हे निर्बंध घालण्याची शिफारस अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरी यांना केली आहे.

    आरएसएफच्या निवेदनानुसार, 'दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे हे चार उच्च अधिकारी भारतातील पत्रकारांवर झालेल्या कारवाईसाठी जबाबदार आहेत.

    हे काउंटर टेररिझम सेल गृह मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली आहे आणि सरकारवर टीका करणाऱ्या लोकांना धमकावण्यासाठी त्याचा वापर केला जातो.'

    गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली स्पेशल सेलने न्यूजक्लिक या वेबसाईटसाठी काम करणाऱ्या सुमारे 46 पत्रकार, सहकारी आणि माजी कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले होते. आरएसएफच्या म्हणण्यानुसार, 'त्या काळात 480 इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली.'

  8. मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 10 व्या मजल्यावरून घेतली उडी

    मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 27 वर्षीय लिपी रस्तोगी हिनं आज (3 जून) पहाटे चार वाजता मंत्रालयाजवळील सुनिती या सरकारी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

    यानंतर तिला तत्काळ जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.

    लिपी रस्तोगी आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची मुलगी आहे. विकास रस्तोगी राज्याच्या शिक्षण विभागाचे सचिव आहेत तर राधिका रस्तोगी चलन विभागाच्या सचिव आहेत.

    लिपी रस्तोगी हरियाणामध्ये वकिलीचं शिक्षण घेत होत्या. अभ्यासातील कामगिरी समाधानकारक नसल्यानं तिनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

    आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये असं तिनं सुसाईड नोटमध्ये म्हटल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

  9. भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते जनतेचं मत नसेल - दिग्विजय सिंह

    काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी भाजपच्या विजयाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेला बोलताना दिग्विजय सिंह यांनी भाजपबद्दल सांगितलं की, "जर जनतेने मतदान केलं असेल, तर त्यांना बहुमत मिळत नाही."

    काँग्रेस 295 जागा जिंकेल, असंही दिग्विजय सिंह म्हणाले.

    एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले की, "जर भाजपने 300चा आकडा पार केला तर ते जनतेचं मत नसेल तर ते ईव्हीएमचं मत आहे, असं समजावं."

    1 जूनच्या संध्याकाळी बहुतेक टीव्ही चॅनेल्सच्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  10. येत्या चार-पाच दिवसांमध्ये दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार - हवामान विभाग

    नैऋत्य मोसमी वारे येत्या चार पाच दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 3 जूनला मान्सून आणखी पुढे सरकला आहे.

    कर्नाटक, रायलसीमा अणि तेलंगणा तसंच बंगालच्या उपसागरात मान्सूननं आगेकूच केली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत मोसमी वारे कर्नाटकचा उर्वरीत भाग, गोवा, दक्षिण महाराष्ट्र तसंच आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडचा काही भाग तसंच दक्षिण ओडिसाचा भाग व्यापण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

    गेले दोन दिवस केरळ आणि कर्नाटकच्या भागांत पावसाच्या सरी बरसत असून, सोमवारीही महाराष्ट्राच्या काही भागांत पूर्वमोसमी सरी बरसल्या. चार जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड आणि विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत काही भागांत वादळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

    तर उत्तर कोकणात, विशेषतः ठाण्यात उष्ण हवामान राहील. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. पावसाची चाहूल लागत असली, तरी महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत उष्णता कायम आहे.

    यवतमाळमध्ये येथे राज्यात सर्वाधिक 45°C कमाल तापमानाची नोंद झाली. तर धाराशिव इथे 22.2°C हे राज्यात सर्वात कमी किमान तापमान होते दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता थोडी कमी झाली आहे. मात्र अजूनही इथे पारा तुलनेनं वर आहे.

    इथे येत्या दोन दिवसांत वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमेकडून येणाऱ्या वादळी वाऱ्यांच्या प्रभावामुळे धुळीचं वादळ येण्याची शक्यता आहे. चार जूनसाठी पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांत या वादळाचा प्रभाव जाणवू शकतो. या राज्यांत चार जूनसाठी ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

  11. क्लॉडिया शिनबॉम मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष

    मेक्सिकोतील निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत क्लॉडिया शिनबॉम पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.

    मेक्सिकोच्या आधिकृत निवडणूक प्राधिकरणानं प्राथमिक निकालांवरून मेक्सिको सिटीच्या 61 वर्षीय माजी महापौरांनी 58% ते 60% मते मिळवली आहेत.

    यामुळं त्यांनी प्रमुख प्रतिस्पर्धी व्यावसायिक झोचिल गाल्वेझ यांच्याविरोधात जवळपास 30 टक्के अंकांची आघाडी घेतली आहे.

    शिनबॉम 1 ऑक्टोबरला त्यांचे गुरू मावळते राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचं पद स्वीकारतील.

    शिनबॉम यांनी मतदारांना सातत्यानं प्रगतीसाठी काम करत राहण्याचं वचन दिलं होतं. तसंच त्यांनी मतदारांना निराश करणार नसल्याचंही म्हटलं होतं.

    मेक्सिकोच्या झोकालो या मुख्य चौकात त्यांच्या समर्थकांनी सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे.

  12. T20 World Cup : टाय सामना आणि सुपर ओव्हरचा थरार, नामिबियाची ओमानवर मात

    ट्वेन्टी20 विश्वचषकात ग्रुप 'बी'च्या लढतीत नामिबियानं ओमानला सुपर ओव्हरमध्ये हरवलं आहे.

    बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर झालेल्या सामन्यात नामिबियानं ओमानचा डाव 19.4 षटकांत 109 रन्सवर गुंडाळला. पण मग नामिबियालाही 20 षटकांत सहा बाद 109 रन्सच करता आल्या.

    त्यामुळे सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये जेरार्ड इरॅस्मस आणि डेव्हिड वाईजनं 21 धावा कुटल्या, तर ओमानला दहा धावाच करता आल्या.

    या सामन्यात नामबियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज रुबेन ट्रंपलमॅननं पहिल्याच ओव्हरमध्ये विक्रमाची नोंद केली.

    तो ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन विकेट्स काढणारा पहिलाच गोलंदाज ठरला.

    त्याआधी, भारतीय वेळेनुसार रविवारी संध्याकाळी झालेल्या लढतीत यजमान वेस्ट इंडीजनं पापुआ न्यू गिनीवर 5 विकेट्स आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला आणि विजयी सलामी दिली.

  13. भाजप आणि काँग्रेसला किती प्रमाणात मतं मिळणार? CSDS ने जाहीर केला सर्वेक्षण अंदाज

    दिल्लीतल्या सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज अर्थात CSDS-लोकनीतीने आपल्या सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळेल असं म्हटलं आहे.

    CSDS नुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांचा वाटा 40 टक्के असू शकतो. या सर्वेक्षणात काँग्रेसची मते 23 टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे.

    CSDSने निवडणुकीनंतर सुमारे 20 हजार लोकांच्या घरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण कसं करण्यात आलं, याचा संपूर्ण तपशील त्यांनी जाहीर केला आहे.

    CSDSने आपल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकतं.

    CSDS नुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 37.4 टक्के आणि काँग्रेसची 19.5 टक्के होती.

    2019 च्या तुलनेत काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या मतांची टक्केवारी 7.3 वरून 12 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे सर्वेक्षणात म्हटलं आहे.

    पण भाजपच्या मित्रपक्षांची मतांची टक्केवारी 2024 मध्ये 7.5 वरून 6 टक्क्यांवर आली आहे.

  14. द.आफ्रिकेत 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच या पक्षाने बहुमत गमावलं, तरीही सत्ता स्थापन करणार?

    दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाला 30 वर्षानंतर पहिल्यांदाच बहुमत मिळालं नाहीये.

    1994मध्ये आफ्रिकेत वर्णभेद संपल्यानंतर ANCने पहिल्यांदाच बहुमत गमावलं आहे.

    आपल्या पक्षाला यावेळी आव्हानात्मक निवडणूक निकालाचा सामना करावा लागला असल्याचं दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी कबूल केलं आहे.

    एकेकाळी नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं होतं. पण बुधवारी (29 मे) जाहीर झालेल्या या देशाच्या निवडणूक निकालात ANCला 400 पैकी केवळ 159 जागा जिंकता आल्या.

    दरम्यान रामाफोसा यांनी मात्र हा लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

    ANC पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी, त्यांची विरोधी पक्ष डेमॉक्रेटिक अलायन्स (DA) यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे. कदाचित ANC पक्ष DA च्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत राहू शकतो.

    पण सध्या ANC च्या काही धोरणांमुळे या आघाडीतल्या चर्चेत जास्त मतभेद असल्याचं सांगण्यात येत आहे.

  15. एक्झिट पोलने भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवल्याने शेअर बाजार तेजीत

    सोमवारी 3 जून रोजी सकाळी शेअर बाजाराची मोठ्या तेजीत सुरुवात झाली आहे.

    सेन्सेक्स जवळपास दोन हजार अंकांच्या वाढीसह उघडला.

    तर निफ्टी प्री-ओपनिंगमध्ये सुमारे एक हजार अंकांच्या वाढीसह उघडला.

    एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारातील ही वाढ दिसून येत आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलने नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

    पण, विरोधी पक्षांनी हे एक्झिट पोल चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. तर INDIA आघाडी 295 लोकसभा जागा जिंकेल असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

  16. अमूलचे दूध महागले, काय आहेत नवीन दर?

    गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर आज 3 जूनपासून लागू होतील.

    नव्या किमतींनुसार प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अर्धा लिटर दुधावर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे.

    मूळ खर्चात वाढ झाल्याने आम्ही आमच्या दुधाच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे

    PTIने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने म्हटले आहे की, फेब्रुवारी 2023 पासून दुधाचे दर वाढवले ​​गेले नव्हते.

    ही वाढ खाद्यपदार्थांशी संबंधित सरासरी महागाईपेक्षा कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदान झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

  17. इस्रायल - हमास यांच्यातील युद्धविरामाबाबत अमेरिकेने काय म्हटलं?

    हमासने सहमती दर्शवल्यास इस्रायल युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य करेल, अशी आशा अमेरिकन सरकारने व्यक्त केली आहे.

    जर हा करार झाला, तर त्याअंतर्गत गाझामध्ये सहा आठवड्यांसाठी युद्धविराम लागू केला जाईल.

    अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

    गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी यासंदर्भात एक योजना मांडली होती.

    या योजनेंतर्गत युद्ध कायमस्वरूपी संपण्यापूर्वी मानवतावादी मदत देण्याबरोबरच ओलिसांची देवाणघेवाण केली जाईल, असेही सांगण्यात आले.

    पण इस्रायल सरकारच्या काही नेत्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.

    गेल्या आठवड्यात इस्रायलने राफामधील छावण्यांवर हल्ला केला. त्यामुळे पॅलेस्टिनी लोकांचा जीव गेला. तसंच अनेकांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले होते.

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्याला दुःखद घटना म्हटले आहे. या हल्ल्यात 45 जणांचा मृत्यू झाला होता.

    या हल्ल्यानंतर इस्रायलला जगातील अनेक देशांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.

  18. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर तुमचे स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत.

    त्याव्यतिरिक्त इतर घडामोडीदेखील देशात होताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल-हमास संघर्ष आणि युक्रेन-रशिया संघर्ष सुरू आहे.

    या सर्व घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

    2 जूनच्या बातम्यांसाठी बीबीसी मराठीच्या या पेजला भेट द्यावी.