महाराष्ट्रात भयंकर उष्णता, माथेरानमध्येही 38 अंश तापमान

29 एप्रिलच्या चालू घडामोडी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या आणि अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

थोडक्यात

  • इस्रायलच्या बॉम्बस्फोटामुळे रफामध्ये 30 जणांचा मृत्यू, हमासचा दावा
  • छत्तीसगढमध्ये झालेल्या अपघातात 10 जण ठार, 22 जण जखमी
  • युक्रेनच्या सेनाप्रमुखांनी मान्य केले आहे की युद्धात त्यांची स्थिती अतिशय नाजूक आहे.
  • गाझात मदत करण्याबाबत फेरविचार करणार असल्याचे वर्ल्ड किचन सेंटर या मानवतावादी संघटनेनी म्हटले आहे.
  • कर्नाटकमधील चामराजनगर या ठिकाणचे भाजप खासदार यांचं आज सकाळी बंगळुरूमध्ये निधन झालं.

लाईव्ह कव्हरेज

नामदेव काटकर आणि आशय येडगे

  1. मी जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही - मोदी

    महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा धर्मावर आधारित दहशतवाद, संपत्तीचं वाटप, माओवाद, दहशतवाद आणि पाकिस्तानच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

    पुण्यातील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, "पुणे ही महात्मा फुलेंची भूमी आहे. पुणे जेवढं प्राचीन आहे तेवढं ते आधुनिक शहर आहे. पुण्यात प्रत्येक क्षेत्रातील उत्तम लोक उपलब्ध आहेत. म्हणून तर म्हणतात 'पुणे तिथे काय उणे?' काँग्रेसने सुमारे 60 वर्षे राज्य केलं पण या साठ वर्षांमध्ये देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे मूलभूत सोयीसुविधा नव्हत्या. आम्हाला फक्त दहा वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली.

    या दहा वर्षांमध्ये मूलभूत सोयीसुविधा तर आम्ही दिल्याचं पण प्रत्येक वर्गातील लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. चांगले रस्ते आणि आधुनिक पायाभूत सोयीसुविधा बघून प्रत्येकाचं मन प्रसन्न होतं. तुम्ही पुणे मेट्रो बघा, पुणे विमानतळाचे नवीन रूप बघा, पालखी मार्ग बघा, वंदे भारत ट्रेन बघा ही सगळे आधुनिक होऊ पाहणाऱ्या भारताचे प्रतीक आहेत.

    "पुणेकरांनी लिहून घ्या ही मोदींची गॅरंटी आहे. तो दिवसही जवळ आहे जेंव्हा तुम्ही देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करू शकाल. काँग्रेसने दहा वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात पायाभूत सोयीसुविधांवर जेवढा खर्च केला तेवढा आम्ही एका वर्षात करतो. उद्या वर्तमानपत्रांमध्ये हे छापलं जाणार नाही. ते कुणालातरी फोन करून विचारतील की काय छापायचं आहे?

    "भारत आता तरुणांवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून पुढे मार्गक्रमण करतो आहे. फक्त दहा वर्षांमध्ये भारताच्या तरुणांनी सव्वा लाख स्टार्टअप बनवले आहेत. आम्ही जे बदल आणले आहेत त्याचे परिणाम मॅपिंगमध्ये दिसून येतोय. आम्ही इंग्रजांचे कायदे उखडून फेकून दिले."

    नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, facebook

    शरद पवारांचं नाव न घेता, त्यांच्यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "45 वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने राजकीय अस्थिरतेचा हा खेळ सुरु केला आणि तेंव्हापासून महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आहे. यामुळे महाराष्ट्रातले अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.

    "2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा अपमान केला. भारताला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचवलं पाहिजे. देशात एक मजबूत आणि स्थिर सरकार दिलं पाहिजे. काँग्रेसच्या राजकुमाराला या देशाला लुटायचं आहे."

    मोदी म्हणाले, "संविधान सभेने अनेक महिने चर्चा करून हा निर्णय घेतला की भारतात कधीही धर्मावर आधारित आरक्षण दिलं जाणार नाही. पण या काँग्रेसने व्होट बँकेसाठी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गातील जातींमध्ये मुस्लिमांचा समावेश केला. या देशातला दलित आरक्षण सोडून मुसलमानांना देईल का? आदिवासी आरक्षण सोडून मुसलमानांना देईल का? त्यांनी कर्नाटक मॉडेल तयार केलं आहे.

    "सुप्रीम कोर्टाने त्यांना नकार दिला की धर्मावर आधारित आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. कर्नाटकात एका रात्रीत एक फतवा काढून मुसलमानांना ओबीसी बनवलं गेलं आणि सकाळी ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणावर डाका टाकून मुसलमान अर्ध्याहून अधिक आरक्षण घेऊन गेले.

    "इंडी आघाडीने कान उघडून ऐकावं की 'मोदी अभी जिंदा है,' जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ देणार नाही. आणि ज्यांची तशी इच्छा असेल त्यांना हा देश राजकीय नकाशावरून कायमचं नष्ट करून टाकेल. काँग्रेसची आणखीन एक ओळख आहे की ते दहशतवाद्यांना मोकळीक द्यायचे."

  2. महाराष्ट्रात भयंकर उष्णता, माथेरानमध्येही 38 अंश तापमान

    उष्णता

    फोटो स्रोत, Getty Images

    अख्खा महाराष्ट्र सध्या उष्णतेमुळे पोळून निघतो आहे.

    29 एप्रिलला अनेक ठिकाणी पारा 40 अंशांवर गेला. मालेगावमध्ये राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तिथेे 44 अंश तर जळगावमध्ये 43 अंश तापमान होतं.

    उत्तर कोकण आणि मुंबई परिसरातही पारा वर चढला आहे.

    थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये सोमवारी 38.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

    मुंबईत सांताक्रुझ वेधशाळेत 39 अंश सेल्सियस तर ठाणे-बेेलापूर औद्योगिक क्षेेत्रात पारा 42 अंशांवर गेला.

  3. इंदूरमध्येही 'सुरत पॅटर्न'? काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे

    कैलाश विजयवर्गीय

    फोटो स्रोत, @KailashOnline

    मध्य प्रदेश भाजपने 'एक्स'वर पोस्ट शेअर करत इंदूरच्या काँग्रेस उमेदवाराने त्यांचा अर्ज मागे घेतल्याची माहिती दिलीय. इंदूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या अक्षय कांती बम यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे.

    13 मे रोजी इंदूरमध्ये मतदान होणार आहे. इंदूरमध्ये विविध पक्ष आणि अपक्षांसह एकूण 23 उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (29 एप्रिल) शेवटचा दिवस आहे.

    मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी अक्षय कांती बम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे ट्विट केले आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी अक्षय कांती यांच्यासोबत कारमध्ये काढलेला एक सेल्फी ट्विट केला आहे.

    त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री जेपी नड्डा, मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष श्री व्हीडी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या भाजपमध्ये इंदूरमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार श्री अक्षय कांती बम यांचे स्वागत आहे."

    मुख्यमंत्री मोहन यादव यांनीदेखील यासंदर्भात ट्विट करून अक्षय कांती बम यांचं स्वागत केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    मुख्यमंत्री मोहन यादव यांनीदेखील यासंदर्भात ट्विट करून अक्षय कांती बम यांचं स्वागत केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

    माध्यमांमधील वृत्तांनुसार, काँग्रेस उमेदवाराचे नाव मागे घेतल्यानंतर भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांचा मार्ग सुकर झाला आहे. खजुराहोनंतर इंदूर ही दुसरी जागा असेल जिथे इंडिया आघाडीचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसेल.

    खजुराहोची जागा इंडिया आघाडीच्या जागावाटपात समाजवादी पक्षाला देण्यात आली होती, परंतु त्यांचे उमेदवार मीरा यादव यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.

    गेल्या आठवड्यात गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल निवडणूक होण्यापूर्वीच विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाला आणि उर्वरित अपक्ष उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आले.

  4. इस्रायलच्या बॉम्बस्फोटामुळे रफामध्ये 30 जणांचा मृत्यू, हमासचा दावा

    रफा शहरातील शरणार्थी कॅम्प

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, रफा शहरातील शरणार्थी कॅम्प

    हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं दावा केला आहे की, इस्त्रायलच्या बॉम्बस्फोटात दक्षिण गाझामधील शहर रफामध्ये कमीत कमी 30 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

    रफामध्ये हल्ला करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा इस्रायलकडून सातत्यानं केला जात आहे. गाझाच्या रफा शहरात 10 लाखांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

    हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबरपासून इस्रायलच्या हल्ल्यात 34 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

    गाझामध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी राजनैतिक पावले उचलली जात आहेत. शांतता चर्चेसाठी हमासचे शिष्टमंडळ कैरोमध्ये उपस्थित आहे.

    हमासच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं की, इस्रायलच्या युद्धविराम आणि ओलीस लोकांच्या सुटकेच्या ताज्या प्रस्तावावर त्यांना काही 'आक्षेप' नाहीये. मात्र या विषयावर चर्चा होईल असे अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

    अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन सौदी अरेबियात असून ते हा करार अंमलात येण्यासाठीच्या प्रयत्नांबाबत बोलणार आहेत.

  5. छत्तीसगढ: भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी

    छत्तीसड अपघात

    फोटो स्रोत, alok putul

    छत्तीसगढमधील बेमेतरा येथे झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

    या अपघातात 22 जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

    बेमेतराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, "बेमेतरा येथील पाथरा गावातील जवळपास 30 लोक एका पिकअपमधून एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतत होते. रात्री उशिरा काठीया गावाजवळ त्यांचे पिकअप वाहन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकले.

    “ही धडक इतकी भीषण होती की यात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 मुलांचाही समावेश आहे. याशिवाय 22 जण गंभीर जखमी झाले आहेत.”

    या अपघातात जखमी झालेल्या लोकांना स्थानिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर चार गंभीर लोकांना रायपूरच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

  6. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची 2 मुलांसह आत्महत्या

    अश्विनी

    फोटो स्रोत, NASHIK POLICE

    फोटो कॅप्शन, अश्विनी

    दिंडोरी तालुक्यातील खतवड गावातील अश्विनी मुळाणे यांनी आपल्या दोन लहानग्यांसह शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत 3 जणांना अटक केली आहे.

    चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण गावातील अश्विनी यांचा विवाह दिंडोरी तालुक्यातील खतवड गावसाज येथील रहिवासी अर्जुन सुदाम मुळाणे यांच्याबरोबर 16 मे 2012 रोजी झाला होता.

    लग्नानंतर तीन वर्षांनी माहेरून पैसे आणण्यासाठी आश्विनीवर सासरच्यांनी दबाव आणला. याबाबत तिने माहेरच्यांनाही माहिती दिली. मात्र त्रास सुरूच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूल केले मात्र मुलीला त्रास देऊ नका, असे सांगितले.

    सन 2018 मध्ये अश्विनीला सासू, नवरा व दीर यांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यामुळे अश्विनीच्या वडिलांनी 5 लाख रुपये रोख सासरच्यांना दिले. काही दिवस सारे काही ठीक चालले असताना पुन्हा पैशांची मागणी होऊ लागल्याने तिच्या वडिलांनी तीन लाख रुपये दिले.

    5 ऐवजी तीनच लाख दिल्याने पुन्हा त्रास सुरू झाला. या त्रासाला कंटाळून अश्विनीने शुक्रवारी 26 एप्रिल रोजी नऊ वर्षीय सिद्धेश व सहा वर्षीय विराज या मुलांसमवेत घराच्या शेततळ्यात उडी घेतली.

    अश्विनी यांचे वडील चंद्रकांत नारायण पूरकर यांच्या फिर्यादीनंतर पती अर्जुन सुदाम मुळाणे, सासू हिराबाई सुदाम मुळाणे, दीर प्रमोद सुदाम मुळाणे या तिघांविरोधात पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.

    या तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 306,498, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  7. वर्ल्ड सेंट्रल किचन गाझामध्ये पुन्हा अन्न पोहचवणार

    मानवतावादी संस्था वर्ल्ड सेंट्रल किचन गाझामध्ये अन्न वितरण पुन्हा सुरू करणार आहे.

    महिनाभरापूर्वी वर्ल्ड सेंट्रल किचनचे सात कर्मचारी इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात ठार झाले होते.

    या घटनेनंतर गाझामध्ये मदत देण्याचं काम थांबवलं होतं. " मदत पुरवणं सुरूच ठेवलं पाहिजे, असं आम्ही ठरवलं आहे,” असं वर्ल्ड सेंट्रल किचननं म्हटलंय.

    वर्ल्ड सेंट्रल किचन, गाझा, मदतकार्य

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    संस्थेनं एक निवेदन जारी करत म्हटलंय की, "मदत देण्यासाठी 276 ट्रक तयार केले आहेत ज्यात 80 लाख खाद्यपदार्थांची पाकिटे आहेत. ते रफाह क्रॉसिंगमधून प्रवेश करतील.”

    वर्ल्ड सेंट्रल किचनच्या सीईओ एरिन गोर म्हणाल्या, “गाझामधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आम्ही पूर्ण उर्जेने आमचे काम पुन्हा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांना जेवण देण्याचा आमचा प्रयत्न असेल."

    वर्ल्ड सेंट्रल किचन ही एक अमेरिकन संस्था आहे जिचं उद्दिष्ट राष्ट्रीय आपत्ती आणि मानवतावादी संकटांमुळे पीडित झालेल्या लोकांना अन्न पुरवणं हे आहे.

  8. ज्याच्या हाती असते माहिती, तोच युद्धात वरचढ ठरतो; असं म्हणत चीनची 'या' युनिटची स्थापना

  9. 'रशियाविरोधातील युद्धात युक्रेनची स्थिती नाजूक', युक्रेन सेनाप्रमुखांनी केलं मान्य

    ओलेक्सेंडर सीरिस्की

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    फोटो कॅप्शन, ओलेक्सेंडर सीरिस्की

    युक्रेनच्या आघाडीवर परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याची कबुली लष्कर प्रमुखांनी दिली आहे.

    युक्रेनच्या सैन्याला पूर्व आघाडीवर माघार घ्यावी लागली आहे, असं जनरल ओलेक्सेंडर सीरिस्की यांनी म्हटलं आहे.

    युक्रेनला अमेरिकेकडून लष्करी मदत मिळण्यापूर्वीच रशिया परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे.

    "परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. युक्रेनच्या सैन्याला पूर्व दोनेत्स्क परिसरात माघार घ्यावी लागली आहे,” असं सीरिस्की यांनी टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं रविवारी (28 एप्रिल) दावा केला की, रशियन सैन्यानं पूर्व दोनेत्स्क भागातील ओचेरेताइने जवळील वस्ती ताब्यात घेतली आहे.

    युक्रेनला 61 अब्ज डॉलरची लष्करी मदत देण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात अमेरिकन संसदेत मंजूर करण्यात आला.

  10. नमस्कार

    देशात आणि राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, भाषण आणि प्रचार सारं काही घडत आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास युद्ध सुरू आहे.

    इतरही घडामोडी सातत्याने घडताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

    धन्यवाद.