रफाच्या रस्त्यांवर उतरले इस्रायली रणगाडे, शहरात तुफान गोळीबार, 21 जणांचा मृत्यू
मंगळवारी (28 मे रोजी) इस्रायली सैन्यानं रफाच्या अल-अवदा चौकाजवळचा परिसर ताब्यात घेतला. त्यानंतर शहरात तोफा आणि स्फोटांचे आवाज येत आहेत. या स्फोटात 21 जण मारले गेले असल्याची माहिती रॉयटर्स आणि एएफपी या वृत्तसंस्थांनी पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिली आहे.
थोडक्यात
- सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्य़ात आलेला अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका घेण्यास नकार दिला आहे.
- सांगली जिल्ह्यात तासगाव - मणेराजुरी मार्गावर चिंचणीजवळ मध्यरात्री अल्टो कार ताकारी कालव्यात कोसळून झाला भीषण अपघात झाला.
- समलैंगिक पुरुषांप्रती अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी माफी मागितली आहे.
- राफामध्ये इस्रायलने काही मोठा हल्ला केलेला नाही असं अमेरिकेचं म्हणणं आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हे स्पष्ट केलं आहे.
लाईव्ह कव्हरेज
रफाच्या रस्त्यांवर उतरले इस्रायली रणगाडे, शहरात तुफान गोळीबार, 21 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, REUTERS/HATEM KHALED
गाझाच्या दक्षिण भागात वसलेल्या रफा शहरामध्ये पॅलेस्टिनी विस्थापितांच्या एका शरणार्थी शिबिरात झालेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले आहेत.
मंगळवारी (28 मे रोजी) इस्रायली सैन्यानं रफाच्या अल-अवदा चौकाजवळचा परिसर ताब्यात घेतला. त्यानंतर शहरात तोफा आणि स्फोटांचे आवाज येत आहेत. या स्फोटात 21 जण मारले गेले असल्याची माहिती रॉयटर्स आणि एएफपी या वृत्तसंस्थांनी पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिली आहे. तसंच या हल्ल्यात 64 नागरिक जखमी झाल्याचा हमास प्रशासित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे.
'वफा' या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार पॅलेस्टिनी प्रशासनाचे प्रवक्ते नाबिल अबू रुदेइनेह यांनी रफामध्ये झालेल्या हल्ल्याचं वर्णन 'नरसंहार' असं केलं आहे. दरम्यान इस्रायली सैन्यानं रफा शहरातील एका महत्त्वाची टेकडी ताब्यात घेतली आहे.
व्यूहरचनेच्या दृष्टीकोनातून ही जागा महत्त्वाची मानली जाते. जवळच असलेली इजिप्त-गाझा सीमा इथून व्यवस्थित दिसू शकते.
इस्रायली सैन्यानं काय म्हटलं?
सोशल मीडियावर येत असलेल्या फुटेजमध्ये या स्फोटानंतरचं घटनास्थळाचं दृश्य दिसतं आहे. या फुटेजचं विश्लेषण केल्यानंतर बीबीसीच्या लक्षात आलं आहे की हे फुटेज आजचंच आहे.
मात्र हा स्फोट नेमका कुठे झाला आहे याची खात्री आम्ही देत नाही. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत आणि आम्हाला जसजशी अधिक माहिती मिळेल तसतशी आम्ही ती तुमच्यापर्यत पोहोचवू. हे शरणार्थी शिबीर जवळच्या शस्त्रांस्त्रांच्या साठ्यावर केलेल्या हवाई हल्ल्याच्या परिघात असल्यानं तर इथे स्फोट झाला नाही ना या शक्यतेचा आम्ही तपास करत आहोत, असं इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, IDF
फोटो कॅप्शन, आयडीएफचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी इस्रायली सैन्याचे प्रवक्ते रीअर अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की आम्ही ज्या दोन बॉम्बचा वापर केला होता, ते आकारानं इतके लहान होते की त्यातून इतका मोठा स्फोट होऊ शकत नाही.
त्यांनी असंही म्हटलं की हमासच्या ज्या दोन वरिष्ठ कमांडरना लक्ष्य करण्यासाठी हा हवाई हल्ला झाला, ते दोघे इस्रायलनं मानवतावादी परिसर म्हणून घोषित केलेल्या भागाच्या बाहेर उपस्थित होते. या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद लवकरच एक आपातकालीन बैठक घेणार आहे.
गाझाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे?
गाझाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की इस्रायलनं विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनींच्या शरणार्थी शिबिराला लक्ष्य करूनच हा हल्ला केला आहे. आपतकालीन सेवेनी सांगितलं की अल मवासी मध्ये काही तंबूंवर चार तोफगोळ्यांनी हल्ला करण्यात आला होता.
अल मवासी या ठिकाणाला इस्रायलनं पॅलेस्टिनी लोकांसाठी सुरक्षित परिसर म्हणून चिन्हांकित केलं होतं. मंगळवारीच इस्रायलचे रणगाडे रफा शहरात पोचले. स्थानिक लोक आणि पत्रकारांनी सांगितलं की इस्रायली सैन्यानं शहराच्या एका मुख्य चौकावर नियंत्रण मिळवलं आहे. या ठिकाणी बॅंक आणि सरकारी कार्यालयं आहेत.

फोटो स्रोत, HAITHAM IMAD/EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
याआधी पहिल्यांदाच इस्रायलचे रणगाडे रफा शहरात पोचले. स्थानिक लोक आणि पत्रकारांनी सांगितलं की इस्रायली सैन्यानं शहराच्या एका मुख्य चौकावर नियंत्रण मिळवलं आहे. या ठिकाणी बॅंक आणि सरकारी कार्यालयं आहेत.
नरेंद्र मोदी बहुमतापासून दूर राहूनही सत्तेत येऊ पाहतील असं कुमार केतकर यांना का वाटतं?
व्हीडिओ कॅप्शन, मोदी हरतील, पण पंतप्रधानपदाच्या हॅटट्रिकचा प्रयत्न करतील - कुमार केतकर यांचं विश्लेषण इस्रायली रणगाड्यांचा रफामधील अल अवदा चौकावर ताबा
इस्रायली रणगाड्यांनी रफामधला अल अवदा चौक ताब्यात घेतला आहे. रफामधल्या स्थानिक पत्रकारांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अल-अवदा रफा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे आणि इथे बँका, सरकारी संस्था आणि दुकानं आहेत. हा चौक पॅलेस्टिनी-इजिप्शियन सीमेपासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर आहे.
इस्रायली सैन्यानं हा परिसर ताब्यात घेतला, तेव्हा मोठ्या प्रमाणात आर्टिलरी शेलिंगही झालं. रफा शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या अमिराती हॉस्पिटलमध्ये काही विस्थापित लोकांनी कुटुंबासह आश्रय घेतला आहे.
त्यांनी सांगितलं की इस्रायली सैनिकांनी एक इमारत ताब्यात घेतली आहे आणि तिच्या छतावरून खाली कुठलीही येजा झाली तर गोळ्या झाडल्या जात आहेत.
हमास प्रशासित आरोग्य मंत्रालयानं माहिती दिली आहे की गेल्या 24 तासात इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान 46 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे आणि 110 जण जखमी झाले आहेत, तर 7 ऑक्टोबर 2023 रोजी हे युद्ध सुरू झाल्यापासून आजवर 36,096 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्यांचंही या मंत्रालयानं म्हटलं आहे. इस्रायली सैन्यानं रफा शहरात आणि उत्तर तसंच मध्य गाझामध्ये लष्करी कारवाई होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, इस्रायली रणगाडे दिल्ली दंगलीप्रकरणी उमर खालिदचा जामीन फेटाळला

फोटो स्रोत, ANI
दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने जेएनयू पीएचडी स्कॉलर आणि विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालिदचा जामीन फेटाळला आहे. खालिदवर 'दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा' आरोप असून, खटला सुरू आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर वाजपेयी यांनी दोन्ही पक्ष ऐकून घेतल्यानंतर 13 मे रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. जामीन रद्द करण्याच्या आदेशाची प्रत अद्याप आलेली नाही. त्यात जामीन रद्द करण्याची कारणे नमूद केली जातात.
उमर खालिदवर दहशतवाद प्रतिबंधक कायदा म्हणजेच युएपीए अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. यापूर्वी कड़कडूमा न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने उमर खालिदचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
फेब्रुवारीमध्ये उमर खालिदने आपण ट्रायल कोर्टात जाणार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला होता. दिल्ली कनिष्ठ न्यायालयाच्या मंगळवारच्या निर्णयाबरोबरच ट्रायल कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची ही दुसरी वेळ आहे.
मान्सून कुठे पोहोचला? महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत येणार?
केरळ आणि ईशान्य भारतात पुढच्या पाच दिवसांत मान्सून दाखल होण्यासाठी पोषक परिस्थिती आहेे, असं भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. IMDनं सोमवारी 27 मे रोजी दुसऱ्या टप्प्यातला लाँग टर्म अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा देशभरात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केवळ उत्तरेकडील जम्मू-काश्मिर, लडाख, हिमाचल, उत्तराखंडचा काही भाग, ईशान्येकडील राज्ये पूर्व भारतातील काही भागांत पावसाचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी राहू शकतं.
जूनमध्ये देशभरात सरासरीएवढा पाऊस अपेक्षित आहे. पण भारतीय द्वीपकल्प, म्हणजेे दक्षिण भारताच्या काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

फोटो स्रोत, IMD
दरम्यान, अरबी समुद्रात मान्सूनची शाखा थोडी पुढे सरकली आहे. केरळमध्ये येत्या तीन-चार दिवसांत मान्सून दाखल होण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहील.
जून महिन्यात देशात अनेक ठिकाणी तापमानही सरासरीपेक्षा थोडं अधिक असेल. मध्य, उत्तर आणि वायव्य भारतात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे पंजाबचा काही भाग, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहारमध्ये उष्णतेची लाट कायम राहील.
30 मे नंतर हळूहळू वायव्य आणि मध्य भारताला उष्णतेपासून दिलासा मिळेल.

फोटो स्रोत, IMD
महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये पुढच्या काही दिवसांत तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
राज्यात आज ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 47.1°C कमाल तापमानाची नोंद झाली. तर धाराशिव येथे 22.9°C हे राज्यात सर्वात कमी किमान तापमान होते.
पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनामुळे हजारो लोक बेपत्ता
व्हीडिओ कॅप्शन, पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनामुळे हजारो लोक बेपत्ता, अख्खं गाव ढिगाऱ्याखाली 
जंगलांमधून जाणाऱ्या वाटेवर हे हत्ती लोकांकडून अन्न 'वसूल करतात' तेव्हा...
400 वर्षांपूर्वी नहरींच्या जाळ्यातून मलिक अंबरने असा सोडवला होता औरंगाबादचा पाणीप्रश्न

फोटो स्रोत, Getty Images
नहर ए अंबरी हा मोठा ऐतिहासिक वारसा देणारा मलिक अंबर नेमका कोण होता?बीबीसीने 'इनकार्नेशन्स'नावाची मालिका केली होती. त्यात इतिहासकार सुनील खिलनानी यांनी मलिक अंबरचे सविस्तर वर्णन केलं आहे.
मलिक अंबरचा जन्म सोळाव्या शतकाच्या मध्यात अबिसिनिया म्हणजे आताच्या इथियोपियामध्ये झाला होता. त्यांचं बालपणीचं नाव चापू होतं. आई वडिलांनीच त्याची लहानपणी गुलाम म्हणून विक्री केली असावी अशी माहिती आहे.
पुढं गुलाम म्हणून अनेक वेळा मलिक अंबरची खरेदी विक्री झाली आणि अखेर तो भारतात आला. सौदी अरबमधून एका जहाजाद्वारे त्याला भारतात, महाराष्ट्रातील कोकण भागात पाठवण्यात आलं होतं.
मलिक अंबर भारतात किंवा महाराष्ट्रात आला तेव्हा निजामशाहीचा सरदार चंगेज खान हा त्याचा मालक होता. मलिक अंबरच्या हुशारीमुळे त्याला चंगेज खानकडून आर्थिक व्यवहारांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचबरोबर अभियांत्रिकीमध्येही त्याचं वाखाणण्याजोगं असं कौशल्य होतं.सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 400 वर्षांपूर्वी नहरींच्या जाळ्यातून मलिक अंबरने असा सोडवला होता औरंगाबादचा पाणीप्रश्न
डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत सिंह राम रहीम एका हत्याप्रकरणात निर्दोष
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत सिंह राम रहीमला एका हत्या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवलं आहे.
या प्रकरणात गुरमीतसह चौघांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.
राम रहीम सध्या दोन शिष्यांवरील बलात्काराशी संबंधित प्रकरणात 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. तसेच पत्रकार रामचंद्र छत्रपतिच्या हत्येप्रकरणीही त्याला शिक्षा झाली आहे.
हरियाणाच्या पंचकुलामध्ये एका सीबीआय न्यायालयाने या प्रकरणात राम रहीम आणि इतर चौघांना जन्मठेप सुनावली होती. रंजित सिंह हे डेराचे पूर्वी मॅनेजर होते. 2002मध्ये त्यांची हत्या झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
राजस्थान मधील श्रीगंगानगर येथे 15 ऑगस्ट 1967 रोजी गुरमीत सिगंचा जन्म झाला. 1990 मध्ये गुरमीत सिंग उर्फ गुरमीत राम रहीम इन्सान डेरा सच्चा सौदाचा प्रमुख झाला. डेरा सच्चा सौदा हे पंजाब, हरियाणा भागातील मोठं प्रस्थ आहे. शाह मस्ताना यांनी 1948 मध्ये हा डेरा स्थापन केला. देशभरात सध्या पन्नासहून अधिक आश्रम या डेऱ्यातर्फे सांभाळले जातात. लाखो अनुयायी या डेराशी जोडले गेले आहेत.
डेराचं प्रमुख काम हे सामाजिक कार्य, रक्तदान आणि गरीबांसाठी मदत गोळा करणं असं असलं तरी गुरमीत राम रहीम सिंग डेरा प्रमुख झाल्यावर या डेराला वेगळं वलय प्राप्त झालं. कारण बाबा राम रहीमनं काही चित्रपटांतही प्रमुख भूमिका केली. गुरमीत राम रहीमच्या मुलाचं लग्न काँग्रेस सदस्य हरमिंदर सिंह जस्सी यांच्या मुलीशी झालं आहे. हरमिंदर सिंग हरियाणा विधानसभेच्या गेल्या निवडणुकीच्या वेळी मात्र भारतीय जनता पक्षासोबत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हैसूर दौऱ्यातील हॉटेलचं बिल केंद्र सरकारने भरलं, इम्रान कुरेशी बीबीसीसाठी, बंगळुरूमधून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हैसूरमधील हॉटेलचं बिल 13 महिन्यांनंतर अखेर नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन एजन्सी (एनटीसीए) ने भरलं आहे.
1 जूनपर्यंत हे बिल भरलं नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत हॉटेल रॅडिसन ब्लूने दिले बोते.
प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षं पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर दौरा केला होता, त्यावेळचं हे प्रकरण आहे. तेव्हा नरेंद्र मोदी ज्या हॉटेलात उतरले होते, त्याचं बिल आतापर्यंत भागवलं गेलं नव्हतं.
हा कार्यक्रम एटीसीए आणि केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने आयोजित केला होता. त्याचं बजेट 3 कोटी ठेवण्यात आलं होतं. राज्य सरकारला या कार्यक्रमात केंद्राद्वारे आर्थिक मदत मिळेल असं सांगण्यात आलं होतं.
मात्र एकूण खर्च 6.33 कोटी रुपयांवर गेला. एनटीसीएने 3 कोटी रुपयांचं बिल दिल मात्र बाकी बिल दिलं नाही.

फोटो स्रोत, Photo by PIB/Hemant Joshi / Handout/Anadolu Agency via Getty Images
यानंतर हॉटेलचं बिल भरणं शिल्लक असल्याची माहिती राज्य सरकारने केंद्रीय मंत्रालयाला दिली. एनटीसीएने हॉटेलला थेट 1 कोटी रुपयांचं बिल दिलंही मात्र राज्य सरकारच्या वन विभागाला त्याची माहिती दिली नाही.
कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांद्रे यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, सामान्यतः राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या संबंधित बिलं राज्य सरकार देतं. त्यासाठी आम्ही 80 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. काल सोमवारी हा निर्णय माध्यमांत जाहीर केल्यावर एनटीसीएने तात्काळ हॉटेलचं बिल भरण्यासाठी 2.33 कोटी रुपये दिले आहेत.
कर्नाटकचे मुख्य वनसंरक्षक सुभाष मलखेडे यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, आज किंवा उद्या आम्ही हॉटेलचं बिल भरुन टाकू.
सुरुवातीला हा कार्यक्रम राज्य सरकारचा नाही असं सांगत कर्नाटक सरकारने बिल देण्यास नकार दिला होता. एप्रिल 2023मझ्ये कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे आचारसंहिता लागू होती.
राफामधील हल्ला दुःखद- बेंजामिन नेत्यानाहू

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी राफा शहरात झालेल्या हल्ल्याला दुःखद घटना असं संबोधलं आहे.
इस्रायलने रविवारी राफामधील शरणार्थी छावणीवर हल्ला केला होता.
यात सुमारे 45 लोकांचे प्राण गेले होते.
या हल्ल्यानंतर नेतान्याहू यांच्यावर जगभरातून टीका होत आहे.
नेतान्याहू म्हणाले, राफामध्ये आम्ही 10 लाख लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. नागरिकांचं नुकसान होणार नाही असा आमचा प्रयत्न असतो. पण एक घटना सोमवारी घडली, तिचा तपास आम्ही करत आहोत आणि त्यातून धडा घेऊ.
राहुल गांधी आणि अखिलेश यादव आज वाराणसीमध्ये

फोटो स्रोत, Getty Images
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज मंगळवारी वाराणसीमध्ये इंडिया आघाडीची मोठी रॅली होणार आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव या सभेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. तत्पुर्वी ते दोघेही रुद्रपूरमधील सभेला संबोधित करतील.
या निवडणुकीत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी अनेकवेळा एकत्र प्रचार केला आहे. फुलपूर इथल्या त्यांच्या सभेला मोठी गर्दी जमली होती तेव्हा चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या दोघांनाही भाषण न करता परतावं लागलं होतं.
वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. इथं नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार अजय राय निवडणूक लढत आहेत.
पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा इथं निवडणूक लढवत आहेत. या जागी 1 जून रोजी मतदान होत आहे.
नमस्कार
आज 28 मे आहे. बीबीसी मराठीत आपले स्वागत आहे. देशविदेशात अनेक घडामोडी सुरू आहेत. देशातील सहा टप्प्यांचे मतदान संपले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन-रशिया आणि इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष सुरू आहे. या सर्व घडामोडी तुम्हाला बीबीसीच्या या पेजवर वाचायला मिळतील.
27 मेच्या बातम्या वाचण्यासाठीया पेजला भेट द्यावी.
