You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

'इंडिया' आघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू : राहुल गांधी

लोकसभा निवडणूक 2024 च्या घडामोडींचे अपडेट आणि इतरही बातम्या तुम्हाला या लाईव्ह पेजवरून जाणून घेता येतील.

थोडक्यात

  • सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्य़ात आलेला अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका घेण्यास नकार दिला आहे.
  • सांगली जिल्ह्यात तासगाव - मणेराजुरी मार्गावर चिंचणीजवळ मध्यरात्री अल्टो कार ताकारी कालव्यात कोसळून झाला भीषण अपघात झाला.
  • समलैंगिक पुरुषांप्रती अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी माफी मागितली आहे.
  • राफामध्ये इस्रायलने काही मोठा हल्ला केलेला नाही असं अमेरिकेचं म्हणणं आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हे स्पष्ट केलं आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा कडाका, पारा 52.3 डिग्री सेल्सिअसवर

    राजधानी दिल्लीमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा कडाका पाहायला मिळाला. बुधवारी (29 मे) दिल्लीत पारा 52.3 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला.

    भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी बीबीसीशी बोलताना हे तापमान नोंदवलं गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    आयएमडीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे दिल्लीमध्ये नोंदवलं गेलेलं सर्वोच्च तापमान आहे.

    आयएमडीने म्हटलं की, दुपारी 2.30वाजण्याच्या सुमारास उत्तर-पश्चिम दिल्लीतील मुंगेशपूर इथल्या हवामान केंद्रात 52.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.

    मंगळवारी (28 मे) याच केंद्रावर 49.9डिग्री सेल्सिअ तापमान नोंदवलं गेलं.

    मंगळवारी दिल्लीतली नजफगढ हवामान विभाग केंद्रात 49.8डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.

    दिल्लीमधील दोन हवामान केंद्रांवर दक्षिण दिल्ली आणि आर्या नगरमध्ये मंगळवारी नोंदवलं गेलेलं तापमानही विक्रमी होतं.

    भारताच्या कोणत्याही भागात आतापर्यंत 52.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं नाहीये.

  2. इंडिया आघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू : राहुल गांधी

    इंडिया आघाडीचं सरकार आलं की, देशभरातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे.

    राहुल गांधी पंजाबमधील लुधियानातील सभेत बोलत होते.

    राहुल गांधी यांनी म्हटलं की, “जेव्हा इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. ते अब्जाधीशांचं कर्ज माफ करतात आणि आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू.”

    “आम्ही केवळ एकवेळ कर्ज माफ नाही करणार. आम्ही एक आयोग बनवू ज्याचं नाव असेल ‘किसान कर्जमाफी आयोग.’ जेव्हा शेतकऱ्यांना कर्ज माफीची गरज असेल तेव्हा तो आयोग आम्हाला सांगेल आणि आम्ही तेव्हा गरजेनुसार कर्ज माफ करू. मग ते एकदा होईल किंवा दोनदा होईल.”

    राहुल गांधी यांनी म्हटलं की, “नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे की, शेतकऱ्यांना कायदेशीररित्या किमान हमी भाव देऊ शकत नाही.”

    “निवडणुकीनंतर चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा खात्रीने कायदेशीररित्या पीकाला किमान हमी भाव देऊ.”

  3. बारावीच्या परीक्षेत सारख्याच टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या मायलेकींची गोष्ट

  4. मान्सून केरळच्या वेशीवर, महाराष्ट्रात कधी येणार?

    नैऋत्य मोसमी वारे केरळच्या वेशीवर असून पुढच्या 24 तासात केरळमधील हवामानाची स्थिती मॉन्सून ऑनसेटसाठी पोषक असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

    फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात. केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतो आहे.

    केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो. केरळमध्ये सध्या अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

    केरळमध्ये एरवी साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारणपणे 5 जूनच्या आसपास गोव्यात, 10 जूनच्या आसपास मुंबईत आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अवतरतो. त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे.

    अर्थात, जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीएवढाच पाऊस पडेल असं हवामान विभागाचं भाकीत आहे. दरम्यान, उत्तर भारताला मात्र उन्हाचा तडाखा बसतो आहे.

    पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिसामध्ये अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. मात्र 30 तारखेनंतर इथे राहणा-या लोकांना थोडा दिलासा मिळेल.

    महाराष्ट्राचा विचार केला, तर उत्तर कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

    विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    मुंबई शहर आणि उपनगरांत या काळात आकाश अंशतः ढगाळ राहील. राज्यात बुधवारी ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे ४५.२°C कमाल तापमानाची नोंद झाली. तर जेऊर येथे २२.०°C हे राज्यात सर्वात कमी किमान तापमान होते

  5. कांदा निर्यातबंदी उठवली, पण निर्यातशुल्कावर शेतकरी नाराजच

  6. राजकोट गेम झोनच्या आगीतून अनेक जीव वाचवणारा चहावाला

  7. अरविंद केजरीवालांची जामीन वाढवण्याची याचिका स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

    सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्य़ात आलेला अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका घेण्यास नकार दिला आहे.

    लाईव्ह लॉ संकेतस्थळानुसार, अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. या अतिरिक्त याचिकेचा मूळ याचिकेशी काहीही संबंध नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे.

    केजरीवाल दिल्लीमधील मद्यधोरणासंदर्भात मनी लाँड्रिंग खटल्यात अंतरिम जामीनावर बाहेर आले आहेत. हा जामीन 1 जूनला संपणार आहे.

    21 मार्च रोजी त्यांना अटक झाली होती. 10 मे रोजी ते अंतरिम जामीनावर बाहेर आले होते. त्यांनी आपल्याला प्रचारासाठी जामीन मिळावा अशी विनंती कोर्टाला केली होती.

  8. चरण सिंहांनी इंदिरा गांधींना केली होती अटक, नंतर त्यांच्याच पाठिंब्याने बनवले 23 दिवसांचे सरकार

    28 जुलै 1979...चौधरी चरण सिंह हे देशाचे पाचवे पंतप्रधान झाले. 20 ऑगस्ट 1979 चरण सिंह यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

    23 दिवसांचं सरकार...देशाच्या इतिहासातले ते एकमेव पंतप्रधान होते, ज्यांना पंतप्रधान म्हणून एकदाही संसदेला सामोरं जाण्याची संधी मिळाली नाही.

    पण तरीही त्यांची नोंद केवळ ‘काही दिवसांचे पंतप्रधान’ एवढीच घेतली गेली नाही. त्यांची एकूण राजकीय कारकीर्द प्रदीर्घ होतीच, पण आणीबाणी आणि त्यानंतर देशात घडलेल्या ऐतिहासिक घटनांमधला ते एक महत्त्वाचा दुवा होते.

    हे झालं राजकारणाचं. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी देशातल्या बहुसंख्य, पण उपेक्षित अशा शेतकरी वर्गाला राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचाही प्रयत्न केला. कृषी आधारित अर्थव्यवस्था राबवण्यासाठी संघर्ष केला. आजही त्यांची ओळख शेतकरी नेता अशीच आहे.

    आज चौधरी चरण सिंह यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. वाचा- चरण सिंहांनी इंदिरा गांधींना केली होती अटक, नंतर त्यांच्याच पाठिंब्याने बनवले 23 दिवसांचे सरकार

  9. मोदी हरतील, पण पंतप्रधानपदाच्या हॅटट्रिकचा प्रयत्न करतील - कुमार केतकर यांचं विश्लेषण

  10. अमेरिकाः राफामध्ये इस्रायलची मोहीम काही मोठा हल्ला नाही

    राफामध्ये इस्रायलने काही मोठा हल्ला केलेला नाही असं अमेरिकेचं म्हणणं आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हे स्पष्ट केलं आहे.

    किर्बी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, रविवारी जे हवाई हल्ले झाले, त्यात मुख्यत्वे मुलं, महिला आणि वृद्धांचे प्राण गेले. ही भयानक घटना आहे.

    ते म्हणाले, कोणाही निरपराध्याचे प्राण जाता कामा नयेत.

    किर्बी म्हणाले, आम्हाला आताही वाटतंय की राफामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राऊंड ऑपरेशनची गरज आहे आणि आतापर्यंत मोठ्या स्तरावरचं ऑपरेशन अजून पाहिलेलं नाही.

    अमेरिका या सध्याच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणावरचा हल्ला मानतं की नाही असं विचारल्यावर ते म्हणाले, “इथं राष्ट्राध्यक्ष कोणत्याही प्रकारे परिभाषा बदलण्याचा प्रयत्न करत नाहीयेत किंवा कोणत्याही प्रकारचा शब्दच्छल करत नाहीयेत."

  11. सांगलीच्या चिंचणी येथे कार कालव्यामध्ये पडून सहा जण ठार

    सांगली जिल्ह्यात तासगाव - मणेराजुरी मार्गावर चिंचणीजवळ मध्यरात्री अल्टो कार ताकारी कालव्यात कोसळून झाला भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहाजणांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान झाला अपघात झाला. हा अपघात सकाळी लक्षात आला.

    हे अपघातग्रस्त कुटुंब तासगाव येथील आहे. मृतांमध्ये तीन मुले, एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. राजेंद्र पाटील, राजराम पाटील, सुजाता राजेंद्र पाटील,राजीव विकास पाटील ,प्रियांका खराडे, आणि ध्रुवा पाटील अशी मृतांची नावं आहेत.

    हे कुटुंब कवठेमंकाळ तालुक्यातल्या कोकळे या ठिकाणी वाढदिवसाच्या एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्यानंतर पुन्हा तासगाव या आपल्या घरी परतत असताना हा अपघात घडला आहे.

  12. पोप फ्रान्सिस यांची समलैंगिक व्यक्तींबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल माफी

    समलैंगिक पुरुषांप्रती अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी माफी मागितली आहे.

    व्हॅटिकनतर्फे एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं त्यात, “पोप यांचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. आपल्या शब्दांमुळे ज्या लोकांना त्रास झाला त्यांची पोप माफी मागत आहेत”, असं म्हटलं आहे.

    इटलीमध्ये एक बिशप परिषद झाली होती. त्यात गे लोकांना पाद्री होण्यासाठीचं प्रशिक्षण देण्यात येऊ नये असं पोप कथितरित्या म्हणाले. हे बोलताना त्यांनी ‘फ्रॉशियाजिन’ हा शब्द वापरला. हा शब्द अत्यंत अपमानास्पद आहे.

    हा एक खासगी कार्यक्रम होता मात्र या विधानामुळे त्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या.

    पोप यांच्या विधानावर वाद झाल्यावर कॅथलिक चर्चच्या ‘होली सी’ या प्रशासन मंडळाचे संचालक माटेओ ब्रूनी यांनी एक विधान प्रसारित केले आहे. त्यात ते म्हणतात, “पोप फ्रान्सिस यांना या काळात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची, लेखांची माहिती आहे. या बातम्यांत बंद दरवाजाआड बिशप्सशी झालेल्या चर्चेबद्दल लिहिण्यात आलं आहे.”

    पोप यांच्या कथित टिप्पणीबद्दल सर्वात आधी डागोस्पिया या इटालियन संकेतस्थळांनं लिहिलं त्यानंतर इतर इटालियन वृत्तसंस्थांनी त्याबद्दल लिहिलं.

    पोप यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह होती असं या बातम्यांत म्हटलं आहे, कारण एरव्ही पोप फ्रान्सिस सार्वजनिक क्षेत्रात समलैंगिक व्यक्तिंप्रती सन्मान दर्शवण्याच्या बाजूने बोलायचे.

  13. नमस्कार

    आज 29 मे आहे. बीबीसी मराठीत आपले स्वागत आहे. देशविदेशात अनेक घडामोडी सुरू आहेत. देशातील सहा टप्प्यांचे मतदान संपले आहे.

    आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन-रशिया आणि इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष सुरू आहे. या सर्व घडामोडी तुम्हाला बीबीसीच्या या पेजवर वाचायला मिळतील.

    28 मेच्या बातम्या वाचण्यासाठीया पेजला भेट द्यावी.