न्यूजक्लिकः माफीचे साक्षीदार बनलेल्या अमित चक्रवर्तींना मुक्त करण्याचा दिल्ली हायकोर्टाचा आदेश
दिल्ली हायकोर्टानं न्यूजक्लिकचे एचआरप्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या सुटकेचा आदेश दिला आहे. युएपीए प्रकरणात अमित चक्रवर्ती साक्षीदार बनले होते.
न्यूजक्लिक या न्यूज वेबसाईटवर चीनकडून पैसे घेऊन भारतात चीनच्या समर्थनातील प्रपोगंडा चालवण्याचा आरोप झाल्यानंतर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अमित चक्रवर्ती यांनी यूएपीए प्रकरणातून सुटकेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जस्टिस स्वर्णकांता शर्मा यांच्या पीठानं ही याचिका मंजूर करत अमित चक्रवर्ती यांच्या सुटकेचा आदेश दिला आहे.
अमित चक्रवर्ती यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चीनमधील कंपन्यांकडून विदेशी पैसा घेऊन भारताला नुकसान पोहोचवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
चक्रवर्ती यांच्या वकिलानं ते या प्रकरणात माफीचे साक्षीदार बनल्यानं त्यांच्या सुटकेची मागणी केल होती. तर ईडीनंही त्यांना जामीन मिळण्याबाबत काही आक्षेप नसल्याचं म्हटलं होतं.