You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात, कन्नौजमधून निवडणूक लढणार

आजच्या ताज्या बातम्या आणि घडामोडी या ठिकाणी तुम्ही वाचू शकता.

थोडक्यात

  • समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात, कन्नौजमधून निवडणूक लढणार
  • यवतमाळमधील पुसद येथील सभेत भाषणादरम्यान नितीन गडकरींना भोवळ आली, विश्रांतीनंतर गडकरींनी पुन्हा भाषण सुरू केलं
  • कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवार यांना मिळाली क्लिन चीट
  • सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वर्तमानपत्रात जाहीर माफी मागितली.
  • अमेरिका युद्धग्रस्त इस्रायल आणि युक्रेनला करणार अब्जावधी डॉलर्सची मदत
  • प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला, जर मंगळसुत्राचे महत्त्व कळले असते तर असं बोलले नसते
  • सुरतमध्ये बिनविरोध खासदाराच्या निवडीवरुन अखिलेश यादव यांची टीका, 'हा तर जनतेचा अपमान'
  • मुंबई दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर न देण्याचा युपीए सरकारने निर्णय घेतला होता - एस. जयशंकर

लाईव्ह कव्हरेज

  1. सुनेत्रा पवार : सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत पराभूत, आता राज्यसभेची उमेदवारी; असा आहे प्रवास

  2. हिंदू धर्माच्या अनुयायांनी बौद्ध धर्मात जाण्याची धर्ममार्तंडांना इतकी भीती का वाटते ?

  3. अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात, कन्नौजमधून निवडणूक लढणार

    अखिलेश यादव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशातील कन्नौज मतदारसंघातून ते निवडणूक लढणार असल्याची माहिती समाजवादी पक्षानं दिलीय.

    अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत.

    उद्या, 25 एप्रिलला अखिलेश यादव कन्नौजमधून लढण्यासाठी उमेदवादी अर्ज दाखल करणार आहेत.

  4. यवतमाळमध्ये भर सभेत नितीन गडकरींना भोवळ, विश्रांतीनंतर पुन्हा भाषण सुरू

    यवतमाळमधील पुसद येथील सभेत भाषणादरम्यान भाजप नेते नितीन गडकरी यांना भोवळ आल्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला.

    यानंतर गडकरींनी विश्रांती घेतली आणि त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं.

    नितीन गडकरींनी ट्वीट करूनही त्यांची तब्येत बरी असल्याचं सांगितलं. शिवाय, वरूड (अमरावती) येथील सभेसाठी जात असल्याचंही गडकरींनी सांगितलं.

    शिवसेनेच्या राजश्री पाटील या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी पुसद येथे आले होते.

    यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान असून, आज (24 एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

  5. महाराष्ट्र सहकारी बॅंक कथित घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चिट

    महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनी क्लीन चिट दिलं आहे.

    महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या 25,000 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चिट मिळाले आहे.

    जानेवारीमध्ये तपास यंत्रणांनी याविषयी अंतिम अहवाल जमा केला होता. त्यानुसार कर्ज वाटप, साखर कारखाने विक्री, यामुळे बँकेला कोणतेही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं या रिपोर्टमध्ये नमून करण्यात आलं आहे.

    त्यामुळे सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे. सहकारी संस्थांमध्ये हजारो कोटी रुपयांच्या कर्जाचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपासही सुरू केला होता.

    नाबार्डच्या वतीने 2007 ते 2011 दरम्यानच्या कार्यकाळातील बँकेच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये सहकार आयुक्त आणि सादर केलेल्या चौकशी अहवालात बँकेचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची म्हटले आहे. तसा अहवाल पण तपास संस्थांनी कोर्टात सादर केला.

    साखर कारखान्यांना कर्ज वाटप करताना बँकिंग आणि रिझर्व बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधित आरोप पत्रात करण्यात आला होता.

    यामध्ये कमी व्याज दारात कर्ज वाटप करणे आणि मालमत्ता कमी दरात विक्री करणे असा उल्लेख करण्यात आला होता.

  6. नितीन गडकरी यांचा नागपूर लोकसभा निवडणूक प्रचार वादात, निवडणूक आयोगाची कारवाई

  7. सॅम पित्रोदांच्या वारसा हक्क करावरील वक्तव्यानंतर काँग्रेसची सारवासारव

    काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वारसा हक्कावरील कर या मुद्द्यावरील वक्तव्यानंतर ऐन निवडणुकीच्या काळात नवीन राजकीय वाद सुरू झाला आहे.

    ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकेतील वारसा हक्काविषयी चर्चा केली. त्यानंतर भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

    दरम्यान, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वारसा टॅक्स मुद्द्यावरील वक्तव्यापासून काँग्रेस पक्षाने स्वतःला दूर ठेवलं आहे.

    ANIला दिलेल्या मुलाखतीत सॅम पित्रोदा म्हणाले, अमेरिकेत वारसा टॅक्स कायद्याची व्यवस्था आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्या व्यक्तीकडे 100 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता असेल, तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांना केवळ 45 टक्के संपत्ती मिळेल. आणि उर्वरित 55 टक्के सरकार घेईल.

    ते पुढं म्हणाले, "तुम्ही भारतात हे करू शकत नाही. जर एखाद्याची संपत्ती 10 अब्ज रुपये असेल आणि ती व्यक्ती हयात नसेल, तर त्यांची मुलं संपूर्ण 10 अब्ज रुपये ठेवतात आणि जनतेला काहीच मिळत नाही. या गोष्टीवर लोकांनी चर्चा केली पाहिजे.

    भाजपची काँग्रेसवर जोरदार टीका

    सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "सॅम पित्रोदा यांच्या विधानाने संपूर्ण देशाला स्पष्ट केलंय की, काँग्रेसचं सरकार आलं तर खाजगी मालमत्तेचं सर्वेक्षण करून ती संपत्ती सरकारी तिजोरीत टाकली जाऊ शकते."

    भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनीही ट्विट करत, काँग्रेसने भारताला नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं आहे.

    "सॅम पित्रोदा यांच्या म्हणण्यानुसार, तुमच्या मेहनतीने जे काही कमावले आहे ते 50 टक्के काढून घेतले जाईल. काँग्रेस सत्तेत आली तर तुम्ही कितीही कर भरला तरी शेवटी तुमची 50 टक्के संपत्ती सरकार घेणार.

    काँग्रेस पक्षाची सारवासारव

    सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली.

    ते म्हणाले, "पित्रोदा अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने मत व्यक्त करतात. अर्थात लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला त्यांचे वैयक्तिक विचार व्यक्त करण्याचे आणि त्यावर चर्चा करण्याचे स्वातंत्र्य असते. याचा अर्थ असा नाही की पित्रोदा यांचे विचार नेहमीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका दर्शवतात. बऱ्याचदा असं घडत नाही. भाजपकडून लोकांचं लक्ष वळवण्याचासाठीचा हा मुद्दाम प्रयत्न केला जातोय."

  8. इस्रायल-इराणच्या संघर्षात जॉर्डन का पडला, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

  9. बाबा रामदेव यांची पुन्हा एकदा जाहीर माफी; माफीनाम्याच्या आकारावरून सुप्रीम कोर्टाचा दणका

    सुप्रीम कोर्टाने जुन्या माफीनाम्याच्या आकारावरून फटकराल्यानंतर बाबा रामदेव यांच्याकडून पुन्हा एकदा जाहीर माफी मागण्यात आली आहे.

    पतंजली आयुर्वेद यांच्याकडून याआधी वर्तमानपत्रातील एका कोपऱ्यातील लहान जागेत जाहीर माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला होता.

    पण, तुमच्या जाहिरातीएवढा हा माफीनामा का नाहीये, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना विचारला. तेव्हा मात्र बुधवारी (24 एप्रिल) पतंजलीकडून वर्तमानपत्रात पुन्हा एकदा तुलनेने मोठा आकाराचा जाहीरनामा छापण्यात आला आहे.

    बाबा रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी ही माफी मागितली आहे.

    या माफीनाम्यात असं लिहिण्यात आलं आहे की, "आम्ही वैयक्तिकरित्या तसेच कंपनीच्यावतीने प्रलंबित असलेल्या खटल्याच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाच्या सूचना/आदेशांचे पालन न केल्याबद्दल बिनशर्त दिलगिरी व्यक्त करतोय. तसंच आम्ही नोव्हेंबर 2023 रोजी पत्रकार परिषद आयोजित केल्याबद्दल पण माफी मागत आहोत.

    "आमच्या जाहिरातींच्या प्रकाशनात झालेल्या त्रुटीबद्दल मनापासून दिलगीर आहोत आणि अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे यापुढे अत्यंत काळजीपूर्वक आणि निष्ठेने पालन करू.

    इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आणि रामदेव यांच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले माफीनामा पत्र कापून ते सुप्रीम कोर्टात सादर करण्यास सांगितले होते.

    तेव्हा कोर्टाने म्हटलं की, "आम्हाला माफीनाम्याचा खरा आकार पाहायचा आहे. या आमच्या सूचना आहेत. आम्ही तो पाहिल्यावर त्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करयाची गरज भासू नये, असं आम्हाला वाटतं."

    पतंजली आयुर्वेदने सोमवारी 67 वर्तमानपत्रांमध्ये माफीनामा पत्र प्रकाशित केला होता. पण त्याचा आकार लहान असल्याने सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा फटकारलं.

  10. अमेरिका इस्रायल आणि युक्रेनला देणार अब्जावधी डॉलर्स

    अमेरिकेन सीनेटने युक्रेन, इस्रायल आणि तैवानला 95 अब्ज डॉलर्स ( अंदाजे 7915 कोटी रुपये) इतक्या रकमेचे पॅकेज देण्याची मंजुरी दिली आहे.

    राष्ट्रपती जो बायडन यांनी बुधवारी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. या प्रस्तावानुसार युक्रेनसाठी 61 अब्ज डॉलरची मंजुरी देण्यात आली आहे.

    अमेरिकेनी म्हटले आहे की युद्धग्रस्त युक्रेनला ही मदत काहीच दिवसानंतर मिळणे सुरू होणार आहे. या तिन्ही देशांना पॅकेज देण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने 79 मतं पडली तर विरोधात 18 पडली.

    या पॅकेजची स्तुती करताना बायडन म्हणाले की हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या देशाला तसेच जगाला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षिततेची भावना यामुळे मिळेल.

    आम्ही आमच्या मित्र राष्ट्रांची मदत करत आहोत जे राष्ट्र हमाससारख्या कट्टरतावाद्यांविरोधात असो वा पुतिनसारख्या हुकूमशाहांविरोधात लढताना स्वतःला वाचवण्याची पराकाष्ठा करत आहेत.

    या पॅकेजमधील 26 अब्ज डॉलर ही इस्रायलच्या सैन्याला मदत म्हणून देण्यात येणार आहे तर 9.1 अब्ज डॉलर गाझातील युद्धग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.

  11. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर युपीए सरकारने प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला होता - एस. जयशंकर

    26/11 च्या मुंबई हल्ल्यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तत्कालीन यूपीए सरकारवर जोरदार टीका केली.

    "पाकिस्तानवर हल्ला केला तर महाग पडेल यापेक्षा काहीही न केलेलं बरं, या तर्काच्या आधारे यूपीए सरकारने मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाई केली नाही," असं जयशंकर यांनी म्हटलं आहे.

    मंगळवारी (23 एप्रिल) हैदराबादमध्ये 'Foreign Policy The India Way: From Diffidence To Confidence' या विषयावर आयोजित चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्र्यांनी हे वक्तव्य केलं.

    या चर्चेदरम्यान जयशंकर पुढे म्हणाले, "मुंबई हल्ल्यानंतर यूपीए सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी लिहून ठेवलं की, आम्ही बैठक घेतली आणि चर्चा केली.सर्व पर्यायांचा विचार केला. त्यानंतर आम्ही पाकिस्तानवर लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. कारण पाकिस्तानवर हल्ला करण्याची किंमत जास्त मोजावी लागू शकते, असं तत्कालीन सरकारला वाटलं होतं."

    "भारताला सीमेवर काही आव्हानांचा सामना करावा लागतोय. त्यावर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा प्रभाव वाढवणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, भारतीय लष्कराला मदत करणं आणि सीमेवर धोक्याच्या वेळी प्रत्युत्तर देऊ शकेल अशी यंत्रणा तयार करणं, अशी आपली रणनीती असायला पाहिजे," असंही जयशंकर यांनी यावेळी म्हटलं.

  12. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये तुमचं स्वागत आहे. निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे आणि त्याच बरोबर जगभरात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत.

    या सगळ्या घडामोडींची माहिती तुम्हाला बीबीसी मराठीच्या या पानावर मिळू शकेल.

    23 एप्रिलच्या घडामोडी वाचण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता.