You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

इराणी सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीत घेतलं एक जहाज ताब्यात, जहाजावर 25 क्रू मेंबर्स

लोकसभा निवडणूक 2024 सह महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील घडामोडींचे अपडेट तुम्हाला इथे वाचता येतील.

थोडक्यात

  • उत्तरप्रदेशातील मेरठच्या शाही इदगाहबाहेरील रस्त्यावर नमाज अदा केल्याप्रकरणी पोलिसांनी 200 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
  • वेस्ट बॅंकमध्ये एका बेपत्ता झालेल्या किशोरवयीन मुलाचा इस्त्रायली अधिकारी शोध घेत असताना इथे राहणाऱ्या ज्यू आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसाचार सुरू झाला. यात एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
  • पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्यासाठी डोपिंग चाचणीत अडकवण्याचा कट रचला जातोय, कुस्तीपटू विनेश फोगाटचा गंभीर आरोप
  • महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, पिकांना मोठा फटका
  • धैर्यशील मोहिते पाटील उद्या (14 एप्रिल) शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता
  • सांगलीत विशाल पाटलांना उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज

लाईव्ह कव्हरेज

  1. इराणी सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीत घेतलं एक जहाज ताब्यात, जहाजावर 25 क्रू मेंबर्स

    इराणी सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीत एक कंटेनर जहाज ताब्यात घेतलं आहे. सीरियातील आपल्या वाणिज्य दूतावासावरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून हल्ला होण्याची भीती बळावली असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे.

    एमएससी अराईज असे या कंटेनर जहाजाचे नाव असून ते संयुक्त अरब अमिराती आणि इराण यांच्यातील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात होते. हे जहाज शनिवारी (13 एप्रिल) पहाटे ताब्यात घेण्यात आलं आहे.

    इराणची वृत्तसंस्था आयआरएनएने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात कंटेनर जहाजाच्या वर हेलिकॉप्टर उडताना दिसत असून कमीतकमी तीन लोक दोरीचा वापर करून जहाजात उतरत आहेत.

    या जहाजाची देखभाल करणाऱ्या एमएससी कंपनीने म्हटलंय की जहाजावर एकूण 25 क्रू मेंबर्स आहेत. जहाजावर पोर्तुगीज झेंडा असला तरी हे जहाज झोडियाक मेरीटाईमच्या मालकीचे आहे. ही कंपनी लंडन-आधारित आंतरराष्ट्रीय शिपिंग ऑपरेटरची असून याचे मालक एक इस्रायली आहेत.

  2. मेरठमध्ये रस्त्यावर नमाज अदा केल्याप्रकरणी 200 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

    उत्तरप्रदेशातील मेरठच्या शाही इदगाहबाहेरील रस्त्यावर नमाज अदा केल्याप्रकरणी पोलिसांनी 200 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे रोडचे प्रभारी निरीक्षक आनंद गौतम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "ईदच्या दिवशी ईदगाहाबाहेरील रस्त्यावर अनेकांनी नमाज अदा केली होती. या संदर्भात व्हिडिओ फुटेज आणि सर्व छायाचित्रांच्या आधारे रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला जात आहे."

    नेमकं प्रकरण काय आहे?

    11 एप्रिल रोजी ईदच्या दिवशी शाही ईदगाह परिसरात ईदच्या नमाजासाठी लोकांची गर्दी जमली होती. मशिदीत जागा नसल्याने अनेक लोकांनी मशिदीच्या बाहेर रस्त्यावर बसून नमाज पठण केलं. पोलिसांनी लोकांना नमाज अदा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एका हिंदू संघटनेचे नेते सचिन सिरोही यांनीही वरिष्ठांकडे तक्रार केली होती.

    तक्रारीत काय म्हटलंय?

    रेल्वे रोड पोलीस ठाण्याचे क्षेत्रीय चौकी प्रभारी राम अवतार यांच्या तक्रारीवरून ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या नकारानंतरही अज्ञातांनी रस्त्यावर नमाज अदा केल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचं तक्रारीत म्हटलंय.

  3. वेस्ट बॅंकमध्ये एक मुलगा बेपत्ता झाल्यामुळं हिंसाचार, एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू

    वेस्ट बॅंकमध्ये एका बेपत्ता झालेल्या किशोरवयीन मुलाचा इस्त्रायली अधिकारी शोध घेत असताना इथे राहणाऱ्या ज्यू आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसाचार सुरू झाला. यात एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. जवळपास 25 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

    बंदुका आणि दगडांनी सज्ज असलेल्या डझनावारी सेटलर्सनी (सेटलर्स - इस्त्रायलच्या ताब्यात असणाऱ्या वेस्ट बॅंकमध्ये वसवण्यात आलेल्या ज्यूंना सेटलर्स म्हणतात) रामाल्लाच्या जवळील एका गावावर हल्ला चढवला. यानंतर इस्त्रायली सैनिकांनी मध्यस्थी केल्यामुळे परिस्थिती निवळली.

    मात्र बिन्यामिन अहीमायरर हा बेपत्ता झालेला 14 वर्षांचा किशोरवयीन मुलगा काही सापडला नाही. या मुलाच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम राबविली जाते आहे. इतर घडामोडींमध्ये इस्त्रायलच्या सुरक्षा दलांनी वेस्ट बँक मध्ये राहणाऱ्या दोन पॅलिस्टिनी नागरिकांवर गोळ्या झाडल्या. त्यात या दोघांचा मृत्यू झाला आहे.

    यातील एकजण आपला स्थानिक कमांडर असल्याचे हमासने म्हटलं आहे. इस्त्रायली सैन्याचं म्हणणं आहे की मोहम्मद दरगमेहचा मृत्यू त्यांचा सैनिकांबरोबर गोळीबार सुरू असताना झाला.

    सात ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या इस्त्रायल आणि हमास मधील युद्धामुळं वेस्ट बॅंकमध्येदेखील हिंसाचार वाढला आहे.

  4. 'अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात त्रास दिला जात आहे'- संजय सिंह यांचा आरोप

    आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे.

    केंद्र आणि पंतप्रधान यांच्या इशाऱ्यावर तुरुंगात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अत्याचार केले जात आहेत, असा त्यांचा आरोप आहे.

    "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तुरुंगात केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर अत्याचार केले जात आहेत. तुरुंगात जे किमान अधिकार मिळतात तेही त्यांच्याकडून वारंवार हिसकावून घेतले जात आहेत," असंही संजय सिंह म्हणाले.

    "तिहारच्या तुरुंगात जे घडत आहे, ते यापूर्वी कधीही घडलेलं नाही. अधिकारी तर केवळ मोहरे आहेत. ते फक्त त्यांना मिळालेल्या आदेशाचं पालन करतात." "पण भेटीबाबत मी सांगू शकतो. तुरुंगातील नियम 602 आणि 605 अंतर्गत कोणालाही प्रत्यक्ष भेटता येऊ शकतं. हा अधिकार तुरुंग प्रशासनाकडं असतो. तसा नियम आहे," असं संजय सिंह म्हणाले.

    "अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आणि कुटुंब प्रचंड तणावात आहेत. त्यांचे आई वडील घाबरलेले आहेत. केजरीवाल यांच्या पत्नी अर्ज करतात तेव्हा त्यांना समोरा-समोर भेटू दिलं जात नाहीत. गजांच्या खिडकीआडून भेटायला सांगतात, हे अमानवीय आहे," असंही त्यांनी म्हटलं.

    सीएम अरविंद केजरीवाल सध्या दिल्लीच्या तथाकथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तुरुंगात कैदेत आहेत. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली होती. केजरीवाल यांचे वकील या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकतात.

  5. इस्रायलवर करण्यात येणाऱ्या संभाव्य हल्ल्याबाबत अमेरिकेची इराणला ताकीद

    अमेरिकन अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या अमेरिकन पार्टनर सीबीएस न्यूजशी बोलताना सांगितलं की, इस्रायलवर लवकरच मोठा हल्ला होऊ शकतो.

    इस्रायलने म्हटलंय की ते स्वतःचा बचाव करण्यास तयार आहेत. तर दुसऱ्या बाजूला जो बायडन यांनी इराणला इस्रायलवर हल्ला करू नये अशी ताकीद दिली आहे.

    बायडन म्हणाले, "आम्ही इस्रायलच्या संरक्षणासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही इस्रायलला पाठिंबा देऊ. आम्ही इस्रायलचं रक्षण करू. इराणचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत."

    गाझामध्ये इस्रायलशी लढा देणारा पॅलेस्टिनी गट, हमासला इराणचा पाठिंबा आहे. सोबतच इस्रायलवर हल्ला करणाऱ्या अनेक प्रॉक्सी संघटनांनाही पाठिंबा आहे.

    यामध्ये लेबनॉनच्या हिजबुल्ला संघटनेचाही समावेश आहे. शुक्रवारी हिजबुल्लाहने लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने डझनभर रॉकेट सोडल्याचं वृत्त आहे.

    इस्त्रायली लष्कराच्या (आयडीएफ) प्रवक्त्याने सांगितलं की, सुमारे 40 क्षेपणास्त्रे आणि स्फोटक ड्रोन डागण्यात आले, ज्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

    अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सीबीएस न्यूजला सांगितलं की, हा हल्ला इस्त्रायलवरील कोणत्याही अपेक्षित इराणी हल्ल्याच्या विपरीत होता.

  6. सिडनीत मॉलमध्ये चाकूहल्ला, हल्लेखोरावर पोलिसांचा गोळीबार

    ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये अनेक लोकांना चाकूनं भोसकून, नंतर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

    स्थानिक माध्यमांच्या दाव्यानुसार, वेस्टफील्ड मॉलमध्ये गोळीबार झाला आहे.

    पोलिसांच्या कारवाईत चाकू हल्ला करणाऱ्याला गोळी लागली आहे. पोलिसांनी स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.

    पोलिसांनी या संपूर्ण भागातून लोकांना बाहेर काढलं आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंनुसार, घटनास्थळावर रुग्णवाहिका आणि पोलिसांची वाहनं पोहोचल्याचे दिसत आहेत.

  7. 'दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणताही नियम असू शकत नाही'

    भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्यांच्या 'व्हाय इंडिया मॅटर्स' या मराठी भाषेतील पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना ते म्हणाले की, "दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणताही नियम असू शकत नाही."

    एस. जयशंकर म्हणाले की, दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणताही नियम असू शकत नाही.

    ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने अलीकडेच एका वृत्तात दावा केला होता की, भारताची गुप्तचर संस्था रॉ ने पाकिस्तानमध्ये कारवाई केली आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, या दाव्यावर प्रतिक्रिया देताना एस जयशंकर म्हणाले, "26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर, यूपीए सरकारने अनेक फेऱ्यांमध्ये पाकिस्तानसोबत चर्चा केली आणि शेवटी सरकार या निष्कर्षापर्यंत पोहोचलं पाकिस्तानवर हल्ला करण्याची किंमत हल्ल्यापेक्षा न करण्यापेक्षा जास्त होती. तुम्ही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं नाही की, मग मुंबईसारखे हल्ले पुन्हा होतात. भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांना कसे रोखता येईल?"

    जयशंकर पुढे म्हणाले की, "दहशतवाद्यांनी असा विचार करू नये की ते सीमेच्या पलीकडे असतील तर त्यांच्यावर कोणी हल्ला करू शकत नाही." दहशतवादी कोणतेही नियम पाळत नाहीत. त्यामुळे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा कोणताही नियम असू शकत नाही.

  8. विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेतीचं मोठं नुकसान

    गेल्या काही दिवसांपासून विदर्भात ठाण मांडून बसलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.

    वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भात जवळपास 70 हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे, तर तीन हजार घरांची पडझड झाली आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात 56 हजार हेक्टरवर नुकसान झालं आहे.

    यवतमाळ जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू, तर तिघे जखमी झाले आहेत. तसंच, 29 जनावरे मृत झाली आहे.

    अमरावती,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या पाच जिल्ह्यात तीन हजार घरांची पडझड झाली तर 70 हजार हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

    नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. आपत्तीग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

  9. 'पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्यासाठी डोपिंग चाचणीत अडकवण्याचा कट'

    भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आरोप केलाय की, तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्यासाठी डोपिंग चाचणीत अडकवण्याचा कट रचला जातोय.

    भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आरोप केलाय की, तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्यासाठी डोपिंग चाचणीत अडकवण्याचा कट रचला जातोय.

    विनेश फोगाटने पुढे म्हटलंय की, "बृजभूषण शरण सिंह आणि डमी अध्यक्ष संजय सिंह हे मला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या असलेले सहाय्यक, कर्मचारी हे त्यांच्याच ऐकण्यातले आहेत. त्यामुळे स्पर्धेदरम्यान पाण्यात काहीतरी घालून मला डोपिंगमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो."

    विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या 50 किलोग्राम वजनी गटातील स्पर्धेत सहभागी होणार आहे. विनेश फोगाटने मागच्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय महिला कुस्ती सराव सामन्यात 50 किलोग्राम गटात विजय मिळवून स्पर्धेसाठी आपलं स्थान पक्कं केलं आहे.