अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार
सोलापूरचे नेते धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह मंडी लोकसभेच्या मैदानात
भाजपचा जाहीरनामा प्रकाशित, समान नागरी संहिता लागू करण्याचं आश्वासन
लाईव्ह कव्हरेज
गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली सलमानची विचारपूस
अभिनेता सलमान खानच्या बांद्रा येथील घराबाहेर दोन अज्ञात लोकांनी गोळीबार करण्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की सलमान आणि त्याच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ते या विषयाबाबत सलमान खानशी बोलले देखील आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला आहे, ती एक दुर्दैवी घटना आहे.
पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना कधीही माफ केलं जाणार नाही.
''आम्ही त्यांची सुरक्षा वाढवण्यास आणि त्याबाबत खातरजमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी स्वत: सलमानशी बोललो आहे आणि सांगितलं आहे की सरकार तुमच्यासोबत आहे. तुम्हाला त्रास होईल असं काहीही होणार नाही, कठोर कारवाई केली जाईल,'' असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
मुंबई पोलिसांनी माहिती दिली होती की बांद्रा येथे सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञात लोकांनी रविवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास गोळीबार केला होता.
या घटनेनंतर मुंबई पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखेची (क्राईम ब्रॅंच) टीम घटनास्थळी पोचली होती. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तीन गोळ्या झाडल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती.
फोटो स्रोत, ANI
इस्रायलमधील अमेरिकन दुतावासाकडून कर्मचाऱ्यांना इशारा
इस्रायलमधील अमेरिकन दुतावासाकडून कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. जेरुसलेममधील अमेरिकन दुतावासाने सातत्याने होणारे ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ले कमी झाले आहेत असं सांगत अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी शेल्टर इन प्लेस आदेश रद्द केला होता.
इस्रायलमध्ये प्रवास करण्यासाठी अमेरिकेने नागरिकांना जी बंधनं घातली ती मात्र अद्याप कायम आहेत. जेरुसलेम, तेल अविव आणि बीर शेवा या शहरात आणि त्या शहरादरम्यान प्रवासासाठी घातलेली बंधनं तशीच आहेत.
अमेरिकेने इस्रायलमधील सुरक्षा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं आहे. अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत किंवा पुढे ढकलण्यात आली आहेत.
त्याचबरोबर इस्रायली लष्कराने नागरिकांना सांगितलं आहे की देशभरातील इस्रायली लोकांनी सुरक्षित खोल्यांजवळ राहण्याची आता आवश्यकता नाही. मात्र लोकांनी जमा होण्यासंदर्भातील बंधनं अद्याप लागू आहेत.
फोटो स्रोत, Reuters
गोळीबारानंतर सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त
गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी आतापर्यत पाचपेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
पोलिस आणि फोरेन्सिक टीम घटनास्थळी हजर आहेत.
धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित
माढा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड आज घडतेय.
माढ्यात शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिलाय. धैर्यशील मोहिते पाटील हे आज संध्याकाळीच शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार आज माढा दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तिथं माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, "सोलापूर आणि माढा परिसरातील सगळ्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला एका गोष्टीचं समाधान आहे की या सगळ्यांनी या निवडणुकीचे आघाडीचे जे उमेदवार आहेत, त्यांच्या विजयासाठी जे जे करावं लागेल ते ते करण्याची तयारी ठेवलेली आहे."
धैर्यशील मोहिते पाटलांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार म्हणाले की, "माढा लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे धैर्यशील मोहिते पाटील यांनी लढवावी अशी आम्हा सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली की, तुम्ही पक्षात येण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इथे येतील, पक्षाचे महत्त्वाचे नेते इथे येतील आणि त्यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल.
"सोळा तारखेला या दोन्ही उमेदवारांची बैठक सोलापूरला होईल. या सगळ्यांच्या उपस्थित एकत्रित काम करण्याचा निर्णय झालेला असेल आणि अर्ज दाखल केल्यानंतर चित्र बदललेलं दिसेल."
फोटो स्रोत, Facebook
पवार पुढे म्हणाले, "सोलापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूंच्या विचारांचा पुरस्कार करणारा जिल्हा राहिला आहे. या जिल्ह्याचा इतिहास पाहता आमचे दोन्ही उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील याची खात्री मला आहे."
भाजपच्या संकल्पपत्राबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "अनेक प्रश्नांवर आश्वासने देणं आणि अंमलबजावणी न करणं हे भाजपाच वैशिष्ट्य आहे. शेतमालाचा भाव असो किंवा तरुणांना नोकऱ्या देण्याचा प्रश्न असो त्यांना ही आश्वासनं पूर्ण करता आल्या नाहीत."
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, "सगळे आमदार तिकडे असले तरीही कशापद्धतीने निवडून यायचं याची तयारी आम्ही केली आहे."
24 कॅरेट सोन्यासारखीच मोदींची गॅरंटीही अस्सल - राजनाथ सिंह
भारतीय जनता पक्षाने (भाजप) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने या जाहीरनाम्याला 'मोदींची गॅरंटी संकल्प पत्र' असं नाव दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह म्हणाले की, "आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. आम्ही जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचे आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण झालं. आम्ही महिलांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं तेही आम्ही पूर्ण केलं.
फोटो स्रोत, X/@BJP4India
भाजपचा जाहीरनामा 24 भागांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये सुशासन, देशाची सुरक्षा, स्वच्छ भारत, खेळांचा विकास, पर्यावरण या विषयांचा समावेश आहे.
24 कॅरेट सोन्यासारखीच मोदींची गॅरंटीही अस्सल असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.
भाजपच्या जाहिरनाम्यातील 'ही' आहेत 17 मोठी आश्वासनं :
1) पुढच्या पाच वर्षांसाठी मोफत रेशन, पाणी, गॅस जोडणी आणि पंतप्रधान सौर घर योजनेतून नागरिकांचं वीज बिल शून्यावर आणलं जाईल.
2) आयुष्मान भारत योजनेतून 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहेत, ते भविष्यातही दिले जातील.
3) मध्यमवर्गीय कुटुंबांना पक्की घरं बांधून देणार
4) पेपरफुटीवर मोठा कायदा केला आहे, त्याची अंमलबजावणी करू
5) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल
6) 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भारताकडे असणार आहे
7) पायाभूत सुविधा, उत्पादन, स्टार्टअप, क्रीडा, गुंतवणूक, उच्च मूल्याच्या सेवा आणि पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील.
8) एक कोटी बहिणी लखपती दीदी झाल्या, आणखी तीन कोटीं महिलांना लखपती दीदी बनवणार, तसंच, नारी वंदन अधिनियम लागू करणार
फोटो स्रोत, X/@BJP4India
9) बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार. नॅनो युरिया आणि नैसर्गिक शेतीद्वारे जमिनीचे रक्षण करणार.
10) बोटींचा विमा, मत्स्य प्रक्रिया युनिट, उपग्रहाद्वारे वेळेवर माहिती मिळणे अशा मच्छिमारांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक पैलूला बळकटी दिली जाईल.
11) मत्स्यपालन करणाऱ्यांना समुद्री तण आणि मोत्यांची लागवड करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
12) रिक्षाचालक, टॅक्सी चालक, ऑटो चालक, घरगुती कामगार, स्थलांतरित कामगार, ट्रक चालक, कुली या सर्वांना ई-श्रमशी जोडले जाईल आणि त्यांना कल्याणकारी योजना पुरवल्या जातील.
13) तिरुवल्लुवर कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारताची संस्कृती जगासमोर नेणार.
14) उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील अभिजात भाषांच्या अभ्यासाची व्यवस्था केली जाईल.
15) 2025 हा आदिवासी अभिमान वर्ष म्हणून साजरा केला जाईल.
16) एकलव्य शाळा, पीएम जनमन वन उत्पादनांचा दर्जा वाढवला जाईल आणि इको टुरिझमला प्रोत्साहन दिले जाईल.
17) ओबीसी, एससी, एसटी समाजाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सन्मान दिला जाईल.
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार झाल्याची घटना घडलीय.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी अशी माहिती दिली की आज (14 एप्रिल) पहाटे पाचच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला.
तीन राऊंड गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तपासासाठी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाली आहे.
फोटो स्रोत, ANI
अभिनेता सलमान खानला यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. अभिनेता सलमान खान आणि सिद्धू मोसेवालाचा मॅनेजर हिटलिस्टवर असल्याचं कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईनं सांगितल्याचं एनआयएनं म्हटलं होतं. या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
आता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानं सलमानच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
नमस्कार...
बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजवर तुमचं स्वागत आहे.
आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता.