CIA म्युझियम: एकापेक्षा एक वरचढ स्पाय गॅजेट्स, बंदुका आणि महत्त्वाच्या मोहिमांमधील आठवणी

म्युझियम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीआयए म्युझियम
    • Author, गॉर्डन कोरेरा
    • Role, सिक्युरिटी करस्पॉडन्ट, व्हर्जिनिया
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

जगाच्या इतिहासाला आकार देणाऱ्या असामान्य वस्तूंचा संग्रह एका बंद दाराआड लपलाय असं सांगितलं तर काही जणांचा विश्वास बसणार नाही.

म्हणजे सद्दाम हुसेनच्या लेदर जॅकेटपासून ते ओसामा बिन लादेन मारला गेला तेव्हा त्याच्याकडे सापडलेल्या बंदुकीपर्यंत सर्वच गोष्टी अमेरिकेत एका संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. पण सर्व सामन्यांसाठी मात्र या वस्तूसंग्रहालयाची दारं बंद आहेत.

हे संग्रहालय म्हणजे अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA चं सिक्रेट इन हाऊस म्युझियम आहे.

अमेरिकेच्या व्हर्जिनियामधील लँगली इथं CIA चं मुख्यालय आहे. या संस्थेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संग्रहालायचं नूतनीकरण करण्यात आलंय. या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख वृत्तसंस्थांच्या पत्रकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

बीबीसीलाही निमंत्रण मिळालं होतं. संग्रहालय बघण्याचं आमंत्रण जरी असलं तरी आतमध्ये प्रवेश केल्यावर सिक्युरिटी एस्कॉर्ट पत्रकारांवर सतत नजर ठेवून होते.

या संग्रहात सुमारे 600 वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. यात शीतयुद्धाच्या काळात वापरलेल्या स्पाय गॅजेट्सही होत्या. यात एक 'डेड ड्रॉप रॅट' होता, ज्यात तुम्हाला मॅसेज लपवता यायचा.

तिथं एक सिगारेटचं पॅकेट होतं, ज्याचा वापर हिडन कॅमेरा म्हणून केला जायचा. सोबतच स्पाय कॅमेरा असलेलं एक कबुतर आणि स्फोटकांचा मार्टिनी ग्लास अशा वस्तू होत्या.

एवढंच नाही तर सीआयएने अलीकडच्या काळात जे काही ऑपरेशन्स केले त्यातल्या गोष्टीही या संग्रहात मांडण्यात आल्या होत्या.

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेच्या CIA गुप्तहेर संस्थेच्या सिक्रेट कारवायाचं संग्रहालय कसं आहे?

यात पाकिस्तानमध्ये लपलेल्या ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी जो स्केल प्लॅन करण्यात आला होता, त्याचंही मॉडेल ठेवण्यात आलं होतं. 2011 मध्ये सीआयएने अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला मारण्याचा प्लॅन बनवला होता. यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मंजुरी हवी होती. त्यासाठी हे मॉडेल तयार करण्यात आलं होतं.

या मॉडेलविषयी सांगताना संग्रहालयाचे संचालक रॉबर्ट झेड बायर सांगतात की, "हे मॉडेल 3D असल्यामुळे मिशनचं नियोजन करायला मदत झाली. तसेच धोरणकर्त्यांना मिशनचा अंदाजही आला."

अगदी याच वर्षीच्या जुलै महिन्यातील 30 तारखेलाही एक मिशन राबविण्यात आलं होतं. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकन क्षेपणास्त्र डागण्यात आली. आणि टार्गेटवर होता अल-कायदाचा नवा नेता अयमान अल-जवाहिरी.

म्युझियम

फोटो स्रोत, CENTRAL INTELLIGENCE AGENCY

फोटो कॅप्शन, ओसामा बिन लादेन याला मारण्यात आलं ते कंपाऊंड

1 जुलै 2022 रोजी या प्रस्तावित मिशनचं मॉडेल राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना दाखवण्यात आलं. अमेरिकेच्या इंटेलिजन्स कम्युनिटीने बरेच महिने अयमान अल-जवाहिरी याच्या हालचाली टिपल्या आणि नंतर एक दिवस बाल्कनीत उभ्या असलेल्या जवाहिरीला अमेरिकेच्या क्षेपणास्त्राने टिपले.

बायर सांगतात की, "गुप्तचर अधिकारी दशतवाद्यांच्या जीवनशैलीकडे कशा पद्धतीने पाहतात हे आपल्याला या मॉडेल्स मधून समजत."

संग्रहालयाच्या पहिल्या भागात सीआयएची स्थापना आणि त्यानंतर सुरू झालेलं शीतयुद्ध दिसतं. हळूहळू आपण पुढं सरकू तसा तिथं ठेवलेल्या आर्टीफॅक्ट्सचा कालखंडही पुढे सरकतो. 9/11 रोजी अमेरिकेवर जो दहशतवादी हल्ला झाला होता तो या संग्रहालयाचा मध्यबिंदू ठरतो. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वस्तूही संग्रही ठेवण्यात आल्या आहेत.

हे संग्रहालय बघण्यासाठी सीआयएचे कर्मचारी आणि ऑफिशियल व्हिजिटर्स यांनाच परवानगी आहे. सीआयएने ज्या मोहीमा जिंकल्या त्याच वस्तू इथं ठेवण्यात आल्यात का? तर नाही.

इथं सीआयएच्या अपयशाचे संदर्भ सुद्धा सापडतील. क्युबातील फिडेल कॅस्ट्रोचा पाडाव करण्यासाठी सीआयएने चुकीच्या पद्धतीने जी मोहीम राबवली होती त्याचे आर्टीफॅक्ट्स तसेच इराकमध्ये विनाशकारी शस्त्रे शोधण्यात अपयश आल्याचे संदर्भ इथं आढळतात.

म्युझियम

फोटो स्रोत, CENTRAL INTELLIGENCE AGENCY

फोटो कॅप्शन, काबूलमध्ये अल जवाहिरी बाल्कनीत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

बायर पुढे सांगतात की, "हे केवळ ऐतिहासिक संग्रहालय आहे असं म्हणता येणार नाही. तर हे एक ऑपरेशनल म्युझियम आहे. इथं सीआयएच्या अधिकार्‍यांना आणलं जातं, त्यांना सीआयएची चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू दाखवल्या जातात. जेणेंकरून त्यांना संस्थेचा इतिहास समजावा, त्यांना चुकांमधून शिकून भविष्यात काहीतरी चांगलं करता यावं हाच उद्देश आहे."

याशिवाय सीआयएच्या काही वादग्रस्तही मोहिमांचाही इथं संदर्भ आढळतो. जसं की, 1953 मध्ये सीआयएने मिल्ट्री एजन्सी सेक्शन सिक्स (MI6) सोबत मिळून इराणमध्ये एक ऑपरेशन राबवलं होतं.

यात इराणमध्ये लोकशाही मार्गाने सत्तेवर सरकार उलथवून टाकण्यात आलं होतं. 2001 मध्ये अमेरिकेत जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यातील संशयितांचा छळ कसा करण्यात आला होता याचे संदर्भ आढळतात.

"वी कॅन नायदर कन्फर्म ऑर डिनाय"

संग्रहालयाचा दुसऱ्या भागात तुम्हाला काही स्पेसिफिक ऑपरेशन्सची तपशीलवार माहिती मिळते.

जेव्हा तुम्ही संग्रहालयात फेरफटका मारता तेव्हा तुम्हाला अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेची "वी कॅन नायदर कन्फर्म ऑर डिनाय" म्हण राहून राहून आठवेल. आपण ज्या वस्तू कधीही पहिल्या नाहीत त्या वस्तू पाहिल्यावर आपल्याला या म्हणीचा उगम कळतो.

म्युझियम

फोटो स्रोत, CENTRAL INTELLIGENCE AGENCY

फोटो कॅप्शन, K-129 सबमरीन

1960 मध्ये सोव्हिएत युनियनची पाणबुडी समुद्राच्या तळाशी गायब झाली होती. अमेरिकेच्या सीआयएने अब्जाधीश हॉवर्ड ह्यूजेसच्या मदतीने ही पाणबुडी शोधून त्यावरचं तंत्रज्ञान आणि पाणबुडी अशा दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केला.

पण ही बाब झाकण्यासाठी अमेरिकेने एक बनाव रचला. त्यानुसार ह्यूजेस, ग्लोमर एक्सप्लोरर नावाच्या जहाजाचा वापर करून समुद्राचा तळ खणणार असल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या.

या संग्रहालयात त्या सोव्हिएत पाणबुडीचे मॉडेल ठेवण्यात आलं आहे. तसेच अॅश ट्रे आणि मेलबॅग आहेत. सीआयएच्या डेप्युटी डायरेक्टरने या जहाजाला भेट देताना जो विग वापरला होता तो सुद्धा प्रदर्शनात मांडण्यात आला आहे.

सीआयएची ही मोहीम अंशतःचं यशस्वी झाली असं म्हणावं लागले. कारण ग्लोमर जहाजाच्या साहाय्याने ती पाणबुडी वर आणण्याचा प्रयत्न करताना ती मध्येच तुटली. आणि काही भाग मिळवण्यात यश मिळालं.

म्युझियम

फोटो स्रोत, CENTRAL INTELLIGENCE AGENCY

फोटो कॅप्शन, आर्टिफॅक्ट्स

बायर सांगतात त्याप्रमाणे, "त्या पाणबुडीवर सीआयएला जे काही सापडलं त्याचं अजूनही वर्गीकरण करणं सुरू आहे."

उरलेली पाणबुडी मिळेपर्यंत प्रोजेक्ट अझोरियन नावाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आणि तेव्हा सीआयएच्या अधिकाऱ्यांनी "वी कॅन नायदर कन्फर्म ऑर डिनाय" असं म्हटलं. या म्हणीला "ग्लोमर रिस्पॉन्स" असंही म्हटलं जातं.

1979 मध्ये इराणमध्ये क्रांती झाली त्यावेळी इराणमधील अमेरिकन अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी जे मिशन राबवण्यात आलं होतं त्याचं मॉडेलही या प्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. 2012 मध्ये याच कथेवर आधारित 'अर्गो' नावाचा एक चित्रपट आला होता.

म्युझियम

फोटो स्रोत, CENTRAL INTELLIGENCE AGENCY

फोटो कॅप्शन, म्युझियम परिसर

जेव्हा आपण विविध म्हणींबद्दल बोलतच आहोत तेव्हा हे देखील सांगावंसं वाटतं की संग्रहालयाच्या छतावर काही गूढ संदेश देखील लिहिले आहेत. ते विविध कोडच्या माध्यमातून एजंट्सने पाठवले होते.

सीआयएच्या अधिकाऱ्यांना वाटतं की, यातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले जावेत, जेणेकरून लोकांना ही कोडी उलगडता येतील का हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. संग्रहालयातील प्रदर्शनात ठेवलेल्या काही वस्तू तुम्हाला ऑनलाइनही पाहता येतील. तूर्तास या म्युझियममध्ये जाण्यासाठी काही खास व्यक्तींनाच परवानगी आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)