बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला आग, 40 हून अधिक जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, SHAYMAL NANDI
बांगलादेशातील सीताकुंड शहरात एका कंटेनर डेपोला लागलेल्या आगीमुळे झालेल्या स्फोटात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या पाच कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
बांगलादेशमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या चटगावपासून सीताकुंड केवळ 40 किलोमीटर लांब आहे.
चटगाव वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे संचालक ब्रिगेडियर जनरल मोहम्मद शमीम अहसन यांनी आतापर्यंत रुग्णालयात 34 मृतदेह आणण्यात आल्याची माहिती दिली.
या दुर्घटनेत शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात स्फोट
सीताकुंड शहरामध्ये एका कंटेनर स्टोअरेज डेपोमध्ये आग लागली होती. ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आणि त्याच दरम्यान हा स्फोट झाला.
स्टोअरेज डेपोमध्ये नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये. डेपोमध्ये ठेवलेल्या काही कंटेनर्समध्ये केमिकल होतं आणि त्यामुळे आग भडकली, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक रुग्णालयांमध्ये जखमींना भरती करण्यात आलं असून नागरिकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे.
काही जखमींची प्रकृती अजूनही नाजूक आहे.
लॉरी ड्रायव्हर तुफैल अहमदने एएफपी या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितलं की, जेव्हा स्फोट झाला तेव्हा तो एका ठिकाणी उभा होता. मात्र, स्फोटानंतर त्या जागेपासून 10 मीटर अंतरावर जाऊन पडला. या दुर्घटनेत त्यांचे हात आणि पाय भाजले आहेत.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या अजून एका व्यक्तीने सांगितलं की जिथे आग लागली होती, तिथे अजूनही मृतदेह असू शकतील.
मोठा स्फोट
हा स्फोट इतका मोठा होता की, आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या फुटल्या. घटनास्थळापासून चार किलोमीटर दूरपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचं लोकांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
आगीचा वर्षाव होतोय की काय असं वाटत होतं, एक स्थानिक दुकानदार सांगत होता.
स्फोटानंतरचे जे फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये उद्ध्वस्त झालेले कंटेनर्स दिसत आहेत. त्या गोदामाचं छतही पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे.
रविवारी (5 जून) सकाळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सतत स्फोट होत असल्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येत होत्या.
त्यासोबतच समुद्रामध्ये रसायनं वाहून जाऊ नये याचीही खबरदारी घेण्यात येत होती.

फोटो स्रोत, SHAYMAL NANDI
एका सरकारी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कंटेनरमध्ये लाखो डॉलर्सचे कपडे होते, जे निर्यात केले जाणार होते.
बांगलादेश कपड्यांच्या सर्वांत मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे.
नियमांकडे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे बांगलादेशमध्ये बरेचदा अशाप्रकारच्या दुर्घटना होतात. गेल्या काही वर्षांत अशा दुर्घटनांमध्ये शेकडो मृत्यू झाले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




















