रशिया - युक्रेन युद्ध : 'रशियन सैनिकांनी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या'

फोटो स्रोत, Nachiporenko Family
17 मार्चला 11 च्या सुमारास युरी नेचीपोरेन्को आणि त्याचे वडील रुस्लान सायकलवरून बुचाच्या प्रशासकीय इमारतीकडे मदत घेण्यासाठी निघाले होते. युक्रेनची राजधानी कीव्ह रशियन सैन्याने ताब्यात घेतल्यानंतर शहरातील वीज, गॅस आणि पाणी पुरवठा बंद होता. शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होता.
युरी आणि त्याचे वडील काही औषधं आणि अन्न मिळण्याच्या अपेक्षेने निघाले होते. युरीने सांगितले की एका रशियन सैनिकाने त्याला आणि त्याच्या वडिलांना तारसिव्हस्का सेंटवर थांबवले. त्यांनी लगेच हात वर केले.
14 वर्षांचा युरी आणि त्याची आई अल्ला यांनी फोनवरून बीबीसीशी बोलताना पुढे काय घडलं याची माहिती दिली. "आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे कोणतीही शस्त्रे नाहीत आणि आमच्यापासून कोणताही धोका नाही. मग माझ्या वडिलांनी आपला चेहरा माझ्या दिशेनं वळवला आणि तेव्हाच त्यांना गोळी लागली... त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या त्या त्यांच्या छातीत लागल्या आणि त्यानंतर ते जमिनीवर पडले."
पुढे युरी म्हणाला, त्या सैनिकाने त्याच्या डाव्या हातावर गोळी झाडली आणि तोही पडला. तो जमिनीवर पडला असताना त्याच्यावर पुन्हा गोळी झाडण्यात आली. पण यावेळी गोळी दंडावर लागली.
युरी सांगतो, "मी माझ्या पोटावर पडलेला होतो, माझ्या आजूबाजूला काय घडतंय ते मला काहीही दिसत नव्हतं. त्या सैनिकाने पुन्हा माझ्या डोक्यात गोळी झाडली. पण गोळी माझ्या हुडमधून निसटून गेली."
युरी म्हणाला, यावेळी त्या सैनिकाने त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली. पण रुस्लान आधीच मरण पावले होते. "मला एक छोटासा पॅनिक अटॅक आला. माझा जखमी हात माझ्या अंगाखाली होता. मी पाहिलं की माझ्या हातातून रक्तस्त्राव होतोय."
युरी म्हणाला, थोड्या वेळाने, जेव्हा सैनिक एका टँकच्या मागे गेला तेव्हा तो उठला आणि पळून गेला.
बीबीसीने युरीच्या दाव्यातल्या तपशीलांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही, मात्र रशियन सैन्याने बुचा आणि कीव्हच्या उत्तरेकडील इतर शहरांवर त्यांचं नियंत्रण प्रस्थापित केल्यावर अत्याचार वाढल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
एकट्या बुचामध्ये, मृत पुरुषांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आढळलेत, त्यातल्या अनेकांना मोठ्या जखमा झाल्या होत्या.काही जणांच्या कानशिलावर बंदूक ठेवून वध करण्यात आल्याप्रमाणे गोळी झाडण्यात आली होती, काहींचे हात किंवा पाय पाठीमागे बांधलेले होते. काही जणांना रणगाड्याखाली चिरडले होते.

फोटो स्रोत, Nachiporenko Family
ज्या रस्त्यावर रुस्लान मारले गेल्याचं म्हटलं गेलं त्या रस्त्यापासून फक्त 2 किलोमीटरवर (एक मैल) याब्लोन्स्का स्ट्रीटवर अनेक मृतदेह आढळले.
युरीची आई अल्ला यांनी बीबीसीला सांगितले की, युरी घरी परतल्यानंतर त्याने तिला घडलेला प्रकार सांगितला. तिला वाटलं की युरीचा काहीतरी चुकीचा समज झालेला असू शकतो. रुस्लान जखमी झाले असतील तर त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असेल म्हणून त्या त्यांच्या पतीला पहायला निघाल्या होत्या.
अॅला सांगतात, "माझ्या मुलाने मला तसं न करण्याची विनंती केली, तो म्हणाला की ते मलाही मारतील."

त्यांनी रस्त्यावरून चालण्याचा प्रयत्न केला असता शेजाऱ्यांनी तिला अडवलं. "मला पुढे जाऊ नको असं सांगितलं, रशियन लोक त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रदेशातील सर्वांना ठार करतायत."
दुसऱ्या दिवशी सकाळी, अॅलांची आई त्यांना मदत करण्यासाठी आली. पांढरा स्कार्फ घालून त्या दोघी त्या ठिकाणी गेल्या. त्यांची आई रशियन सैनिकांशी बोलली आणि त्यांना पुढे जाता आलं. शेवटी त्यांनी रुस्लान यांचा मृतदेह घरी आणला.
अॅलाने बीबीसीसोबत शेअर केलेला, अर्धवट झाकलेल्या शरीराचा फोटो युरीने सांगितलेल्या गोष्टींशी तंतोतंत जुळणारा होता. या फोटोत छातीच्या उजव्या बाजूला हृदयाजवळ बंदुकीची गोळी लागल्याची जखम दिसते.
रुस्लान पेशाने वकील होते. मृत्यूसमयी ते 49 वर्षांचा होते. "ते समाजासाठी काम करत, घरी थांबून वाट पाहणं त्यांना शक्य नव्हतं. ते लोकांना मदत करत होते."
या कुटुंबाने रुस्लान यांना घराच्या बागेतच दफन केलं.
वडिलांना मारणारा सैनिक रशियन होता असं युरीचं म्हणणं आहे. त्याचा गणवेश गडद हिरवा होता, अगदी रशियन सैन्यासारखा. "त्याच्या फ्लॅक जॅकेटवर रशियनमध्ये 'रशिया' असं लिहिलं असल्याचं मला दिसलं. त्या सैनिकाला आमच्यापासून कोणताही धोका नव्हता, आम्ही नागरिक होतो हे दाखवण्यासाठी पांढरा स्कार्फ घातला होता. याला काहीच अर्थ नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























