बांगलादेशात हिंदू मंदिरावर कथित हल्ला, नेमकं काय प्रकरण आहे?

बांगलादेश देऊळ हल्ला

फोटो स्रोत, RADHAKANTA TEMPLE

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाक्यात गुरुवारी (17 मार्च) एका संतप्त जमावाने तथाकथितरित्या हिंदू मंदिरावर हल्ला केला आणि मंदिराच्या चार भिंतींपैकी एका भिंतीचा काही भाग तोडला.

जमावाने मंदिरावर केलेल्या हल्ल्यात त्यांचे दोन सहाय्यक जखमी झाले असल्याचं राधाकांता इस्कॉन मंदिराचे पुजारी कृष्ण दास यांनी केलेल्या आरोपात असं म्हटलंय.

तर दुसरीकडे या घटनेमागे जमिनिशी काही निगडित वाद असल्याचं बोललं जातंय.

स्थानिक धार्मिक संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. मंदिराच्या जागेवरून या परिसरात दबदबा असणाऱ्या गटाशी वाद निर्माण होऊन हा हल्ला झाला असल्याचं हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेने म्हटले आहे.

त्याचवेळी, मारहाणीच्या आरोपात तथ्य नसल्याचं पोलीस म्हणतायत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागेची मालकी असलेल्या एका पक्षाने तिथं दुरुस्तीचं काम करून घेतलं आणि त्याच वेळी मंदिराची जुनी भिंत कोसळली.

पण या कथित हल्ल्यानंतर मंदिराच्या सुरक्षेसाठी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.

हे मंदिर जुन्या ढाक्यातील वारी इथं 16 गुंठ्यांच्या परिसरात आहे. हे मंदिर 200 वर्षे जुनं असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

घटनेबाबत दावे प्रतिदावे

गुरुवारी मंदिरात घडलेल्या घटनाक्रमाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

मंदिराचे पुजारी कृष्ण दास यांनी केलेल्या आरोपानुसार, गुरुवारी रात्री काही अज्ञात लोकांनी मंदिराच्या चार ही भिंती तोडल्या.

मंदिर प्रशासनाचे काही सदस्य जेव्हा त्यांना विरोध करायला गेले तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

त्यांचा आरोप आहे की, या चार भिंती तोडल्यानंतर काही चोरटे मंदिराच्या परिसरात घुसले. त्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आणलेला लोखंडी सळ्या आणि मूर्ती पळवून नेली.

हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेच्या लोकांनी शुक्रवारी मंदिर परिसराचा दौरा केला. मंदिराच्या भिंतींची तोडफोड झाली आहे. मात्र मूर्ती चोरल्याचा काही पुरावा मिळाला नसल्याचं परिषदेचं म्हणणं आहे.

परिषदेचे संयुक्त महासचिव मोनिंदर कुमार नाथ आणि 6 सदस्यांनी मंदिराचा दौरा केला होता.

बांगलादेश देऊळ हल्ला

फोटो स्रोत, RADHAKANTA TEMPLE

मंदिराच्या जीर्ण झालेल्या भिंतीचा काही भाग हल्लेखोरांनी तोडला असून, यावेळी मंदिरातील दोन सहाय्यक जखमी झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.

हल्लेखोरांनी मंदिराच्या आत ज्या गोष्टी केल्या त्या कोणत्याही गोष्टीची माहिती मिळाली नाही असं ही ते म्हणाले.

यामागे कोणतं कारण सांगितलं जातंय?

या घटनेमागे जमिनीच्या वादाची पार्श्वभूमी असल्याच्या काही गोष्टी समोर येत आहेत.

मंदिर परिसरात असलेली एक प्रभावशाली व्यक्ती बऱ्याच वर्षांपासून मंदिराच्या एका भागावर आपला हक्क सांगत असल्याचं मोनिंदर नाथ सांगतात.

जुनाचं असलेला हा वाद अजूनही मिटलेला नाही.

मंदिराच्या जमिनीवर हक्क सांगणाऱ्या व्यक्तीच्या संबंधित लोकांनीचं हा हल्ला केला, नंतर मंदिराच्या भिंतीचा एक भाग तोडून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, असा मोनिंदर नाथ यांचा दावा आहे.

मंदिराचे पुजारी कृष्ण दास सुद्धा अशाच प्रकारची माहिती देतात.

पण स्थानिक पोलीस मात्र मंदिरावर अशा प्रकारचा कोणताही हल्ला झाल्याचे नाकारतात.

मंदिरावर हल्ला झाल्याचे आरोप योग्य नसल्याचं वारी पोलीस स्टेशनचे प्रभारी कबीर हुसैन म्हणतात.

कबीर हुसैन यांच्या म्हणण्यानुसार, हाजी सफीउल्ला हा स्थानिक व्यापारी मंदिराजवळ असलेल्या जागेवर आपला मालकी हक्क सांगतोय.

कबीर हुसैन सांगतात की, बांधकाम सुरू असताना जीर्ण भिंतीचा काही भाग पडला होता.

त्याचवेळी मंदिर प्रशासनाने ही आपल्या तक्रारीवर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे पोलीस मात्र या आरोपांचे खंडन करतात.

ज्या व्यक्तीवर मंदिरावर हल्ला केल्याचा आरोप होतोय त्या व्यक्तीशी बीबीसीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

मंदिरावर हल्ला झाल्याची बातमी ट्विटरवर

मंदिरावर हल्ला झाल्याची पोस्ट जेव्हा ट्विटरवर आली तेव्हा सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर या घटनेची चर्चा सुरू झाली.

वॉयर ऑफ बांग्लादेशी हिंदू या ट्विटर हँडलने संबंधित घटनेचं ट्विट केलं. ट्विटमध्ये मंदिरावर हल्ला करण्यात आला, भिंत पाडण्यात आली आणि मूर्ती चोरून नेली या गोष्टी लिहिल्या होत्या.

आणि या ट्विटच्या आधारे भारतीय माध्यमांनी या घटनेशी संबंधित बातम्या प्रसिद्ध केल्या.

या रिपोर्ट्समध्ये, गुरुवारी शब-ए-बारात दरम्यान एका हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आलाय.

मात्र, बांगलादेशात गुरुवारी शब-ए-बारात साजरी झाली नाही. तसेच मंदिराची तोडफोड किंवा मूर्ती लुटल्याच्या आरोपांत ही तथ्य असल्याचं आढळलं नाही.

त्यामुळे ही घटना कोणत्याही धार्मिक भावनेतून नाही तर जमिनीच्या वादातून घडल्याचं सर्व पक्षांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)