फ्रँको मुलक्कल : बलात्कार प्रकरणात खटला हरलेल्या ननला शेकडो पत्रांद्वारे लोकांचा पाठिंबा

नन्सचं कौतुक करणारं पत्र
फोटो कॅप्शन, या कथितरित्या बळी पडलेल्या व्यक्तीला पाठिंबा दिल्याबद्दल एका पत्रात नन्सचं कौतुक करण्यात आलं आहे. यात म्हटलंय, "तुमचं धैर्य आणि चिकाटी अतुलनीय आहे."
    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

ननवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात सत्र न्यायालयानं गेल्या आठवड्यात बिशपला निर्दोष ठरवलं आहे. त्यानंतर आरोप करणाऱ्या भारतीय ननला पाठिंबा दर्शवणाऱ्या पत्रांचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून माझ्या सोशल मीडिया अकाऊंटच्या टाईमलाइनवर हस्तलिखित संदेशांचा पाऊस पडतो आहे. बिशप फ्रँको मुलक्कल यांनी 2014 ते 2016 दरम्यान 13 वेळा बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या 50 वर्षीय ननला पाठिंबा देण्यासाठी हे संदेश पाठवण्यात आले आहेत.

या पोस्टपैकी बहुतांश पोस्ट या प्रामुख्यानं दक्षिणेतील केरळ राज्यातील महिला, कार्यकर्त्या, स्त्रीवादी चळवळीतील सदस्य, पत्रकार आणि सेलिब्रिटी यांच्या आहेत. त्यापैकी अनेक पोस्टमध्ये #withthenuns आणि #avalkoppam असे हॅशटॅग आहेत. #avalkoppam याचा अर्थ मल्याळम भाषेत तिच्या पाठिशी किंवा तिच्या बरोबर असा होतो.

या पत्रांच्या माध्यमातून ननला त्यांच्या न्यायाच्या लढ्यात पाठिंबा देण्याचं वचन देण्यात येत आहे. काहींमध्ये केवळ प्रोत्साहनपर शब्द लिहिलेली आहेत काहींमध्ये कवितेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे तर काहींमध्ये चित्रं, कलाकृती यांचा समावेशही आहे.

"या अंधारलेल्या काळामध्ये तुम्ही लाखोंसाठी आशेचा किरण आहात," असं एकानं एमिली डिकिन्सन यांचा दाखला देत म्हटलं. आणखी एका पत्रात माया अँजेलोऊ यांच्या स्टिल आय राईज कवितेच्या दाखल्यानं पाठिंबा दर्शवला आहे. ही कविता स्त्रीवादी चळवळीचं जणू गीत बनली आहे.

सत्र न्यायालयातील न्यायाधीशांचा विश्वास नसला तरी नन जे म्हणत आहे, त्यावर आम्हाला विश्वास आहे, असंही अनेकांनी लिहिलं आहे.

बिशप फ्रँको यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर भारतात एकच खळबळ माजली होती. देशातील सर्वात जुन्या ख्रिश्चन समुदायाला यामुळं धक्का बसला होता. तसंच कॅथलिक चर्चनं तक्रारीकडं दुर्लक्ष केल्याच्या ननच्या आरोपानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

बिशप फ्रँको मुलक्कल यांचा निषेध करणारं पोस्टर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिशप फ्रँको मुलक्कल यांचा निषेध करणारं पोस्टर

काही नननी एकत्र येऊन केरळ उच्च न्यायालयाबाहेर उपोषण केल्यानंतर शक्तीशाली धार्मिक गुरू असलेल्या बिशप फ्रँको यांना 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. व्हॅटिकननं त्यांना कामावरून तात्पुरत्या स्वरुपात मुक्त केलं होतं. तर एका महिन्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती.

अनेक वर्षे या महिलेला सोशल मीडियावर अपमानाचा सामना करावा लागला. एका स्थानिक नेत्यानं तर त्यांचा उल्लेख वेश्या असा केल्यानं महिला आयोगानं त्यांना शिक्षाही दिली होती.

बिशप फ्रँको यांनी त्यांच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले आणि गेल्या शुक्रवारी कोट्टायम शहरातील सत्र न्यायालयानं त्यांना निर्दोष जाहीर केलं.

पीडितेच्या जबाबामध्ये अतिशयोक्ती असून फिर्यादी पक्षाला बिशप यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यात यश आलं नाही, असं अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी गोपालकुमार म्हणाले. तसंच चर्चमधील शत्रुत्वाबद्दलही ते बोलले.

फ्रँको मुलक्कल
फोटो कॅप्शन, आपण काहीही चूक केलं नसल्याचा दावा बिशप फ्रँको मुलक्कल यांनी कायमच केला आहे.

"जेव्हा सत्य आणि असत्य एकमेकांपासून वेगळे करणं शक्य नसतं, किंवा धान्य आणि भुसा वेगळा करता येणार नाही असं मिसळलं जातं, त्यावेळी केवळ एकच मार्ग शिल्लक राहतो, तो म्हणजे पुरावे रद्द करणे. न्यायालय पूर्णपणे ननच्या जबाबावर अवलंबून राहून शकत नाही, त्यामुळं मी आरोपीची निर्दोष मुक्तता करत आहे," असं त्यांनी म्हटलं.

या निकालाने अनेकांना धक्का बसला. तसंच जेव्हा 289 पानांचं निकालपत्र सार्वजनिक करण्यात आलं, त्यानंतर त्यावरून देशात प्रचंड संताप पाहायला मिळाला. न्यायाधीश महिलेच्या आचरण आणि चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत असल्याचंही अनेकांनी म्हटलं.

आर्टिस्ट नवमी यांनी केरळच्या ननना समर्थन देण्यासाठी काढलेलं चित्र
फोटो कॅप्शन, आर्टिस्ट नवमी यांनी केरळच्या ननना समर्थन देण्यासाठी काढलेलं चित्र

"मी जेव्हा निकाल वाचला तेव्हा मला प्रचंड धक्का बसला होता. माझ्याकडे त्याचं वर्णन करण्यासाठी "ज्युडीशिअल पॉर्न" हे दोनच शब्द आहेत," असं इतिहासकार आणि स्त्रीवादी चळवळीच्या अभ्यासक जे देविका यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.

"हा आदेश फक्त बिशपना निर्दोष ठरवणाराच नव्हता, तर त्याचबरोबर फिर्यादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या ननचं मनोधैर्य खचवणाराही होता. ननने ज्याप्रमाणे सांगितलं होतं, त्या प्रकारच्या लैंगिक कृत्य आणि अत्याचाराचं त्यात वर्णन होतं. न्यायाधीशांनी अगदी स्तन तपासणीचा उल्लेखही त्यात केला होता. या सर्वाची काय गरज होती?" असं त्या म्हणाल्या.

हा निकाल म्हणजे, स्पष्टपणे "न्यायाच्या गर्भपाताचे" प्रकरण असल्याचं केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणाले. तसंच अनेक कार्यकर्ते आणि वकिलांनी महिलेच्या वर्तनावर केंद्रीत असल्यानं निकालावर टीका केली आहे.

बलात्कार पीडितेशी वर्तन करण्याची ही योग्य पद्धत आहे का? अशी विचारणा अनेकांनी केली. तसंच गेल्यावर्षी एका मॅगझिनचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्या सुटकेबरोबर याची तुलना करण्यात आली. त्यावेळीही फिर्यादी पीडितेला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

केरळच्या नन प्रकरणातही, न्यायाधीश गोपालकुमार यांनी विचारलं की, त्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बहिणीच्या घरी न राहता आरोपीबरोबर कॉनव्हेंटमध्ये का आल्या होत्या?

बलात्कार प्रकरणांमध्ये न्यायाधीशांनी महिलांच्या वर्तन किंवा चारित्र्याबद्दल मत मांडू नये असं सर्वोच्च न्यायालयानं वारंवार निकालांमध्ये सांगितलं आहे. आरोपीनं बलात्कार केला का? हा एकच प्रश्न त्यांनी विचारायला हवा, असंही न्यायालयानं म्हटंल आहे.

"पण यातून असं वाटतं की, याठिकाणी ननवर खटला सुरू होता," असं देविका म्हणाल्या.

"ज्या सामाजिक स्थितीमध्ये हा गुन्हा घडला त्याकडे न्यायाधीशांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. चर्चमध्ये वरिष्ठ ननच्या तुलनेत अगदी नव्या धर्मगुरूंनादेखील फारसं महत्त्वं नसतं. त्यात बिशप फ्रँको शक्तीशाली व्यक्ती आहे. पण न्यायाधीशांनी त्यांचा प्रभाव आणि ताकद याकडं दुर्लक्ष केलं," असंही त्या म्हणाल्या.

आता राज्य सरकार या निर्णयाच्या विरोधात उत्त न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्यानं, ननला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आहे.

"आमच्यापैकी काहीजण एकत्र आले आणि त्या नन तसंच त्यांच्याबरोबर लढणाऱ्या आणखी पाच जणींचं मनोधैर्य कायम राहावं म्हणून काही तरी करुया असं ठरवलं," असं सार्वजनिक धोरण क्षेत्रात काम करणाऱ्या आणि पत्र लिखाण मोहिमेच्या आयोजकांपैकी एक असलेल्या अथिरा सुजाता यांनी म्हटलं.

केरळच्या ननना पाठिंबा देणारं अथिरा आणि प्रियांका यांचं पत्र

शुक्रवारी ज्यावेळी न्यायाधीश गोपालकुमार यांनी निर्णय सुनावला होता बरोबर त्याचवेळी बुधवारी सकाळी 11 वाजता अथिरा यांनी इन्स्टाग्रामवर एक पत्र पोस्ट करून मोहीम सुरू केली.

"न्याय टिकवण्यासाठी खरं बोलून ठामपणे उभं राहण्याचं तुमचं हे धाडस हे केवळ याच प्रकरणातून बचावलेल्यांसाठीच नव्हे तर अशा प्रकारे सगळीकडे वाचलेल्यांसाठी आणि साक्षीदारांसाठी आशा आणि धैर्याची विलक्षण बाब आहे," असं त्यांनी लिहिलं.

दोन तासांतच त्यांना जवळपास 200 पत्रं मिळाली. तर 24 तासांत त्याचा आकडा 1000 च्याही वर गेला. अनेकांनी त्यांची पत्रं फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही शेअर केली, असं त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

अनेकांनी त्यांची पत्र "Sister X" (फिर्यादी नन) यांच्या नावानं लिहिली तर काहींनी "Sisters" म्हणजे ननला साथ देणाऱ्या पाच इतर ननचं कौतुक पत्राद्वारे केली.

अनेकांनी पत्रामध्ये त्यांचे वैयक्तिक अनुभव कथन केले. ननने दिलेल्या लढ्यामुळं त्यांनाही बोलण्याचं बळ मिळालं असं त्यांनी पत्रांत म्हटलं.

"अन्यायकारक वाटणाऱ्या या भूमीवर माझ्यासारख्या मुली तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही प्रेम, आदर आणि सन्मानास पात्र आहात. या अंधाऱ्या भुयाराच्या शेवटी नक्कीच प्रकाशाचा किरण असेल," असं प्रसिद्ध गायिका चिण्मयी श्रीपाद यांनी पत्रात लिहिलं.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

"हे काम कोणत्याही दृष्टीनं सोपं नाही. पण तुम्ही नक्कीच यात यशस्वी व्हाल," असं अभिनेत्री आणि दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी म्हटलं.

एका महिलेनं काही ननचे पेन्सिल स्केच रेखाटले आणि मल्याळममध्ये संदेश लिहित त्यांचं कौतुक केलं. "तुमचे धैर्य आणि चिकाटी याची तुलना होऊ शकत नाही. न्याय मिळवण्यासाठीची कोणतीही चळवळ निरर्थक ठरत नसते," असं त्यांनी लिहिलं.

लोकांना पत्र लिहिण्याचं आवाहन करणारी पोस्ट केली तेव्हा नेमकी लोकं कशा प्रकारची पत्र लिहितील याबाबत काहीशी शंका होती, असं अथिरा यांनी म्हटलं.

"पण आम्हाला एकही नकारात्मक पत्र मिळालं नाही. सिस्टर्सना आपला पाठिंबा हवा आहे याची लोकांना जाणीव आहे आणि ते त्यांना प्रोत्साहन देत आहेत."

मल्याळमध्ये लिहिलेल्या पत्रात देविका यांनी या सिस्टरची तुलना काजव्यांबरोबर केली आहे.

"असेही काही लोक असू शकतात जे म्हणतील की काजवे रात्रीच्या काळोखाचा सामना करू शकत नाही. मात्र, लाखो काजवे एकत्र आले तर या कधीही न संपणाऱ्या रात्रीवर ते सहज विजय मिळवू शकतात," असं देविका यांनी लिहिलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)