विमानात जन्मलं 'मिरॅकल' बाळ, डॉक्टरांनी विमानप्रवासात केली महिलेची प्रसुती

विमानात जन्मलेल्या बाळाची कहाणी

फोटो स्रोत, AISHA KHATIB

    • Author, मॅक्स मात्सा
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

युगांडाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एका गर्भवती महिलेची डिलीव्हरी झाली आणि एक तान्हुली सुरक्षितपणे या जगात आली. विमानतच ही डिलीव्हरी करणाऱ्या कॅनडाच्या डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला.

डॉक्टर आयेशा खातीब टोरंटो विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. कतार एअरवेजच्या दोहा ते एंटेब फ्लाईटमध्ये प्रवास करत असताना विमानात एक घोषणा करण्यात आली.

युगांडामधील एक स्थलांतरीत गर्भवती कामगार सौदी अरेबियाहून घराच्यादिशेने प्रवास करत असताना त्यांना प्रसुती वेदना सुरू झाल्या. ते त्यांचं पहिलं बाळंतपण होतं.

हे बाळ अवघं 35 आठवड्यांचं होतं. मात्र तरीही जन्मामंतर ते सुदृढ होतं. या बाळाचं नाव डॉक्टरांच्या नावावरून 'मिरॅकल आयेशा' असं ठेवण्यात आलंय.

टोरंटोमधल्या कोरोनाच्या अत्यंत थकवून टाकणाऱ्या कामाच्या दगदगीनंतर डॉक्टर खातीब या त्यांच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी आणि विश्रांतीसाठी निघाल्या होत्या.

मात्र, जेव्हा इंटरकॉमवर विमानात एखादा डॉक्टर आहे का? अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी जराही मागं-पुढं पाहिलं नाही.

"मला पेशंटच्या भोवती लोकांची गर्दी गोळा झालेली दिसत होती," असं डॉक्टर खातीब बीबीसी बरोबर बोलताना म्हणाल्या. हार्ट अटॅकसारखी एखादी आणीबाणीची परिस्थिती असेल असं त्यांना वाटलं होतं.

"मी जवळ जाऊन पाहिलं तर सीटवर एक महिला झोपलेली होती. तिचं डोकं आतल्या बाजूला आणि पाय खिडकीकडे होते. त्यावेळी बाळ बाहेर येऊ लागलं होतं!"

विमानात जन्मलेल्या बाळाची कहाणी

फोटो स्रोत, AISHA KHATIB

डॉ. खातीब यांना विमानातील इतर दोन प्रवाशांनी मदत केली. त्यापैकी एक परिचारिका आणि एक डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स संस्थेचे बालरोगतज्ज्ञ होते.

बाळ जोरानं रडत होतं, असं त्या म्हणाल्या. बाळाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांनी आणखी सखोल तपासणीसाठी ते बाळ बालरोगतज्ज्ञांकडे पाठवलं.

"मी बाळाकडं पाहिलं ती अगदी स्वस्थ होती. तसंच मी आईकडं पाहिलं तर तीही ठीक होती,"असं डॉ. खातीब म्हणाल्या.

"त्यामुळं मी लगेचच अभिनंदन मुलगी झाली असं म्हटलं. त्यानंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा मला अचानक लक्षात आलं की, आपण विमानात आहोत आणि सगळे आपल्याकडे पाहत आहेत."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"या संपूर्ण घटनेतील सर्वात चांगला भाग म्हणजे या महिलेनं तिच्या बाळाचं नाव माझ्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला."

त्यांच्या नावाची भेट म्हणून डॉक्टर आयेशा खातीब यांनी या बाळाला त्यांनी परिधान केलेली, अरबीमध्ये त्यांचं नाव - आयेशा लिहिलेली सोन्याची चेन भेट म्हणून दिली.

"मला वाटलं की मी तिला हे द्यायला हवे. त्यामुळं 35 हजार फूट उंचीवर नाइल नदीवरून उड्डाण घेत असताना तिला जन्म दिलेल्या डॉक्टरची आठवण तिच्याकडे कायम राहील."

ही प्रसुती 5 डिसेंबर रोजी झाली. मात्र डॉक्टर खातीब या कोव्हीड पेशंटवर उपचार करण्यात एवढ्या व्यस्त होत्या की, त्यांना या आठवड्यापर्यंत फोटो शेअर करायलाही वेळ मिळाला नव्हता.

18 डिसेंबरला त्यांना युगांडाहून परत बोलावण्यात आलं होतं. त्याठिकाणी स्थानिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं.

घरी परततानाही त्यांच्या विमानात वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती.

"सुदैवानं त्यावेळी विमानात दुसरे डॉक्टर होते," असं डॉ. खातीब हसत म्हणाल्या.

"मी म्हटलं, मी दोन आठवड्यांपूर्वीच विमानात बाळाला जन्म दिला आहे. आता ही केस तुम्ही पाहा. मदत लागली तर मी सीट नं 25A वर आहेच."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)